सिद्धार्थ खांडेकर siddharth.khandekar@expressindia.com

‘न्यूझीलंड क्रिकेट’ असे फॅन्सी नाव (क्रिकेट ऑस्ट्रेलियापेक्षा काही तरी निराळं करण्याच्या उद्देशाने) धारण करणारे न्यूझीलंड क्रिकेट मंडळ खरे म्हणजे क्रिकेट जगतातील सर्वाधिक कफल्लक मंडळांपैकी एक. क्रिकेटच्या चिमुकल्या क्लबमधला हा एक बऱ्यापैकी जुना सदस्य. गोऱ्यांची बहुसंख्या आणि ब्रिटिश वसाहत ही आद्य पात्रता. ऑस्ट्रेलियन महाद्वीपाच्या वळचणीला लागून असलेला हा चिमुकला द्वीपसमूह. त्यामुळे ऑस्ट्रेलियन प्रभावाखाली पूर्ण झाकोळलेला. म्हणूनच संधी मिळेल तेव्हा त्या प्रभावाच्या परिघाबाहेर पडण्यासाठी धडपडणारा. यात क्रिकेटपेक्षा रग्बीमध्ये अधिक यशस्वी ठरलेला. ऑस्ट्रेलियापेक्षाही न्यूझीलंडमधील मूळ अधिवासींना म्हणजे माओरींना तेथे अधिक सन्मानाने वागवले जाते. तेथील समाजजीवनातही माओरी अधिक यशस्वीरीत्या एकत्रित झालेले दिसतात. रग्बीमध्ये न्यूझीलंडने तीन वेळा जगज्जेतेपद पटकावले आहे. त्या संघात माओरी वंशीयांचा टक्का बराच वरचा आहे. न्यूझीलंडच्या राष्ट्रगीताचा सुरुवातीचा भाग माओरी असतो आणि झाडून सगळे गोरेही तो गाऊन दाखवतात. रग्बी सामन्याच्या आधी माओरींचे पारंपरिक युद्धनृत्य ‘हाका’ सादर केले जाते. ब्रिटिशांनी क्रिकेटला न्यूझीलंडमध्ये आणले. गेल्या सहस्रकात ग्लेन टर्नर, सर रिचर्ड हॅडली आणि मार्टिन क्रो हे तीनच खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे म्हणता येतील असे क्रिकेटपटू तिथे तयार झाले. तरीही ऐंशीचा अपवाद वगळता (त्या काळातील न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ खरोखरच गुणी होता. किमान चॅपेल बंधूंना अंडरआर्म चेंडू टाकायला उद्युक्त करावा इतका तरी!) न्यूझीलंडच्या संघाने अव्वल संघांना टक्कर दिल्याची फारशी उदाहरणे नाहीत. परदेशी भूमीवर कसोटी मालिका विजय नोंदवण्याचा पराक्रम भारताने न्यूझीलंडमध्येच प्रथम करून दाखवला होता. थोडक्यात, डोंगर-समुद्रावरील साहसी खेळ आणि रग्बी, तसेच काही प्रमाणात अ‍ॅथलेटिक्स वगळता इतर खेळांमध्ये आणि क्रिकेटमध्ये हा संघ मातब्बर म्हणून कधीच ओळखला गेला नाही. ऑस्ट्रेलियाप्रमाणे कोणत्याही खेळात, पण विशेषत: क्रिकेटमध्ये इंग्लंडवर कुरघोडी करण्याची जिद्द न्यूझीलंडने कधीही बाळगली नाही. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ‘थोरल्या भावाच्या दंडेली’विरुद्धचा राग तेवढा आजही दिसून येतो.

