हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

साधारणत: पंधराएक वर्षांपूर्वीची माझी एक वैयक्तिक आठवण आहे. कुणीतरी त्यांच्या मुलाविषयी माझ्या घरातल्यांना सांगत होतं.. ‘आमच्या घरात अमुक अमुक गोष्ट नियमित वाचली जाते. त्यावर आमचं पूर्ण कुटुंब अधिकारवाणीनं बोलू शकतं. अगदी गावाच्या पंचक्रोशीमध्ये आमच्या पणजोबांनी त्या ग्रंथाचं सामूहिक वाचन सुरू केलं. आज अनेक अशिक्षित गावांमध्ये या ग्रंथाचे वर्ग सुरू झाले आहेत. लोकांनी व्यसने सोडली आहेत. घरातील वाद, तंटे, मारहाण कमी झाली आहे. काही मंडळी तर चक्क संस्कृत श्लोक समजू लागली आहेत..’ वगैरे वगैरे! दीड दशक जुनी असलेली ही स्मृती.. हा संवाद मला ‘रिच्युअल्स-कर्मकांडे’ या विषयावरील सिद्धान्त वाचताना अनेकदा आठवतो. खरं तर ढोबळ लोकधारणांच्या दृष्टीने पवित्र ग्रंथवाचन किंवा विशिष्ट गुरू, बुद्ध, र्तीथकर किंवा प्रेषिताची शिकवण आत्मसात करण्याचे उपक्रम आणि त्यातून समाजात पसरवली जाणारी दारू- दंगे-मारहाणरहित ‘सामाजिक नैतिकता’ ही अतिशय पोषक आणि चांगली बाब. बहुधा अशा प्रकारच्या ‘वाईट’ सवयी घालवून चांगल्या सवयी लावायचे कार्य अशा धार्मिक दीक्षा, ग्रंथवाचन, कर्मकांडे, धार्मिक सण, मेळे यांच्या माध्यमातून अधिक प्रभावी रीतीने केले जाते, अशी सर्वसाधारण धारणा आपल्या समाजात रूढ असते. मात्र, धर्मश्रद्धांच्या वेष्टनात अशा गोष्टींविषयीची जागरूकता रुजवणे ही केवळ एकरेषीय प्रक्रिया असते असे मात्र निश्चितच नाही. काही वाईट सवयी घालवण्यासाठी काही चांगल्या सवयी लावणे किंवा काही विशिष्ट पारलौकिक, ऐहिक इच्छा प्राप्त करण्यासाठी विशिष्ट कर्मविधी-उपचारांचे पालन करणे ही आपल्या समाजात दिसून येणारी अगदी नित्याची बाब आहे. या कर्मकांडांभोवती केंद्रित अशा वेगवेगळ्या धार्मिक आणि सुधारक व्यवस्थादेखील आपल्या सामाजिक गतिमानतेला निरनिराळे आयाम देत असतात व त्यातून लक्षणीय असे राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक बदल होत असतात. त्यामुळेच ‘कर्मकांड’ हा विषय ‘इतिहासाकडे पाहायचा एक चष्मा’ म्हणून गांभीर्याने हाताळणे गरजेचे आहे.

कर्मकांडांविषयी आधुनिक परिप्रेक्ष्यातील चर्चेचा विचार करताना आपल्याला दोन महत्त्वाच्या पदरांचा विचार करावा लागतो. एक म्हणजे जात्युच्छेदक चळवळी, प्रागतिक-विज्ञानवादी चळवळी आणि विमर्शातून झालेला कर्मकांडप्रणीत ब्राह्मणी, उच्चवर्णीय/वर्गीय मुजोरीला मिळालेलं आव्हान आणि त्या अंगाने झालेली मांडणी, तर दुसरी मानववंशशास्त्रीयदृष्टय़ा आणि मानवी समाजेतिहासदृष्टय़ा कर्मकांड-रिच्युअ‍ॅलिजम्ची झालेली अकादमिक मीमांसा. यापैकी पहिल्या पदराविषयीची संवेदनशीलता आपल्या देशातील श्रद्धाप्रवण  समाजाच्या आग्रही निष्ठांतून किंवा विद्रोहविषयक धारणांविषयीच्या आग्रही जागरूकतेतून अभिव्यक्त होत असल्याने या बाबीविषयी लिहिताना ‘पोलिटिकली करेक्ट’ राहून लिहावे लागते. मात्र, आपण त्या ‘करेक्टनेस’च्या पलीकडे जात कर्मकांडांकडे पाहायचा प्रयत्न करू या.

