मकरंद देशपांडे

माझ्या ग्रुपचे संजय, श्रुती खूपच उल्हसित झाले होते. निलाद्री आपल्या लाल गाडीतनं लाल रंगाचं ‘झिटार’(सितार आणि गिटार यांचं क्रॉसब्रीड वाद्य)- जे त्यानं स्वत: बनवून घेतलं होतं- घेऊन आला. रिहर्सल रुममधे जेव्हा त्यानं साज तयार केला, तेव्हा मी त्याला पाहत बसलो. त्यानं मला विचारलं नाही की आपण काय करणार आहोत. मी तालमीला सुरुवात केली. ‘गृहलक्ष्मी’ हे नाटक मी एकपात्री केलं होतं. त्याविषयी मी या सदरात एक लेख लिहिला होता. त्या नाटकात मी आपल्या मृत पत्नीच्या भूताबरोबर राहतो. पण मला असं वाटलं की त्या मृत पत्नीच्या भुताला मी रंगमंचावरून मुक्त करायला हवं आणि त्यासाठी निलाद्री कुमार यांच्या झिटार आणि सितारसारखं जादुई संगीत नाही.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा

मी तालमीच्या खोलीत रिकाम्या भिंतीमधे प्रेक्षकांना पाहत, त्यांना पत्नीच्या महानिर्वाणाला निमंत्रण द्यायला सुरुवात केली आणि हळूच जसं काही स्वर्गात उघडलेल्या दारांमुळे झालेली कंपनं निलाद्रीच्या बोटात पोहोचली आणि त्यानं वाजवायला सुरुवात केली. साधारण पाऊण तास मी उत्स्फूर्त बोलत होतो आणि निलाद्री वाजवत होता. पाऊण तासानंतर आम्ही दोघं थांबलो. हॉलच्या भिंतीत अजूनही ती कंपनं होती. निलाद्री मला म्हणाला, ‘‘मॅकभाई, हेच हवं होतं मला. एक उत्स्फूर्त भावविश्व- जे माझ्याकडून काही तरी वेगळंच वाजवून घेईल. आज मला मी वाजवलेलं वेगळंच वाटतंय.’’ ग्रुपमधल्या संजयच्या चेहऱ्यावर एखादा आठवडा मेडिटेशन कॅम्पमधे जाऊन आल्यावर येणारी शांतता होती. मी एवढंच म्हणालो की, या प्रयोगाची प्रत्येक तालीम एक प्रयोग असेल. आणि खरं सांगतो निलाद्री जेव्हा जेव्हा तालमीला यायचा तो जवळपास प्रयोगच असायचा. हळूहळू माझं उत्स्फूर्त बोलणं आकार घेऊ लागलं आणि तसं तसं निलाद्रीचं सितार आणि झिटार हे प्रसंगाप्रमाणे बदलू लागले.

आता साधारण एक तास पंधरा मिनिटं तालीम चालायची. गंमत म्हणजे, आम्ही एकदाच तालीम करायचो आणि निघून जायचो. कारण आम्ही दोघांनी ठरवलं होतं की अपेक्षेने काही करायचं नाही. फक्त हे ठरवलं की, बेतानं सजवलेल्या रंगमंचावर एकीकडे निलाद्री बसेल आणि दुसरीकडे मी अभिनय करणार. रंगमंच अर्धा त्याचा, अर्धा माझा.

खरं तर दोन वाद्यांची जुगलबंदी जशी चालते तशी नाही, पण एकमेकांना पूरक, फक्त साथ.. पण भावनिक. हळूहळू तालमीतला प्रयोग खऱ्या प्रयोगाच्या जवळ येऊ लागला. पहिल्या रंगीत तालमीला निलाद्रीलाही गंमत वाटली. कारण टेडी मौर्यानी त्याच्या आजूबाजूला पडदे सोडले होते- जे एका प्रसंगात उडणारही होते. बेडवर एक मच्छरदाणी एखाद्या घुमटासारखी वरती. कारण ती महानिर्वाणावेळी कोसळणार होती. निलाद्रीचं सितार आणि झिटार हे नेपथ्याचा भाग झालं आणि आम्ही दोघे विंगेत उभे राहिलो. त्याला खूपच गंमत वाटली आणि मी म्हणालो की, आज तर मजा येईलच; पण जेव्हा प्रेक्षकांनी भरलेलं पृथ्वी थिएटर असेल तेव्हाचा आनंद आणि अनुभव हा खूपच अकल्पित असेल.. आणि पहिल्या शोची वेळ आली.

