डॉ. रणधीर शिंदे – randhirshinde76@gmail.com

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा दस्तावेज असलेली ज्येष्ठ कार्यकर्ते पन्नालाल सुराणा, पुष्पा भावे आणि विजय विल्हेकर यांची आत्मकथनं मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहेत. त्यांचा परिचय करून देणारा लेख..

सामाजिक चळवळींतील ज्येष्ठ कार्यकर्ते-नेते, विचारवंत पन्नालाल सुराणा, पुष्पा भावे व विजय विल्हेकर यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. यात  सुराणा यांचे ‘पायपीट समाजवादासाठी- एका निष्ठावंताचं आत्मकथन’, पुष्पा भावे यांचे ‘लढे आणि तिढे- चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी’आणि विजय विल्हेकरांचे ‘ फकिरीचे वैभव- एका कार्यकर्त्यांचे वेदनाकथन’ या तीन पुस्तकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ, राजकारण, महाराष्ट्र मन आणि विचारविश्व समजून घेण्यासाठी ही आत्मकथने महत्त्वाची आहेत. या तिघांच्याही कार्यात आणि भूमिकांत परस्परपोषक अशी सुसंगतता आहे. समाजवादी निष्ठा, शेतकरी, स्त्रिया आणि वंचितांचे प्रश्न हे समान सूत्र त्यांच्या विचारकार्यात सामावलेले आहे.

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि आयुष्यभर कार्यकर्ते म्हणून जीवन जगणाऱ्या पन्नालाल सुराणा यांचे ‘पायपीट समाजवादासाठी’ या आत्मकथनातून त्यांच्या जीवनप्रवासाबरोबरच महाराष्ट्र तसेच भारतातील समाजवादी राजकारणाचा पट साकारला आहे. सुमारे ७० वर्षांहून अधिक काळ पन्नालाल सुराणा समाजवादी चळवळीत एकांडय़ा ध्येयनिष्ठेने कार्यरत आहेत. स्थानिक समाजकारण ते राष्ट्रीय सामाजिक चळवळींशी त्यांचा संबंध आला. स्वातंत्र्यपूर्व काळातील सेवादलापासून ते ‘द सोशालिस्ट पार्टी’पर्यंत त्यांचा प्रवास यात उलगडला आहे. समाजवादी पक्षाशी निगडित एस. टी. कामगार, मिल मजदूर संघ, राष्ट्र सेवा दल, समाज प्रबोधन संस्था, हमाल पंचायत, सानेगुरुजी कथामाला या संघटनांच्या पुनर्बाधणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जनता पक्षाचे नेते, संपादक, विश्वस्त, लेखक, महाराष्ट्र आणि भारतीय राजकारण तसेच अर्थशास्त्राचे अभ्यासक अशी त्यांची ओळख असली तरी समाजवादी चळवळ व गांधीविचारांवर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांचे हे प्रांजळ निवेदन आहे. आणीबाणीतील चळवळीत सुराणा यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या काळातील काँग्रेस नेतृत्वाचे हुकूमशाही धोरण ते विरोधी पक्षातील नेत्यांची भूमिका, मतप्रवाह  यासंबंधीचे चित्रण यात आले आहे. त्या काळातील जनसंघाच्या भागीदारीबद्दल पक्षात असणारे मतभेदही त्यांनी नोंदवले आहेत. त्या काळातील जयप्रकाश यांच्या दैनंदिनीतील ‘कैसे बैठू किनारे पर जब लहरों का निमंत्रण’ या ओळींचा दाखला त्यांनी यासंदर्भात दिला आहे. सुराणांचा राजकारणातील सहभाग, जनता पक्षाला निवडणुकीत मिळालेले अपूर्व यश आणि अल्पकाळातच दुभंगलेल्या या पक्षातील घडामोडींचे अनुभव त्यांनी कथन केले आहेत. ‘कुकरमध्ये कोंडलेली वाफ झाकण काढल्याबरोबर बाहेर यावी तसे झाले’ असे या काळातील वातावरणाची त्यांनी मीमांसा केली आहे. त्यात समाजवादी पक्षाचे राजकारण व वळणवाटांचे चित्रण आहे. पन्नालाल सुराणा यांच्या जडणघडणीचे व वैचारिक भूमिकांचे कथन यात आहे. समाजवादी चळवळीतील अंतर्विरोधाची त्यांनी केलेली मांडणी सुस्पष्ट आहे. ‘पक्षनेत्यांचे कार्य मोठे, तसेच हेवेदावेही मोठे’ या शब्दांत त्यांनी त्याचे वर्णन केले आहे. शेतकरी कामगार पक्ष व कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणातील भूमिकांबद्दल त्यांनी नोंदवलेली  निरीक्षणे महत्त्वाची आहेत. सुराणा यांच्या पक्षीय राजकारणाबरोबरच समाजकार्याचेही विस्ताराने चित्रण यात आहे. तरुणपणी बिहारमधील सोखोदेवरा आश्रमातील सहभागापासून ग्रामीण विकासासंदर्भातील त्यांच्या कार्याचा भाग त्यात आहे. आयुष्याच्या उत्तरकाळात ग्रामीण विकासाचा ध्यास म्हणून वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड, पाणलोट विकास क्षेत्र आणि नळदुर्गमधील ‘आपले घर’सारख्या अभिनव सामाजिक प्रयोगाविषयीचे कथन यामध्ये आले आहे. ‘गणगोत’मध्ये कुटुंब, आजी व आईबद्दल अत्यंत भावपूर्ण असे निवेदन येते. पत्नी वीणा यांच्या हृद्य आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, मधू लिमये, जॉर्ज फर्नाडिस यांच्या कार्याबद्दलच्या आठवणी यात आहेत. अतिशय तळमळीने राष्ट्रउभारणीसाठी समाजवादी विचारांवर अढळ निष्ठा ठेवून लढणाऱ्या नेत्याचे हे निवेदन आहे.  इतर वेळी विचार व आचारांमुळे पन्नालाल सगळ्यांना ‘आपले’ वाटतात. मात्र निवडणुकीत ते ‘आपल्यापैकी’ आहेत असे वाटत नाहीत असे भाई वैद्य यांनी म्हटले होते ते खरेच आहे. अशा ध्येयनिष्ठ पन्नालाल  सुराणा यांचा जीवनपट जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

