|| रवींद्र शोभणे

पुस्तकांचं वाचन करताना काही पुस्तकं आनंद देतात, काही पुस्तकं अंतर्मुख करतात, तर काही पुस्तकं आतून-बाहेरून अक्षरश: ढवळून काढतात. वाचकांना असंच ढवळून काढणारं, सुन्न करणारं पुस्तक म्हणजे चित्रा मुद्गल या हिंदी लेखिकेची मराठीत नुकतीच अनुवादित झालेली कादंबरी- ‘पोस्ट बॉक्स नं. २०३, नालासोपारा’! या मूळ हिंदी कादंबरीचा तेवढाच सहजसुंदर मराठी अनुवाद केला आहे तो डॉ. वसुधा सहस्रबुद्धे आणि माधवी जोग या लेखिकाद्वयीनं. या कादंबरीत उभं केलेलं किन्नरांचं विश्व, संभावित मध्यमवर्गीय समाजापासून त्यांचं तुटत जाणं, स्वत:ला सभ्य समजणाऱ्या आपल्या समाजाची त्यांच्याशी असलेली वागणूक इत्यादींतून एका पीळदार कथेची मांडणी चित्रा मुद्गल यांनी केली आहे.

किन्नरांच्या जगाचं आपल्या मध्यमवर्गीय समाजाशी असलेलं नातं कमालीचं कटुत्वाचं आहे. आज आपण या किन्नरांचा उल्लेख संभावित शब्दात ‘तृतीयपुरुषी’ असा जरी करीत असलो, तरी व्यवहारात मात्र तो उल्लेख ‘हिजडा’ अशा शब्दातच करतो आणि ‘हिजडा’ ही आपल्या संभावित मध्यमवर्गातली खरमरीत शिवी झालेली आहे. ‘ट्रान्सजेंडर’सारखे शब्द अगदी अलीकडे आपण वापरायला लागलो असलो, तरी आपल्या मनातली ‘हिजडा’ ही भावना आपण खरडून काढूच शकत नाही, मग त्या हिजडय़ाशी आपले रक्ताचे नाते का असेना. या अशा नात्यात आपण रक्ताच्याही नात्याला पुसून- मध्यमवर्गीय मानसिकतेत सांगायचे झाल्यास- स्वच्छ होऊ पाहतो; पण हे असलं स्वच्छ होऊ पाहणं किती निर्दय आहे, हे या कादंबरीत कलात्मकरीत्या मांडलं आहे.

या कादंबरीत येणारं वातावरण एका गुजराती मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. हरिश्चंद्र शाह आणि वंदनाबेन शाह हे गुजराती दाम्पत्य आपल्या तीन मुलांपैकी मधला मुलगा विनोद याला लिंगदोषामुळे चंपाबाई नावाच्या किन्नराच्या हवाली करतात. आजूबाजूच्यांना, नातेवाईकांना त्याच्या या दोषाविषयी सांगण्याच्या लज्जेपोटी ‘त्याचा अपघात झाला आणि त्यात तो मृत्यू पावला’ अशी कहाणी रचून त्याला आपल्या जगण्यातूनच पार हद्दपार करतात. एवढेच नव्हे, तर त्याच्याविषयीच्या चौकशींनी आपल्या घरातली शांती ढळू नये म्हणून काळबादेवी या परिसरातलं दुकान आणि घर विकून ही मंडळी नालासोपारासारख्या दूरच्या उपनगरात राहायला जातात. वडील या मधल्या मुलाविषयी (विनोद ऊर्फ बिमली ऊर्फ बिन्नी) कमालीचे उदासीन असतात, तर मोठा भाऊ सिद्धार्थ (मोटाभाय) विनोदचा प्रचंड दुस्वास करणारा असतो. त्याला आपल्या घराण्याला कलंक ठरलेल्या या मधल्या भावाची साधी सावलीही आपल्या घरावर आता पडू द्यायची नाहीये; पण वंदनाबेन मात्र मनानं या मधल्या मुलामध्ये अडकून पडलेली. आपण या मुलावर अन्याय केला, या भावनेनं ती आतून सतत जळत असते. त्याचा हालहवाल सतत आपल्याला कळावा अशी तिची आंतरिक तळमळ असते. या आंतरिक तळमळीतून ती विनोदला बाहेरून फोन करते; पण सतत फोन करायचा तो कुठे, हा प्रश्न आहेच. तिला विनोदला घरून फोन करता येत नाही. कारण त्याच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत, अशी मोटाभायची सक्त ताकीद असते. विनोदलाही आपल्या आईजवळ मन मोकळं करायचं असतं; पण पत्रव्यवहार करता येत नाही.

