१९०७ साली जेव्हा डब्लिनला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा प्लेबॉय ही संकल्पना नाटकातून मांडल्यामुळे प्रेक्षकांनी निदर्शनं केली, मोर्चे काढले, प्रयोग सुरू असताना तो करणाऱ्यांना शिवीगाळ करून प्रयोग बंद पाडले. १९११ साली अमेरिकेत या नाटकाच्या प्रयोगावर अंडी, कुजक्या भाज्या फेकून प्रयोग बंद पाडला गेला होता. नाटक बंद पाडण्याची क्रिया जगभरच होत असते. फक्त स्थळ-काळ-वेळ वेगवेगळी असते, पण नंतर हळूहळू प्रेक्षक बदलला. सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरं झाली आणि ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ ही डार्क कॉमेडी आर्यलडमध्ये आणि लंडनमध्ये सादर व्हायला लागली. त्याचा ‘ग्रेटनेस’ लोकांच्या लक्षात आला.
प्ले बॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ हे जे. एम. सिंज नावाच्या आयरिश लेखकाने १९०७ साली लिहिलेलं नाटक. मी ‘मिफ्टा अ‍ॅवॉर्ड’च्या निमित्ताने लंडनला गेलो होतो. प्रथेप्रमाणे नाटक बघायचं हे ठरवलेलं होतंच. नाटकांच्या जाहिराती बघत असताना माझं लक्ष गेलं ते ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ या नाटकावर! ओल्ड विकला त्याचा प्रयोग होता. मी वाचलेलं आणि मला खूप आवडलेलं हे नाटक. मी ठरवून टाकलं- ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ बघायचंच. अशी बरीच नाटकं असतात- ज्यांचं पुनरुज्जीवन होत असतं, पण ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ हे वारंवार होणाऱ्या नाटकांपैकी नव्हतं. ‘ओल्ड विक’ हे लंडनच्या रंगभूमीच्या इतिहासाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं नाटय़गृह आहे. मी शेक्सपीअरच्या ‘अ‍ॅज यू लाइक इट’चा उत्तम प्रयोग तिथे पाहिला होता. ‘ओल्ड विक’ला जाण्यासाठी वॉटर्लू स्टेशनवर उतरावं लागतं. अतिशय सुंदर आणि शांत परिसर. ‘ओल्ड विक’च्या बरोबर समोर एक बुक शॉप आहे. तिथे उत्तमोत्तम ‘वापरलेली’ पुस्तकं स्वस्तात मिळतात. तिथलं नाटकांचं कलेक्शन पण चांगलं आहे. ओल्ड विक हे थिएटर १८१८ साली सुरू झालं. आधी त्याचं नाव ‘रॉयल कोबर्ग थिएटर’ असं होतं. साऊथ बँकचं नॅशनल थिएटर बांधण्यापूर्वीची त्यांची सर्व अ‍ॅक्टिव्हिटी इथून होत असे. १९५१ साली रॉयल कोबर्ग थिएटरचं ‘ओल्ड विक’ असं नामकरण झालं. ओल्ड विकची रेपर्टरी सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांच्या मार्गदर्शनाखाली शेक्सपीअरची नाटकं करण्यासाठी प्रसिद्ध होती. शेक्सपीअरबरोबरच त्यांनी इतरही महत्त्वाच्या नाटककारांची नाटकं केली. मी ‘अ‍ॅज यू लाइक इट’ बघायला गेलो असताना तिथे ओल्ड विकबद्दल माहिती देणारी एक छोटी पुस्तिका विकत घेऊन वाचली होती. त्यात वर उल्लेख केलेली सर्व माहिती छायाचित्रांसकट दिलेली होती. ओल्ड विकची वास्तूसुद्धा अतिशय छान होती. जुनी भक्कम इमारत, नक्षीदार खांब, मुख्य दरवाजातून आत शिरल्याबरोबर अतिशय सुंदर गालिचा होता. मुख्य दरवाजाच्या समोरच्या भिंतीवर लॉरेन्स ऑलिव्हिएचा हॅम्लेटच्या वेशातला मोठ्ठा फोटो होता. मी तिकीट विंडोवर गेलो. मला वाटलं होतं, खूप गर्दी असेल, पण नाही. निम्मं थिएटर रिकामं होतं आणि प्रयोग सुरू व्हायला पाऊण तास शिल्लक होता. मी तिकीट काढून आजूबाजूचे प्रेक्षक बघायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की, बहुतेक प्रेक्षक साठीच्या आसपासचे होते. ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ हे नाटक माहीत असलेले असावेत.
