|| राजीव बर्वे

पां. ना. कुमठा यांनी तब्बल ४८ वर्षे ‘बॉम्बे बुक डेपो’च्या माध्यमातून मराठी ग्रंथविक्री व प्रकाशन व्यवहाराचे उत्तम नेतृत्व केले. कोणत्याही प्रकाशकाला आपलंसं वाटणारं मुंबईतलं हक्काचं ठिकाण म्हणजे बॉम्बे बुक डेपो! मराठी प्रकाशकांचं जणू माहेरघरच! ग्रंथव्यवहारातील सर्वांना आदरणीय वाटणाऱ्या पां. ना. कुमठा यांच्या जन्मशताब्दी (२५ मे) निमित्ताने…

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

 

पांडुरंग नागेश कुमठा ऊर्फ पां. ना. कुमठा आज हयात असते तर शंभर वर्षांचे असते. वयाची ९८ वर्षे गाठलेले कुमठा खरं तर शंभर वर्षे नक्की जगतील असे सर्वांनाच वाटत होते. सात दशकांहून अधिक काळ मराठी पुस्तकांच्या दुनियेत रमलेला हा भीष्माचार्य! असंख्य पुस्तकप्रेमींना आपलासा वाटणारा, स्वत: उत्तम वाचक असलेला आणि ग्रंथविक्रेत्यांचा, प्रकाशकांचा पितामहच!

प्रदीर्घ आयुष्य लाभणं ही आजच्या काळात फार अप्राप्य गोष्ट राहिलेली नाही. पण वयाच्या ९७-९८ वर्षांपर्यंत कार्यरत राहणं, पुस्तकांत रमणं, आवडलेल्या पुस्तकांविषयीची स्वत:ची मतं, परीक्षणं लेखकांना प्रदीर्घ पत्र पाठवून कळवणं, प्रकाशकांचंही चांगल्या पुस्तकाबद्दल कौतुक करणं आणि प्रकाशकांना मार्गदर्शन करणं हे कुमठाशेठ यांचं काम अगदी शेवटपर्यंत चालू होतं.

माझे वडील प्रा. द. के. बर्वे आणि कुमठा दोघेही बेळगावचे आणि बालमित्र. साधारण एकाच वयाचे. वडिलांचा जन्म खुद्द बेळगावचा, तर कुमठांचा बैलहोंगल येथला. पण त्यांचे शालेय शिक्षण बेळगावमध्येच झाले. माझ्या वडिलांची मातृभाषा मराठी, तर कुमठांची कोंकणी. पुढे शाळेमध्ये ते कानडीतून शिकले. माझे वडील, जी. ए. कुलकर्णी वगैरे मित्रांमुळे कुमठा मराठी बोलायला शिकले. पुढे त्यांनी जाणीवपूर्वक संस्कृत विषय घेतला. त्यामुळे त्यांची देवनागरी लिपी आणि मराठी आणखी पक्के झाले. सांगायचा मुद्दा हा की, कानडीत शिक्षण झालेला, उत्कृष्ट इंग्रजी आणि संस्कृत भाषा आत्मसात केलेला हा कोंकणी माणूस आयुष्यभर मराठी पुस्तकांत रमला.

१ एप्रिल १९४८ ला पां. ना. कुमठा यांनी भटकळांच्या ‘बॉम्बे बुक डेपो’चे संचालकपद स्वीकारले. तत्पूर्वी १९४५ ते ४८ ‘पॉप्युलर बुक डेपो’ या इंग्रजी पुस्तकांच्या दुकानापासून सुरू झालेली त्यांची ग्रंथांच्या दुनियेतील वाटचाल ‘बॉम्बे बुक डेपो’ या गिरगावातल्या दुकानी येऊन स्थिरावली. तेथून पुढे तब्बल ४८ वर्षे बॉम्बे बुक डेपोच्या माध्यमातून त्यांनी जणू मराठी ग्रंथविक्री व्यवसायाचे अतिशय दर्जेदार असे नेतृत्व केले. कोणत्याही प्रकाशकाला- मग तो जुना असो अगर नवीन- आपलंसं वाटणारं मुंबईतलं हक्काचं ठिकाण म्हणजे बॉम्बे बुक डेपो! मराठी प्रकाशकांचं जणू माहेरघरच!