शेवटी त्यातून वंदनाबेन एक मार्ग काढते. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ती घरच्यांना लपून आपल्या नावाचा एक पोस्ट बॉक्स घेते. त्या पोस्ट बॉक्स नं. २०३ मध्ये विनोदनं पाठविलेली पत्रं येतात. वंदनाबेन त्याचं एकेक पत्र वाचून त्याची हकीकत, त्याचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करते. विनोद ऊर्फ बिमली ऊर्फ बिन्नीने आपल्या आईला लिहिलेल्या एकतर्फी पत्रांतूनच बिन्नीचं आणि पर्यायाने किन्नरांच्या विश्वाचं भीषण जगणं आपल्यासमोर येतं व तिथल्या दाहक अनुभवांनी वाचक सुन्न होऊ लागतो.

विनोदनं लिहिलेल्या एकतर्फी पत्रांतून ही सगळी कहाणी उकलत जाते. या शैलीतून साकारल्या जाणाऱ्या या कादंबरीच्या मांडणीत मात्र अनेक पदर अध्याहृत आहेत. ते एकाच वेळी कौटुंबिक आहेत, सामाजिक आहेत, भावनिक-मानसिक आहेत आणि राजकीयही आहेत. माणूस कुठल्याही पातळीवर, कुठल्याही वातावरणात, कुठल्याही विश्वात वावरत असला, तरी अंतिमत: राजकीय व्यवस्थेशीच तो घट्टपणे कळत-नकळत बांधलेला असतो आणि त्या चक्रव्यूहातून त्याची सुटका नसते, हा आशय या कादंबरीच्या केंद्रस्थानी एकवटला आहे.

किन्नरांच्या जगातल्या रीतिरिवाजात बिन्नीची पर्यायानं विनोदची सतत घुसमट होते. त्यांच्यासारखं टाळ्या वाजवीत, गाणी म्हणत, अचकट विचकट अंगविक्षेप करीत भीक मागणं त्याला मान्य नाही; पण या जगातले उसूल त्याला धुडकावूनही लावता येत नाहीत. विनोद इतरांसारखा तृतीयपंथी नाही. त्याच्यात स्त्रीजन्य गुणसूत्रंही नाहीत. फक्त सर्वसामान्य पुरुषासारखा त्याला लघवीचा अवयव नाही आणि याच एका कारणानं तो इतर मुलांपासून दूर राहू लागतो. संकोचानं त्यांच्यात मिसळत नाही. हीच गोष्ट किन्नरांच्या मुखियाला- चंपाबाईला कळते आणि ‘आमच्या बिरादरीतला मुलगा आमच्या हवाली करा’ असा हट्ट धरून ती या कुटुंबात धडकते. घरातले कुणी यासाठी फारसं अनुकूल नसताना, फक्त मोटाभायच्या हेकेखोरपणामुळे विनोदला चंपाबाईच्या हवाली केलं जातं आणि इथून विनोदची दुनियाच बदलते. तो विनोदचा बिमली ऊर्फ बिन्नी होतो.

हा विनोद चांगला शिकलेला आहे. त्याचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. इतरांसारखी आपण भीक मागण्यापेक्षा कुठेतरी नोकरी करावी, या भावनेनं तो झपाटून जातो. त्यासाठी तो कॉम्प्युटर क्लास लावतो. आणि अशातच त्याला आमदारसाहेबांच्या कार्यालयात नोकरी मिळते. त्याच्या बिरादरीतल्या त्याच्यावर जीव लावणाऱ्या चंद्रा किंवा पूनमपासून तो दूर जातो खरा; पण त्याला त्याची वाट सापडली या समाधानानं या दोघीही त्याला समजून घेतात, त्याचं मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करतात.

आमदारसाहेबांच्या बहुतेक राजकीय उपक्रमांची आखणी करणारा आणि त्यांच्या राजकीय भविष्यासाठी झटणाऱ्या तिवारीकडे विनोदला मार्गदर्शन करण्याची, त्याच्या कामाचं हे स्वरूप समजावून सांगण्याची जबाबदारी असते. आमदारसाहेबांच्या पुढील राजकीय डावपेचाचा एक भाग म्हणून, एक प्यादा म्हणून तिवारी आता विनोदकडे पाहू लागतो. त्याच्या बिरादरीतल्या तमाम किन्नरांची मते पुढील निवडणुकीत आपल्याला पडावी म्हणून आमदारसाहेबांच्या सांगण्यावरून तिवारी विनोदला चंदिगडला घेऊन जातो आणि तिथल्या किन्नरांच्या सभेत त्याला बोलायला लावतो. विनोदच्या समोर असते किन्नरांच्या सुधारणांविषयीची तळमळ, त्या सुधारणांसंबंधी काही आडाखे, शासकीय घोषणांनुसार काही योजना; तर तिवारीच्या डोक्यात असते फक्त निवडणुकीची गणितं आणि त्यासाठी किन्नरांना वापरून घेण्याची भावना. आपण जे काही करतो आहोत ते सगळं वंदनाबेनला सांगण्याची त्याची सतत धडपड सुरू असते. मग हे सांगणं पत्रांतून का होईना आणि त्या पत्रांचं वाचन (पोस्ट बॉक्स नं. २०३ मधून आलेल्या) लपून का होईना; पण ते करण्याची वंदनाबेनची धडपड, असा या कादंबरीतला आई आणि मुलाच्या नात्यातला एक वेगळा आविष्कार प्रतीत होतो.