मानववंशशास्त्रातली ‘रिच्युअल स्टडीज्’ या नावाची एक ज्ञानशाखा पाश्चात्त्य अकादमिक विश्वात गेली अनेक दशके अस्तित्वात आहे. या शाखेतील अभ्यासकांनी कर्मकांडविषयक वेगवेगळ्या व्याख्या आणि सिद्धान्तांना ज्ञानमीमांसेच्या दृष्टीने हाताळायचा प्रयत्न केला आहे. लिव्हाई स्ट्रौस इत्यादी अभ्यासकांच्या मते, ‘कर्मकांडे म्हणजे ‘धर्माचा’ विशिष्ट अर्थ पोहोचविणाऱ्या किंवा अभिव्यक्त करणाऱ्या काही सांकेतिक कृतींची मालिका.’ तर मेरी डग्लस नामक अभ्यासकर्तीच्या मते, कर्मकांड हे ऐहिक जगातून पारलौकिक जगाशी संपर्काचे माध्यम समजले जाते. मलिनोव्स्की वगैरे अभ्यासकांनी, कर्मकांडे मानवी अस्वस्थतेवर मात करण्याचे श्रद्धापर उपचार असतात, अशी मानसशास्त्रीय अंगाने कर्मकांडांची व्याख्या केली आहे. टर्नर नावाच्या अभ्यासकांनी ‘धर्मश्रद्धेच्या अंगाने विकसित झालेले सांस्कृतिक-सामाजिक नाटय़सादरीकरण’ अशी ‘रिच्युअल्स’ची व्याख्या केली आहे.

हिंदू प्राचीन परंपरांच्या- त्यातही वैदिक कर्मप्रधान व्यवस्थांच्या सिद्धांतांतून व्यक्त होणाऱ्या धारणा काहीशा गूढत्वाच्या अंगाने तत्कालीन सृष्टीविषयक धारणांना अभिव्यक्त करतात. विश्वातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव तत्त्वात ‘चैतन्य’ असते आणि ही सारी तत्त्वे एकमेकांशी गूढ अशा वैश्विक ऊर्जा-शक्तीद्वारे संबंधित असून, एकमेकांना प्रभावित करत सृष्टीच्या नियमन प्रक्रियेत सहभागी होत असतात. कर्मकांडे किंवा यज्ञादी कर्मे या वैश्विक शक्तीशी संपर्क करण्यासाठी साहाय्यभूत होतात, अशी वैदिक विश्वातील धारणा कर्मकांडविषयक भागांतून ठळकपणे व्यक्त होते. याला ‘बंधुता’ अशी संज्ञा परंपरेने दिलेली आहे.

