मी ना मेनन यांचं ‘दंगलीआधी आणि दंगलीनंतर धगधगती मुंबई’ हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे. मुंबई दंगलीचा काळावर झालेला परिणाम तपासण्यासाठी मीना मेनन यांनी २००७ ते २००९ अशी दोन-अडीच र्वष संशोधन केलं. त्यासाठी त्यांना ‘SARAI’ ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. दंगलपीडितांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांनी हे संशोधन तडीस नेलं आणि त्यावर आधारित हे पुस्तक प्रकाशित केलं. अक्षर प्रकाशनातर्फे त्याचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. दीप्ती राऊत यांनी केलेलं हे भाषांतर अतिशय सफाईदार आहे. सामाजिक आणि राजकीय संज्ञा ओघवतेपणी मराठीत आल्या आहेत. कारण शेवटी भाषांतर हे फक्त भाषिक पातळीवर करून चालत नाही, तर संहितेचा सांस्कृतिक अनुवादही कसा व कितपत करायचा, याचा भाषांतरकाराला अंदाज असावा लागतो. यासंदर्भात दीप्ती राऊत यांची मेहनत पदोपदी जाणवते. साधं हे वाक्य बघा- ‘शेवटी मुंबई ही महानगरी आहे. इथे लोकांना पैशाशी मतलब आहे.’ आता या ओळीमध्ये येणारा ‘मतलब’ हा किती अचूक शब्द आहे! पण या पुस्तकामध्ये मूळ पुस्तकाचं नावही नाही. सहसा मूळ इंग्रजी पुस्तकाचं नाव अनुवादित पुस्तकात आढळतंच. पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन वर्षही दिलेलं असतं. तसं या पुस्तकात आढळत नाही. ‘गुगल’ सांगतं की, मीना मेनन यांचं २०११ साली सेज पब्लिकेशनतर्फे ‘Riots and After in Mumbai : Chronicles of Truth and Reconciliation’ हे पुस्तक प्रकाशित झालं. अजून एक प्रश्न- हे पुस्तक हा वाढीव अनुवाद आहे का? कारण पृष्ठ क्र. ८६ वर एक वाक्य आहे- ‘२००४ च्या लोकसभा निवडणुकीत ६२ जागांचे यश पाहता यावेळची (२००३) कामगिरी अत्यंत वाईट ठरली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेला मोदी-लाटेचा फायदा मिळाला.’ आता २०११ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या अनुवादात ही २०१४ सालची विधानं कशी आली, हे एक कोडंच आहे. पहिल्या दोन-तीन पानांमध्ये मूळ संहितेचे तपशील छापणं किती आवश्यक असतं, हे अशा उदाहरणांमधून स्पष्ट होतं. नपेक्षा संहितेची विश्वासार्हताच धोक्यात येते. पण भाषांतराहूनही मोलाचा आहे पुस्तकातील आशय, लेखिकेची मेहनत, तिचा दृष्टिकोन, दंगलपीडितांपासून मनोहर जोशींपर्यंतच्या मुलाखती आणि त्यामधलं नाटय़! या पुस्तकाच्या राजकीय अन्वयार्थाबद्दल मतभेद होऊ शकतात; पण हे पुस्तक अशासाठी महत्त्वाचं आहे, की ते मुंबई दंगलीचा नुसता गोषवारा न मांडता इतिहासाशी पदोपदी सांगड घालत जातं. पुष्कळ अभ्यासांती ते आलेलं आहे. खेरीज ज्या विषयासंबंधी हे पुस्तक बोलू पाहतं तो विषय आजही अस्तंगत झालेला नाही. मूळ संशोधन जसंच्या तसं न उतरवता मीना मेनन यांनी एक वैशिष्टय़पूर्ण घाट पुस्तकाला दिला आहे. मधेच अनेक पुस्तकांतले परिच्छेद उद्धृते म्हणून येतात. पण लगोलग लेखिका स्वत:चं मनोगत लालित्यपूर्ण शैलीत मांडते. दंगलपीडितांच्या मुलाखतींचे अंश येतात. आणि ही सारी मांडणी नाटय़पूर्ण रीतीने कळसाला नेत एकेक प्रकरण संपतं. हा घाट वेगळा, सर्जनशील आहे. हे पुस्तक समाजशास्त्रावरचं लिखाण लालित्यपूर्ण तऱ्हेनं कसं करावं (त्याचा संशोधकीय बाज व वजन न घालवता!), याचा उत्तम वस्तुपाठ आहे.
