कविवर्य वा. रा. कांत यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता आज (६ ऑक्टोबर) रोजी होत आहे. त्यानिमित्ताने शेवटच्या श्वासापर्यंत कवितेनं कशी त्यांची साथ केली अन् मृत्यूपश्चातही तिनंच आपली साथ करावी अशी प्रकट इच्छा त्यांनी आपल्या ‘मृत्युपत्र’ या अखेरच्या कवितेत कशी प्रकट केली होती, हे सांगणारा लेख झ्र्
ज्ये ष्ठ कविवर्य कै. वा. रा. कांत यांची जन्मशताब्दी वर्षपूर्ती आज रोजी होत आहे. ६ ऑक्टोबर १९१३ रोजी वा. रा. कांत यांचा जन्म मराठवाडय़ातील नांदेड मुक्कामी झाला. अन् ८ सप्टेंबर १९९१ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. वा. रा. कांतांचे वडील रामराव कांत हे निजाम दरबारी पोलीस अंमलदार होते. घरामध्ये कर्मठ शिस्त. कवी कांतांच्या मातोश्री जानकीबाई या हरिपाठ, पूजाअर्चा, भजन-कीर्तन इत्यादीत रममाण असायच्या. आईच्या या संस्कारांमुळेच कांतांमध्ये कवितालेखनाचे बीज आले असावे. पण वडिलांच्या शिस्तप्रिय, कडक स्वभावामुळे आणि त्याकाळी भोगलेल्या निजामाच्या अन् इंग्रजांच्या पारतंत्र्यामुळे कांतांच्या स्वातंत्र्यपूर्व काव्यप्रतिभेत स्थंडीलसंप्रदायी गुण दिसून येतात.
वा. रा. कांतांनी विपुल कवितालेखन केले. स्वत:च्याच कवितेवर प्रयोग करीत असताना आपल्या सहा दशकांच्या साहित्यसेवेत कांतांनी नाटय़काव्य- द्विदलार्थी कविता ‘दोनूली’ हा नवा काव्यप्रकार मराठी साहित्यात आणला. या सहा दशकांच्या काव्यप्रवासात कांतांच्या कवितेनं आपली अनेक रूपं मराठी रसिकांसमोर सादर केली. कांतांचं स्वत:च्याच कवितेशी एक अतूट नातं होतं. आपल्याच कवितेशी संवाद करताना एके ठिकाणी वा. रा. कांत म्हणतात-
पन्नास वर्षांची आपुली सोबत
चाललो ही वाट तेढीमेढी
एकांती गर्दीत, फुलांत, काटय़ांत
तुझी माझी साथ सदोदित
गोळा झाली नाती सर्व तुझ्या ठायी
कांता कन्यकाही मला तूच
सहचारिणी तू, अनुरागिणी तू
कादंबिनी तू तप्त जीवा
अमृतवर्षी तू कुंडलिनी जागी
असा भोगी-योगी तुजमुळे..
आयुष्याच्या अखेर-अखेरच्या दिवसांत कांतांनी बऱ्याच आत्मसंवादी कविता लिहिल्या आहेत. आपल्या शब्दांशी संवाद करताना कांत म्हणतात- ‘मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होऊ नका माझ्या शब्दांनो..’ अखेरच्या दिवसांत कांतांच्या शब्दांनी प्रत्यक्ष मृत्यूशीही अनेकदा मुक्त संवाद केला होता. ‘पेरून मृत्यू गाण्यात जीवन उगवीत होतो..’ असं त्यांचं एका कवितेतील मृत्युचिंतन होतं. असं असताना कांत मृत्यूचे ऋणही मानतात-
शतजन्म मृत्यो ऋणात राहीन
असा एक क्षण देई पुन्हा..
असं म्हणून ‘आणिले उधार मरणा मागून, दोनचार क्षण जीवनाचे’ हे मृत्यूचे ऋणही मान्य करतात. आत्मसंवादी कविता लिहीत असताना कांत आपल्या आयुष्याच्या अखेरच्या कवितेतही एक मन:स्पर्शी संवाद करून गेले आहेत. इस्पितळात रुग्णशय्येवर असताना कांतांनी लिहिलेली, किंबहुना मी लेखनिक म्हणून लिहून घेतलेली त्यांची अखेरची कविता- ‘मृत्युपत्र’! अगदी सामान्य विचार केला तर ‘मृत्युपत्र’ म्हणजे एखादी कविता होऊ शकेल का? मृत्युपत्र म्हणजे ऐहिक चीजवस्तूंचे, संपत्तीचे आप्तस्वकियांमध्ये केले जाणारे वाटप आणि हिस्सेकरण केल्याचे विवरणपत्र! मृत्यू पावलेल्याच्या त्या अखेरच्या इच्छा! पण इथं एका शब्दपुजाऱ्यानं.. एका कवीनं लिहिलेलं मृत्युपत्र म्हणजे एक निराळाच अनुभव आहे..
