डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्र नेहमीच प्रबोधन परंपरेत आघाडीवर राहिलेला आहे. आज जरी महाराष्ट्रदेशी प्रबोधन परंपरेची पीछेहाट झालेली दिसत असली, तरी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ पत्राच्या शताब्दी वर्षांत सध्या धर्मोन्मादाची गुंगी चढलेल्या महाराष्ट्रास जाग आणण्यासाठी प्रबोधनाची कास धरणे किती निकडीचे आहे याची जाणीव विवेकीजनांस नक्कीच आहे.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !
Sanjay Raut talk about Monopoly of mp and mla in Western Maharashtra in sangli
पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात ‘प्रबोधन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे महत्त्व सर्वानाच मान्य असले तरी या प्रक्रियेची पुरेशी चिकित्सा झाली आहे असे म्हणता येत नाही. आचार्य शां. दा. जावडेकरकृत ‘आधुनिक भारत’ हा ग्रंथ मुख्यत्वे या प्रक्रियेलाच चर्चाविषय बनवत असला आणि डॉ. य. दि. फडके यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर काही खंड लिहिले असले, तरीही मी हे विधान करण्याचे साहस करीत आहे. जावडेकरांच्या ग्रंथाला त्यांना स्वत:ला अपेक्षित असलेल्या ‘गांधीवादी समाजवाद’ या राजकीय विचारसरणीच्या मर्यादा पडल्या आहेत, तर फडके यांचा इतिहास प्राधान्याने राजकीय इतिहास आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनावर सातत्याने लिहिणारा अभ्यासक म्हणजे वाईचे रा. ना. चव्हाण! मात्र, चव्हाणांच्या लेखनाला त्यांच्या हयातीत पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. आणि दुसरे असे की, त्यांचे बरेचसे लेखन संकीर्ण स्वरूपाचे होते.

‘प्रबोधन’ हा शब्द इंग्रजी भाषेतील (खरे तर मूळ फ्रेंच) Renaissance या शब्दासाठी समानार्थक म्हणून वापरला गेला आहे, हे अभ्यासक जाणतात. युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या पर्वात या युगाचा अंत घडवून आणणारी एक ज्ञानप्रक्रिया घडून आली. तिचा या शब्दाने निर्देश होतो. या प्रक्रियेमध्ये युरोपियनांच्या अरबांशी आलेल्या संबंधांचा मोठा वाटा होता. मुळात ग्रीक भाषेतल्या, परंतु युरोपसाठी विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या ज्ञानभांडाराचा अरबांनी परिचय करून घेतला. ते अरबी भाषेत आणले. आपला हा प्राचीन ठेवा युरोपातील विद्वानांना अरबांमुळे पुनज्र्ञात झाला. त्यातूनच- म्हणजे त्याला प्रतिसाद देत, त्यातील ग्राह्य़ांश पुढे नेत व प्रमादांचा प्रतिपाद करीत विज्ञानाची वाढ झाली. या प्रक्रियेत सुरुवातीला अरब अग्रेसर होते. पण पुढे त्यांची दमछाक झाली. त्यांची प्रगती कुंठित झाली व नेमके तिथूनच युरोपियन पुढे गेले. इतिहासातील अरबांची जागा युरोपियनांनी घेतली.

युरोपीय ‘रेनेसाँ’ची तपशिलात चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे. तथापि या प्रक्रियेत युरोपमधील प्राचीन ग्रीक परंपरेचा जणू पुनर्जन्म झाला. या पुनर्जन्म प्रक्रियेची सुरुवात इटलीमध्ये झाली. त्यामुळे ‘इटालियन-फ्रेंच-इंग्रजी’ असा या शब्दाचा प्रवास असून, आपल्याकडे तो अर्थातच इंग्रजीतून आला.

युरोपात या ऐतिहासिक प्रक्रियेची व्याप्ती स्थूलमानाने चौदावे ते सतरावे शतक अशी मानली जाते. या प्रक्रियेची राजकीय फलश्रुती म्हणजे अरबांची पीछेहाट होऊन युरोपातील राष्ट्रांमध्ये वर्चस्वासाठी निर्माण झालेली स्पर्धा व तीत अंतिम फेरीत इंग्लंडने मारलेली बाजी!