मी प्रेक्षागृहात जाऊन बसलो. नाटकाला गर्दी कमी असण्याचं कारण मी शोधत होतो. नंतर लक्षात आलं की, मी बघत होतो तो नाटकाचा पाचवा प्रयोग होता. लंडनमध्ये या प्रयोगांना ‘प्रीव्ह्य़ूज’ म्हणतात. त्यामुळे नाटकाच्या प्रयोगाचा बरा-वाईट बोलबाला अजून व्हायचा होता. शिवाय नाटककार आयरिश आहे. त्यामुळे त्यातलं इंग्रजी लंडनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीपेक्षा वेगळं होतं. गर्दी कमी असण्याचं तेही एक कारण असू शकतं. नाटकाला गर्दी कमी आहे, म्हणून मी का अस्वस्थ झालो होतो- त्या नाटकाचा निर्माता असल्यासारखा? माझ्या अस्वस्थतेचं कारण मला पटकन सापडलं. मी नाटक वाचलेलं होतं आणि मला ते खूप आवडलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येने ते पाहावं, अशी माझी इच्छा होती आणि माझ्या नकळत माझी आवड मी लोकांवर लादत होतो. माझं मलाच हसू आलं.
नाटक सुरू झालं. माझ्यासकट उपस्थित असलेले प्रेक्षक ते ‘एन्जॉय’ करायला लागले होते. मायो नावाच्या आर्यलडमधल्या समुद्रकिनाऱ्याजवळच्या एका गावात हे नाटक घडतं. नाटकातलं मुख्य लोकेशन होतं एक घर. या घरात दारूचा छोटासा अड्डा होता. तिथं दारू पीत बसलेली माणसं आणि दारू देणारी एक तरुण मुलगी होती. ती हास्यविनोद करता करता बार बंद होण्याची वेळ झाल्याचं सूचन करीत होती. नाटकाचं नेपथ्य छान आणि उपयुक्त होतं. आर्यलडमधल्या मायो विभागातील दोन खोल्यांचं दगडी घर. दिग्दर्शकाने सुरुवातीला पिजीन नावाच्या मुलीला अशा रीतीने रंगमंचावर फिरवलं की, सुरुवातीलाच नेपथ्यरचना प्रेक्षकांच्या लक्षात येईल आणि त्यांचं लक्ष नाटक आणि त्यात घडणाऱ्या घटनांवर केंद्रित होईल. मला हे खूपच आवडलं. अर्थात सर्वच नाटकांमध्ये हे शक्य होईल, असं नाही. नुसतंच नेपथ्य नाही तर नाटकातल्या सर्व पात्रांची ओळख होईल, याचीही व्यवस्था केली होती. मूळ संहितेत थोडासा बदल करून दृश्यबंधांचा वापर करून नाटकातल्या पात्रांची ओळख करून देणं साध्य केलं होतं. मूळ तीन अंकी नाटक संपादन करून दोन अंकी केलं होतं. त्यामुळे लवकरात लवकर व्यक्तिरेखांचा परिचय करून देणं गरजेचंसुद्धा होतं. मी विचार करत होतो- मी स्वत: जेव्हा एखादं जुनं, आवडलेलं नाटक करायला घेतो तेव्हा बऱ्याचदा मी त्याचं संपादन करत नाही. मला जे नाटक आवडतं, त्यातला लेखकाने लिहिलेला सर्वच भाग मला महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे माझी नाटकं लांबतात. ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ मी वाचलेलं होतंच; शिवाय प्रयोग पाहिल्यावर पुन्हा एकदा नजर टाकली तेव्हा माझ्या लक्षात आलं की, किती उत्तम संपादन केलं होतं त्याचं! प्रयोग-परिणामाच्या दृष्टीने आवश्यक तेवढाच भाग नाटकाच्या प्रयोगात होता. मला संहितेचं उत्तम संपादन करायला कधी जमणार कुणास ठाऊक! ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ चा प्रयोग चांगला झाला होताच, पण एखाद्या उत्तम लिहिलेल्या नाटकाच्या शब्दांच्या प्रेमात न पडता त्याची रंगावृत्ती कशी करावी, याचा माझ्या दृष्टीने तो आदर्श वस्तुपाठही होता. आस्वादक म्हणून या नाटकाने मला आनंद दिला आणि रंगकर्मी म्हणून खूप काही शिकवलंही! असा अनुभव खूपच आनंददायी असतो.
‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ या जे. एम. सिंज या नाटककाराच्या नाटकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. १९०७ साली जेव्हा डब्लिनला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा प्लेबॉय ही संकल्पना नाटकातून मांडल्यामुळे प्रेक्षकांनी निदर्शनं केली, मोर्चे काढले, प्रयोग सुरू असताना तो करणाऱ्यांना शिवीगाळ करून प्रयोग बंद पाडले. १९११ साली अमेरिकेत या नाटकाच्या प्रयोगावर अंडी, कुजक्या भाज्या फेकून प्रयोग बंद पाडला गेला होता. नाटक बंद पाडण्याची क्रिया जगभरच होत असते. फक्त स्थळ-काळ-वेळ वेगवेगळी असते, पण नंतर हळूहळू प्रेक्षक बदलला. सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरं झाली आणि ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ ही डार्क कॉमेडी आर्यलडमध्ये आणि लंडनमध्ये सादर व्हायला लागली. त्याचा ‘ग्रेटनेस’ लोकांच्या लक्षात आला. ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ या नाटकामध्ये आर्यलडमधल्या मायो नावाच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या गावाची गोष्ट आहे. त्या गावात ख्रिस्ती नावाचा एक तरुण मनुष्य येतो आणि आपण केलेलं धाडसी कृत्य तो लोकांना वर्णन करून सांगतो. सबंध गाव त्याची ती गोष्ट ऐकून अचंबित होऊन त्याच्या मागं लागतं. त्याचे परिणाम एकूण गावावर आणि त्या ख्रिस्तीवर काय होतात, याविषयीचं हे विनोदी नाटक आहे. ख्रिस्ती नावाचा तरुण मायो गावात येतो. एका दारूच्या अड्डय़ावर अगदी अड्डा बंद व्हायच्या वेळेवर येतो आणि सांगतो की, डोक्यावर कुदळीसारखं हत्यार घालून त्याने त्याच्या वडिलांना ठार मारलं आहे. पोलिसांपासून आणि कायद्यापासून लपायला तो जागा शोधतो आहे. दारूच्या अड्डय़ाचा मालक मायकेल फ्लॅहर्थी त्याला ठेवून घेतो. मायकेलची मुलगी पिजीन त्याला झोपायला जागा देते आणि अड्डय़ावर वेटरची नोकरीही! ख्रिस्तीच्या पराक्रमाची ख्याती गावात पसरायला लागते आणि त्याला बघण्याच्या निमित्ताने येणाऱ्या माणसांची मायकेलच्या अड्डय़ावर गर्दी होते. ख्रिस्ती खूपच प्रसिद्ध होतो. गावातले लोक त्याचा मोठा सत्कार करतात. पिजीन ख्रिस्तीच्या प्रेमात पडते. त्याचं रंगवून गोष्टी सांगणं सुरूच असतं. गावातले लोक त्याच्या गोष्टी सांगण्याच्या हातोटीच्या प्रेमात पडायला लागले होते. ख्रिस्ती मायो या गावाचा हीरो झाला होता. पिजीनचा शॉन नावाचा प्रियकर असतो. त्याला सोडून ती ख्रिस्तीशी सूत जमवते. आता ख्रिस्ती पिजीन आणि विडोक्वीन असा प्रेमाचा त्रिकोण होतो. गावातल्या इतर स्त्रियासुद्धा धाडसी ख्रिस्तीकडे आकर्षित व्हायला लागल्या होत्या. कारण ख्रिस्ती गाढवांची शर्यत जिंकतो. तेसुद्धा एक मरतुकडं गाढव घेऊन! हा धाडसी, गोष्टीवेल्हाळ ख्रिस्ती प्लेबॉय म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्याने प्लेबॉय या संकल्पनेला वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं होतं. जे. एम. सिंज या नाटककाराने हे नाटक व्यक्तिरेखांच्या आणि नर्मविनोदी संवादांच्या साहाय्याने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं आणि आहे.
