नेदरलँड म्हटलं की आपल्याला आठवतात ते तिथली टय़ुलिप्स, चीज आणि विंडमिल्स. तिथे गेलं की टय़ुलिप गार्डनमध्ये जायचे, विंडमिलसमोर उभे राहून आपले फोटो काढायचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चीजची खरेदी करायची, हे अगदी ठरलेलेच असते. पण त्यापलीकडे जाऊन या देशातली अगणित म्युझियम्स, अ‍ॅन फ्रँकचे घर, जागोजागी असलेली पेंटिंग्जची प्रदर्शने, लाकडी बूट, ब्लू पॉटरी अशा इतरही अनेक बघण्याजोग्या गोष्टी आहेत.
अ‍ॅमस्टरडॅमला ‘फुलांचे गाव’ म्हणतात. तिथल्या शिपॉल विमानतळावर मला एक चित्रांचे प्रदर्शन बघायला मिळाले. त्यात निरनिराळ्या चित्रकारांनी काढलेली ‘ब्लूबेल्स’ या थीमवर आधारीत दहा पेंटिंग्ज होती. असे कळले की, तिथे अधूनमधून एक थीम ठरवून त्या थीमनुसार चित्रे लावली जातात. फुलांच्या गावात आल्या आल्याच बघायला मिळालेली ती पेंटिंग्ज मला फुलांच्या दुनियेत घेऊन गेली.
याआधीच्या एका ट्रीपमध्ये टय़ुलिप्स, चीज बाजार, फुलांचा लिलाव हे सगळे बघून झाले होते. पण तरीही टय़ुलिप्स बघायचा मोह काही मला आवरला नाही. अ‍ॅमस्टरडॅम म्हणजे कालव्यांचे शहर. त्यातल्याच एका कालव्यामध्ये भरणारा फुलांचा तरंगता बाजार हा या खेपेला बघितलेला नवाच प्रकार. कॅनॉलमध्ये लाकडी तराफे टाकून त्यावर फुलांचा बाजार भरवलेला होता. कॅनॉलमधील बोटीतून फेरफटका मारायला गेलो असता आमची बोट या बाजारापाशी थांबली आणि आम्ही तिथे उतरून तो बाजार बघितला. असंख्य प्रकारची फुले, झाडे व फुलांशी निगडित अशा सगळ्या गोष्टी तिथे मिळत होत्या. फुलझाडांचे बी, कांदे, बागकामाचे साहित्य, सुंदर सुंदर सिरॅमिकच्या कुंडय़ा, प्लास्टिकची फुले आणि फुलांची पेंटिंग्ज.. सारे काही तिथे होते. इतकी सगळी फुले बघितली, पण अजून प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉगची सूर्यफुले बघायचे बाकी होते. व्हॅन गॉगच्या पेंटिंग्जचे पिंट्र्स, फोटो आणि त्या पेंटिंग्जची नक्कल पाहण्यात आली होती. आता ती चित्रे प्रत्यक्ष बघायला मिळणार या कल्पनेनेच मी हरखून गेले होते. असे म्हटले जाते की, या चित्रकाराच्या हयातीत त्याने काढलेल्या चित्रांना रसिकांकडून म्हणावी तशी दाद मिळाली नाही. पण आज जगभरातले लाखो लोक इथल्या व्हॅन गॉग म्युझियमला आवर्जून भेट देतात. तिथे निसर्गचित्रे, सेल्फ पोट्र्रेट्स, स्टिल लाइफस् , पेन्सिलची रेखाटने अशा व्हॅन गॉगच्या अनेक कलाकृती बघायला मिळाल्या. १८८६ ते १८८८ या काळात त्याने काही स्वत:ची पोट्र्रेट्स चितारली होती. त्यातले हॅट घातलेले आणि तोंडात पाइप धरलेले चित्र फारच परिणामकारक आहे. त्याची सूर्यफुले म्हणजे तर विचारायलाच नको. त्याच्या प्रत्येक पेंटिंगमधील भावना त्या फुलांच्या आयुष्याशी निगडित आहेत. संपूर्ण उमललेल्या सूर्यफुलाचा सळसळता पिवळा रंग जसा मनाला सुखावतो तसाच मरगळलेल्या आणि सुकलेल्या सूर्यफुलांचे काळपट पिवळे रंगही तोच परिणाम साधण्याची किमया करतात. सूर्यफुलाची बहुतेक चित्रे त्याने फ्रान्समधील अल्रेस या गावात काढलेली आहेत. त्यात तोडलेली सूर्यफुले, फूलदाणीमध्ये ठेवलेली सूर्यफुले तसेच सूर्यफुलांची शेतेच्या शेते काढलेली आहेत. तो संपूर्ण दिवस मी फुलांच्या दुनियेतच हरवून गेले होते.
