‘बँकलुटीचे कटु वास्तव’ (६ डिसेंबर) हा लेख वाचला. उद्योजकांकडून करण्यात आलेली बँकांची बुडीत कर्जाची आकडेवारी वाचताना भोवळ आली. ग्राहकहित जपणाऱ्या अनेक संस्था/ व्यक्ती आहेत, त्यांनी या लेखाची नोंद घेऊन संबंधितांना उत्तरदायी केले पाहिजे. बँकेतील पैसा हा शेवटी सामान्य नागरिकांचा असतो आणि त्यांनी विश्वासाने आणि व्याज मिळेल या आशेने तो बॅंकेत ठेवलेला असतो. सामान्य कर्जदाराला कर्ज मिळण्यासाठी, ते फेडण्यासाठी बऱ्याच दिव्यातून जावे लागते. त्या तुलनेत कर्जबुडवे मात्र हितसंबंध राखून असतात. उद्योजकांना कर्ज देण्यासाठी वेगळी बँकव्यवस्था असावी.

– डॉ. मधुकर घारपुरे, सिंधुदुर्ग

चुकीचा संदर्भ

मनोहर पारनेरकर यांच्या ‘सांगतो ऐका’ सदरात ‘जगप्रवासी रवींद्रनाथ’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी ‘टागोरांनी टिळकांवरच्या देशद्रोहाच्या खटल्यात त्यांची बाजू लढवायला दोन प्रसिद्ध इंग्लिश बॅरिस्टर कोलकात्याहून पाठवले, तसेच खटल्याच्या खर्चासाठी वीस हजार रुपयांचा निधी गोळा केला’ असा उल्लेख केला आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. टिळक आणि अमृत बझार पत्रिकेचे संस्थापक- पालक शिशीरकुमार घोष यांच्यात घनिष्ठ जिव्हाळा होता. तसेच त्यांचे बंधू मोतीलाल घोष यांचाही टिळकांवर विशेष लोभ होता. टिळकांवरचे राजद्रोह-देशद्रोहाच्या खटल्याचे संकट आपले मानून त्यांनी टिळकांना मदत पुरवण्याची प्रेरणा बंगाली जनतेत उत्पन्न केली. त्यांच्याच प्रयत्नांनी प्यू आणि गार्थ हे इंग्लिश बॅरिस्टर आणि चौधरी नावाचे भारतीय बॅरिस्टर तसेच निधी घोष यांनी पाठवला. पुढे लोकमान्य टिळकांनी टागोरांना देशकार्यात गुंतवण्यासाठी  ५०,००० रुपये चिरोल खटल्याच्या वेळी इंग्लंडला जाण्याआधी पाठवले होते. मात्र, टागोरांनी ही रक्कम स्वीकारली नाही. निधीसंबंधी वस्तुस्थिती समजावी म्हणून हे लिहीत आहे. हा संदर्भ न. र. फाटकलिखित ‘लोकमान्य’ या ग्रंथात पान क्र. १५२ आणि १६३ येथे वाचावयास मिळतो. याच आशयाचा संदर्भ साहित्यसम्राट न. चिं. केळकरलिखित टिळक चरित्राच्या पहिल्या खंडातही आहे.

– अरुण भंडारे, मुलुंड

आरक्षणाचे राजकारण करणे गैर

‘क्रिमी लेयरची कोंडी’ (२९ डिसेंबर) हा अ‍ॅड. अभिनव चंद्रचूड यांचा लेख वाचला. आरक्षणाचे लाभ घेऊन आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीप्रत आलेल्या मागासवर्गीयांच्या पाल्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असतात. उलटपक्षी, सवर्ण गरीब कुटुंबातील विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे अशा सुविधांपासून वंचित असतात. त्यामुळे क्रिमी लेयर गटातील पालकांच्या मुलांना आरक्षणाचे लाभ देणे हे आर्थिकदृष्टय़ा मागास सवर्ण विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे असे म्हणावे लागेल. तीच गोष्ट नोकरीत बढतीसाठी आरक्षणाचे लाभ देण्याबाबत. कारण एकदा नोकरी मिळाली की सर्व कर्मचारी समान पातळीवर येतात. नंतर आपली अर्हता वाढवून बढतीसाठी पात्र होणे कुठल्याही कर्मचाऱ्याच्या बुद्धिमत्तेवर आणि मेहनतीवर अवलंबून असते. पण बढतीसाठी आरक्षणाचे लाभ देणे हे कार्यक्षम सवर्ण कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरते. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनी मागासवर्गीयांच्या मतांसाठी आरक्षणाचे राजकारण करणे सर्वथा गैर आहे.

– रमेश नारायण वेदक, चेंबूर, मुंबई</strong>