नाटक इथपर्यंत पोहोचल्यानंतर कथानकात एक ट्विस्ट येतो. ख्रिस्तीचा बाप जखमी अवस्थेत, पण जिवंत मायो गावात येतो आणि एकच गोंधळ होतो. माहोन- म्हणजे ख्रिस्तीचा बाप त्याच्यासमोरच येऊन उभा राहतो. ख्रिस्तीला काय करावं ते समजत नाही. गावातली सगळी माणसं त्याच्यावर उलटतात. त्याला खोटारडा आणि भित्रा म्हणायला लागतात. पिजीनसुद्धा त्याच्यापासून दूर जायला लागते. ख्रिस्तीला हे सहन होत नाही. तो पुन्हा एकदा सर्वासमक्ष आपल्या बापावर प्राणघातक हल्ला करतो. ख्रिस्तीचा बाप माहोन मेला अशी या वेळी सर्वाची खात्री पटते, पण या वेळी ख्रिस्तीचा सत्कार न करता त्याला पिजीनसकट सगळे गुन्हेगार ठरवतात आणि त्याची फाशी निश्चित करतात. तेवढय़ात रक्ताने माखलेला माहोन येतो. तो ख्रिस्तीकडून झालेल्या दुसऱ्या प्राणघातक हल्ल्यातूनसुद्धा वाचलेला असतो. माहोन वाचल्यामुळे ख्रिस्तीची फाशी टळते. मायकेल ख्रिस्तीला गाव सोडून जायला सांगतो. शॉन संधी साधून पिजीनशी लग्न करायचा प्रस्ताव मांडतो, पण पिजीन त्याला धुडकावते. आपल्याला असं वाटायला लागतं की, ती ख्रिस्तीशी लग्न करायला तयार होईल, पण ती तसं करत नाही. ख्रिस्तीलासुद्धा ती नाकारते. आणि दु:खी अंत:करणाने म्हणते- ‘मी माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वात मोठय़ा प्लेबॉयला नकार दिला.’ नाटक संपलं. मी माझ्या एका आवडत्या नाटकाचा चांगला प्रयोग पाहिला होता.
जे. एम. सिंज या नाटककाराचं माझ्या मते क्लासिक म्हणावं असं हे नाटक. आयरिश क्लासिक! या नाटकाचे सुरुवातीचे प्रयोग आर्यलडमध्ये झाले. नंतर ते इतर युरोपीय भाषांमधूनही झाले. १९६२ साली आर्यलडमध्ये त्याच्यावर सिनेमाही झाला. १९९४ साली टेलिव्हिजनवर मालिकापण झाली. एक असं नाटक- ज्याच्यावर १९०७ साली आर्यलडमध्ये समाजविघातक म्हणून बंदी घातली गेली होती, ते पुढच्या काळात असं जगभर गाजलं. अ‍ॅन्टॉनीन आरतॉड या प्रसिद्ध रंगकर्मीने प्लेबॉयला ‘थिएटर ऑफ क्रुएल्टी’ची सुरुवात मानलं. सार्त् या फ्रेंच नाटककाराने प्लेबॉय बऱ्याच वेळा बघून अस्तित्ववादी दृष्टिकोनातून ख्रिस्ती या प्रमुख व्यक्तिरेखेचं विश्लेषण केलं आहे. जर जॉर्ज बर्नाड शॉ तर म्हणतो- ‘सिंज आर्यलडमधल्या जनतेची हलक्या-फुलक्या पद्धतीने बदनामी करतो, ते सबंध जगाबद्दलच खरं आहे. वाहवत जाणारी माणसं, विवेक हरवून बसलेली आणि त्यामुळे हास्यास्पद होणारी माणसं, मनात सुप्त क्रौर्य दडवून जगणारी माणसं जगभर आढळतात.’ अशा पद्धतीने ‘प्ले बॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ची दखल युरोपमधल्या महत्त्वाच्या रंगकर्मीनी घेतली आहे. ओल्ड विकवर प्रयोगाच्या वेळी जी पुस्तिका देतात, त्यात ही सर्व माहिती मिळते.