‘लढे आणि तिढे- चिकित्सक गप्पा पुष्पाबाईशी’ (मुलाखत- मेधा कुलकर्णी) हे सामाजिक चळवळीतील कृतिशील कार्यकर्त्यां, निर्भीड विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांच्या मुलाखतीचे शब्दांकन आहे. भावे यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांचे समाजकार्य आणि विचारविश्वाचा आविष्कार त्यामधून दिसतो.  महात्मा फुले, एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन परंपरा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक विश्वभानाचा खोलवर परिणाम-प्रभाव असलेल्या पुष्पाताईंचे परखड विचार यातून व्यक्त झाले आहेत. रंगभूमीविषयीचे मूलभूत चिंतन यात आहे. नव्या रंगभाषेचा शोध,  सामाजिक बांधिलकीचे स्वरूप, कर्तबगार  रंगकर्मीच्या वैशिष्टय़ांचा त्यांनी घेतलेला शोध महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारण-समाजकारणासंबंधीची महत्त्वाची माहिती यातून पुढे आली आहे. शिवसेनासारख्या पक्षाची उभारणी, वाटचाल, अंतर्विरोध, भ्रामक भावनिक भाषाआवाहनामुळे हा पक्ष लोकप्रिय ठरल्याची मीमांसा त्यांनी केली आहे. राजकीय पक्षांचे ‘सोशल ऑडिट’ होत नसल्याने भारतीय राजकारणाला वेगळे वळण लागल्याचे त्या ठासून सांगतात. रमेश किणी मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात  खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणात पुष्पा भावे निर्भीडपणे उतरल्या आणि खंबीरपणे न्यायालयीन लढाई लढल्या. या लढय़ाचा इतिहास यात आलेला आहे. या लढय़ात रमेश किणी यांच्या पत्नीने दाखवलेल्या धैर्याची त्या आवर्जून नोंद घेतात.

