|| मकरंद देशपांडे

अभिनेता आणि ‘मूव्हर्स अ‍ॅण्ड शेकर्स’चा प्रख्यात अँकर शेखर सुमनबरोबर मी १९९४ साली दूरदर्शनवरील ‘रिपोर्टर’ या मालिकेत काम केलं. त्याचं शहाणपण, प्रेमळपण आणि रोखठोक स्वभावामुळे तो माझ्या लक्षात राहिला. तो टीव्ही माध्यमात खूपच लोकप्रिय झाला. अगदी ‘देख भाई देख’, ‘वाह जनाब’ ते ‘ग्रेट इंडियन कॉमेडी शो’, ‘लाफ्टर चॅलेंज’पर्यंत. त्यादरम्यान मी टीव्हीवरचं काम कमी करत हिंदी नाटकं लिहून दिग्दर्शित करत होतो. स्वत:चा ग्रुप असल्यानं कुणाला विचारावं लागत नव्हतं, की ‘हा नवीन विषय सुचलाय, त्यावर लिहू का नाटक?’, ‘अमुक अमुक कलाकाराला घेऊ का?’ त्यामुळे कलात्मक आविष्कारासाठी खूप मोकळीक होती. शेखर हा जरी फिल्म (उत्सव)आणि टीव्हीवरचा नट असला तरी त्याला नाटकात काम करायचं होतं. आम्ही कुंदन शाहच्या ‘एक से बढकर एक’च्या सेटवर भेटलो. कुंदन हे स्वत: या देशाच्या सिनेमा इतिहासातले एक महत्त्वाचे दिग्दर्शक, पण त्यांना माझ्या नाटय़यात्रेबद्दल कौतुक होतं. शेखरला त्यांच्या बोलण्यामुळे किंवा त्यांच्या कौतुकामुळे वाटलं असावं माझ्याबरोबर नाटकात काम करावं म्हणून!

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या मनाला बेचन करत होत्या. या वेदनेवर नाटक लिहायचं म्हणजे सत्य घटनेवर आधारित नाटक, पण मला शेतकऱ्याच्या वेदनेबरोबर समाजातल्या एका यशस्वी माणसाच्या मानसिक परिवर्तनाला जोडायचं होतं. शेखर सुमननं ‘रिपोर्टर’ मालिकेत एका पत्रकाराचं पात्र साकारलं होतं, पण ते थोडं डिटेक्टिव्ह स्वरूपाचं होतं. मला असं वाटलं, की आपण शेखरला डिटेक्टिव्ह बनवलं आणि एका केसच्या संदर्भात त्याला कुठे तरी पाठवलं; आणि जर तिथे त्याला आत्महत्या करणारा शेतकरी भेटला तर काय होईल?

मनात आलेला विचार कागदावर लिहिताना कागद आणि लेखणीच्या नात्यानं विचाराला वेगळीच कलाटणी दिली. डिटेक्टिव्ह मौर्य आपल्या साहाय्यक मुलीबरोबर एका केससाठी बोधगयेला जातो. तिथे बुद्धाला मिळालेल्या साक्षात्काराच्या जागी (झाडाखाली) डोळे मिटून बसतो आणि एका शेतकऱ्याच्या आकांतानं भानावर येतो. शेतकरी त्याच्यासमोर असतो आणि त्याला म्हणतो, ‘तू आजचा सिद्धार्थ आहेस. आमचा उद्धार तुलाच करायचाय. तूच आम्हाला या दु:खातून बाहेर काढणार.’ तो शेतकरी नंतर आत्महत्या करतो. मौर्य आपल्या सहकारी मुलीबरोबर पोलिसांच्या चौकशीनंतर दोन दिवसांनी घरी परत येतो. मौर्यच्या बायकोला त्याची साहाय्यक  मुलगी अजिबात आवडत नसते. तिला तिच्यावर संशय असतो, की ती जाणून बुजून अशाच केसेस घ्यायला लावते- ज्यात बाहेर फिरावं लागतं. डिटेक्टिव्ह मौर्यला या वेळेस आपल्या बायकोशी भांडायचं नसतं. कारण त्या शेतकऱ्याच्या देहत्यागानं तो हादरलेला असतो. बायकोला मात्र हे काल्पनिक कथानक वाटतं. पण एक दिवस तिला धक्का बसतो. मौर्य घरात कोणाशी तरी बोलताना आढळतो, पण ती व्यक्ती अदृश्य असते. मौर्य त्या अदृश्य व्यक्तीसमोर हात जोडतो आणि सांगतो, ‘‘मी एक भोगी माणूस आहे, जो भौतिक जीवन उपभोगत आहे. आपल्या या आनंदमयी आणि थरारक अशा आयुष्याला त्यागून मी सिद्धार्थ नाही होणार.’’ ती अदृश्य व्यक्ती बोधगयेत ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असते तीच आहे. त्यानं मरताना केलेली आकाशवाणी खरी करण्यासाठी आता तो भूत बनून आला आहे. मौर्यच्या बायकोला तरीही वाटतं की हे काही तरी बनावटी आहे. पण मौर्यचा वेडेपणा वाढत जातो. तो शेतकऱ्याच्या भुताला- मी सिद्धार्थ होण्याच्या पात्रतेचा नाही- हे पटवून देण्यासाठी चिक्कार दारू पितो. पण शेतकऱ्याच्या भुताला मात्र आणखीन खात्री होत जाते की मौर्यच त्यांना वाचवणार आहे.

