04 December 2020

News Flash

वाटप ‘तुम्ही’केलेत, जागा ‘आम्ही’दाखवू!

ज्या मोदींच्या हाती महाराष्ट्रासकट देशाने सत्ता दिली, त्यांचा प्रभाव ओसरू लागल्याची चर्चा तीनच महिन्यांत रंगू लागली. उत्तर प्रदेशात साधू, बैरागी, तथाकथित संत-महंताना मोकाट सोडल्याचे परिणाम

| September 28, 2014 01:10 am

लोकसभा निवडणुका झाल्या. भाजप दिग्विजयी झाला. त्या विजयाचे नगारे थंड होण्याच्या आतच महाराष्ट्र विधानसभेचे पडघम वाजू लागल्याने प्रदेश भाजपला महाराष्ट्राच्या एकहाती सत्तेची स्वप्ने पडू लागली आणि त्यातूनच महायुतीच काय, प्रसंगी युती तोडण्याची बारभाई कारस्थाने भाजपने सुरू केली. महायुतीतल्या घटक पक्षांना चुचकारत सेनेची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंसह सेनेला तिची जागा दाखवण्याचा भाजपचा इरादा होता. पण उद्धव ठाकरे आणि सेना यांनी भाजपला शेवटी युतीत राहूनच निवडणुका लढवण्यास मजबूर केले. यात सेनेचा ताठरपणा जसा होता, तसाच मधल्या चार महिन्यांत झालेल्या पोटनिवडणुकांचा भाजपला बसलेला फटकाही कारणीभूत होता. या पोटनिवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागले असते तर भाजपच्या अंगात बारा हत्तींचे बळ आले असते.
एके काळी आपल्या पडद्यावरच्या नाचगाण्यांनी आणि पडद्याबाहेरच्या नखऱ्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या व त्याच शिखरावरून थेट संसदेत उडी मारलेला गोविंदा नामक नट, माजी खासदार कुणाला आठवतो? अशीच अवस्था लोकांत आणि माध्यमांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची झालीय. ‘युती’सारखाच आघाडीतही ‘जागा’वाटपाचा तिढा होता, पण या तिढय़ाची कुणालाच दखल घ्यावीशी वाटत नव्हती. कारण ते आघाडी म्हणून राहिले काय, नाही राहिले काय, जनतेने आपल्या मनातून त्यांना कधीचेच पायउतार केले आहे.
या पाश्र्वभूमीवर ‘ब्लू-प्रिंट’जनक राज ठाकरे आणि मनसे, सिनेमातल्या आयटम साँगसारखे कधीतरी बातमीत येत होते. ते स्वबळावर लढणार असल्याने, त्यांची हाणामारी स्वत:पुरतीच मर्यादित होती. त्यांचे एक आमदार ह.भ.प. राम कदम भाजपवासीय झाले तर स्वत: पक्षप्रमुखासह नांदगावकरांसारखे शिलेदार ‘एकाच’ मतदारसंघात अडकू नये म्हणून निवडणूक ‘न’ लढवण्याच्या मानसिकतेत आहेत. खरं तर चारच महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी दोन मतदारसंघात लढले. त्यातल्या एकाही मतदारसंघात न अडकता देशभर फिरून त्यांनी त्या दोन मतदारसंघांसह आणखी २७२च्या वर मतदार संघ जिंकले हे मनसेला माहीत नाही?
महायुतीतल्या घटक पक्षांची अवस्था ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशी झाली. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्या ताटात काही पडले असेल किंवा जे मिळाले त्यावर समाधान मानून ते पुन्हा हातात हात धरून हात वर केलेली ‘पांडव’ पोझ देतील. यातला राजू शेट्टींचा परगणा, कार्यक्रम ठरलेला आहे. जानकरांचा बारामती उद्ध्वस्त करायच्या एककलमी कार्यक्रमात त्यांनी आता पंकजा मुंडेशी रक्षाबंधन करून भाजपतला आपला कोपरा निश्चित केला आहे. मेटे बंड करू शकत नाहीत आणि रामदास आठवले यांनी ‘(शरद पवार यांची) चिठ्ठी आयी है’ हे गाणे म्हणायला सुरुवात करून, त्यांच्या पुढच्या प्रदक्षिणेची दिशा ठरवून ठेवली आहे. पण आठवलेंची लवचीकता पाहता ते कुठेही जाऊ शकतात. त्यांनी जावे, राहावे, चारोळ्या कराव्या आम्ही टाळ्या वाजवू, असा ते समजतात तो आंबेडकरी समाज हसत हसत एकमेकांना सांगत असतो.