काही कर्मकांडे विशिष्ट धार्मिक संप्रदायात किंवा उपासना पद्धतीचे आचरण करणाऱ्या समूहात प्रविष्ट होण्यासाठी आचरला जाणारा विधी म्हणून अनुसरली जातात. वैदिक समुदायातील उपनयन/ मुंज/ मौजीबंधन हा विधी, बौद्ध धर्मातील प्रव्रज्या हा विधी किंवा वेगवेगळ्या प्राचीन/आधुनिक समाजातील दीक्षाविधी हे त्या- त्या संप्रदायातील प्रवेशासाठीची धार्मिक औपचारिक प्रक्रिया म्हणून अनुसरले जातात. मानववंशशास्त्रीयदृष्टय़ा दीक्षा (initiation) हा विधी अनेकार्थाने महत्त्वाचा समजला जातो. याची काही प्रमुख कारणे अशी की, या विधीतून दीक्षा घेणाऱ्या किंवा दीक्षित झालेल्या माणसाला विशिष्ट विधी आचरायचे किंवा विशिष्ट श्रद्धाविश्वातील वातावरणात वावरायचे, संबंधित आचार-जीवनपद्धती अनुसरण्याचे अधिकार ‘अधिकृत’रीत्या प्राप्त होतात. थोडक्यात- या आचरणासाठी किंवा विवक्षित वर्तुळात वावरत त्या वर्तुळाशी निबद्ध अशा सांस्कृतिक अस्मिता धारण करण्यासाठीचे अधिकार व सोबत येणारी विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक शक्ती या विधींतून या दीक्षितास प्राप्त होते. ‘धर्म’ हा शब्द आपल्या आधुनिक भारतीय समाजात ‘रिलिजन’ या पाश्चात्त्य कल्पनेला भारतीय प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. ढोबळमानाने रिलिजन म्हणजे श्रद्धाविषयक धारणांना एकत्र आणून त्यातून श्रद्धाव्यवस्थेला एकसंधत्व प्राप्त करून देत श्रद्धा-चौकटींना औपचारिकरीत्या नियमित करणारी व्यवस्था. मात्र, भारतीय संदर्भात धर्म शब्दाची व्याप्ती या अर्थाच्या पल्याड जाऊन अधिक व्यापक आणि बहुआयामी असल्याचे दिसून येते. (अधिक माहितीसाठी : महामहोपाध्याय पां. वा. काणेलिखित ‘धर्मशास्त्राचा इतिहास’)

गेल्या दोन शतकांत भारतीय श्रद्धाविश्वाने पाश्चात्त्य दृष्टीला ‘रिलिजन’ म्हणून ज्या चौकटी अभिप्रेत होत्या/ असतात, त्या चौकटीत स्थानिक श्रद्धा-धर्मविश्वाला बसवण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. ‘रिलिजन’ या चौकटीच्या प्रभावामुळे इथल्या समप्रकृतीच्या, पण वेगवेगळ्या आयामांना व अनेक अंतर्गत भेद-विसंगतींनी युक्त अशा चौकटींना एकसाची करायचे प्रयत्न झाल्याचे दिसून येते. या प्रक्रियेतून देशी समाजातील धर्मविषयक जाणिवा आधुनिक सामाजिक व्यवस्था, धारणा आणि मूल्ये यांच्या पाश्चात्त्यप्रभावित चौकटींत वेगवेगळ्या प्रकारे कशा अभिव्यक्त झाल्या व त्यातून आधुनिक धर्मकारण व राजकारण कसे आकाराला आले याविषयी टिमोथी ल्युबिन वगैरे अभ्यासकांनी विपुल लिखाण केले आहे. वर नमूद केलेल्या वेदांतील बंधुता तत्त्वानुसार प्रतिपादित झालेल्या वैदिक विश्वातील धारणा आधुनिक विज्ञानाला अभिप्रेत असलेल्या सिद्धांतनाच्या अंगाने सरधोपटरीत्या मांडत यज्ञादी व्यवस्थांचे होत असलेले पुनरुज्जीवन गेल्या काही वर्षांत ठळक झाल्याचे आपणा सर्वाना दिसून येत आहे. त्यातून समाजाला एकत्र आणून समाजाच्या मनातले या व्यवस्थांशी असलेले अनुबंध (sense of belongingness) आणि अस्मिता-ओळख (Identity) मिळवून देण्याच्या प्रक्रिया याविषयी मानववंशशास्त्राच्या अंगाने विपुल काम जगभरात होत आहे.