नवीन पुस्तकं कुमठाशेठना दाखवायला घेऊन येणारा प्रकाशक कधीही विन्मुख परत जात नसे. बहुतेक प्रकाशक पुण्याहून मुंबईला जात. काही बाहेरगावाहूनही येत. चोहोबाजूंनी पुस्तकांच्या सान्निध्यात टेबल-खुर्चीवर बसलेले कुमठा अत्यंत आपुलकीने सर्वांचं स्वागत करीत. प्रवासाने दमून आलेल्या प्रकाशकाला चहापाणी तर होईच; पण त्या प्रकाशकाने आणलेले पुस्तक चाळून, त्या पुस्तकाचे मलपृष्ठ व प्रस्तावना वाचून कुमठा त्या पुस्तकासंबंधी प्रकाशकाशी चर्चाही करीत. आणि मग पुस्तकाच्या दर्जानुसार पंचवीस ते शंभर प्रतींची ऑर्डर घेऊन प्रसन्न मनाने प्रकाशक तेथून बाहेर पडे.

ग्रंथविक्री दालनात लेखकांचा राबता आता महाराष्ट्रात कुठेच नाही; पण बॉम्बे बुक डेपोत मात्र असंख्य प्रसिद्ध-अप्रसिद्ध लेखक हक्काने पुस्तके चाळताना, कुमठांशी चर्चा करताना दिसत. त्यामध्ये आचार्य अत्रे, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी, पु. ल. देशपांडे, पंढरीनाथ रेगे, शं. ना. नवरे ही मंडळी आम्ही प्रकाशक त्यांच्या दुकानात गेलो की हमखास दिसत. जयवंत दळवी ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने दर महिन्याच्या ‘ललित’ मासिकात एक सदर लिहायचे. अनेक लेखकांवरच्या मिश्कील टिप्पणी, न बोचणाऱ्या, पण गुदगुल्या करणाऱ्या साहित्य क्षेत्रातील घडामोडी त्यात असत. प्रसंगानुरूप साहित्यिकांची खिल्ली उडवणारं हे सदर चांगलंच लोकप्रिय झालं होतं. तमाम वाचकांना हा ‘ठणठणपाळ’ कोण, याची प्रचंड उत्सुकता होती. त्या वेळेला कुमठा ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा कार्यक्रम बॉम्बे बुक डेपोत राबवायचे. त्यात कुमठांनी एक दिवस जाहीर केलं की, ‘आज ठणठणपाळ अवतीर्ण होणार!’ आणि त्या दिवशी बॉम्बे बुक डेपोत अनेक नामवंत साहित्यिक, कलावंत, प्रकाशक यांनी प्रचंड गर्दी केली. अगदी पुण्याहून लेखक, प्रकाशक तेथे पोहोचले. ‘ठणठणपाळ म्हणजे जयवंत दळवी!’ हे कुमठांनी तेथे जाहीर केले आणि वास्तवदर्शी, गंभीर लेखन करणारे कथा- कादंबरीकार जयवंत दळवीच हे खुसखुशीत आणि विनोदी सदर लिहितात हे तमाम वाचकांना तेथे समजले.