जागतिक इतिहासाच्या एका टप्प्यावर अ‍ॅरिस्टॉटल-प्लेटोच्या ग्रीक वारशाला आत्मसात करीत नवयुगाचे निर्माते ठरलेल्या अरबांनी हा वारसा जोपर्यंत आणि जेथपर्यंत इस्लामच्या चौकटीत रिचवता येतो तोपर्यंत व तेथपर्यंत पचवला. त्याच्या पुढे जायचे झाल्यास त्यांना इस्लामची चौकट ओलांडायला लागली असती. ते त्यांच्याकडून होऊ शकले नाही. नेमक्या याच टप्प्यावर युरोपियनांची जणू रिले रेसची ही बॅटन अरबांकडून घेतली. ती पुढे नेताना त्यांना अर्थातच स्वत:च्या ख्रिस्ती धर्मकल्पनांशी संघर्ष करावा लागला. तो केल्यामुळेच ते पुढे जाऊ शकले. तो करता न आल्याने अरब मागे पडले.

ज्या अरबांनी हे ग्रीक ज्ञानभांडार पुनरुज्जीवित करत इतिहास पुढे सरकवला, ते स्वत: नसले तरी त्यांचेच समानधर्मीय असलेले समूह भारतात येऊन त्यांनी भारतभर राज्य केले. महाराष्ट्रात ही प्रक्रिया चौदाव्या शतकात सुरू झाली. याचा अर्थ असा होतो, की ज्या कालखंडात (चौदावे ते सतरावे शतक) युरोपात ‘रेनेसाँ’ची प्रक्रिया ऐन भरात आली होती, त्या कालखंडात महाराष्ट्रात इस्लामी सत्ताधीशांचा अंमल होता. युरोपातील प्रक्रिया पूर्णतेला पोहोचून तेथे आधुनिकतेचा उदय होत असताना महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी स्वकीयांचे राज्य उभारले. मधल्या साडेतीन शतकांच्या दीर्घ कालखंडात महाराष्ट्राला या नव्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून अ‍ॅरिस्टॉटल-प्लेटोची उपलब्धी होणे शक्य नव्हते.. जशी ती युरोपात अरबांच्या माध्यमातून होऊ शकली. महाराष्ट्रातील हा कालखंड म्हणजे साधारण ज्ञानेश्वर ते तुकारामाचा कालखंड होय. हाच मराठी भाषेच्या समृद्धीचा आणि महाराष्ट्राची वैचारिकता घडण्याचा कालखंड आहे.

शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना समकालीन इस्लामी व युरोपिय ख्रिस्ती सत्तांशी करण्याचा मोह त्र्यं. शं. शेजवलकरांसारख्या इतिहासकाराला झाला तर तो उचितच मानावा लागतो. ख्रिस्ती आणि अरब यांच्यातील धर्मयुद्धे एव्हाना इतिहासजमा झाली असली तरी युरोपात कॅथालिक आणि प्रोटेस्टंट यांच्यातील संघर्ष भरात होता. खुद्द स्वराज्याच्या सीमेला लागून असलेल्या गोव्यातील पोर्तुगीजांचे धार्मिक धोरण किती असहिष्णू होते, हे सर्वानाच ठाऊक आहे. आणि शिवरायांना समकालीन असलेल्या औरंगजेबाबद्दल काही सांगण्याची गरजच नाही. या पाश्र्वभूमीवर उलट शिवरायांचे धार्मिक बाबतीतील धोरण उपरोक्त सर्वापेक्षाही आधुनिक होते असे शेजवलकरांचे प्रतिपादन होते. आधुनिकतेचे विज्ञानाशी नाते आहे हे नाकारायचे कारण नाही. तथापि आधुनिकता म्हणजे विज्ञान- आणि तेही शस्त्रास्त्रसज्जतेकडे नेणारे- असा काहीसा कल राजवाडे-सावरकर परंपरेत आढळतो. शेजवलकरांनी आधुनिकतेचा संबंध स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीशी लावला. ही मूल्यत्रयी युरोपीय प्रबोधनातून निष्पन्न झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीशी लावायचा परिपाठ आहे. शेजवलकरांनी महाराष्ट्रातील एकनाथ, तुकाराम आणि रामदास या तीन संतांनी अनुक्रमे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा पुरस्कार केला असल्याचे सांगत त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या मूल्यभानाशी शिवछत्रपतींचा संबंध जोडला. पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वी न्या. म. गो. रानडे यांनी मांडलेला मुद्दा आता शेजवलकर वेगळ्या प्रकारे सांगतात. पुढे उत्तर पेशवाईत समता आणि बंधुता या मूल्यांचा ऱ्हास झाल्याने स्वराज्य गेले, असेही शेजवलकरांचे प्रतिपादन आहे.