गेल्या दशकभरातला आणि विशेषत: सध्याचा न्यूझीलंडचा संघ हा ‘त्या’ न्यूझीलंडपेक्षा बराच सुधारित आणि कौशल्यसंपन्न आहे. सरत्या दशकात गेल्या दोन विश्वचषक स्पर्धामध्ये न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल झाला होता. आता कसोटी मालिकेत या संघाने भारताला ‘व्हाइटवॉश’ दिला आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियात याच न्यूझीलंडच्या संघाने कसोटी मालिकेत ०-३ असा मार खाल्ला होता. याउलट घरच्या दोन मालिकांमध्ये प्रतिस्पध्र्याना तुडवून भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला होता. नाणेफेक आमच्यासाठी महत्त्वाची नाही, असा दावा प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली करत होते. परदेशी खेळपट्टय़ांवर आपण बऱ्यापैकी जिंकू शकतो असा आत्मविश्वास गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने भारताला दिला होता. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला आपण २-१ असे हरवले आणि कसोटी इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून दाखवली. तो विजय कौतुकास्पदच. तेव्हा न्यूझीलंडमध्ये चुरशीच्या लढती पाहावयास मिळतील अशी अपेक्षा होती. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत अनुक्रमे भारत आणि न्यूझीलंडला निर्भेळ यश मिळाल्यानंतर कसोटी मालिकेत तुल्यबळ संघांतली लढतीची अपेक्षा होती, ती फोल ठरली. प्रत्यक्षात २००२मधील न्यूझीलंड मालिकेसारखीच याही मालिकेत भारताची अवस्था झाली. दोन मालिकांमध्ये विलक्षण साम्यस्थळे आढळतात. त्या मालिकेत भारत दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे १० आणि ४ विकेट्सनी हरला. या मालिकेतील पराभव अनुक्रमे १० आणि ७ विकेट्सनी होते. त्या मालिकेत कर्णधार सौरव गांगुलीची सरासरी होती ७.२५. या मालिकेत विराटने ३८ धावा जमवल्या त्या ९.५०च्या सरासरीने. दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येक सामन्यात नाणेफेक न्यूझीलंडच्या कर्णधाराने जिंकली होती आणि प्रत्येक वेळी भारताला फलंदाजीस धाडले होते. १६१, ९९, १६५, २४२ या एरवी एखाद्या मालिकेत विराट कोहलीच्या वैयक्तिक धावा ठरू शकल्या असत्या. पण न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघ पहिल्या डावात इतक्याच धावा उभारू शकला. दोन्ही मालिकांमध्ये दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली. पण भारताला वर्चस्व टिकवता आले नाही. एकाही भारतीय फलंदाजाला शतकी मजल मारता आली नाही. २००२मध्ये न्यूझीलंडच्या साडेसहा फुटी जेकब ओरमने कसोटी पदार्पण केले होते. २०२०मध्ये ६ फूट ८ इंच उंची असलेला काइल जेमिसन याने पदार्पण केले. या दोघा अष्टपैलू क्रिकेटपटूंनी आपापल्या संघांच्या विजयात भरीव योगदान दिले.

न्यूझीलंडविरुद्ध आपण अनेकदा अनपेक्षितपणे गळपटतो हा अनुभव आहे. विश्वचषक २०१९ची उपांत्य फेरी असो वा उपरोल्लेखित कसोटी मालिका असोत, न्यूझीलंडला कमी लेखणे हेच बहुतेकदा आपल्या पतनाचे कारण ठरलेले आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांच्याविरुद्ध आपण गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत राहण्याइतपत कौशल्य आणि मानसिक कणखरपणा आत्मसात केलेला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्याविरुद्ध आपण अनेकदा जिंकतो. श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध बहुतेकदा जिंकतो. न्यूझीलंडविरुद्ध मात्र आपली कामगिरी तितक्या सातत्याने होत नाही. आपल्यासारखीच चूक इतर संघही करतात. न्यूझीलंडकडे भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याइतकी समृद्ध क्रिकेट संस्कृती किंवा सुसज्ज प्रशिक्षण, सराव सुविधा नाहीत. तरुणांचा मोठा वर्ग साहसी खेळ आणि रग्बीकडे साहजिकपणे वळतो. उर्वरित ‘टॅलेंट पूल’मध्ये क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल खेळांसाठी चढाओढ असते. ऑस्ट्रेलियाइतकी नाही, तरी न्यूझीलंडमध्ये क्रीडासंस्कृती बऱ्यापैकी रुजलेली आहे. पण क्रिकेटसाठी अवाढव्य यंत्रणा उभी करावी, इतका पैसा तेथील मंडळाकडे नाही. आयपीएल सुरू झाल्यानंतर या लीगकडे मोठय़ा प्रमाणात क्रिकेटपटू वळू लागले. आयपीएलच्या पैशाला भुलून मुदतीआधी निवृत्त होऊ लागले. त्यावेळी म्हणजे सरत्या दशकाच्या सुरुवातीला न्यूझीलंड क्रिकेटसाठी खडतर काळ होता. परंतु झिम्बाब्वेप्रमाणे न्यूझीलंडमधील क्रिकेट संस्कृती समूळ नष्ट होऊ शकली नाही. उलट केन विल्यमसनसारखे अनेक चांगले युवक या खेळाकडे वळू लागले. टीम साउदी, रॉस टेलर यांनी आयपीएल किंवा तत्सम व्यावसायिक लीगपेक्षा न्यूझीलंडला प्राधान्य दिले. बडय़ा खेळाडूंना तनखा देता यावा यासाठी न्यूझीलंडमधील सहा स्थानिक संघांनी आपला खर्च कमी केला! इतर देशांप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर गुणवत्ता येथे आढळत नाही. पण एक संघ म्हणून आपल्या मर्यादेच्या चौकटीत हे क्रिकेटपटू सर्वस्व पणाला लावतात. अनेक विश्लेषकांच्या मते, न्यूझीलंडचा सध्याचा संघ त्यांच्या इतिहासातील सर्वोत्तम आहे. ते खरे असू शकते. कारण घरच्या मैदानावर त्यांनी इंग्लंड आणि भारत या मातब्बर कसोटी प्रतिस्पध्र्याना मात दिलेली आहे. विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल ‘विराट’ प्रश्न उपस्थित करून ठेवले आहेत. फार कमी संघांना अलीकडच्या काळात ही किमया करून दाखवता आलेली आहे.