या पलीकडे कम्युनिस्ट, शेकाप, भारिप, अन्य छोटे- मोठे डावे पक्ष यांची तिसरी आघाडी आजही तत्त्व, घटना, भ्रष्टाचार इ.वर लॉजिकल बोलत आलीय, पण या लॉजिकचे मतपेटीतून मॅजिक दिसत नाही. आजच्या राजकारणात लॉजिकवर निवडणुका जिंकणे कठीणच नाही तर अशक्य आहे, हे माहीत असूनही ते आपला रस्ता न बदलता संघर्षांत्मक राजकारण करत राहिले आहेत. मतदारांनीही ‘तत्त्व’ बदलल्याने या आघाडीचा प्रवास अधिक कठीण बनला आहे.
याशिवाय काही अपक्ष या रणधुमाळीत असतील. येत्या विधानसभा निवडणुकांचे हे ढोबळ चित्र! मतदारांना एकही सक्षम पर्याय नाही. त्यांना उडदामाजी काळे गोरे किंवा यांना बाजूला करा, मग हे आले तरी चालतील अशा अगतिक मन:स्थितीत ‘मतदार’ आहेत. जाहीरनामे, वचननामे, वचकनामे वगैरेंची कसलीही भूल आता नागरिकांना पडत नाही. एकाला झाकावा नि दुसऱ्याला काढेपर्यंत हा दुसरा झाकण्याची वेळ येते. नवरा बायकोला जेवढं ‘गृहीत’ धरतो, त्याच्या शंभर पट हे सर्व प्रमुख राजकीय पक्ष लोकांना, मतदारांना गृहीत धरतात!
जागावाटपावरून ‘युती’ आणि ‘आघाडी’त जे काही चालले होते, त्यात मतदार होता कुठे? माध्यमे आणि स्वत: केलेल्या सव्‍‌र्हेवर जणू काही सनदच मिळालीय या थाटात हे महाराष्ट्र वाटून घेत होते. कुणीही ‘जाहीरनामा’ नामक वीस-बावीस पानांचे चोपडे सोडून थेट जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलत नव्हते. दाभोलकरांचे खुनी शोधू शकले नाही म्हणून सरकारवर तुटून पडणारे आणि अंधश्रद्धाविरोधी कायदा केला म्हणून स्वत:लाच हार घालून घेणारे सत्ताधारी वाटाघाटीचे गुऱ्हाळ लांबवत ‘पितृपक्षा’त अर्ज न भरणे, उमेदवार जाहीर न करणे, आघाडी युती जाहीर न करणे असले पळपुटे अश्रद्ध विचार करत राहिले. पितरांनी आशीर्वाद देऊन नाही, मतदारांनी मतदान केले तरच निवडून येणार हे यांना कळत नाही? पण आजचे व उद्याचे सत्ताधारी आम्ही अंधश्रद्धेपासून दूर नाही हेच ठसवत आहेत. यात ‘जनभावना’ जपतो असा छुपा धार्मिक अजेंडाही पसरवता येतो.
ज्या मोदींच्या हाती महाराष्ट्रासकट देशाने सत्ता दिली, त्यांचा प्रभाव ओसरू लागल्याची चर्चा तीनच महिन्यांत रंगू लागली. उत्तर प्रदेशात साधू, बैरागी, तथाकथित संत-महंताना मोकाट सोडल्याचे परिणाम लगेचच दिसून आले. त्यातून लोकांनी थेट मोदींनाच ‘यांना आवरा’ असा संदेश दिलाय. पण आपली प्रशासकीय दहशत आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावण्यात कार्यरत असणाऱ्या नरेंद्रभाईंना राज्यांच्या निवडणुकांत फारसा रस दिसत नाही किंवा ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असा लौकिक असणाऱ्या पक्षाध्यक्ष अमित शहांवर त्यांनी ही जबाबदारी सोपविली असावी. पण लोकसभा निवडणुकीनंतर अमितभाईंच्या लाथेने पाणी सोडा, नळाची धारही मिळवलेली नाही. ‘शायनिंग इंडिया’च्या अनुभवातून भाजप काही शिकलेला नाही हेच यातून दिसून येते.
