12 August 2020

News Flash

तुझियासाठी

आज कार्तिकी पुनवेवरती श्वेतकमल तव समीपतेचे फुलले आहे

| October 13, 2013 01:01 am

आज कार्तिकी पुनवेवरती श्वेतकमल तव समीपतेचे  फुलले आहे
कलहंसापरि हास्य रेशमी संगमरवरी ह्य़ा स्तंभावर बसले आहे
कविवर्य कुसुमाग्रजांची ही कविता माझी अत्यंत आवडती आहे.. आणि त्या कवितेची माझ्या मनावर पडलेली मोहिनी माझ्या कुमारवयापासून आजपर्यंत कणभरही उणावलेली नाही. त्या मोहिनीचा विश्लेषणात्मक शोध घेण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही आणि पुढेही कधी करावा असं मला वाटत नाही. माझ्यालेखी तो एक संपूर्ण सौंदर्यानुभव आहे. तो केवळ एकाग्र एकसंध अनुभवावा आणि त्याहून अधिक काही करू नये अशी माझी मनापासून धारणा आहे. नाही म्हणायला त्या काव्याचा एक विशेष मला अधोरेखित करावासा वाटतो; तो म्हणजे या कवितेचा लयदार रचनाबंध.. प्रवाही गद्य आणि छंदवृत्ती यांचा इतका सुंदर संगम दुसरा शोधूनच सापडू शकेल. हिंदी-उर्दूमध्ये जसं साधं सरळ गद्यच प्रवाहित होऊन त्याचं लयदार काव्य बनतं, तसंच इथंही घडलं आहे. या पहिल्या दोन ओळी पाहिल्या तरी ही प्रचिती येईल. कारण कर्ता-कर्म-क्रियापद यांची सर्वमान्य रचनापद्धती स्वीकारून येणाऱ्या गद्य विधानासारखी ही काव्यविधानं आहेत. पण तरीही गद्य रुक्षतेचा स्पर्शही न झालेली ती निखालस कविता म्हणूनच भेटते. आणि विशेष म्हणजे तिची बढतही त्याच अंदाजानं कवितेच्या शिखरबिंदूकडे जाते. पुन्हा तो शिखरबिंदू आपली मान अवघडेल इतका उंचावर येत नाही. क्षितिजाकडे पाहता पाहता हलकेच सगळं आकाशच क्षितिज होतं आणि जमीन, आकाश अशी काही परिमाणंच उरत नाहीत. ती पूर्ततेची ओळही फार सुंदर आहे.
‘तुझेपणाचे रूप दाविण्या दूरपणातून आज जाहले विलग चांदणे चंद्रापासून..’ तर अशी कितीतरी वर्ष त्या कवितेवर असं मनोमन प्रेम करण्यात गेली. कुसुमाग्रजांच्या ‘स्वगत’ या कवितासंग्रहात ही कविता मला प्रथम भेटली. तो संग्रहही त्यांच्या सर्व संग्रहात माझा अधिक आवडता आहे. त्याचं कारण थोडं व्यक्तिगत आहे. ‘विशाखा’ आणि ‘किनारा’ हे संग्रह माझ्या शालेय वयात मला भेटले. त्यातून कवीची एक जरा अतिउत्कट प्रतिमा माझ्या मनात स्थिरावली होती. ‘गर्जा जयजयकार’, ‘कोलंबसाचे गर्वगीत’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात’, ‘ताजमहाल’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मनस्वी कवितांचा तो असर होता. ही मनस्विता कुसुमाग्रजांच्या कवितेतून कधीही हरवली नाही. पण तरीही त्यांची कविता उत्तरोत्तर अधिक संयत, आत्ममग्न आणि शांतदांत होत गेली. तो बदल मला जाणवला तो त्यांच्या ‘स्वगत’पासून. उदाहरणच द्यायचं तर ताजमहाल हा एक विषय. ‘विशाखा’त ‘शत अनामिकाचे त्या हे कब्रस्तान. त्या अबल आसवांचे करुण निधान’, अशी मनस्वी, पण उग्र अभिव्यक्ती आणि ‘स्वगत’मध्ये तितकाच मनस्वी पण त्या शिल्पकृतीकडे नव्या परिपक्व समंजसपणे पाहताना व्यक्त झालेला दृष्टिकोन..