अ‍ॅमस्टरडॅममध्ये अशा प्रकारची अगणित म्युझियम्स असल्याने त्याला ‘म्युझियम्सचे गाव’ असेही म्हटले जाते. अ‍ॅन फ्रँकचे घर हे एक अजब म्युझियम आहे. खरे तर अ‍ॅन फ्रँक ही एक अगदी सामान्य मुलगी. पण तिचे लहानपण अपवादात्मक परिस्थितीमुळे आगळे ठरले. अ‍ॅॅन व तिच्या आई-वडिलांना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जवळजवळ दोन वर्षे अज्ञातवासात राहावे लागले. त्यावेळी आलेले सगळे अनुभव अ‍ॅनने आपल्या डायरीत नोंद करून ठेवले आहेत. ही मूळ डायरी आणि अ‍ॅनच्या आणखी काही वस्तू आता कायमस्वरूपी प्रदर्शनाचा एक भाग झाल्या आहेत. तिथल्या प्रत्येक वस्तूमागे एक कहाणी आहे आणि त्यांचा केंद्रिबदू म्हणजे दुसरे महायुद्ध व त्यावेळची हिटलरची निष्ठुर हुकूमशाही राज्यव्यवस्था हाच आहे. अ‍ॅन फ्रँकच्या डायरीतील मजकूर वाचल्यावर व ते घर बघितल्यावर ती, तिचे कुटुंबीय आणि इतर लोक त्यावेळी तिथे कसे राहत होते आणि कोणत्या परिस्थितीतून जात होते याचे मूर्तिमंत चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. हे म्युझियम बघणे म्हणजे मन हेलावून टाकणारा अनुभव आहे. आजवर जगभरातील कोटय़वधी लोकांनी तो घेतला आहे.
शिल्पकार मारी तुसाँ यांनी बनविलेल्या मेणाच्या शिल्पांचे लंडनमधील संग्रहालय म्हणजेच जगप्रसिद्ध मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम. आज जगातील अनेक ठिकाणी त्याच्या शाखा प्रस्थापित झालेल्या आहेत. त्यापैकी १९७१ साली अ‍ॅमस्टरडॅमध्ये उभारलेले वॅक्स म्युझियम ही मादाम तुसाँ म्युझियमची लंडनबाहेरील पहिली शाखा. सर्वत्रच हे म्युझियम म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. त्या-त्या देशाच्या इतिहासातील, राजकीय, सिनेसृष्टी आणि क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींचे मेणाचे पुतळे या संग्रहालयात पाहायला मिळतात. ज्या जगप्रसिद्ध व्यक्तींना प्रत्यक्षात कधीही बघण्याचा योग येणार नाही अशा व्यक्तींच्या पुतळ्याशेजारी उभे राहून आपला फोटो काढून घेणे ही इथली खरी मजा असते. हे पुतळे अगदी खरे वाटावे इतके हुबेहूब बनवलेले आहेत.