उपस्थितांत निलाद्री कुमारचे फॅन्स आणि माझी नाटकं बघणारे नाटकप्रेमी तर होतेच, पण आम्ही ज्यांचे फॅन आहोत असे उस्ताद झाकीर हुसन (ज्यांना प्रेक्षकांत फार कमी वेळा पाहिलं गेलं असेल), नसिरुद्दीन शाह, इरफान खान, के. के. मेनन, मनोज वाजपेयी, आशुतोष गोवारीकर, पवन मल्होत्रा, महेश मांजरेकर, निलाद्रीचे वडील आणि गुरू पंडित कार्तिक कुमार, पंडित अजय पोहनकर, अंजली पोहनकर, लेखिका निवेदिता पोहनकर आणि बरेच प्रयोगप्रेमी उपस्थित होते.

दीप-प्रज्त्ज्वलन करताना मी निलाद्रीला बोलावलं, पण तो आला नाही. मी आणि उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांकडून दीप- प्रज्ज्वलन झालं. दुसऱ्या घंटेची वेळ झाली तेव्हा सगळे आत बसल्यावर मी मेकअप रूममधे गेलो. निलाद्रीला विचारलं की, ‘‘तू आला का नाहीस?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी जरा वाजवत होतो, कारण माझी बोटं थंड असून चालणार नाही.’’ माझ्या डोक्यात विजेसारखा लख्ख प्रकाश पडला की, वयाच्या चौथ्या वर्षांपासून तो सितार वाजवत असला तरी प्रयोगाच्या आधीही वाजवावं लागतंच.

मी गच्च भरलेल्या पृथ्वी थिएटरमध्ये सगळ्यांचं स्वागत केलं आणि निलाद्रीला रंगमंचावर बोलावलं. दोन मिनिटं टाळ्या वाजल्या. मग अंधार आणि अंधारात झिटार वाजायला सरुवात झाली. प्रयोग रंगमंचापासून चार इंच वर सुरू झाला आणि प्रयोग सुरू असताना संगीत मैफिलीसारखे ‘वाह, टाळ्या आणि नाटकासारखा हशा, शांतता आणि डोळ्यात पाणी अशी दाद येऊ लागली. आम्हा दोघांसाठी आम्ही न अनुभवलेला प्रयोग. प्रयोग संपला आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आमचं कौतुक केलं. उस्ताद झाकीर हुसन म्हणाले की, ‘‘या प्रयोगाबद्दल बोलण्यापेक्षा हा अनुभवायला हवा.’’ आमच्या दोघांचं एकत्र येणं महेश मांजरेकरांसाठी एक नवीन फॉर्म रंगमंचावर आणण्यासारखं होतं. आशुतोष म्हणाला, ‘‘हा एक ‘लाइव्ह परफॉर्मिग आर्ट’चा वेगळा ऐतिहासिक प्रयोग आहे.’’ इरफान म्हणाला, ‘‘प्रयोग बघताना विचार आला की हे थिएटरचं काय व्याकरण आहे? पण काहीच क्षणात माझ्या लक्षात आलं की, जे काही आत्ता चालू आहे त्यातून आपण बाहेर लक्ष काढू शकत नाही आहोत. याचा अर्थ काही तरी नवीन आणि चांगलं चालू आहे. आता आपण रंगमंचाच्या ठरवलेल्या व्याकरणाला विसरायला हवं.’’ पवन मल्होत्रा म्हणाला की, ‘‘मी तुझा मित्र आहे याचा मला आनंद आहे. मला गर्व आहे.’’ हे या सगळ्यांचं प्रेम.. पण एक विसरून चालणार नाही की हा प्रयोग जरी मी घडवून आणला असला तरी आम्ही दोघांनी मिळून काही तरी करायला हवं ही तीव्र इच्छा निलाद्रीची!

या प्रयोगाच्या यशात प्रकाशयोजनाकार अमोघ फडकेनं तिसरं मोलाचं योगदान केलं. प्रकाशाच्या साहाय्यानं त्यानं ‘पत्नी’ नाटकातल्या मृत पत्नीला डोळस केलं.

जय निलाद्री! जय सितार

जय प्रयोग! जय फनकार!

उत्तरार्ध

mvd248@gmail.com