महाराष्ट्रात रस्ते, वीज, पाणी, वाहतूक अशा मूलभूत सुविधांची वानवा आजही असताना, हजारो कोटींच्या योजनांचे ‘शिलान्यास’ करण्यात राज्य व केंद्र सरकार यात आचारसंहितेपूर्वी शर्यत लागली. यातून बुलेट ट्रेनपासून मेट्रो ट्रेन, मोठाले हायवे, फ्लायओव्हर ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ अशा गोंडस नावाखाली कोटीच्या कोटी मंजूर केले गेले.
पण आज महाराष्ट्रात अनेक गावांत शाळा नाहीत, शाळा आहेत तर शिक्षक नाहीत, मुले नाहीत. दोन्ही आहेत तर पुस्तके नाहीत. असलेल्या पुस्तकांत सतराशेसाठ चुका. माध्यान्ह भोजनातून विषबाधेसारखे प्रकार, तर आश्रमशाळांतून लैंगिक शोषण. मोठी शहरे सोडली तर आजही अनेक जिल्ह्य़ांच्या ठिकाणी सुसज्ज इस्पितळे नाहीत. इस्पितळात औषधे नाहीत. डॉक्टर नाहीत. शिकाऊ डॉक्टर जादा कामाने आत्महत्या करताहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या, आत्महत्या होताहेत. मुलांचे अपहरण होत आहे. मुंबईने बकालपणाची परिसीमा गाठलीय. पाणी तुंबणे, ट्रॅफिक जाम, रेल्वे स्टेशनवर कमी तिकीट खिडक्या, फलाटांच्या उंचीमुळे माणसे मरताहेत, गर्दीमुळे पडून मरताहेत. जागांचे भाव गगनाला भिडलेले, म्हाडात भ्रष्टाचार, झोपडीदादांमुळे झोपडय़ांत गुंडगिरी, दहशतीत वाढ. धरणे मंजूर होतात पण कालवाही बांधून होत नाही. पाणी आलेच तर ते आपल्या क्षेत्रात वळवण्याची राजकीय दादागिरी, शेतकऱ्यांच्या नावावर बोलायचे खूप करायचे काही नाही. आत्महत्या केली की चार पैसे फेकायचे. कृषी विद्यापीठात नवी संशोधने होण्यासाठी उत्तेजन नाही. पर्यावरणावर उद्दामपणे हिंसक प्रतिक्रिया आंदोलकांवर द्यायची. ‘विकासाच्या’ नावावर परिसरच्या परिसर उद्ध्वस्त करायचे. आरक्षणाच्या नावावर आदिवासी आणि इतर नागर जातींत लढाई लावून दिली जातेय. रोज एक नवी जात शोधून आरक्षणाचे गाजर दाखवताहेत. उद्या कदाचित सत्तेसाठीही हे स्वत:चे आरक्षण मंजूर करून घेतील.
या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून, या आघाडय़ा, युत्या बनताहेत. गेली साडेचार नव्हे तर पंधरा वर्षे ज्यांच्या भ्रष्ट कारभारावर भाजप-सेनेने घसा कोरडा केला, त्यांनाच पक्षात घेऊन पावन केले. म्हणजे यांची अपेक्षा काय? मुजरिम भाई का भेस बदलके आएगा उसे हम गले लगाये? वडिलांच्या निधनानंतर संघर्ष यात्रा काढणाऱ्या पंकजा मुंडेंनी त्यापेक्षा स्वत: महिला म्हणून किती महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवला, हे सांगितले असते तर बरे झाले असते. वडिलांची नैसर्गिक राजकीय वारसदार होतानाच बहीण प्रीतमच्या उमेदवारीवर मी तिला निवडणूक लढवायचा आदेश देऊ शकते, असे म्हणणे ही राजकीय गुर्मी की मस्ती? बहीण तुमचा आदेश मानेल, जनता मानेल? गोपीनाथरावांनी खरा संघर्ष केला. त्यांच्या मांडीवरून तुम्ही विधानसभेत गेलात. त्यांच्या निधनाच्या सहानुभूतीचा अतिरेक कशाला?
हा अतिरेक होतो कारण सगळ्याच पक्षातील सगळ्या नेत्यांना एरव्ही ‘माझे कार्यकर्ते’ लागतात आणि निवडणुका आल्या, उमेदवारीची वेळ आली की बायको, मुलगी, मुलगा, जावई, पुतण्या एवढेच दिसतात. एका मुलाच्या दणदणीत पराभवानंतरही  नारायण राणेंना दुसऱ्या मुलासाठी तिकीट हवे, स्वत:साठी हवे. तर वारसाहक्काने शिवसेना अध्यक्ष झालेले उद्धव ठाकरे, अत्यंत प्रतिकूल वातावरणात युतीच्या वाटाघाटीसाठी आदित्य ठाकरेला पाठवतात? महाराष्ट्राची बारा कोटी जनता या सर्वपक्षीय नेत्यांच्या पोरांचे पालनपोषण करण्यासाठीच आहे, या गोड गैरसमजात ही मंडळी ज्या आत्मविश्वासाने वावरतात याला कारण आपण १२ कोटी आणि त्यातलेच या सर्व पक्षातले नेते, उपनेते, कार्यकर्ते. आपणच यांना ‘युवराज’पद देतो. आरक्षणात गुणवत्ता मागणारे सोशल मीडियाधारी या घरंदाज आरक्षणात गुणवत्ता का तपासत नाहीत?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा झपाटय़ाने बदलतोय. आज मोदी किंवा बाळासाहेबांच्या नावावर मत देण्याइतके राज्यनेतृत्व सक्षम नाही. विरोधी पक्ष म्हणून यांनी मांडवलीचेच राजकारण केले. मुंबई यांच्या हातात पंचवीस वर्षे आहे. विकास बाजूलाच राहिला स्वपक्षीय नगरसेविकांना धमकावणारे, लाज काढणारे, जीना हराम करणारे स्वपक्षीय नेते यांना आवरता आले नाहीत. अंधश्रद्धाविरोधी कायद्यासारखा बुद्धिप्रामाण्यवादी कायद्याला ‘धर्म’रंग देऊन सतरा-अठरा वर्षे यांनी अडवला, आघाडीचा नाकर्तेपणा म्हणून युतीला मत म्हणजे डिर्टजट पावडर बदलण्यासारखे आहे. पण आपण एवढेच करू शकतो ही हतबलता १२ कोटी जनतेची आहे.
अण्णा हजारे, केजरीवाल यांनी अपेक्षा उंचावल्या होत्या, पण केजरीवाल दिल्ली सोडून पीएम पदासाठी ललचावले आणि सर्वार्थाने हरले. स्वत: सत्ता सोडून गेलेले केजरीवाल आता प्रश्न विचारण्याचा जुना कार्यक्रम मोदींना प्रश्न विचारून सुरू करते झाले.
आज जनआंदोलन, आपसारख्या पक्षाची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवते. केजरीवालांनी महाराष्ट्रात निवडणुका न लढण्याचा निर्णय घेऊन स्वत:ची प्रतिमा रणछोडदास अशी केलीच, पण महाराष्ट्रात आपच्या निमित्ताने उभी राहिलेली जनआंदोलनांची राजकीय सुरुवात गर्भातच खुडून टाकली.
उमेदवार यादी आधी मंत्रिमंडळाची यादी तयार करणारा भाजप, मराठीऐवजी हिंदुत्वावर झुलणारी सेना, भ्रष्ट आघाडी, दिशाहीन मनसे या सगळ्यांनी आपलीच मालमत्ता असल्यासारखे ‘जागा’वाटप केले खरे पण यांची खरी ‘जागा’ दाखवायची ताकद आपल्यात आहे. आपण आपली ताकद आणि यांची जागा दाखवून देऊया!
शेवटची सरळ रेघ-
भारताच्या मंगळ यानाने, मंगळ मोहीम यशस्वी केली. आता तरी मुलींच्या लग्नातला मोठा अडसर -‘मंगळ’ दूर होईल ही अपेक्षा.
आणि सीबीआयसह, महाराष्ट्र पोलीस, आबा यांनी दाभोलकरांचे खुनी मंगळावर तरी सापडतात का हे बघावे आणि ‘मंगल’ बातमी द्यावी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2014 1:10 am

Web Title: seat sharing alliance for maharashtra assembly election 2014
टॅग Seat Sharing
Next Stories
1 सार्वजनिक शरमेची गोष्ट
2 हिंदूंवरच्या वाढत्या जबाबदाऱ्या..
3 गर्जा (सोयीने) महाराष्ट्र माझा!
Just Now!
X