बायको मात्र आता घाबरून मानसतज्ज्ञाला घरी बोलावते. त्याच्याबरोबर बोलत असताना शेतकरी मौर्यला पाहत असतो. मानसतज्ज्ञाला मात्र मौर्यने दाखवलेला शेतकरी दिसत नाही आणि त्याच्यावर विश्वासही बसत नाही. उलटपक्षी मौर्य आपल्या कामाच्या प्रेशरमुळे भूत बघू लागलाय, असा निष्कर्ष काढतो.

स्थिती नाजूक होऊ लागलीये असं पाहून बायको आता आपला पवित्रा बदलते. ती मौर्याच्या साहाय्यक मुलीला चांगलं वागवते. तिच्याशी मत्री करते. दोघी मिळून ठरवतात की मौर्यच्या डोक्यातल्या भुताला बाहेर काढायचं. पण शेतकरी भूत घर सोडायला तयार नाहीये. ते म्हणतं की, जोपर्यंत मौर्य आपलं ऐसपस घर सोडून आमच्या उद्धारासाठी बाहेर पडत नाही, तोपर्यंत तो घर सोडणार नाही. भुताच्या निश्चयाने बावरून मौर्य आपल्यामध्ये सिद्धार्थचा कोणता अंश आहे याच्या शोधात गौतमाच्या सूत्रांना वाचून आत्मसात करायला लागतो. बायकोला आता भीती वाटायला लागते. भुताला मात्र आता कार्यसिद्धीकडे जाण्याचा मार्ग दिसायला लागतो. मौर्य दारू पिणं बंद करतो. गोड खाणं बंद करतो. शेतकऱ्याच्या वेदनेशी स्वत:ला जोडू पाहतो. आणि एक दिवस येतो, जेव्हा डिटेक्टिव्ह मौर्यचं- स्वत:च्या मनाचं केलेलं आत्मपरिक्षण पूर्ण होतं आणि तो शेतकऱ्याच्या भुताबरोबर घराबाहेर पडतो; तेव्हा बायकोच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात.

नाटककार म्हणून मला शेतकऱ्यांना केवळ सरकारी आश्वासन मिळवून द्यायचं नव्हतं. माझ्या मनात असं होतं की, शेतकऱ्यानं शहरातल्या लोकांची पोटं भरत आपल्या डोक्यावर र्कज घेतली आणि शेवटी त्या बोजापायी आत्महत्या केली. त्याची भरपाई आता शहरवाल्यांकडून व्हायला हवी. पण ते नुसतं ‘चेकरूपी’ नसून, माणुसकीने भरलेलं असावं!

नाटकाचा बाज सुरुवातीला गमतीशीर आणि उथळ असा ठेवला आणि हळूहळू तो गंभीर करत नेला आणि त्या गंभीरपणात हास्याचं कारंजं उडालं.. पण ते मनातले अश्रू होते. शेतकऱ्याच्या भुतानं घरात भीतिदायक वातावरणही आणलं, पण त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी घरात जिवंत झाली- भुताच्या रूपानं. माणसाला वेडं करतो तो त्याचा अपराधबोध, पण शहाणं करते ती त्याला त्याची झालेली जाणीव.

‘‘बुद्धानंतर त्याच्या जवळपास जाईल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही,’’ असं ओशो म्हणाले होते. बुद्ध म्हणजे आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी. स्वत:बद्दल ज्ञान प्राप्त करणारा आणि स्वत:वर विजय मिळवलेला. स्वत:बरोबर संपूर्ण जगाचा उद्धार, उत्कर्ष करू शकणारा बुद्ध. डिटेक्टिव्ह मौर्य हा बुद्धाच्या याच मार्गावर जाण्यासाठी घर सोडतो आणि समाजाला जागृत करतो.

नाटक लिहून पूर्ण झाल्यावर मी शेखरच्या घरी गेलो. एका टॉवरमधले वरचे तीन मजले त्याचे होते. त्यात खूपच सुंदर आणि आलिशान सजावट होती. मला असं वाटलं की, हेच डिटेक्टिव्ह मौर्यचं घर आहे. नाटक वाचून झाल्यावर मला म्हणाला, ‘‘बहुत अच्छा लिखा है तुमने मकरंद. इसे तुरंत करना चाहिये।’’

