||  डॉ. कौस्तव बॅनर्जी

माझे वडील शक्ती बॅनर्जी (saktipada banerjee) यांचे उच्च शिक्षण नागपूर विद्यापीठात झाले असल्याने महाराष्ट्राशी मी त्यांच्या माध्यमातून जोडलो गेलो. त्यानंतरच्या काळात मी कृषि-अर्थतज्ज्ञ म्हणून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये फिरलो. तिथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास केला. त्यामुळे माझा महाराष्ट्राशी थेट संबंध आला. वडिलांकडून मिळालेली माहिती, त्यांचे अनुभव आणि माझ्या प्रत्यक्ष भेटी यातून महाराष्ट्र विविधांगाने मला समजत गेला. कम्युनिझम, आंबेडकरवाद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उजवी विचारसरणी या तीनही विचारधारा एकाच वेळी महाराष्ट्रात विकसित होत गेल्या आणि त्याचा देशव्यापी परिणामही मला दिसले. त्या अर्थाने महाराष्ट्र हा राजकीय-सामाजिक दृष्टिकोनातून देशाच्या संदर्भात महत्त्वाचा ठरतो.

…१९४७ च्या आसपासचा तो काळ होता. त्या काळात कम्युनिस्ट, समाजवादी विचारांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडू लागला होता. शेतकरी-कामगार वर्गासाठी संघर्ष केला पाहिजे, त्यांच्या हक्कांसाठी लढले पाहिजे याची जाणीव महाविद्यालयीन व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रकर्षाने होऊ लागली होती. या काळात माझे वडील नागपूर विद्यापीठात शिकत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते  ए. बी. बर्धन हे माझ्या वडिलांचे समकालीन होते. विद्यापीठांच्या निवडणुकीत या डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असे. हे विद्यार्थी कम्युनिझमकडे आकर्षित झालेले असले तरी ते कुठल्या पक्षाशी संबंधित नव्हते. १९४८ मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा त्यात माझे वडील सहभागी झाले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासी वस्त्यांमध्ये जाऊन त्यांचे काम समजून घेणे, या कर्मचाऱ्यांचे आयुष्य जाणून घेणे या सगळ्या प्रक्रियेतून विद्यार्थी आणि कामगार यांच्यातील नातेसंबंध तयार होत गेले. या संपात सहभागी झालेल्या नागपूर विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी ब्रिटिशकाळात महाराष्ट्राने देशद्रोहाचे गुन्हे अनुभवले होते. या संपात माझे वडीलही नागपूर तुरुंगात होते. डाव्या चळवळींचा हा प्रभाव ७०-८० च्या दशकापर्यंत देशभरात होता. यादरम्यान शेतकरी आणि कामगारांचे अनेक लढे झाले, विद्यार्थी संघटनांनी वेळोवेळी संघर्ष केला. महाराष्ट्राचे हे मोठे योगदान म्हणता येईल.

त्याकाळी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुका होत असत. निवडणुकीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत होता. देशातील लोकशाही बळकट करण्यात या विद्यार्थी निवडणुकांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राने चळवळींचा, लोकशाहीकरणाचा प्रवास खूप आधीपासून पाहिलेला आहे. माझे वडील डाव्या चळवळींशी जोडले गेले तेव्हा आंबेडकरवादी चळवळीनेही मूळ धरलेले होते. ब्राह्मण-अब्राह्मण वादातून जातीअंताची   लढाई सुरू झाली होती. नागपूर विद्यापीठातील डाव्या चळवळीशी जोडले गेलेले ब्राह्मण विद्यार्थी वर्गसंघर्षात उतरले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचा इतका प्रचंड अनुभव माझ्यापर्यंत वडिलांमुळेच पोहोचला. महाराष्ट्राने देशाला काय दिले, हे या प्रातिनिधिक उदाहरणावरून स्पष्ट होऊ शकेल.

महाराष्ट्रात शेतीआधारित औद्योगिक विकास होत होता. मात्र, १९८० मध्ये आर्थिक धोरणे बदलत गेली, ती उजव्या बाजूला झुकली. तिथून सामाजिक-आर्थिक दृष्टीनेही महाराष्ट्र बदलत गेलेला मी पाहिला. त्यातून ग्रामीण शेती अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत गेला. कापूस वगैरे नगदी पिके घेतली जाऊ लागली. एकरी उत्पादनवाढीसाठी आयात बियाणे वापरण्याचे प्रमाण वाढले. तिथून महाराष्ट्राने शेती क्षेत्रात तरी आत्मनिर्भरता सोडून दिली असे म्हणता येईल. या प्रवासाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. या सगळ्याच्या परिणामी विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. दलित वा अन्य सामाजिक चळवळींची प्रचंड ऊर्जा असतानादेखील शेतकऱ्यांची दुरवस्था झालेली या काळात मी पाहिली. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेले. आता शेतकरी-कामगारांशी जोडून घेणारी विद्यार्थी चळवळ दिसत नाही. महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती हळूहळू लयाला गेली. त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम शेतकऱ्यांच्या आयुष्यावर झालेला दिसतो. परदेशी बियाण्यांच्या कंपन्यांनी आज शेतीक्षेत्राला व्यापून टाकले आहे. त्यांची नवी सावकारी सुरू झालेली दिसते. महाराष्ट्राच्या शेतीक्षेत्रात हा बदल दिसतोच; पण त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही होत गेलेला बदल भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर अधिक प्रकर्षाने समोर आला आहे. महाराष्ट्रात आजवर वेगवेगळ्या विचारांना स्थान मिळाले होते, पण आता हा अवकाश आकुंचित होऊ लागला आहे. गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्रातील ही स्थित्यंतरे आधी वडिलांच्या माध्यमातून आणि नंतर प्रत्यक्ष महाराष्ट्राशी संबंध आल्यावर मला पाहता/ अनुभवता आली.

(लेखक डॉ. आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली येथे

शेती अर्थतज्ज्ञ आहेत.)

kb@aud.ac.in