न्या. श्रीकृष्ण आयोगाचं एक मोठ्ठंच्या मोठ्ठं पांघरूण मीनाबाईंनी पुस्तकभर पांघरलेलं आहे. न्या. श्रीकृष्ण आयोग जितका गाजला, तितका क्वचितच दुसरा कुठला आयोग नजीकच्या काळात गाजला नसेल. लेखिकेला आयोगाचे निष्कर्ष हे केवळ पटतात असं नाही, तर तेच आधारभूत घेऊन तिनं संशोधन केलेलं दिसतं. कधी ती तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना थेट भेटून त्यासंबंधी विचारते. तिनं लिहिलं आहे- ‘मुख्यमंत्री म्हणून जोशी यांनी श्रीकृष्ण आयोगाला विरोध केला होता. विधानसभेत ते यावर दोन दिवस बोलले. त्यावेळी आपण अहवालातील त्रुटी मांडल्याचं त्यांनी सांगितलं. न्या. श्रीकृष्ण यांना अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याचं त्यांचं मत आहे.’ चार ओळींमध्ये ही लेखिका खटाखट राजकारण उलगडते. ती मुस्लीम दंगलपीडितांना भेटते, तशीच हिंदू दंगलपीडितांनाही! राधाबाई चाळीतली दंगल ही मुंबई दंगलीमधलं एक महत्त्वाचं सत्र होतं. संशोधनात लेखिकेच्या ध्यानी येतं की, जी जळाली ती गांधीचाळ होती; राधाबाई चाळ नव्हे! ‘गडबडीत लोकांना वाटलं की, दंगलीत राधाबाई चाळच जळाली. नावातल्या त्या गोंधळामुळे राधाबाई चाळीतल्या रहिवाशांना बरीच मदत मिळाली आणि खऱ्या पीडितांपर्यंत कोणीच पोहोचलं नाही.’ लेखिकेचं हे निरीक्षण किती महत्त्वाचं आहे! गांधीचाळीत जवळजवळ जिवंत जाळण्यात आलेल्या नयना बने यांना लेखिका भेटते, तिची सद्य:स्थिती बघते. तसंच ती सुलेमान बेकरीच्या मोहमद अबूस सत्तार यांनाही भेटून बोलतं करते. या मुलाखती हे या पुस्तकाचं खरं बलस्थान आहे. साऱ्या दंगलपीडितांच्या व्यथा खऱ्या आहेत. आणि बव्हंशी सारख्याही आहेत. पण त्याचे परिणाम सारखे नाहीत. कुणी कोषात गेलं आहे, कुणी झटकलाच आहे भूतकाळ, तर कुणी विखारी विरोधामध्ये मग्न आहे.