मागील लेखात आपण ‘power is everywhere’ या मायकेल फूको या थोर समाजशास्त्रज्ञांनी  मांडलेल्या सिद्धांतावर चर्चा केली. धर्माभ्यास व मानववंशशास्त्रदृष्टय़ा कर्मकांडे किंवा रिच्युअल हे तत्त्व हे या ‘पॉवर प्रॅक्टिस’मधील एक महत्त्वाचे अंग मानले जाते. कॅथरीन बेल या अभ्यासकर्तीने दाखवून दिल्यानुसार कर्मकांडे ऐहिक आणि पारलौकिक जगातील तत्त्वांचा संपर्क करून देणारे किंवा धर्माचे तत्त्व नाटय़रूपात किंवा सांकेतिक रूपातल्या प्रक्रियामालिकेतून अभिव्यक्त करत असली, तरीही त्यांचे सामाजिक उद्दिष्ट मात्र वेगळे असते. रिच्युअल्स ही विवक्षित धर्मव्यवस्था प्रस्थापित असणाऱ्या किंवा नसणाऱ्या समाजात रिच्युअलिस्टिक एजंट (कर्मकांड जगताला अभिप्रेत असलेले हेतू पूर्त करण्यास साहाय्यभूत ठरणारे प्रतिनिधी-कार्यकर्ते) बनवण्याचे कार्य करते व त्यातून स्थानिक पातळीवरील राजकारण, संस्कृती-समाजकारण, अर्थकारण व धर्मकारण यांसाठी आवश्यक असलेल्या राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व्यवस्था पुष्ट करण्याचे कार्य करतात. अर्थात कर्मकांड जगताला अभिप्रेत असलेले हेतू कोणते, असा प्रश्न यानिमित्त चर्चेला घ्यायला हवा. भारतासारख्या समाजात किंवा इथल्या धर्मव्यवस्थेस व तत्त्वज्ञान प्रवाहांना अभिप्रेत असलेली पुरोहित-प्रशासक-व्यापारीवर्गाचे हितसंबंध जपणारी व्यवस्था बळकट करणे हे हेतूंचे मुख्य सामाजिक अंग. भारतातील राजकारणच नव्हे, तर अर्थकारण आणि जातकारण/ जातिव्यवस्थाविशिष्ट मापदंड आणि आचारप्रवणतेतून प्रामाण्य गाजवणारी असल्याने समाजातील निम्नस्तरीय वर्गाला या कर्मकांडविश्वाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी या विधींचा व भव्य सामूहिक मेळाव्यांचा उपयोग होताना दिसतो. अनेकदा यासाठी ग्रंथ-परंपरेला अभिप्रेत असलेल्या कर्मविधींशी साधम्र्य सांगणारे प्रच्छन्नविधी लोककथा-श्रद्धांशी जोडून प्रमाणित केले जातात व त्यांद्वारे तथाकथित निम्नवर्गीय-जातीयसमूहांत  संबंधित श्रद्धाविश्वाचा घटक असल्याची धारणा रुजवली जाते. या अशा प्रक्रियांतून अनेकदा व्यक्तीचे किंवा समाजाचे जातिव्यवस्थेत उन्नयन होऊन तो प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनतो, किंवा उन्नयन न होता तो वेगळी, पण मूळ परंपरेशी नाते टिकवून ठेवणारी उपव्यवस्था निर्माण करतो. प्राचीन काळात हिरण्यगर्भदान विधींसारख्या विधीतून निम्न (शूद्र) वर्गातील पराक्रमी, प्रभावी व्यक्तींनी द्विजत्व प्राप्त करून राजपद (व क्षत्रियत्व) मिळवल्याची अनेक उदाहरणे अनेक ग्रंथ आणि शिलालेखांतून दिसून येतात. एका तूप/ जलाने भरलेल्या सुवर्णकुंभात (हा कुंभ गर्भाचे प्रतीक) संबंधित व्यक्तीला बसवून त्याला समंत्रविधीपूर्वक त्या कुंभातून (गर्भातून) तो व्यक्ती बाहेर येतो व द्विजत्व (दुसरा जन्म) पावतो व त्याला विधीपूर्वक वर्णव्यवस्थेत स्थान दिले जाते. अशा रीतीने ही कर्मकांडे एखाद्या व्यक्तीस/ समूहास नसलेला अधिकार प्रदान करायचे सामथ्र्य बाळगून असतात. विशिष्ट उच्चभ्रू सांस्कृतिक-राजकीय वर्तुळात  विधींचे राजकारण, अर्थकारण आणि त्यातून पुष्ट होणारी ब्राह्मक्षात्रवैश्यप्रवण वर्णव्यवस्था किंवा कुठल्याही संप्रदायात विशिष्ट धार्मिक अधिकार प्राप्त करण्यासाठी घेतलेल्या दीक्षादी विधींतून पुष्ट होणारी अधिकारांची उतरंड ही या कर्मकांडांच्या प्रभावीपणाचे, ताकदीचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेशी आहेत. यज्ञादी कर्मे किंवा अन्य विधी-उपासना पारलौकिक शक्ती किंवा अपूर्व असे फळ मिळवून देतात, वगैरे धारणा ‘अग्निष्टोमेन यजेत स्वर्गकाम:।’.. ‘स्वर्गाची इच्छा असणाऱ्याने अग्निष्टोम यज्ञ करावा’ अशा वैदिक वाक्यांतून प्रतीत होतात. असे यज्ञ किंवा प्रवचने, धर्मप्रवर्तने काही विवक्षित अधिकारक्षेत्रात संबंधित व्यक्तीला प्रवेश करून देतात. या धार्मिक अधिकारांत अनेकदा बलाढय़ राजांना किंवा व्यापाऱ्यांना नियंत्रित करण्याची शक्तीदेखील असते. अर्थात राजव्यवस्था आणि व्यापारीवर्गाने धर्मव्यवस्थेचे अर्थकारण व सत्ताकारण नियंत्रित केल्याचीही अनेकानेक उदाहरणे इतिहासांत दिसून येतात. मात्र या तिन्ही वर्ण-वर्गाना विशिष्ट दीक्षाकर्मातून गेल्याशिवाय संबंधित वर्गाचे अधिकार प्राप्त होत नाहीत, हेदेखील तितकेच खरे.