मूल्यऱ्हासामुळे असो किंवा आणखी कशाने, मराठय़ांचे स्वराज्य १८१८ साली गेलेच. चौदाव्या शतकात ज्याप्रमाणे येथे यादवांचे राज्य जाऊन खिलजीची इस्लामी राजवट आली, त्याचप्रमाणे आता शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य जाऊन ब्रिटिशांचे राज्य आले.

मात्र, ज्या अर्थाने खिलजी, तुघलक, बहामनी, निजामशाही, आदिलशाही वा मोगल राजवटींना ‘इस्लामी राज्ये’ म्हणता येते, त्या अर्थाने या ब्रिटिश राज्याला ‘ख्रिस्ती राज्य’ म्हणता येत नाही. (शेजारच्या गोव्यातील पोर्तुगीज राज्याला म्हणता आले असते!) प्रबोधनकाळात झालेल्या वैचारिक महामंथनात पुढे आलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि मानवतावाद या विचारधारांमुळे आणि राजसत्ता व धर्मसत्ता यांच्यातील संघर्षांमुळे युरोपमधील अनेक ख्रिस्ती राष्ट्रांचे धर्मवेड कमी  झाले होते. किंबहुना, धर्माचीही चिकित्सा होऊन ख्रिस्ती धर्मातील वैश्विक मूल्यांवर भर देण्याकडे कल वाढला होता. साहजिकच इस्लामी सत्ताधाऱ्यांना उघडपणे आपण इस्लामाचे प्रचारक असल्याचा दावा करत तो सिद्धही करावा लागायचा, तसे या सत्ताधीशांना करावे लागत नसे. युरोपात ज्याप्रमाणे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यात संघर्ष होऊन त्यातून ‘सेक्युलॅरिझम’चा विकास झाला, तसा संघर्ष वा विकास इस्लामी राजवटीत झालेला दिसत नाही.

खरे तर महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी साठ वर्षे बंगालमध्ये ब्रिटिशांचा पायरव झाला होता. १८१८ पर्यंत तर तेथे ही सत्ता चांगली स्थिरावलीही होती. ब्रिटिश शाळा, कॉलेज, न्यायव्यवस्था यांचा जम बसला होता. इतकेच नव्हे, तर सर विल्यम जोन्स यांच्यासारख्या साक्षेपी विद्वानाचे लक्ष प्राचीन भारतीय ज्ञानसंचिताकडे जाऊन ‘भारतविद्या’ या ज्ञानशाखेची उभारणी होत होती. प्रबोधनासाठी ही अनुकूल परिस्थिती होती. पश्चिमेकडे ज्याप्रमाणे अरबांच्या अभिकर्तृत्वामुळे (Agency) ग्रीक वारशाचे पुनरुज्जीवन झाले, त्याप्रमाणे बंगालमध्ये ब्रिटिशांच्या अभिकर्तृत्वामुळे संस्कृत भाषेतील ज्ञानसंचिताचे पुनरुज्जीवन झाले असे म्हणायला हरकत नसावी. कारणे काहीही असोत; बंगालमध्ये मधल्या काळात पारंपरिक विद्येची जपणूक बऱ्यापैकी झाली होती असे म्हणावे लागते. त्यामुळे ब्रिटिश पुनरुज्जीवकांचे काम सोपे झाले. लुप्त ग्रंथ उजेडात आणण्यापेक्षा दुर्लक्षित ग्रंथांची भाषांतरे करून त्यांचे महत्त्व आधुनिक परिप्रेक्ष्यात सांगणे हे त्यांचे कार्य राहिले आहे.

अरबांमुळे ग्रीक ज्ञानभांडाराकडे लक्ष वेधल्या गेलेल्या युरोपीय अभ्यासकांनी ज्याप्रमाणे तो वारसा आत्मसात करीत त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तसेच काहीसे बंगालमध्ये घडल्याचे दिसून येते. ज्यांना ‘प्रबोधनाचे प्रपितामह’ म्हटले जाते त्या राजा राममोहन रॉय यांचेच उदाहरण घेऊ. राममोहनांनी एकीकडे आपल्या धर्मचळवळीसाठी उपनिषदांमधील ब्रह्म हा केंद्रबिंदू मानून ब्राह्मो समाजाची निर्मिती केली, तर दुसरीकडे पारंपरिक संस्कृत-प्राधान्यवादी शिक्षणपद्धतीचा त्याग करून नव्या इंग्रजी पद्धतीच्या शिक्षणाच्या धोरणाला पाठिंबा दिला. लॉर्ड मेकॉलेच्या धोरणांचा पाठपुरावा केला. हे खरे प्रबोधनाचे ‘स्पिरिट’ होते.