आजच्या महाराष्ट्रातील ग्रंथविक्रीच्या दालनांचा पाया पां. ना. कुमठांच्या बॉम्बे बुक डेपोने घातला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. बॉम्बे बुक डेपो हे केवळ पुस्तकांचे दालन नव्हते, हे त्याचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य!  केवळ ग्रंथविक्रीच नाही, तर साहित्यविषयक उपक्रमांचे ते केंद्र बनले. दूरदर्शनचा घराघरांत प्रवेश होण्यापूर्वी अभिरुचीसंपन्न पुस्तके घराघरांत पोहोचवून मराठी वाचकांना पुस्तकांची आवड निर्माण करण्याचे काम करणारी जी थोडी दालने महाराष्ट्रात त्या काळात होती, त्यातले आद्य दालन म्हणजे बॉम्बे बुक डेपो. त्या अर्थाने मराठी मनाची सांस्कृतिकता जोपासण्याचे मोठे काम बॉम्बे बुक डेपोने केले. पुस्तक पंढरी, बालसाहित्य जत्रा यांसारखे प्रयोग राबवून असंख्य वाचकांची पुस्तकांशी मैत्री कुमठांनी करून दिली. पुस्तक गाजलं की त्या लेखकाला बॉम्बे बुक डेपोत बोलवावं, लेखक आणि वाचकांची प्रत्यक्ष भेट घडवून आणावी, प्रत्यक्ष त्या लेखकाची स्वाक्षरी घेऊन वाचकाला ते पुस्तक सहर्ष द्यावं… असं सगळं त्यांचं चाललेलं असायचं! स्वत: कुमठांचं वाचन अफाट होतं. त्यामुळे ते खरेदीसाठी आलेले प्राध्यापक, ग्रंथपाल किंवा सामान्य वाचकांचे मार्गदर्शकही असत. एखादा ग्रंथविक्रेता अशा पद्धतीने मार्गदर्शक असू शकतो, हे आज कदाचित खरंही वाटणार नाही. प्रकाशकांचे तर ते मार्गदर्शक होतेच; एखादं पुस्तक का खपलं नाही, एखादी कादंबरी कुठे रेंगाळली, अशी निरीक्षणे प्रकाशकांना सांगून काय व कसं प्रकाशित करायला हवं, हे काहीही हातचं न राखता ते सांगत असत. एखाद्या गरजू प्रकाशकाला वैयक्तिक पातळीवर जाऊन ते आर्थिक मदतही करीत.

१९७६ साली माझ्या पिताजींबरोबर मी सर्वप्रथम बॉम्बे बुक डेपोत गेलो होतो, तेव्हा पहिल्यांदा कुमठांना पाहिलं. प्रसन्न हसरा, गोरा चेहरा, मोठे कपाळ, मोठ्या फ्रेमचा चष्मा, मध्यम उंची आणि चेक्सचा हाफ शर्ट… अशी त्यांची मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यानंतर त्यांच्या असंख्य भेटी झाल्या. उद्योगपती रावसाहेब बा. म. गोगटे यांचे ‘सागरमेघ’ हे चरित्र माझे वडील प्रा. द. के. बर्वे यांनी लिहिले होते. ही गोष्ट १९८१ सालची.  हे चरित्र दिलीपराज आणि बॉम्बे बुक डेपो यांनी संयुक्तपणे प्रकाशित करावे असे ठरले होते. ओबेरॉय हॉटेलच्या वरच्या मजल्यावर रावसाहेबांच्या स्पेशल रूममध्ये माझे वडील, कुमठा आणि रावसाहेब बा. म. गोगटे यांची बैठक झाली. मुंबईमध्ये नामदार यशवंतराव चव्हाण आणि उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ करायचा असे ठरले. ८ जानेवारी १९८२ ही प्रकाशन समारंभाची तारीखही ठरली. आणि अचानक हृदयविकाराने २५ डिसेंबर १९८१ ला- म्हणजे प्रकाशनाच्या जेमतेम १०-१२ दिवस अगोदर माझ्या वडिलांचे देहावसान झाले. एवढ्या मोठ्या माणसाचे एवढे मोठे पुस्तक तोपर्यंत दिलीपराजने प्रकाशित केले नव्हते. त्यात प्रमुख पाहुण्यांची नावे घालून पत्रिकाही छापून झालेल्या. कार्यक्रम पुढं ढकलावा किंवा रद्द करावा असं त्यावेळी अतिशय अननुभवी असलेल्या मला वाटू लागलं. पण कुमठा तातडीने पुण्याला आले. मला त्यांनी धीर दिला. ‘सागरमेघ’च्या एक हजार प्रतींचा अ‍ॅडव्हान्स चेक माझ्या हातात ठेवला. ‘अजून समारंभाला दहा दिवस आहेत. (मला ते त्यांच्या मुलाच्या वयाचा असूनही ‘अहो’च म्हणायचे!) तुम्ही छपाई सांभाळा. मी कार्यक्रमाचं बघतो. पण कार्यक्रम पुढं ढकलायचा नाही. (माझ्या वडिलांना आम्ही ‘भाऊ’ म्हणायचो.) भाऊंचा फोटो ठेवून कार्यक्रम करू या. यशवंतराव आणि शंतनुराव यांच्या उपस्थितीत उद्योगपती बा. म. गोगटेंचं चरित्र दिलीपराजने प्रकाशित केलं की दिलीपराजचं एकदम महाराष्ट्रभर नाव होणार आहे. ही संधी गमवायची नाही,’ असं सांगून त्यांनी मला धीर दिला. आणि ठरल्याप्रमाणे मोठ्या दिमाखात कार्यक्रम पार पडला. प्रमुख वर्तमानपत्रांतून प्रकाशन समारंभाच्या फोटोसह मोठ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. वडिलांबरोबरच्या बालमैत्रीला कुमठा जागले होते आणि मित्र गमावल्यानंतर मित्राच्या मुलालाही त्यांनी भक्कम आधार दिला होता.