भावे यांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अलीकडील काळात आकाराला आलेल्या ‘हितसंबंधी राजकारणाची चिकित्सा’ हा आहे. या राजकीय हितसंबंधांचे समाजमनावर झालेल्या परिणामांची नोंद त्यात आहे. धर्म आणि विवेक, अध्यात्म व जागतिकीकरण, तसेच संकोचत गेलेल्या चळवळींची त्यांनी केलेली  चिकित्सा मननीय आहे. भारतातील स्त्रीवादी चळवळीची त्यांनी केलेली मांडणी मूलभूत स्वरूपाची आहे. समतेच्या वाटेवरील स्त्रीवादी चळवळीतली सकारात्मकता आणि मानवी जीवन अधिक उन्नत करणारी बाईपणाची दृष्टी या चिंतनातून व्यक्त झाली आहे. गं. बा. सरदार, नलिनी पंडित त्यांच्या कामगिरीबद्दल तसेच डॉ. श्रीराम लागू यांचे सामाजिक काम आणि त्यांच्या अभिनय कामगिरीबद्दल अतिशय मार्मिक नोंदी पुष्पाताईंनी नोंदवल्या आहेत. यात विद्या बाळ, मेधा पाटकर, वंदना भागवत, नीरजा, प्रतिमा जोशी यांचे पुष्पाताईंच्या कार्यावरील लेखही समाविष्ट आहेत. अमोल पालेकर यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ‘अशा आदर्शाच्या जोरावरच समकालीन मिंधेपणाच्या दलदलीत आपण तग धरून आहोत.’ या दृष्टीत पुष्पा भावे यांचे समाजकार्य, जडणघडण, विचारविश्व व निर्भीडपणा समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.

विदर्भातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते, नेते विजय विल्हेकर यांचे ‘फकिरीचे वैभव’ हे या मालेतील एक महत्त्वाचे आत्मकथन होय. त्याला त्यांनी ‘एका कार्यकर्त्यांचे वेदनाकथन’ असे उपशीर्षक दिले आहे. ४० वर्षांतील शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा व लोकलढय़ांचा इतिहास या आत्मनिवेदनातून साकारला आहे.  आपल्या कौटुंबिक पाश्र्वभूमीपासून  लोकआंदोलनातील सहभाग तसेच शेतकरी आंदोलनाविषयीचे कथन त्यांनी निवेदिले आहे.  हा प्रवास अर्थातच आनंददायी नव्हता, तर वेदनादायी व अस्वस्थ करणारा आहे. शेतकरी चळवळीने हाती घेतलेले शेतीमालाचे प्रश्न यात चर्चिले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या अस्वस्थ कहाण्या आणि त्यांचे अनेक कंगोरे त्यातून मांडले आहेत. राज्यकर्त्यांकडून नाडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवी कथा यात आहेत.  जयप्रकाश नारायण व शरद जोशी यांच्या विचारांवर निष्ठा असणाऱ्या या फकिरी  कार्यकर्त्यांचा जीवनप्रवास यातून उलगडलेला आहे. विल्हेकरांच्या प्रवाही शैलीतील वृत्तांतकथनातून व्यक्तिकार्य व त्याच्याशी निगडित घडामोडींतून शेतकरी चळवळीचा इतिहास साकारला आहे. विशेषत: या लेखनात कार्यकर्त्यांच्या सामूहिक कार्याचा इतिहास आहे. सामान्य कार्यकर्त्यांची धडपड व संघर्षांची चित्रे यात आहेत. त्यांच्या पराभवाच्या कहाण्यादेखील आहेत. चळवळीतले अंतर्विरोधदेखील त्यांनी  सांगितले आहेत. कुटुंबातील व्यक्तींचे, विशेषत: आईचे हृद्य भावचित्र त्यांनी रेखाटले आहे. शेतकरी चळवळीतील स्त्रिया आणि सामान्य शेतकऱ्यांच्या सहभागावर त्यांनी भर दिला आहे. हे आत्मनिवेदन विदर्भातील शेतकरी चळवळीविषयीचे महत्त्वाचे पैलू सांगते. चळवळीतील सोबत्यांची व्यक्तीचित्रेही यात रेखाटली आहेत. जोपर्यंत शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही, त्याचं दु:ख, दारिद्रय़ नष्ट होत नाही, तोपर्यंत मरणमार्गी गेलेल्या जिवाच्या कार्यकर्त्यांचा मरणकाटा टोचत-बोचत राहील’ या भावनेने लिहिलेले हे कथन आहे.

या तिन्ही आत्मपर कथनांतून महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जीवनावर एक वेगळा  प्रकाश पडतो. महाराष्ट्राच्या समाजकारणात दीर्घकाळ ज्यांनी मूलभूत स्वरूपाचे कार्य केले अशा कार्यकर्ते-नेते-विचारवंतांची ही आत्मकथने आहेत. महाराष्ट्र तसेच भारतातील सामाजिक चळवळींचे अंतरंग आणि राजकारण जाणून घ्यायला त्यांचा उपयोग होणार आहे. समाजवादी, शेतकरी तसेच स्त्रियांच्या, वंचितांच्या चळवळींचे अंतरंग दर्शन त्यामधून घडले आहे.