मृत्युपत्र
अंतकाळी मजजवळ नसावी आप्तजनांची छाया
नकोत कोणी मित्र-सखेही शोकाश्रू ढाळाया
फुले साजिरी समोर असू द्या खिडकीमधि हसणारी
उन्हे येऊ द्या सदने, वदने, गगने उजळविणारी
किरणांच्या पालखीत बसूनी दिगंतात जाइन
सूर्यासनिच्या महातेजास छायेपरी वंदीन
पवनभोवरे वाहटूळीचे उंच नभी उठतील
तनकाडय़ा मनमाडय़ा त्यातून सनकाडय़ा उडतील
अरुणतरुणसे कोंभ नवे मग फुटतील श्वासोच्छवासी
विश्वसतील अन् कविता त्यातून शब्द जसे आकाशी
चैतन्याची, आनंदाची इतुकी पुरे मिरास
पैल पृथ्वीच्या जाता-जाता अर्पिन मी तुम्हास
शब्द-सूर ओलांडूनी
स्र्वगगा तीराहूनी
मी करीन तुम्हा विनवणी
कुठेही गेलो नक्षत्रांच्या जरी दूर देशात
‘तरुवेली’परी जपेन आंतरी बहर शुष्क शाखांत
फुलेल कधितरी कविता फिरूनी तप्त दग्ध हृदयात
आत्म्याचा कधि वसंत येता फुलावया गाण्यात..
                                            (२६- ४- १९८८)
मालाड येथील एव्हरशाइन नर्सिग होममध्ये रुग्णशय्येवर असताना कांतांनी मजकडून लिहून घेतलेली ही अखेरची कविता! या कवितेवर काही संस्कार करायचे त्यांच्याकडून राहून गेले असण्याची शक्यता आहे. परंतु अर्धागवायूच्या आजारामुळे पुढे या कवितेसंबंधी माझ्याशी ते काही बोलले नाहीत.
वरवर पाहता या कवितेत कांतांनी कुठली अखेरची इच्छा प्रकट केली आहे? कांतांनी कुठल्या संत-महंतांप्रमाणे लोककल्याणाची मागणी केलेली नाही, अथवा एखाद्या राजकीय पुढाऱ्याप्रमाणे मरणोपरान्त प्रत्येक दु:खिताचे अश्रू पुसण्याची महत्त्वाकांक्षाही सांगितली नाहीए. कांतांनी प्रेषिताची भूमिका न घेता फक्त कवी आणि त्याचे काव्यप्रेम याबद्दलचे आत्मबल वाचकांसमोर मांडले आहे. कांत म्हणतात- ‘माझ्या मृत्युसमयी बेगडी दु:खाचे प्रदर्शन करून खोटे अश्रू ढाळणारे मित्रच काय; पण आप्तस्वकीयदेखील जवळ नसावेत. माझा जड देह नाहीसा झाल्यावर त्यातील चैतन्यतत्त्व या पंचमहाभूतांत माझ्या कवितेच्या साक्षीने विलीन होऊ द्या. पृथ्वीच्या पल्याड गेल्यानंतरही मी दिगंतात कवितेच्या समृद्धीचीच आकांक्षा बाळगीन. सूर्य-चंद्राच्या किरणांत व वायूच्या लहरींत माझ्या कवितेचे अस्तित्व फुलांच्या बहराप्रमाणे सदैव टवटवीत राहील..’
आत्म्याचा बहर फुलविण्यासाठी किरणांच्या पालखीत बसून  कांत आपल्या कवितेबरोबर दिगंतात निघून गेले. फक्त कवितेच्याच नव्हे, तर साहित्याच्या इतरही प्रकारांच्या सृजनप्रसंगी ते स्वत: खूप आतूर असायचे अन् ती निर्मिती मनासारखी होईपर्यंत ते अस्वस्थ राहायचे. ही आतुरता अन् अस्वस्थता कांतांच्या एकूण प्रतिभेचा अन् निर्मितीचाही स्थायीभावच नव्हता, तर धर्म होता. कांतांच्या टेबलावर एक फ्रेम सदोदित ठेवलेली असायची. तीत त्यांनी लिहिलं होतं-
शब्द माझा धर्म
शब्द माझे कर्म
शब्द हेच वर्म
ईश्वराचे.
असो. कांतांच्या जन्मशताब्दी वर्षांची आता सांगता होत आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या जन्मशताब्दीचे थोडेफार सोहळे झाले. औरंगाबादमधील मराठवाडा साहित्य परिषदेच्या कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे आणि नांदेड शाखेचे पदाधिकारी यांनी कांतांच्या साहित्यावर एक दिवसाचे चर्चासत्र घडवून आणले, तर नांदेडच्या उमरीकरांनी कांतांच्या स्मरणार्थ कार्यक्रम योजून त्यांच्या भावगीतांनी एक सुंदर संध्याकाळ सजविली. तसंच कांत-साहित्याचं प्रकाशन करण्याचा मनोदयही व्यक्त केला. पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून कवी विश्वास वसेकरांनी कांतांच्या एकंदरीत साहित्यप्रवासाचा आढावा एक ‘रूपक’ सादर करून घेतला, तर वसईच्या नाटेकरांनी कांतांच्या अप्रकाशित साहित्याचं प्रकाशन करण्याचं केवळ आश्वासन न देता पाच ग्रंथांचं प्रकाशनही केलं. मराठवाडय़ातले माझे एक संपादक मित्र कृष्णा कोत्तावार यांनी आपल्या साईश्रद्धा प्रकाशनातर्फे कविवर्य कांतांचं साहित्य नेटवर उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्याचे वचन दिले आहे. कांतांच्या जन्मशताब्दी वर्षांत त्यांच्या साहित्याची पालखी पुढे नेणारे हे भोई लाभले याचा आनंद आहेच; पण स्वत:च्या कवितेची अन् फक्त कवितेचीच साथसंगत शाश्वत मानणारे कांत आपल्या कवितेला सोबत घेऊन दिगंतात निघून गेलेत. मात्र, नक्षत्रांच्या देशातूनही मनामनांच्या तरुवेलींवर आत्म्याचा वसंत ते फुलवीत राहणार आहेत.