पुण्याला आल्यावर अगदी चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत ते आमच्याकडे आल्याशिवाय राहत नसत. अगदी ईहलोक सोडण्याच्या एक महिना अगोदरपर्यंत दूरध्वनीवर अगर पत्ररूपाने ते आमच्या पाठीशी उभे होते. कधी सल्लागार म्हणून, तर कधी अभिनंदनासाठी! हे फक्त माझ्याच बाबतीत नव्हे, तर अशा असंख्य प्रकाशकांच्या आयुष्यातला एक कप्पा कुमठांनी आपल्या प्रेमाने, स्नेहाने व्यापला होता. अत्यंत ऋजुता आणि विनम्रता तर त्यांच्या स्वभावात होतीच; पण कोणत्याही अभिनिवेशाव्यतिरिक्त शांतपणे आपली मते मांडायचे कसबही त्यांच्यात होते. एक विलक्षण प्रेमळपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. जेवढे आम्हा प्रकाशकांवर ते प्रेम करायचे, तेवढेच त्यांचे ४५ वर्षे सहकारी असलेल्या झांट्येंवर करायचे. बोलताना झांट्येंचं नाव त्यांच्या तोंडी अगदी शेवटपर्यंत असायचं.

पाच वर्षांपूर्वी त्यांचा ९५ वा वाढदिवस होता. २५ मे’ला मुलगा, सून, नातू यांनी पुण्यात भूगावला मुलाच्या नवीन घरी तो साजरा केला. वाढदिवस साजरा केल्याबद्दल आणि पुण्याला मुलाने छान घर घेतलं याचा कोण आनंद त्यांना झाला होता! २४ तारखेला रात्री ते मुंबईहून पुण्याला आले. कार्यक्रम संपवून २६ तारखेला लगेच मुंबईला सगळ्यांबरोबर गेलेदेखील!

चार वर्षांपूर्वी मराठी प्रकाशक संघाने त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल जीवनगौरव पुरस्कार दिला, त्यालाही ते मुंबईहून आले. सत्काराच्या उत्तराच्या भाषणाकरिता दिलेली खुर्ची बाजूला सारून अर्धा तास उभं राहून त्यांनी भाषण केलं. आई-वडिलांवरील श्रद्धा, वाचन, नियमितता आणि होकारात्मक विचारसरणी ही त्यांच्या प्रदीर्घ आणि संपन्न आयुष्याची सूत्रे या भाषणातून सर्वांना समजली. त्यानंतर कुमठा शंभर वर्षे नक्की जगतील असं त्यांची चांगली तब्येत पाहून वाटत होतं. फेब्रुवारी १९ मध्ये एका पुस्तकाचं उत्तम रसग्रहण त्यांनी पाठवलं होतं. दूरध्वनीवरही संभाषण झालं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. स्वत:ला ते ‘पुस्तक पंढरीचा वारकरी’ म्हणत. २८ मार्च २०१९ ला हा वारकरी वैकुंठवासी झाला. साहित्य क्षेत्राचा आधारस्तंभ असलेला हा पंढरीचा वारकरी कसला? हा तर ग्रंथप्रेमींचा आणि प्रकाशकांचा पंढरीचा पांडुरंगच होता!

(लेखक अ. भा. मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष आहेत.)

rajeevbarve19@gmail.com