संहारक अस्त्रांनी दुखावलेल्या आकाशाच्या
एका निवांत निर्मळ कोपऱ्यात
द्वंद्वाच्या  क्षोभाच्या अशांतीच्या पलीकडे
असलेल्या प्रदेशात उभा आहे हा
विशुद्ध सौंदर्याचा संचय.. एकाकी..
माणसाच्या पुनरुत्थानाची प्रतिक्षा करीत..
तर असा हा ‘स्वगत’ नामक कवितासंग्रह आणि त्यातली ती कार्तिकी पुनवेची माझ्या अंत:करणात सामावलेली कविता..
आपल्याला आजच्या ‘संगणक’ नामक युगप्रवर्तक माध्यमाचं अपरंपार कौतुक वाटतं, तेही रास्तच आहे. कारण तो अपरिमित गोष्टी त्याच्या चिमूटभर (की ‘चिप’भर) पोटात साठवतो आणि नेमक्या हव्या त्या वेळी हवी ती गोष्ट आपल्यापुढे क्षणात हजर करतो म्हणून. पण खरं तर वर्षांनुर्वष आपला छोटा मेंदू तरी दुसरं काय करतोय? तिथं तर माऊस- कर्सर इत्यादी भानगडीही लागत नाहीत. आपल्याला हवे ते संदर्भ आपल्याला हव्या त्या वेळी (आणि बरोब्बर  त्याचवेळी) आपल्यासमोर आपसूक अवतीर्ण होतात. आपण त्यांना न बोलावताही. १९६० च्या दशकमध्यावर केव्हातरी भेटलेली ही कविता ८०च्या दशकात पुन्हा मनात जागी व्हावी, असा एक सुयोग आला..
कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने एक ताजा टवटवीत रंगमंचीय प्रयोग उभा करण्याची जबाबदारी, संकल्पना आणि संहिता अशा दुहेरी भूमिकेतून आकाशवाणी पुणे केंद्राने माझ्यावर सोपवली. पुण्याच्या टिळक  स्मारक मंदिरात तो प्रयोग सादर झाला आणि त्याचवेळी त्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून एकाचवेळी सादर झालं. त्या प्रयोगाचे संगीतकार होते आनंद मोडक आणि त्याचं  शीर्षक होतं, ‘गाण्यांचे चांदणे’. प्रयोगाच्या संकल्पना-काव्यातून हे शीर्षक अलगद उगवलं होतं.
स्थळ-काळाच्या अतीत याव्या अशा चांदराती
व्हावा किनाराही लाट अशी सागरभरती
प्राण चिंब चिंब जणू शुभ सुखाची कोंदणे
पडो मनांच्या अंगणी असे, गाण्यांचे चांदणे..
प्रयोगसंहिता  म्हणून मी कविवर्य केशवसुत ते कवी आरती प्रभू असा आधुनिक मराठी कवितेचा प्रवास मांडला होता.. त्यासाठी एस.पी. कॉलेज ग्रंथालयात काही दिवस मुक्काम टाकला होता आणि पोटभर कविता वाचल्या होत्या. पण कुसुमाग्रजांबाबत मात्र मी वेगळा विचार केला नाही. सरळ निवडली ती ‘आज कार्तिकी पुनवेवरती’ ही कविता.. आनंद मोडकांनी ती फार सुंदर स्वरबद्ध केली. काहीशा ठाय लयीत एखादी देखणी बंदिश भासावी अशी ती चाल होती. कवितेचा सगळा डौल आणि खानदानीपणा  जपत हलकेहलके उलगडणारी, खोल रक्तात मुरलेलं एक प्रेम असं अनपेक्षितपणे प्रदीर्घ काळानंतर प्रकट झालं म्हणून मी अपरंपार सुखावलो. वाटलं, चला, एक वर्तूळ पूर्ण झालं. पण तेव्हा कळलं नाही की ही वर्तुळं पूर्ण होतात.. पण संपत किंवा थांबत नाहीत..
