पराग कुलकर्णी

जपान बुलेट ट्रेनसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय वेगाने जाणाऱ्या या ट्रेनला ‘बुलेट ट्रेन’ का म्हणतात, हे माहिती आहे का? एक तर तिचा वेग बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा असतो आणि सुरुवातीला तिचा आकारही बंदुकीच्या गोळीसारखाच होता. पण या आकारामुळेच बुलेट ट्रेनच्या अभियंत्यांसमोर एक आव्हान उभे राहिले. या ट्रेन्स जेव्हा बोगद्यातून जात तेव्हा त्यांच्या वेगामुळे मोठा आवाज व्हायचा. या आवाजाचा त्रास त्या भागातील लोकांना होत होता आणि लवकरच काहीतरी मार्ग काढणे आवश्यक होते. कमी विरोधाच्या (Low Drag) मोकळ्या हवेतून ट्रेन जेव्हा जास्त विरोधाच्या (High Drag) बोगद्याच्या हवेत जात होती तेव्हा ट्रेनसमोरची हवा पुढे फेकली जाऊन हा आवाज तयार होत होता.

इजी नाकात्सु नावाचा एक अभियंता या प्रश्नावर काम करत होता. योगायोगाने तो एक पक्षीनिरीक्षकही होता. पक्षीनिरीक्षणाच्या अनुभवावरून त्याला माहीत होते, की किंगफिशर हा पक्षी जेव्हा पाण्यात सूर मारून मासे पकडतो तेव्हा तोही अशाच कमी विरोधाच्या वातावरणातून (हवा) जास्त विरोधाच्या वातावरणात (पाणी) जातो आणि तरीही पाण्यात शिरताना खूपच कमी पाणी आजूबाजूला उडवले जाते, जणू काही पाणी त्याला विरोधच करत नाही. ही किमया किंगफिशरच्या चोचीच्या विशिष्ट रचनेमुळे होते. ते नाकात्सुच्या लक्षात आले आणि त्याने बुलेट ट्रेनचा समोरचा भाग त्यानुसार बदलण्याचे ठरवले. नाकात्सुचा अंदाज बरोबर ठरला. या विशिष्ट रचनेमुळे केवळ आवाजच कमी झाला असे नाही, तर हवेचा विरोध कमी झाल्याने ट्रेनचा वेग १० टक्के वाढला आणि तोही १५ टक्के कमी विजेच्या वापरात!

फार पूर्वीपासून माणूस आपल्या प्रश्नांची उत्तरे निसर्गात शोधत आला आहे. राइट बंधूंनी पक्षांचे निरीक्षण करूनच विमानाची निर्मिती केली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अशा प्रकारे निसर्गापासून प्रेरणा घेऊन त्याचा उपयोग मानवी समस्या सोडवण्यासाठी करण्याला ‘बायोमिमिक्री’ (Biomimicry) असे नाव देण्यात आले. शास्त्रज्ञ आणि लेखिका जेनिन बेनायस यांच्या ‘बायोमिमिक्री : इनोव्हेशन इन्स्पायर्ड बाय

नेचर’ या व इतर पुस्तकांमुळे आणि त्यांच्या ‘बायोमिमिक्री’च्या प्रचारामुळे आज बऱ्याच क्षेत्रांतले लोक निसर्गाकडे अभ्यासू दृष्टीने पाहत आहेत.

 

पृथ्वीवर ३.८ बिलियन (३८० करोड) वर्षांपासून जीवसृष्टी अस्तिस्त्वात आहे. झाडे, फुले, सूक्ष्म जीव-जंतू, छोटे कीटक ते मोठे प्राणी, पक्षी सर्वानाच आजूबाजूच्या परिस्थितीशी झगडत आणि मुख्य म्हणजे बऱ्याचदा जुळवून घेत आपले अस्तित्व टिकवून ठेवावे लागते. या जुळवून घेण्यातूनच प्रत्येक जिवाचे स्वत:चे असे एक तंत्र एवढय़ा वर्षांच्या उत्क्रांतीत विकसित झाले आहे. आपल्या आजूबाजूला करोडो वर्षे प्रयोग चालू असलेली एक R & D प्रयोगशाळाच आहे असे म्हटले तरी चालेल. गरज आहे ती ते प्रयोग डोळसपणे बघण्याची, तंत्र समजावून घेण्याची आणि त्याचा उपयोग करून घेण्याची. ‘बायोमिमिक्री’ ही ज्ञानशाखा हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करते.

एकदा का निसर्गाला गुरू मानले आणि आपल्या आजूबाजूच्या, आपल्या आधीपासून या पृथ्वीवर राहणाऱ्या जिवांकडे आपला मानवी अहंकार बाजूला ठेवून बघितले, तर ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची एक खाणच आपल्याला गवसते. कोणत्याही बाशक्ती (मोटर) शिवाय झाडात मुळांपासून पानांपर्यंत जाणारे पाणी, एसीशिवाय तापमान नियंत्रण करणारी वारुळे, स्वत:च साफ होणारी वॉटरप्रूफ कमळाची पाने, कित्येक किलोमीटर दुरूनही जंगलातल्या वणव्याची माहिती कळणारे कीटक.. निसर्गातील असे अनेक चमत्कार आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवू शकतात!

मोरांच्या पंखांवरचे रंग आपल्याला मोहवून टाकतात. पंखांवरचे वेगवेगळे घनता असलेले थर आणि त्यातून प्रतिबिंबित (Reflect) आणि परावर्तित (Refract) होणारा सूर्यप्रकाश यातूनच हे रंग निर्माण होतात. असे संरचनात्मक रंग (Structural Colours) अनेक प्राण्यांमध्ये आणि फुलपाखरांमध्येही आढळून येतात. अशाच प्रकारे रंग तयार करण्याचे माणसांचेही प्रयत्न चालले आहेत, ज्याचा उपयोग अनेक क्षेत्रांत होऊ शकतो. उदा. चलनी नोटांची सुरक्षा! त्यामुळे काही ठरावीक रंग वापरून नोटांच्या खोटय़ा प्रतिकृती बनवणे थांबवता येईल.

पण हे रंगांचे उदाहरण देण्यामागचे मुख्य कारण आहे- दृष्टिकोनातला बदल! रासायनिक प्रक्रिया, त्यासाठी लागणारे आणि त्यातून निर्माण होणारे  विषारी पदार्थ, प्रक्रियेसाठी लागणारे खूप जास्त वा खूप कमी तापमान, दाब (Pressure) या कशाचीही मदत न घेता निसर्ग असे रंग तयार करतो- तेसुद्धा दुसरे कोणते दुष्परिणाम न करता! ‘बायोमिमिक्री’ अशा अनेक गोष्टींनी आपला दृष्टिकोन बदलण्यास मदत करते व पृथ्वीवरचा सर्वात हुशार प्राणी खरेच कोण, हे एकदा स्वत:लाच तपासून पाहायला लावते!

पण आपण आपल्याला ही माहिती मिळणार कुठून? जेनिन बेनायस यांच्याच पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘AskNature’ या संस्थेमार्फत हे सगळे ज्ञान एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘asknature.org’ या संकेतस्थळावर आपण वेगवेगळ्या समस्यांवरची निसर्गाने शोधलेली उत्तरे जाणून घेऊ शकतो आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी करू शकतो.

parag2211@gmail.com