ब ने बने, वेंधळ्यासारखी तिकडे कुठे पाहतेस?
ही बघ, ही नमोदेवाची पायरी!
नाही गं. नामदेवाची नाही! नामदेवाची पायरी तिकडं विठ्ठलाच्या मंदिरात. इथं नमोदेवाचीच पायरी. या पायरीवरच नाही का नमोजी नतमस्तक झाले होते? तूपण नतमस्तक हो बरं इथं. माणसाच्या मनात कसा पूज्य आदरभाव हवा. पुन्हा तो दिसायलासुद्धा हवा. टेकव पाहू डोकं. आता म्हण- जय मातादी!
काय म्हणालीस?
कोण मातादी?
काय हे बने? किती गं नवमतदार तू? तुझं पाळण्यातलं नाव आलिया भट आहे का गं? किंवा गेलाबाजार राहुल? मग? सोनियांचा इथं काय संबंध? नाही गं, भाजपचासुद्धा संबंध नाही. भाजप ही फक्त नमोजींची मातादी. आपली मातादी भारतमाता! तिचा जयजयकार असो.
अगं हळूच! किती मोठय़ाने भारतमाता की जय म्हणतेस? लोकांना वाटेल अण्णाजीच आलेत की काय! काय म्हणालीस, कोण अण्णाजी? एवढय़ात विसरलीस? अगं, ते म्हणजे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईतले महात्माजी आणि जेपीजी!.. पण जाऊ  दे. आता त्यांची गरज नाही! का नाही म्हणजे? अरुणभाई जेटली काय म्हणाले ते ऐकलं नाहीस का तू? आता आपल्यासाठी महात्माजी, जेपीजी असं सगळं काही बाबा रामदेवजी. मनातल्या मनात त्यांना प्राणायाम- सॉरी, प्रणाम कर पाहू.  
बने, हे बघ, आता आपण संसदेच्या व्हरांडय़ात आलो. इथं जरा जपून चाल हं.
नाही गं वेडे! ही दिल्ली असली आणि इथल्या १८६ खासदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले असले, तरी इथं तसं काही घाबरण्याचं कारण नाही! निवडून आल्यामुळे त्यांना आपोआपच चाल आणि चारित्र्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. मी जपून चाल म्हणालो, ते खाली फरशी ओली आहे ना, म्हणून. नाहीतर तू पाय घसरून धपकन् आपटायचीस. हो. मागे वाजपेयी सरकार असंच आपटलं होतं इथं. पण आता या शुभप्रसंगी त्याची आठवण कशाला?

बने, पळ पळ.. रामदासभाई येताहेत.. पळ.
हुश्श! थोडक्यात वाचलो! नाही तर त्यांनी आपल्याकडेही मंत्रिपद मागितलं असतं!
मी करतोय प्रयत्नांची शर्थ..
मी करतोय प्रयत्नांची शर्थ..
कारण मला हवंय कॅबिनेटमध्ये बर्थ..
असं काय पाहतेस माझ्याकडे? अगं, हे भाईंचं काव्यपुष्प आहे. तुला काय वाटलं? माझ्या मेंदूवर परिणाम झालाय? तसा परिणाम व्हायला मी थोडाच डोक्यावर पडलोय निवडणुकीत? काहीतरीच बाई तुझं!

आता आपण सेंट्रल हॉलमध्ये आलो हं बने. फिरले ना डोळे? हा ९८ फुटी ऐतिहासिक हॉल पाहून कोणाचेही असेच हाल होतात. आमचे उद्धोजी आले होते ना सपत्नीक परवा, तेव्हा त्यांचंही असंच झालं होतं. टीव्हीवर बघ कसे हरवल्यासारखे दिसत होते. गोपीनाथरावांनी तर आपण कुठं हरवू नये म्हणून शेवटपर्यंत नमोजींची पाठच सोडली नव्हती. एक बरं, की त्यांनी त्यांचं नेहमीचं जाकीट वगैरे घातलं होतं. नाहीतर लोकांना ते नमोजींचे बॉडीगार्डच वाटले असते.
बने, तुला माहीत आहे, १९४७ मध्ये याच ऐतिहासिक हॉलमध्ये सत्तांतराचा सोहळा झाला होता. आता तसा दुसरा सोहळा इथं होणार आहे. याच ऐतिहासिक हॉलमध्ये परवा नमोपची- तेच गं ते- भाजपची बैठक झाली. काय सांगू तुला त्या सोहळ्याची मौज! माझ्या तर डोळ्यांत आनंदानं पाणीच आलं ते पाहून. लालजी पण रडले.
बने, गद्धे, तू हल्ली फारच स्युडो सेक्युलर होत चालली आहेस हं! ते अश्रू आनंदाचेच होते! लालजींनी तसा खुलासापण केला नंतर!
काय म्हणालीस बने? लालजींचा तुला खूप राग येतो? अगं, तू केवढी, ते केवढे? त्यांनी तळं बांधलं, राखलं, म्हणूनच ही कमळं फुललीत ना बने?
अच्छा, अच्छा.. लालजींमुळे नमोजींना रडू आलं, हुंकार रॅलीची हुंदका रॅली झाली, म्हणून तू रागावलीस होय? अशू दे अशू दे! ते लालजी ना तस्सेच आहेत! नमोजींना सालखा सालखा त्लास देतात! आपन ना लालजींचं घल उन्हातच बांधू हं! अमितशाअंकल त्याची व्यवस्था करतीलच.
पण बने, सेंट्रल हॉलमधल्या त्या बैठकीचं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ काय होतं माहिताय?
अगं, नमोजींना हुंदका फुटला हे तर झालंच..
पण त्या बैठकीनंतर ‘दहा जनपथ’मधूनही हुंदके फुटले म्हणतात!