पुस्तकात लेखिकेनं वर्तमान सतत भूतकाळाला जोडलेला दिसतो. पहिलं प्रकरणच ‘धर्मवादाचा इतिहास’ या शीर्षकाचं आहे. टिळक, सावरकर, संघ, भाजप, शिवसेना ते सनातन संस्था असा एक मोठा सरळरेषेतला प्रवास लेखिका मांडते. (म्हणजे ती रेष सरळ आहे, असं लेखिकेचं म्हणणं आहे.) अर्थात मूळ ‘फोकस’ आहे शिवसेना! लेखिकेची पुस्तकातली भूमिका थोडक्यात सांगायची तर अशी : हिंदू आक्रमक राष्ट्रवाद हा पूर्वीपासून आस्ते आस्ते वाढत गेला आहे. धार्मिक दंगलींचा इतिहास हा मुख्यत्वे १८९३ सालच्या गोरक्षण चळवळीपासून सुरू होतो. १९८० मध्ये काँग्रेसने त्यांचे धर्मनिरपेक्षतेचे रंग दाखवायला सुरुवात केली. शीख दंगली ते शाहबानू प्रकरण दोन परिच्छेदांत उरकून मग लेखिकेने बाबरी मशीद, अडवाणींची रथयात्रा, मुंबई दंगल आणि मग बॉम्बस्फोट असा प्रवास क्रमानं दाखवला आहे. शिवसेनेनं दंगलीला हातभार लावल्याचं तिचं मत तिनं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तऱ्हेनं अनेकदा सांगितलं आहे. (‘बाळासाहेबांवरील केसेस.. आणि झगडा- माहिती मिळवण्याचा!’ या शीर्षकाचं परिशिष्टच अंती आहे.) लेखिकेचा मुख्य मुद्दा आहे तो ‘घेट्टो’ तयार झाल्याचा! दंगलीनंतर हिंदू आणि मुस्लीम वस्त्या स्वतंत्र होत गेल्या, नवे घेट्टो तयार झाले, असं ती सप्रमाण दाखवते. ‘विस्थापन आणि ध्रुवीकरण’ हे प्रकरण समाजशास्त्रीयदृष्टय़ा महत्त्वाचं आहे. या पुस्तकातलं जे अंतर्गत स्थलांतर आहे- मुंबईतल्या मुंबईत झालेलं, जिव्हारी लागलेलं, मन उजाड करून टाकणारं, विश्वासच नाहीसं करणारं स्थलांतर- त्याला तोड नाही. म्हणूनच कितीही राजकीय मतभेद असले तरी वाचकानं पुस्तकातली ही जी दंगलीमागची आवर्तनं आहेत, ती अभ्यासायला- निदान ध्यानी घ्यायला हवीत.
lr17आता काही निरीक्षणं- लेखिकेच्या विचारसरणीनुसार, अनुभवांनुसार तिनं माणसांना, घटनांना पुस्तकात झुकतं वा पडतं माप दिलेलं दिसतं. ते नैसर्गिकही आहे. तटस्थ असं काही नसतंच. पण संशोधनपर लिखाणात संतुलनाची अपेक्षा असते. इथे काही ठिकाणी ते संतुलन हरवलं आहे. काँग्रेसने शाहबानूच्या निमित्ताने केलेलं जुन्या विचारसरणीच्या मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा ओझरता उल्लेख येतो. पण बाबरी मशिदीसंदर्भात ही घटना इतिहासाच्या नजरेनं महत्त्वाची आहे. ‘बॉम्बस्फोटानंतर मुंबईत मुस्लिमांवर हल्ले झाले नाहीत,’ हे मत अनेकजण लेखिकेला सांगतात. त्यावर तिचा स्वत:चा दृष्टिकोन येणं गरजेचं होतं. तसा तो येत नाही. तेव्हा लेखिकेचंही मत तसंच आहे का, असं वाटू शकतं. दाऊद आणि मुंबईचं कुख्यात गुन्हेगारी विश्व यांचा ऊहापोह या पुस्तकात नाही. तो विषय आणि दंगली-बॉम्बस्फोट परस्परांशी निगडित नाहीत, असं म्हणणं हास्यास्पदच ठरेल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी ही स्थानिक अशी केस स्टडी असली तरी त्याचा जागतिक प्रतिरव पुस्तकात उमटलेला नाही. आज जगातलं धार्मिक राजकारण अनेकपदरी व खूपच गुंतागुंतीचं झालं आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम यापेक्षाही ‘आयसिस’च्या रूपानं मुस्लीम विरुद्ध मुस्लीम असा संघर्षही पेटलेला दिसतो. म्हणूनच ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायजेशन’च्या संकल्पनेतलं तथ्य जाणून वाटतं की, खरा संघर्ष धर्म-पंथ-जातीमधल्या सुधारक व जहाल यांच्यामधला होऊ पाहतो आहे.
असं जरी असलं तरी मुंबई दंगलीचे व्रण अद्याप भरून आलेले नाहीत. म्हणूनच अपुरं वाटलं, पटलं- न पटलं तरी हे पुस्तक महत्त्वाचं आहे.
‘दंगलीआधी आणि दंगलीनंतर धगधगती मुंबई’-  मीना मेनन, अनुवाद : दीप्ती राऊत,
अक्षर प्रकाशन, पृष्ठे : ३१९, मूल्य : ३२५ रु.     
ashudentist@gmail.com

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार