18 November 2019

News Flash

बाभळीतला चंद्र

‘‘राणूआज्जी, गणा हाय का?’’ अर्धवट उघडय़ा दाराच्या फटीतून डोकावत केविलवाण्या चेहऱ्यानं सर्जानं विचारलं.

|| समीर गायकवाड

‘‘राणूआज्जी, गणा हाय का?’’ अर्धवट उघडय़ा दाराच्या फटीतून डोकावत केविलवाण्या चेहऱ्यानं सर्जानं विचारलं. ‘‘नाय रं माझ्या राज्या. आपला गणा त्येच्या भणीच्या सासरी गेलाय. तुझा गणा आता मामा झालाय. त्येच्या जागी आपला जगदाळ्यांचा रवू येईल हाजरीवर..’’ तिचं सायओलं वाक्य सर्जानं अध्र्यातच तोडलं.

‘‘ते ऱ्हाऊ दे. तो कदी येणार हाय ते सांग!’’

राणूआज्जी उत्तरली, ‘‘आरं बाळा, त्येच्या भाच्याचं बारसं हाये तिकडं. आता तो दोन रोजानी ऐतवारीच येणार बग.’’ हे शब्द कानावर पडताक्षणी सर्जानं धूम ठोकली. राणूबाईनं कवाडाकडं बघेपर्यंत गडी गायब झालेला! ती माईंदळ बुचकळ्यातच पडली. इदुळा रामपारी गणाकडं सर्जाचं काय काम असंल असा प्रश्न तिला पडला. ‘पोरासोरांचंच काय तरी इंगित असणार..’ असं मनाशी पुटपुटत ती पुन्हा गोधडी विणण्यात गढून गेली.

राणूबाईचा मिसरूड फुटलेला नातू गणा आबासाहेब मान्यांच्या शेतात गुरं वळायच्या कामास होता. शाळा अध्र्यात सोडल्यापासून गेली आठ-दहा वर्षे त्यांच्याकडं तो याच कामावर होता. विशेष म्हणजे त्याला याची आवडही होती. मान्यांची सगळी म्हसरं त्याची मतर झाली होती. बलं, खोंडं, गायी, वासरं, हालगटं, रेडकं ही सगळी जणू आप्तंच होती त्याची! राणूबाईनं बांधून दिलेल्या भाकरी घेऊन आठ-नऊच्या सुमारास घरातली सगळी बारीकसारीक कामं उरकून तो कामावर जायचा. अभ्यासात जरा म्हणून गोडी नसलेला गणू निसर्गाच्या सान्निध्यात गुराढोरांत रममाण व्हायचा.

आबासाहेब मान्यांचं चाळीसेक एकराचं रान होतं. दोन विहिरी होत्या. बक्कळ पाणी होतं. कसदार जमीन होती. मातीतनं सोनं पिकत होतं. मोठा लठ गोठा होता. डझनावारी गायी-म्हशी होत्या. बलं होती. शेरडांचा घोळका होता. खंडीभर कोंबडय़ा होत्या. एकंदर मोठा फाफटपसारा होता. यातली कोंबडय़ा, शेरडं सोडली तर बाकीचा जिम्मा गणावर होता. रोज सकाळी तो येवतीच्या टेकडीपाशी असलेल्या, झाडाझुडपांनी डवरलेल्या शिवारात गुरं घेऊन जायचा आणि दिवस मावळायच्या बेतात असताना परतायचा. त्याच्यासोबत मक्या असायचा. मक्या हा मान्यांचा लाडका कुत्रा होता. मकवणात सापडलेला म्हणून त्याचं नाव मक्या! अनोळखी माणसानं बांधावर पाय जरी ठेवला तरी त्याचं भुंकणं सुरू व्हायचं. त्यामुळं त्याला चुकवून चोराचिलटांची मान्यांच्या वस्तीवर यायची टाप नव्हती. जित्राबांना कोल्ह्य़ाकुत्र्यांचं भय नको म्हणून दिवसा तो गणासोबत जायचा. रात्री मात्र वस्ती सोडायचा नाही. तो गणासोबत गेलेला असला की त्याचा जोडीदार असलेला टिकल्या दिवसभर वस्तीच्या तोंडाशी बसून असायचा. या दोघांचीही नजर तीक्ष्ण होती. घ्राणेंद्रियं अफाट कार्यक्षम होती. त्यांना चकवणं अशक्य होतं. त्यातही मक्याला हुलकावणी देणं तर कठीणच होतं. त्यामुळं मान्यांच्या वस्तीवर यायला अनोळखी माणसं दबकत असत. मात्र त्यांच्याशी ओळख झाल्यावर एक वेगळंच सुख अनुभवास येई. पायात घुटमळणारी, सारखी मागेपुढे करणारी, मायेनं हातपाय चाटणारी ही कुत्र्यांची जोडी सर्वाची लाडकी होती. आबासाहेबांचा त्यांच्यावर खूप जीव होता. त्यांचाही आबांवर जीव होता. पण आबांपेक्षा त्यांच्या नातवावर- सर्जावर अधिक जीव होता. सर्जासाठी ही कुत्र्यांची जोडी जीव की प्राण होती. सुटीच्या दिवशी तो रानात मुक्कामाला असला की मक्या त्याच्या अंथरुणात शिरलेला असे आणि अंगाचं मुटकुळं करून बसलेला टिकल्या त्याच्या पायापाशी असे. सर्जाचा शेतातला मुक्काम संपला की तो सकाळी उठून गावाकडं निघायचा तेव्हा मक्या आणि टिकल्याचा चेहरा पडलेला असे. दोघंही त्याच्या अवतीभवती घुटमळत. अन्याबाच्या बायकोनं केलेली चुलीवरची ताजी भाकरी त्याच्या हातानं खात. मग कुठं त्यांना बरं वाटे! अंगानं जाडजूड, लांबलचक असलेला मक्या सर्जाला निरोप द्यायला श्रीपतीच्या घरापर्यंत- म्हणजे अध्र्या रस्त्यापर्यंत जायचा.

सर्जा शेतात असला की त्याची मालमत्ता ठरलेली असे. सगळी शेरडं त्याच्या भवताली फिरत आणि तो त्यांच्या मधे! हे सगळे मुके प्राणी त्याचे जिवलग होते. त्यानं त्या सगळ्यांना नावं दिलेली होती. त्याच नावानं त्यांचा पुकारा होई. तेदेखील हाका मारल्या की ‘बँबँबँ’ आवाज काढून प्रतिसाद देत.  सर्जा त्यांच्यात इतका एकरूप होई की त्याच्या अंगाला शेळ्यांचा दर्प येई. विशेषत: मंगी, साहेब्या आणि पाडशा यांच्यावर त्याचा अतोनात जीव होता. काळ्या कुळकुळीत अंगाची, राठ केसाची मंगी ही सर्वात चपळ, तरतरीत, चलाख बकरी होती. तर साहेब्या हा धष्टपुष्ट बोकड. त्याची दाढी इवलुशीच, पण डौलदार िशगं, भक्कम पाठशीळ, तीक्ष्ण नजर, करडा तांबूस रंग यामुळं पाहताक्षणी तो नजरेत भरे. पाडशा हे मंगीचं लोभसवाणं कोकरू होतं. टकाटक उडय़ा मारत अंगात वारं भरल्यागत दिसंल तिकडं मोकाट धावत सुटणाऱ्या त्या लडिवाळ पिलाला त्यानं हरिणीच्या बाळाची उपमा दिली.. पाडस! सर्जा शेतात असला की पाडशा त्याच्या खांद्यावर, नाहीतर बगलेत असायचा. लुचूलुचू चाटायचा. सर्जा जिकडं जाईल तिकडं पाडशा असं समीकरण असे. हे दोघे निघाले की त्यांच्या मागं मंगी आणि साहेब्या असत. बांधावरल्या झाडांच्या सावल्या हलाव्यात तसे एकमेकांना खेटून हे निघत. सगळं रान त्यांच्या पायाखालचं असल्यानं चिंतेचा सवाल नसायचा. तरीही गणासोबत गुरांमागं जायचं चुकवून मक्यादेखील या टोळीत सामील झालेला असे. तो सर्वाच्या मागे असे. त्याचं ऐटदार चालणं पाहून वाटे, की या सर्वाचा रक्षणकर्ता हाच असावा. त्यामुळंच त्याचा इतका रुबाब! तासन् तास भटकंती करून हे सगळे पुन्हा वस्तीवर येत. तोवर पोटात काहूर माजलेलं असे. सगळ्यांची पोटपूजा उरकली की दंडाच्या रांगंत असलेल्या आंब्याच्या झाडाखाली सगळी फौज रवाना होई. संध्याकाळी पुन्हा एक रपेट होई. सर्जा शेतात असला की हे सगळं ठरलेलं असे. तो शाळेसाठी गावातल्या घरी असला तरी त्याचं सगळं चित्त या मुक्या जीवांत एकरूप झालेलं असे.

आतादेखील त्याच्या मनात केवळ यांचाच ध्यास होता. झालं असं होतं, की मागच्या पाच-सहा दिवसांपासून घरात सागुतीची चर्चा त्याच्या कानी पडत होती. मरीआईपुढं बोकड कापून गावात वाटे द्यायचे- असं काहीतरी अर्धवट त्यानं ऐकलेलं. आबा, राऊआज्जी, काका, काकी, आई आणि भाऊ सगळेच जण ऐतवारी सागुती करायच्या विषयावर बोलत होते. गावात कुणाला सांगावा द्यायचा, पाव्हण्यारावळ्यांना कधी निरोप द्यायचे, मंडप टाकायचा की नाही, मोठाली भगुली कधी आणायची, चुली कुठं मांडायच्या, कलालास निरोप कधी द्यायचा.. अशा एक ना अनेक गोष्टी त्यात सामील होत्या. ही चर्चा ऐकून चिमुरडय़ा सर्जाच्या काळजात धस्स झालेलं. ‘आपल्या साहेब्याला मारणार आणि नंतर उकळत्या कालवणात टाकून शिजवून खाणार!’ ही कल्पनाच त्याच्या बालमनाला सहन झाली नाही. त्याचा जीव भेदरला. त्यानं मनोमन ठरवलं, की साहेब्याला घेऊन निघून जायचं. पण जायचं तरी कुठं? आपल्याला वेस माहिती नाही की गावाच्या सीमा ठाऊक नाहीत. मग येवतीच्या टेकडीजवळच्या शिवारात जाऊन राहूयात.. ऐतवार टळून गेला की हालहवाल पाहून कधी परत यायचं ते बघता येईल असा विचार त्यानं पक्का केला. आता टेकडीपर्यंत जायचं म्हणजे गणाची मदत घेतली पाहिजे, असं मनाशी पुटपुटत त्यानं दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच उठून गणाच्या घरी जायचं नक्की केलं आणि तो कसाबसा झोपी गेला. त्या रात्री साहेब्या त्याच्या स्वप्नात येऊन कसनुसा रडत होता. मंगी उदास दिसत होती. आणि पाडशा हताश बसून होता. बिलकूल उडय़ा मारत नव्हता.

सकाळ होताच घरी जो-तो आपापल्या नादात घाईत होता. तेवढय़ात सर्वाची नजर चुकवून सर्जा तिथून निसटला तो थेट गणाच्या घरी गेला. पण राणूआज्जीनं सांगितलं की- गणा त्याच्या बहिणीच्या गावाकडं गेलाय. आता आली की पंचाईत! कापडात गुंडाळलेलं भाकरीचं भेंडोळं सदऱ्यात लपवून तो तडक शेताकडं निघाला. वाटेत त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. आपल्यासोबत आपण मक्याला नेलं तर तो आपल्याला रस्ता दाखवंल हे त्यानं ताडलं. मग काय- स्वारी एकदम खूश होऊन टणाटण उडय़ा मारत शेतात पोहोचली. आता शेतात गेलं की साहेब्याला वाचवण्यात आपण यशस्वी होणार, या तंद्रीत त्यानं रस्ता कापला. तो शेतात आला तेव्हा सकाळचं ताजंतवानं विश्व त्याच्या स्वागतास हजर होतं..

(पूर्वार्ध)

sameerbapu@gmail.com

First Published on June 30, 2019 12:05 am

Web Title: sameer gaikwad story
Just Now!
X