महाराष्ट्राचा विचार बंगालच्या पाश्र्वभूमीवर करण्याची प्रथा आहे. तिचे अनुकरण करत प्रबोधनाचा विचार करताना काय दिसते? १७५७ मध्ये प्लासीची लढाई होऊन बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेने मुहूर्तमेढ रोवली. हा प्रकार म्हणजे बंगालमध्ये इस्लामी सत्ताधीशांची सत्ता जाऊन तिची जागा नव्या परकीय सत्ताधीशांनी घेण्याचा होता. १७५७ मध्ये मराठे अटकेपार झेंडा फडकवीत होते. दिल्लीच्या बादशहाला ताब्यात ठेवून त्याच्या माध्यमातून हिंदुस्थानवर नियंत्रण ठेवण्याचे मराठय़ांचे हे राजकारण होते. त्याआधीपासून किमान शंभर वर्षे मराठे स्वराज्याचा उपभोग घेत होते.

या तुलनेचा अर्थ समजून घ्यायला हवा. बंगालमधील हे सत्तांतर म्हणजे एका पारतंत्र्यातून दुसऱ्या पारतंत्र्यात जाणे होते, तर १८१८ मधील महाराष्ट्रातील सत्तांतर स्वराज्यातून (खरे तर साम्राज्यातून) म्हणजे स्वातंत्र्यातून पारतंत्र्याकडे जाण्याचा प्रकार होता. साहजिकच परकीय ब्रिटिश सत्तेला सामोरे जाऊन प्रतिसाद देण्याची मराठय़ांची पद्धत बंगाली लोकांच्या पद्धतीपेक्षा वेगळी होती. या भेदाचा परिणाम प्रबोधनावर झाल्याशिवाय राहिला नाही. परंतु हा एक व्यापक चर्चेचा विषय होईल.

येथे एवढे स्पष्ट करणे पुरेसे होईल, की विल्यम जोन्ससारख्या पौर्वात्यवाद्यांना बंगालमधील प्रबोधनाचे अभिकर्ते होणे शक्य झाले, याचे एक कारण म्हणजे मुळात बंगालमध्ये त्या प्रकारच्या प्राचीन पारंपरिक ग्रंथांची व त्यांच्या अभ्यासकांची उपलब्धता बऱ्यापैकी होती. ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वीच्या काळात मोगल बादशहाची सत्ता असल्यामुळे हिंदू धर्मातील अभिजन वर्गाला खुल्या असलेल्या अवकाशाची व्याप्ती कमी होती. त्यामुळे या वर्गाने पारंपरिक विद्येची- अगदी नव्यन्यायाचीसुद्धा बऱ्यापैकी जोपासना केली होती. आत्मरक्षणासाठी स्वत:ला आखडून घेऊन तो कार्यरत होता. याउलट, महाराष्ट्रातील स्थिती होती. येथील ब्राह्मणांनी राज्यकारभाराच्याच काय, परंतु तलवारबाजीसारख्या धकाधकीच्या क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यामुळे विद्या व आचार याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. एका अर्थाने ही इष्टापत्ती होती व तिच्यासंबंधीची उलटसुलट चर्चा ‘विश्वगुणादर्श चंपू’सारख्या तत्कालीन रचनांमध्ये आढळून येते. त्यामुळे येथे बंगाली अर्थाचे प्रबोधन शक्य नव्हते.

महाराष्ट्रात प्रबोधनासाठी इतिहासकाळात फार लांब जाण्याची गरज नव्हती. शेजवलकरांनी ज्या परंपरेचा उल्लेख केला आहे, ती संतपरंपरा याच कारणासाठी उपयुक्त ठरलेल्याला फार काळ लोटला नव्हता. महाराष्ट्रातील प्रबोधन हे मुख्यत्वे याच परंपरेवर आधारित होते व त्यासाठी कोणत्या खास अभिकर्त्यांची गरज भासली नाही.