ओल्ड विकचा मी पाहिलेला प्रयोग अभिनय आणि तांत्रिकदृष्टय़ा चांगला होता. अभिनेत्यांनी बोलण्याचा जो आयरिश लहजा पकडला होता तो मधे मधे समजायला जड जात होता; पण तरीही मी नाटक बारकाईने वाचलेलं असल्यामुळे मला बराचसा भाग समजला. जॉन क्रॉवले हा या प्रयोगाचा दिग्दर्शक होता. मोठं आव्हान होतं त्याच्यासमोर.. सिंजच्या नाटकातला डार्क ह्य़ुमर पोहोचवायचं! शब्दांमधून तो पोहोचण्याची शक्यता होती; पण दृश्यस्वरूपातून तो पोहोचविणं जरा अवघड होतं. ‘प्ले-बॉय’ हा फार्स नाही हे ध्यानात घेऊन, अभिनेत्यांकडून तसा तो करून घेणं कठीण होतं. नाटकात काही प्रसंग असे आहेत- विशेषत: दारूच्या अड्डय़ावरची माणसं आणि ख्रिस्ती यांच्या परस्परसंबंधातले, जे फार्सिकल होऊ न देणं कर्मकठीण होतं, पण क्रॉवले यांना ते साधलं होतं. विडो क्विन आणि पिजीन या दोन सुंदर स्त्रिया ख्रिस्तीवर आपला हक्कसांगतात, तो प्रसंग तर कमाल होता. विडो क्वीनचं काम करणारी निआम कुसॅक ही अभिनेत्री फारच छान होती. किंबहुना मला तिचं काम सर्वात जास्त आवडलं. पिजीनशी किंवा गावातल्या इतर लोकांशी बोलणारी क्वीन आणि ख्रिस्ती समोर आल्यावर त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करणारी क्वीन- यांच्यातला फरक शरीरातून आणि स्वरातून कुसॅक या बाईने जो पोहोचवला, तो लाजवाब! मला तिची एक पोझ डोळ्यांसमोर अजून दिसते. ती ख्रिस्तीसाठी खाणं घेऊन येते आणि त्या वेळी ती बाई त्या दारूच्या अड्डय़ाच्या दरवाजात ज्या पद्धतीने उभी राहिली होती, ते दृश्य केवळ अप्रतिम! शब्दावाटे काहीही न बोलता शरीरावाटे ती बरंच काही बोलून गेली. दिग्दर्शक जॉन क्रॉवलेला या नाटकाचा पोत बरोबर समजला होता आणि प्रयोगात ते दिसतही होतं. फक्त मला खटकली प्रमुख पात्रांची पात्र निवड! रॉबर्ट शिहॅन हा सिनेमा आणि टीव्हीवर काम करणारा प्रसिद्ध अभिनेता प्रथमच नाटकात काम करीत होता. रॉबर्ट शिहॅन अभिनेता चांगला होता; पण तो ख्रिस्ती म्हणून नको इतका देखणा होता. त्याच्या देखणेपणावर कुठलीही मुलगी फिदा होईल, असा होता. माझ्या डोळ्यांसमोरचा ‘प्ले-बॉय’ दिसायला बरा नसलेला, केवळ त्याच्या धाडसामुळे हीरो झालेला होता! शिहॅनच्या देखणेपणामुळे त्याने सांगितलेल्या त्याच्या धाडसाच्या कथांची गंमत कमी झाली, असं मला वाटलं. शिवाय वेशभूषेमध्ये त्याचे कपडे थोडे ब्राइट होते आणि इतरांचे जरा डल. त्यामुळे शिहॅनचं देखणेपण जास्तच ठसलं. पिजीनचं काम करणारी रूथ नेगा या अभिनेत्रीनेही आपली व्यक्तिरेखा चांगली उभी केली. सुरुवातीला अजागळ, पण ख्रिस्तीच्या प्रेमात पडल्यावर वेशभूषेतला, चालण्या-बोलण्यातला फरक आणि नाटकाच्या शेवटी अपरिहार्यपणे ख्रिस्तीला सोडण्याचा घेतलेला निर्णय- हे सर्व तिने परिणामकारकरीत्या उभं केलं. सिंजच्या मनात असलेला अत्यंत बुरसटलेल्या कल्पनांना चिकटलेला आर्यलडमधला समाज त्याच्या लेखनातला तिरकसपणा कायम ठेवून जॉन क्रॉवलेने या ओल्ड विकच्या निर्मितीत आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याने ठसविला.