क्लॉग्ज म्हणजे लाकडी बूट ही नेदरलँडची आणखी एक खासीयत. तेराव्या शतकापासून तिथले लोक असे लाकडी बूट वापरत आहेत. क्लॉग्जमुळे पावले कोरडी व सुरक्षित राहून थंडीच्या दिवसात ती उबदार राहतात. हे बूट खूप काळ टिकणारे व आरामदायी असल्यामुळे आजही कामकरी व शेतकरी लोक ते वापरताना दिसतात. क्लॉग्ज बनवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे खास लाकूड वापरतात. ओल्या लाकडाचे चौकोनी ठोकळे कापून त्यातून हे बूट बनवले जातात. पारंपरिक क्लॉग्ज पिवळ्या रंगाचे आणि त्यावर लाल रंगाचे चित्र असलेले असतात. आज अ‍ॅमस्टरडॅममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी क्लॉग्ज बनविणारी दुकाने आहेत. बहुतेक दुकानांच्या बाहेर एक मोठय़ा आकाराचा बुटांचा जोड ठेवलेला असतो आणि त्यात उभे राहून लोक आपले फोटो काढून घेत असतात.
डॅम स्क्वेअर हा अ‍ॅमस्टरडॅमचा मध्यवर्ती भाग. तिथे क्लॉग्ज, ब्लू पॉटरी, कृत्रिम टय़ुलिप्स, लहान आकाराच्या िवडमिल्स अशा अनेक वस्तू मिळण्याची खूप दुकाने आहेत. कायम गजबजलेल्या या भागात तीनशे वर्षांपूर्वी सिटी हॉलची इमारत बांधली गेली. कालांतराने म्हणजे अठराव्या शतकात नेपोलियनने त्याचे राजवाडय़ात रूपांतर केले. हाच तो आजचा रॉयल पॅलेस. अ‍ॅमस्टरडॅममध्ये तीन राजवाडे आहेत. नेदरलँडची राणी बिट्रिक्स या राजवाडय़ात राहत नाही. पण तिचे खास पाहुणे आणि नातेवाईकांसाठी हा राजवाडा राखून ठेवलेला आहे. राजवाडाच तो; त्यामुळे तिथली पेंटिंग्ज, काचेची झुंबरे, पुतळे सगळे काही भव्यदिव्य आणि डोळ्यांत साठवून ठेवावे असे आहे. या राजवाडय़ाचा बराचसा भाग आज पर्यटकांना बघता येतो.
अ‍ॅमस्टरडॅमला ‘कॅनॉल सिटी’ असेही म्हटले जाते. या गावाची मोहकता कालव्यांमधूनच अनुभवली पाहिजे. त्यासाठी आम्ही म्युझियम स्क्वेअरपासून बोटीत बसलो आणि नॅशनल म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशी सफर करून आलो. काही सफरींमध्ये बोटीतून उतरता येते, तर काही सफरींमध्ये फक्त लांबूनच स्थलदर्शन घडवतात.
बहुतेक सगळ्या कालव्यांच्या काठावर आणि रस्त्यावर सायकलसाठी वेगळा ट्रॅक असतो. त्यावरून अनेक लोक सायकलींवरून हिंडताना दिसतात. कालव्याच्या बाजूला किंवा रेल्वेस्टेशनच्या बाहेर साखळीने बांधलेल्या सायकली ठेवलेल्या असतात. लोक त्यात नाणे टाकून सायकल काढून घेतात. ते बघून आम्हालाही सायकलवरून फेरफटका मारायची हुक्की आली. मग काय, कालव्याकाठच्या सायकली घेऊन त्याच्या बाजूची असंख्य सोव्हिनियर शॉप्स आणि छोटी छोटी दुकाने बघत, कालव्याच्या पाण्यावरचा गार वारा अंगावर झेलत सायकलवरून मस्त रपेट केली. वाटेत कॉफी शॉपमध्ये थांबून तिथला माहोल अनुभवला. यामुळे यावेळची नेदरलँडची सफर अगदी वेगळ्याच प्रकारची झाल्याचे समाधान वाटले.

how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…