महाराष्ट्रातील प्रबोधनाचा वृत्तपत्रसृष्टीशी निकटचा संबंध आहे. बाळशास्त्री जांभेकर हे आद्य पत्रकर्ते व प्रबोधनकर्तेसुद्धा! त्यांनी १८३२ साली मुंबईहून ‘दर्पण’ पत्र सुरू केले, तेव्हा मराठय़ांचे राज्य जाऊन जेमतेम दहा-पंधरा वर्षेच झाली असतील. बाळशास्त्री आद्य पत्रकार असल्याचे सर्वच सांगतात. परंतु बाळशास्त्र्यांनी प्रसिद्ध केलेली ‘ज्ञानेश्वरी’ ही ‘ज्ञानेश्वरी’ची पहिली छापील आवृत्ती होय, याचा उल्लेख कोणी करीत नाही. येथील समाजाची सुधारणा करून त्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या तोडीचे बनायचे असेल तर ते धर्माच्या- म्हणजेच धर्मसुधारणांच्या अंगानेच शक्य असल्याचे बाळशास्त्र्यांच्या लक्षात आले व त्यांनी तिथूनच सुरुवात केली.

महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या वंशवृक्षाचे मूळ अशा प्रकारे बाळशास्त्री आहेत. त्यांच्या तालमीत तयार झालेले दादोबा पांडुरंग तर्खडकर हे या वृक्षाचे खोड होत. दादोबांनीही याच प्रकारे विचार करून धर्मसुधारणा करणारे ‘मानव धर्मसभा’ आणि ‘परमहंस सभा’ हे दोन धर्मपंथ काढले. ‘मानवधर्म सभा’ हा त्यांच्या गुजरातेतील वास्तव्याच्या काळात निर्माण झालेला पंथ असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर प्रभाव नाही. तथापि, ‘परमहंस सभा’ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. ‘दादोबा आणि त्यांची परंपरा’ याबद्दलची सविस्तर चर्चा मी ‘तुकारामदर्शन’ या ग्रंथात केली आहे. त्यातले काही मुद्दे येथे साररूपाने मांडणे उचित ठरेल.

महाराष्ट्रातील हे नवीन धर्मपंथ पाश्चात्त्य विद्या व एकेश्वरी धर्म यांच्या संदर्भात केलेल्या धर्माच्या पुनर्माडण्या आहेत व त्याचा आधार महाराष्ट्रातील संतपरंपरा, विशेषत: तुकोबांचे विचार हाच राहिलेला आहे. या अर्थाने हे महाराष्ट्रातील प्रबोधन युग आहे. धर्म हे समाजजीवनाचे अधिष्ठान असून, बहुतेक अनिष्ट सामाजिक रूढींच्या मुळाशी चुकीच्या धर्मसमजुती आहेत, हे ओळखून या मंडळींनी नव्या धर्मपंथांची उभारणी केली.

दादोबांनी प्रयुक्त केलेला ‘परमहंस’ हा शब्दही तुकोबांच्या अर्थाने आहे. ‘परमहंस तरी जाणे सहज वर्म। तेथे यातिकुल धर्म नाही।।’ ही तुकोक्ती आहे. दादोबांनी रचलेला धर्मग्रंथ अभंगात्मकच होता हे लक्षात घ्यायला हवे. दादोबांच्या परमहंस मंडळीतील तुकाराम तात्या पडवळ यांनी जातिव्यवस्थेची चिकित्सा करणारा ‘जातिभेद विवेकसार’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ठायी ठायी संतांची वचने उद्धृत केली असून, तुकारामशिष्या बहिणाबाई यांच्या वज्रसूचि उपनिषदाच्या अभंगात्मक अनुवादाचाही त्यात समावेश आहे. याच तुकाराम तात्यांनी सर्व संतांच्या अभंगगाथा व ज्ञानेश्वरीचेही प्रकाशन केले, ही बाब उल्लेखनीय आहे.