कादंबरीचा शेवट सुन्न करणारा आहे. आमदारसाहेबांच्या फार्म हाऊसवर त्यांच्या भाच्यानं आणि त्याच्या मित्रांनी पूनमसोबत केलेलं घृणास्पद वर्तन (त्याला बलात्कारही म्हणता येणार नाही), तिचा हॉस्पिटलमध्ये जीवनमरणाचा संघर्ष, विनोदचं आपल्या बिरादरीविषयी चाललेलं कार्य आणि अशातच आपल्या आईची तब्येत नाजूक आहे म्हणून तिला भेटायला दिल्लीहून निघणारा विनोद. त्याला आपल्या आईला भेटायचं आहे. तो तिला शेवटचं पत्र लिहितो; पण ते पत्र पोस्टात न टाकता तो सोबत घेऊन येतो. आपलं हे पत्र त्याला आईच्या हातात द्यायचं आहे आणि इकडे त्याची आई वंदनाबेन वर्तमानपत्रात विनोदला आपल्या घरी परत येण्याविषयी पत्र लिहिते आणि ते पत्र प्रकाशित होईस्तोवर ती हे जग सोडून निघूनही जाते. आईच्या भेटीसाठी दिल्लीहून मुंबईला धावतपळत येणारा विनोद त्याच्याच माणसांकडून मारला जातो. एका बातमीच्या माध्यमातून त्याचं मिठी नदीत सापडलेलं, विद्रूप झालेलं कलेवरच वाचकांच्या समोर येतं. वाचक सुन्न होतो.

ही कादंबरी एकाच वेळी अनेक स्तरांवरून घडत जाते आणि तिच्या घडण्याची शैली आहे विनोदनं आपल्या आईला लिहिलेली एकतर्फी पत्रं. निवेदनाच्या या शैलीत अनेक धोके असतानाही इथे मात्र सबंध कादंबरी आशयची वाकडीतिकडी वळणं घेत एकाच वेळी किन्नरांच्या जगाचा आणि त्याच वेळी राजकीय घृणित कारवायांचा तेवढय़ाच तटस्थपणे वेध घेताना दिसते. माणसं कुठल्याही स्तरावरची असू देत, पण त्यांच्या जगण्याला राजकारण मात्र जळूसारखे चिकटून बसलेले दिसून येते. हे राजकारण माणसाच्या उन्नयनासाठी नसून त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आहे, या भेसूर वास्तवाची तीव्र जाणीव ही कादंबरी वाचताना होते.

चित्रा मुद्गल यांच्या लेखनाचा विचार करता एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते; ती म्हणजे, समाजभानाची तीव्रेतर मांडणी करताना त्यांच्या लेखनातील कलात्मकता कधीही डागाळत नाही. आपल्या कलाकृतीत अध्याहृत असणाऱ्या आशयाला एक सुंदर पोत देण्याचे कसब या लेखिकेत निश्चित आहे आणि म्हणूनच त्यांच्या कादंबऱ्या आपला आशय अधिक जोरकसपणे घेऊन अवतरतात.

पाश्चात्त्य देशांमध्ये किन्नरांसाठी तेथील सरकारांनी वेगवेगळे उपक्रम राबवून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रतिष्ठेचं जगणं बहाल केलं आहे. चित्रा मुद्गल यांची ही कादंबरी त्या मागणीकडे अंगुलिनिर्देश करणारी आणि त्यातून एका मोठय़ा सामाजिक प्रश्नाला हात घालणारी आहे.

  • ‘पोस्ट बॉक्स नं. २०३, नालासोपारा’ – चित्रा मुद्गल,
  • अनुवाद- डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, माधवी जोग,
  • विजय प्रकाशन, नागपूर,
  • पृष्ठे- २००, मूल्य- २५० रुपये