१९९० च्या दशकमध्यावर आनंद मोडक एक नवा प्रकल्प घेऊन हजर झाले. गुणी गायक मुकुंद फणसळकरसाठी अल्बम करायचा.. नव्या कविता, नवे स्वर. सुमारे आठ गाणी करायची होती आणि त्यासाठी आनंद मोडकांकडे नव्या बांधलेल्या सुंदर चाली होत्या. त्यामध्ये  आनंदने ‘ती कार्तिकी पुनवेवरची’ चाल पुन्हा माझ्यासमोर ठेवली. मी  क्षणभर  गडबडलो. ती मुळातली माझीच आवडती कविता, ती मीच आनंदला चाल लावण्यासाठी पूर्वी दिलेली आणि आता त्यावर मी पुन्हा काहीतरी नवं लिहायचं, हे जरा पचनी न पडणारं होतं. पण त्यातून एक आव्हानही खुणावत होतं.
एक गोष्ट करावी लागली, ज्या कवितेमुळे ती चाल जन्माला आली ती कविताच पूर्णपणे मनावेगळी केली.. आणि केवळ एक निखळ स्वररचना म्हणून  नव्या ताज्या नजरेतून त्या चालीकडे पाहायला सुरुवात केली. मुळातील एक गोष्ट मला आधीपासून थोडी खटकत होती. त्या मूळ कवितेला लावलेल्या चालीमध्ये त्या पहिल्याच ओळीच्या शेवटच्या ‘फुलले आहे’ या शब्दांची स्वरांच्या बारीक बारीक नक्षीकामातून पुनरावृत्ती  होत होती आणि ती फार मधुर वाटायची. पण तोच प्रकार पुढील अंतऱ्यामध्ये अर्थपूर्ण होत नव्हता. उदाहरणार्थ- ‘बसले आहे’ हा शब्दप्रयोग.  स्वरसौंदर्यामुळे तिथे फार मोठा विरस होत नव्हता, पण तरीही. आता नवीनच कविता लिहिताना आणि तीही या स्वरसौंदर्याची जाणीव ठेवून विचार करताना एक छान शब्द मला सुचलेल्या सलामीच्या ओळीतूनच सामोरा आला.. ‘तुझियासाठी..’ पण ती शुभारंभाची ओळ झटक्यात सुचूनही मी ती तशीच आपल्या तंद्रीत भिजत ठेवून दिली.. आणि इतर चालींकडे वळलो. पाहता पाहता त्या सगळ्या कविता आकार घेत गेल्या आणि पुन्हा ती मूळची ओळ समोर येऊन उभी ठाकली. पण तिच्या मनाचा पुरता थांग लागल्याखेरीज शब्दांची ओढाताण करण्यात कधीच अर्थ नसतो. अखेर ती ओळ  हृदयाशी घेऊन निवांत गाढ झोपी गेलो. अचानक, ज्याला ब्राह्ममुहूर्त म्हणतात त्या उत्तररात्री छान जागा होऊन उठून बसलो आणि त्या अंधूक प्रकाशात अलगद कविता उलगडत गेली..
लखलखणारे हे तारांगण झुकून खाली येईल पळभर तुझियासाठी
स्वलरेकीचा कल्पतरुही ह्य़ा मातीतून रुजून येईल तुझियासाठी
अजर अमरता लेवून येईल निष्कलंक पुनवेचे गहिरे शुभ्र चांदणे
आणि अमेचा अंधकारही प्रमत्त अत्तर उधळीत  राहील तुझियासाठी
गंधर्वाच्या स्वरलहरींनी झंकारत राहील निरंतर नादमयी जग
अन् वाऱ्याची  झुळूक ओलसर जणू स्वच्छंदी लकेर होईल तुझियासाठी
हळूहळू रेखांकित होईल सुंदर स्वप्नांची ध्यासांची धूसर सृष्टी
सारे शाश्वत आणि शुभंकर; अनायास आकारा घेईल तुझियासाठी    
poetsudheer@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2013 1:01 am

Web Title: poem of kusumagraj
टॅग Kavita Sakhi
Next Stories
1 प्रार्थना
2 दुसरी बाजू..
3 ‘अशोक-चक्रांकिता..’
Just Now!
X