परमहंस सभेची मात्रा तेव्हाच्या समाजाच्या पचनी न पडलेल्या लोकांनी त्या पंथाला तीव्र विरोध केल्यामुळे दादोबांना ही सभा बरखास्त करावी लागली. तरीही याच सभेतील बुजुर्ग मंडळींचे साह्य़ घेऊन रानडे-भांडारकरांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तर प्रार्थना समाजातील अभिजनांच्या प्रभावाने शंकाकुल झालेल्या महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज वा सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली. स्वत: जोतिरावांचा परमहंस मंडळींशी निकटचा संबंध होता. दादोबांचे शिष्य केशव शिवरामपंत भवाळकर पुणे येथे शिक्षण खात्यात कार्यरत असताना (ही बदली दादोबांनीच केलेली!) त्याच क्षेत्रात काम करणाऱ्या फुले दाम्पत्याचा व त्यांचा संबंध आला. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्यावरील पोवाडा जोतिरावांनी परमहंस सभेचे धुरीण राम बाळकृष्ण यांनाच अर्पण केला आहे.

प्रार्थना समाजाच्या विचारांचे अधिष्ठान संतांच्या- त्यातल्या त्यात एकनाथांच्या व विशेषत: तुकोबांच्या गाथेत होता, हे वेगळे सांगायची गरज नाही. ‘आपण नवभागवत धर्माचे पाईक आहोत,’ असे सांगणाऱ्या प्रार्थना समाजाच्या अनेक अभ्यासकांनी संतसाहित्याच्या संशोधन प्रकाशनास कसा हातभार लावला, हा वेगळ्या चर्चेचा विषय होईल.

फुलेप्रणीत सत्यशोधक चळवळीबाबत तर काही वेगळे सांगायची गरजच नाही. रानडय़ांप्रमाणे फुल्यांना भागवत धर्माशी जवळीक साधायची गरज भासली नाही, तरीही तुकोबांना मात्र त्यांनी सोडले नाही. किंबहुना, तुकोबा हे सत्यशोधक समाजाचे ‘रोल मॉडेल’ होते असे म्हटले तरी चालेल.

जोतिरावांनी केलेली प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज यांची फारकत मोडण्याचे प्रयत्न महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले. शिंदे यांनी केलेले अस्पृश्यता निवारणाचे कार्य आणि त्याला पुरवलेले अध्ययन-संशोधनाचे अधिष्ठान हे एका अर्थाने या दोन्ही समाजाच्या व अंतिमत: संतांच्या कार्याचा विस्तार आहे.

जांभेकरांच्या ‘दर्पण’च्या संदर्भात महाराष्ट्रातील पत्रसृष्टीचा उल्लेख झालेला आहेच. १८४८ पासून लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ‘प्रभाकर’सारख्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ‘शतपत्रे’ लिहून तत्कालीन रूढीग्रस्त समाजाची कठोर चिकित्सा केली. जोतिरावांचे सहकारी कृष्णाजी पांडुरंग भालेकर यांची ‘दीनबंधु’ सुरू करून ब्राह्मणेतर पत्रकारितेची पायाभरणी केली. ‘प्रबोधन’ या पत्रामुळे ‘प्रबोधनकार’ हे बिरुद ज्यांना आयुष्यभर चिकटले ते केशव सीताराम ठाकरे याच परंपरेतील! ब्राह्मणांवरील टीकेचा तत्कालिक भाग सोडला तर ही मंडळी बुद्धिप्रामाण्यवादी, मानवतावादी होती. १९२० साली पुण्यात चिपळूणकर-टिळकपंथीयांचे अधिराज्य असताना अब्राह्मणी पथ चालवणे हे जोखमीचे व धाडसाचे काम होते. ठाक ऱ्यांनी ‘प्रबोधन’ साप्ताहिकातून व इतरही कृतींमधून पुरोहितशाही व भांडवलशाही यांच्यावर कठोर कोरडे ओढले आहेत. कर्मठ ब्राह्मण्यावर टीका करताना, एकनाथांसारख्या संतावर ‘खरा ब्राह्मण’ हे नाटक लिहिताना त्यांना कोणतीही अडचण आली नाही, हे उल्लेखिले पाहिजे. शिवाय त्यातून पुन्हा एकदा प्रबोधन आणि संतपरंपरा यांच्यातील नातेही अधोरेखित होते. ठाकरे यांनी संत गाडगेबाबांच्या ‘जनताजनार्दन’ या पत्राचे संपादकत्व सांभाळले ते काही उगाच नव्हे.

