पराग कुलकर्णी

‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ आला की गुलाबाची फुले महाग होतात. तेव्हाच जर तुम्हाला गुलाबाचं एक फूल विकत घ्यायचं असेल तर तुम्ही किती पैसे मोजाल? तुमच्या वर्षभराच्या कमाईच्या दहापट रक्कम तुम्ही द्याल का? किंवा दसऱ्याला तुम्ही बाजारात झेंडूच्या फुलांचं तोरण विकत घेण्यासाठी गेला आणि फुलवाल्याने सांगितलेली किंमत तुमच्या घराच्या किमतीपेक्षाही जास्त आहे, तर तुम्ही ते तोरण घ्याल का? या दोन्ही प्रश्नांची तुमची उत्तरं अर्थातच ‘नाही’ अशी असली आणि मनात तुम्ही ‘असा मूर्खपणा कोणी करेल का? तेही फुलांसाठी!’ असा विचार करत असाल तर तुम्हाला हॉलंडमधल्या ‘टय़ुलिप मॅनिया’बद्दल जाणून घेणं नक्कीच आवडेल.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
congress not responsible for the defeat of babasaheb ambedkar in 1952 election as well by election in 1954
आचारसंहितेचे बंधन तपासयंत्रणांवरही असू शकते…
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व

सतराव्या शतकात (१६३६-३८) हॉलंडमध्ये श्रीमंतीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून टय़ुलिपच्या फुलांचा वापर श्रीमंत लोकांमध्ये वाढला. टय़ुलिपच्या फुलांची मागणी वाढू लागली. पण पुरवठा कमी असल्याने फुलांचे भाव हळूहळू वाढत गेले. टय़ुलिपचे चढणारे भाव बघून अनेक लोकांनी यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे किंमत भरमसाट वाढली. जरी लोकांना फुलांची मूळ किंमत एवढी नाही हे माहिती होते, तरी लोक त्याच्या कित्येक पटीने जास्त किमतीचे फुलांचे सौदे करत होते.

का? कारण ही सट्टेबाजी होती. उद्या भाव अजून वाढतील आणि आपण आजच्या (स्वस्त?) भावाने घेतलेली फुलं विकून त्यातून नफा कमावू, असे विचार हे व्यवहार करणारे लोक करत होते. पण यात भाव इतके वाढले, की एक वेळ अशी आली की टय़ुलिपच्या फुलांची किंमत हॉलंडमधल्या एखाद्या कुशल कामगाराच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहापट झाली! टय़ुलिपच्या फुलांच्या किमती घरांच्या किमतीपेक्षाही जास्त वाढल्या!

पण हे असंच चालू राहणं अशक्यच होतं. १६३७ च्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एके दिवशी अचानक फुलाची मागणी थोडी घटली आणि पुढील काही दिवस ती कमीच होत गेली. लोक घाबरले आणि आता भाव गडगडणार या भीतीने त्यांनी मिळेल त्या भावात विक्री सुरू केली. त्यामुळे फुलांची किंमत अजून वेगाने कमी होत गेली आणि काही दिवसांतच टय़ुलिपच्या फुलांचा बाजार पूर्णच कोसळला. अनेक व्यापारी, सामान्य लोक यांचे अतोनात नुकसान झाले. कित्येक लोक देशोधडीला लागले आणि त्यानंतर हॉलंडमध्ये आर्थिक मंदी आली.

हॉलंडमध्ये टय़ुलिपच्या फुलांच्या बाबतीत जे घडलं त्यालाच अर्थशास्त्रात ‘आर्थिक बुडबुडे’ (Economic Bubbles) म्हणतात. हवेने एखादा बुडबुडा फुगावा, त्याने लोकांना क्षणभंगुर आनंद द्यावा आणि काही कळण्याच्या आतच तो फुटून होत्याचे नव्हते व्हावे यावरूनच अशा घटनांना ‘बुडबुडे’ (Bubbles) असे नाव देण्यात आले.

‘टय़ुलिप मॅनिया’ हा जरी पहिला बुडबुडा मानला तरी त्यानंतर असे अनेक बुडबुडे इतिहासात फुगले आणि फुटले. अठराव्या शतकातील ‘साऊथ सी बबल’, ‘मिसिसिपी बबल’, ‘रेल्वे मॅनिया’ आणि मागच्या काही दशकांत झालेले ‘डॉट कॉम बबल’ (१९९५ -२०००), अमेरिकेतले घरांच्या किमतीचे बबल (२००२ – २००६) आणि नुकताच झालेला ‘क्रिप्टो करन्सी बबल’ (२०११-२०१८).

एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडून लोक त्या वस्तूचे मूल्य किंवा आंतरिक किंमत नजरेआड करतात आणि तर्क, विवेक सोडून त्या गोष्टीत भरमसाट गुंतवणूक करतात आणि एके दिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटतो आणि त्याचे भयंकर परिणाम त्या व्यक्तीला आणि समाजाला भोगावे लागतात. २००७ – ०८ मध्ये जगभरात आलेली मंदी ही अमेरिकेतील घरांच्या किमतीच्या बुडबुडय़ाचाच परिणाम होता- ज्यातून जग अजूनही सावरतंय.

हे बुडबुडे निर्माण होण्यामागची काही कारणं सांगता येतील. गुंतवणुकीच्या नव्या संधी, बाजारात असलेला अतिरिक्त पसा (जो सरकारी हस्तक्षेपामुळे येऊ शकतो), स्वतंत्रपणे विचार न करता समूहामागे धावण्याची लोकांची मानसिकता, अति आशावाद, अल्पकालीन फायद्याची दृष्टी, इत्यादी.

‘ग्रेटर फूल्स थिअरी’ अशी बुडबुडय़ांची कारणे सांगणारी एक मजेशीर थिअरी आहे. यात अति आशावादी- म्हणजेच मूर्ख (फूल्स) माणसे एखादी वस्तू तिच्या किमतीपेक्षाही चढय़ा भावाने विकत घेतात, म्हणूनच बुडबुडे निर्माण होतात असे म्हटले आहे. जोपर्यंत अशी माणसे या वस्तू त्यांच्यापेक्षा जास्त मूर्ख माणसांना (ग्रेटर फूल्स) विकू शकतात, तोपर्यंत हे बुडबुडे फुगत राहतात आणि जेव्हा सर्वात महान मूर्खापर्यंत (ग्रेटेस्ट फूल्स) हे पोहोचते- जे की ती वस्तू वेळेत विकू शकत नाही किंवा अजून जास्त मूर्ख माणूस शोधू शकत नाही- तेव्हा तो बुडबुडा फुटतो! अर्थात शेवटचा- नुकसान होणारा माणूस जरी मूर्ख ठरला गेला, तरी मध्ये फायदा करून घेणाऱ्याला हुशारच म्हटले पाहिजे!

अर्थशास्त्राचा अभ्यास हा वर वर पाहता वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनांचा, त्यांच्या विक्रीचा, त्यातूनच होणाऱ्या नफा-तोटय़ाचा आणि त्यासंबंधित व्यवस्थांचा वाटू शकतो. पण वेळोवेळी यातूनच या सर्वाच्या केंद्रभागी असणारा माणूस- तो विचार कसा करतो, निर्णय का वा कसे घेतो, त्याने वैयक्तिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाचा समूहावर काय परिणाम होतो.. अशा अनेक गोष्टींचाही उलगडा होतो. आर्थिक विश्वातल्या मोठय़ा घटनांतूनच- मंदी, घोटाळे, बुडबुडे- आपल्याला आपणच तयार केलेल्या व्यवस्थांच्या मर्यादा आणि माणूस म्हणून आपण कसे वागतो, हे कळतं. अठराव्या शतकातल्या ‘साऊथ सी बबल’मध्ये खुद्द आयझॅक न्यूटनचे पैसे बुडाले. ‘मी ग्रहताऱ्यांच्या हालचाली मोजू शकतो, पण माणसांचा मूर्खपणा नाही,’ असे त्याने यासंदर्भात म्हणून ठेवले आहे! घडून गेलेल्या घटनांचं विश्लेषण करून कोण बरोबर, कोण चूक, कोण हुशार आणि कोण मूर्ख ठरलं हे सांगणं सोपं आहे. पण या विश्लेषणाचा उपयोग तेव्हाच होईल, जेव्हा आपण आज, आत्ता घडणाऱ्या घटनांचे अर्थ लावू शकू. नाहीतर फुलांच्या मागे वेडय़ा झालेल्या ‘फूल्स’सारखं आपलंही मूल्यमापन येणारी पिढी करेल.

parag2211@gmail.com