मला या नाटकाच्या प्रयोगातली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे नेपथ्य आणि त्याचा दिग्दर्शक आणि नेपथ्यकाराने मिळून केलेला वापर! स्कॉट पास्क या नेपथ्यकाराने रंगमंचावर दगडी भिंती असलेला मायकेल फ्लॅहर्थीचा दारूचा अड्डा आणि त्याच्या घराच्या आतला भाग छान उभा केला होता. त्यासाठी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. हवा तेव्हा दारूचा अड्डा दिसायचा आणि हवा तेव्हा घराच्या आतला भाग! नाटकातल्या इंटिमेट प्रवेशांसाठी म्हणजे पिजीन आणि ख्रिस्तीमधल्या घराच्या आतला भाग वापरला जात होता आणि इतर प्रवेशांसाठी बाहेरचा भाग! पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा सेट प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर फिरत होता. हा सेट आपला आपण फिरत होता, मेकॅनिकली आणि हवा त्या अँगलला थांबत होता. म्हणजे पिजीनला खिडकीतून बाहेरचं दृश्य बघायचं असेल तर सेट थोडासा फिरायचा आणि प्रेक्षक त्या व्यक्तिरेखेच्या अँगलमधून बाहेरचं दृश्य बघत होता. थोडक्यात- एखादा कॅमेरा लावावा तसं आपण त्या-त्या व्यक्तिरेखेच्या डोळ्यांमधून, दिग्दर्शक सांगेल तसा हवा तेवढा भाग आपण बघत होतो आणि सेट फिरण्याचा वेगही पात्रांच्या मानसिकतेप्रमाणे बदलत होता. ज्या दृश्य स्वरूपाचं मी वर्णन करतोय ते शब्दांत सांगणं कठीण आहे. हल्ली आपण बऱ्याच नाटकांमध्ये मल्टिमीडियाचा वापर होताना बघतो; पण मी पाहिलेल्या ‘प्ले-बॉय’मध्ये कसलंही शूटिंग न करता, नाटकाचं नाटकपण तसंच ठेवून, मला हव्या त्या अँगलमधून एखादय़ा सिनेमासारखं नाटक दाखवत होते. अशा प्रकारचा नेपथ्याचा वापर मी तरी यापूर्वी नाटकात पाहिला नव्हता, अचंबित करणारा आणि नाटकाला पूरक असा!
‘प्ले बॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ हे नाटक १९०७ साली त्याला झालेल्या विरोधामुळे गाजलं, असं काही विद्वानांचं मत आहे. मला मात्र तसं बिलकूल वाटत नाही. खोटारडय़ा, फसव्या माणसांच्या मागे लागणं, त्यांना हीरो बनविणं आजही सर्व क्षेत्रांत सुरू आहे. तसंच परंपरेने चालत आलेल्या रूढी कितीही घातक असल्या तरी अंधत्वाने त्याच्यावर विश्वास ठेवणंही नाटककाराने मी वर नमूद केलेल्या गोष्टी नाटकात तिरकस विनोदाच्या अंगाने मांडल्या आहेत, पण हे सगळं करीत असताना आपल्याला ख्रिस्तीचा राग येत नाही. कारण तो पूर्णपणे काळा रंगवलेला नाही. त्याला इंग्रजीत आपण ‘लव्हेबल रास्कल’ म्हणू. ‘प्ले बॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’चा भारतात कुणी प्रयोग केल्याचं माझ्या ऐकिवात नाही, पण ख्रिस्तीसारख्या व्यक्तिरेखा मात्र आपल्या नाटक-सिनेमांमध्ये दिसत राहिल्या. उदाहरणार्थ ‘कभी हा, कभी ना’ या कुंदन शहा दिग्दर्शित हिंदी चित्रपटातील सतत खोटं बोलणारी आणि तरीही हवीहवीशी वाटणारी शाहरुख खानची व्यक्तिरेखा!
अशा रीतीने ही ‘क्लासिक’ मानली जाणारी आयरिश कॉमेडी जगभर पोहोचली.