केशवराव ठाकरे यांचे ‘प्रबोधन’ पत्र सुरू झाले तेव्हाची परिस्थिती आव्हानात्मक म्हणावी अशी होती. पहिले महायुद्ध संपले होते आणि मान्टेग्यू चेम्सफर्ड योजनेच्या माध्यमातून भारतात निवडणुकांचे वारे वाहू लागले होते. ब्रिटिश सरकारने देऊ केलेल्या सुधारणांमध्ये भारतीयांसाठी कौन्सिलवर उमेदवार निवडून देण्याची तरतूद होती. विशेष म्हणजे या योजनेत काही जागा मागास जातींसाठी राखीव ठेवण्यात येणार होत्या. त्या जागांसाठी आपली वर्णी लागावी म्हणून वेगवेगळ्या जाती-जमातींचे नेते प्रयत्नशील होते. राजकीय जागृती होऊ लागली होती. मुकुंदराव पाटील यांचे ‘दिनमित्र’, त्याचप्रमाणे भगवंतराव पाळेकरांचे ‘जागृती’ तसेच वा. रा. कोठारी यांचे ‘जागरूक’ ही पत्रे या रणधुमाळीत आघाडीवर होती. त्यात प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांनी उडी घेतली आणि प्रत्यक्ष पुण्यामधून ‘प्रबोधन’ नावाचे पत्र सुरू केले. ब्राह्मणेतर समूहामध्ये पुरोहितशाही, धर्मभोळेपणा आणि सावकारशाही यांची पाळेमुळे खोलवर रुजली होती. ती उद्ध्वस्त करण्याचे वृत्तपत्र हे एक नवे हत्यारच होते. याच दरम्यान ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्नेहबंध जुळून आले. भाऊरावसुद्धा असेच पत्र काढण्याच्या विचारात होते. पण नंतर त्यांनी शैक्षणिक कार्यास वाहून घेतले. पुणे हा त्यावेळी प्रतिगामी अभिजनांचा बालेकिल्ला होता. त्यांना ‘प्रबोधन’सारखे पत्र सहजासहजी पचनी पडणारे नव्हते. ते बंद पाडण्याचे प्रयत्न झाले. पण प्रबोधनकार त्याला पुरून उरले. त्यांची केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आणि पुढे श्रीधरपंत टिळक यांच्याशी दोस्ती जमली. त्यांनी पुण्यातील प्रतिगामी वृत्तीला जाहीर आव्हान दिले. जवळकर आणि ठाकरे यांच्या लेखण्या तिखटपणात एकमेकांशी जणू स्पर्धा करीत. पण मुद्दा फक्त भाषेचा नव्हता, तर त्यांची विचारप्रक्रियादेखील समांतर असे. दोघेही एकाच वेळेला शेतकऱ्यांच्या स्वराज्याचा पुरस्कार करू लागले.

येथपर्यंत जी चर्चा केली, ती धार्मिक (विशेषत: संतांच्या धर्माच्या अंगाने) व सामाजिक क्षेत्रातील प्रबोधनाची होती. या काळात देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असल्यामुळे राजकीय प्रबोधनाचीही गरज होती. या काळातील राजकीय प्रबोधन हे प्राधान्याने ब्रिटिश सत्तेचे जोखड झुगारून देऊन स्वातंत्र्यप्राप्ती करण्याच्या हेतूने घडणे स्वाभाविक होते. त्यातूनच राजकीय स्वातंत्र्याची चळवळ उभी राहणार होती. या प्रकारच्या प्रबोधनाचे प्रवर्तक म्हणजेच निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर! शास्त्रीबुवांनी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिशूळावर राष्ट्रवादाची उभारणी केली. त्यातून लोकमान्य टिळकांसारखे देशपातळीवर छाप पाडणारे नेते निर्माण झाले. इतिहासाचार्य राजवाडय़ांसारखे इतिहास संशोधक पुढे आले. आज कोणीही काही म्हणत असले- आणि तेव्हाही या दोन प्रबोधनकर्त्यांच्या छावण्या एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या असल्याचे दिसून येत असले, तरी देश व समाज या दोघांचा विचार एकत्रितपणे केला असता दोन्ही एकमेकांना पूरक होत्या असे म्हणावे लागते. त्या काळात देश-काल-परिस्थितीच्या रेटय़ामुळे त्यांनी एकमेकांशी केलेल्या किंवा त्यांना कराव्या लागलेल्या भांडणांची आज पुनरावृत्ती करणे म्हणजे इतिहासातून आपण काहीच धडे घेतले नाहीत, हे सिद्ध करण्यासारखे होईल. तसे होऊ नये म्हणून आज आणखी एका प्रबोधनाची गरज आहे.