आपल्याकडे मानव्यविद्यांविषयी किंवा धर्म- श्रद्धादी विषयांवर  सार्वजनिक व्यासपीठांवर चर्चा करताना कर्मकांडे-धर्म यांच्याकडे शोषणाच्या व्यवस्था या चौकटीतून पाहिले जाते. मात्र गंभीर अकादमिक चर्चा करताना कर्मकांडे किंवा श्रद्धांना केवळ शोषणाच्या व्यवस्था म्हणून संभावना करून चालत नाही. जुनाट धागे असलेल्या, नवनवे मुलामे देऊन जपलेल्या कर्मकांडे किंवा श्रद्धा यांच्या पटांचे शोषणाचे पदर अधिक ठळक आहेत हे वास्तव मान्य केले, तरीही कर्मकांडे ही प्रत्येक काळात समाजव्यवस्थेच्या चौकटींना पूरक व्यवस्था निर्माण करत त्यांना मोबिलाइज- गती देण्याचे काम करत असतात, हे वास्तव अकादमिक अंगाने कर्मकांडांचा परामर्श घेतल्यास दिसून येते.

सामाजिक व्यवस्था प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियांच्या रूपात आजच्या आधुनिक व्यवस्थेत कर्मकांडे अवशिष्ट असली तरीही त्यातून वेगवेगळ्या आर्थिक गैरव्यवहार, जवळच्या- धनाढय़ वर्गाशी संबंधित लोकांना प्राधान्य, व्यवस्थात्मक रचनेतून आकाराला आलेल्या अधिकार-उतरंडीतून दिसणारी सरंजामी वृत्ती याच प्राचीन व्यवस्थांच्या अवशेषांच्या रूपात आज वारंवार समोर येते. समाजाचे नियमन करण्यासाठी काही अधिकार, पदे आणि अधिकृत प्रक्रियांची गरज आणि धार्मिक-सश्रद्ध वर्गाच्या दृष्टीने विशिष्ट आचारांची शिस्त व चौकट म्हणून कर्मकांडे प्रोसेसचा भाग म्हणून आजही आचरली जातात. मात्र त्यातून होणारे शोषण, सरंजामी वर्चस्ववाद, वर्गीय/जातीय कुरघोडी व उच्चभ्रूत्वगंड या गोष्टींविषयीचा विवेक केवळ मानव्यविद्यांच्या अभ्यासातून आणि त्यातून जागवल्या जाणाऱ्या जाणिवांतून दृढ होऊ शकतो, हे आपण समजून घ्यायला हवे.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)