मी त्याला माझ्या मनातलं कास्टिंग सांगितलं. त्याची साहाय्यक  म्हणून इंग्रजी नाटक करणारी दिलनाज़्‍ा इराणी आणि बायकोसाठी कविता लाड मेढेकर! शेखरने फार विचारपूस केली नाही की या दोघी कोण आहेत वगरे वगरे, पण एकदा कविता आणि दिलनाज़्‍ाने होकार दिल्यावर नाटकाचं वाचन सुरू झालं आणि शेखरला कविताचं कॉमिक टायिमग, बायकोची बायाकोगिरी, तिचं हळवंपण, तिचा रुसवा, प्रसंगी राग तर प्रसंगी भीती दाखवण्याची क्षमता बघून नट म्हणून त्याला सुरक्षित वाटलं. शेवटी कितीही चांगला कलाकार असला तरी सहकलाकार चांगला असल्याशिवाय त्याचा अभिनय अर्थपूर्ण वाटत नाही; आणि कविताला तर तिच्या नवऱ्याचा- आशीषचा मनापासून असलेला पाठिंबा आमच्या नाटकालाही उपयोगीच ठरला. दिलनाज़ इराणीची आकर्षक आणि हजरजबाबी साहाय्यक  फारच परिणामकारक झाली. शेतकऱ्याचं भूत मीच करावं, असं शेखरचं म्हणणं होतं. प्रत्येक तालमीत मला वाटायचं की, माझ्यातल्या ‘मकरंद’ नावाच्या मागे जगत असलेल्या माणसाला, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा होत असणारा त्रास अनुभवताना, त्याच्यावर इलाज शोधायलाच हवा- एक माणूस म्हणून!

नाटकाचा शेवट प्रेक्षकांशी बोलून करायचा असं ठरलं. नाटकाची शिस्त वेगळी असते. कितीही चांगला आणि अनुभवी नट असला तरी तालमी, तालमी.. आणि खूप तालमी कराव्या लागतात. शेखरने खूप मेहनत घेतली.

नाटकात ‘वंदेमातरम्’ गाणं असावं म्हणून सुलतान खान (प्रसिद्ध सारंगीवादक आणि गायक) यांना भेटलो आणि तो एक अविस्मरणीय अनुभव होता. त्यांना नाटकाचा आशय ऐकून गहिवरून आलं. त्यांच्या घरातून बाहेर पडल्यावर असं वाटलं की ते खूपच मोठं व्यक्तित्व आहे. त्यांना नाटकाच्या तालमींना बोलावणं चुकीचं ठरेल. शैलेन्द्र बर्वे या माझ्या चोवीस कॅरेट सोनं असलेल्या संगीत दिग्दर्शकाकडून ‘वंदेमातरम्’चं एक फारच हृदयस्पर्शी रूप रेकॉर्ड केलं.

पहिल्यांदा व्यावसायिक नाटकासारखा बॉक्स सेट तयार करून, यशवंत नाटय़गृहात रंगीत तालीम केली. ती पाहताना असं वाटलं की काही तरी कमी आहे.

पृथ्वीला शुभारंभाचे प्रयोग ठरले होते, पण मला मनात काही तरी अपूर्णता वाटत होती. ठरलेल्या तारखांना प्रयोग झाला नाही. मी फक्त कलाकारांची माफी मागितली (असावी). काहीही करून नाटक करायलाच पाहिजे, असा माझा अट्टहास कधीच नसल्याने आणि त्यात दुसऱ्याचे  पसे गुंतले नसल्याने काही र्वष गेली. नाटक तसंच रंगीत तालमीत राहून गेलं.

एका रिअ‍ॅलिटी शोचे जज म्हणून शेखर आणि मी पुन्हा एकत्र आलो, तेव्हा तो मेकअप व्हॅनमध्ये म्हणाला, ‘‘अरे मकरंद, तू नाटक बंद का केलंस ते खरं सांग.’’ मी म्हटलं, ‘‘बंद नाही केलंय, फक्त मला ते जमलं नाही तेव्हा.’’ साहजिकच मी प्रॅक्टिकल नाही हे त्याच्या लक्षात आलं, कारण शेखर सुमनला बघायला प्रेक्षक नक्की येणारच होता. काही दिवसांनंतर मला असं वाटलं, आपण पुन्हा कलाकारांना विचारून बघू. आणि त्यांनी ‘तू प्रयोग करणार ना की फक्त तालीम?’ या एका अटीवर ‘हो’ म्हटलं.

बॉक्स सेट काढून टाकला. फारच सुंदर पांढरे सोफे (वेगळ्या आकाराचे) आणि आरशाचा, पण क्रिस्टल ग्लासचा इफेक्ट देणारा अप्रतिम बार टेडी मौर्यने बनवला. काळ्या बॅकड्रॉपवर पांढरा आणि काचेरी सेट उठून दिसला आणि यशस्वी माणसाच्या पांढऱ्या शुभ्र जीवनाच्या प्रतिबिंबालाच तडा दिल्याचा अनुभव नाटकाच्या शेवटी देता आला.

पृथ्वीचे शुभारंभाचे प्रयोग हाऊसफुल होतेच, पण एक वेगळं यश असं होतं की, शेखरने जेव्हा शेवटी क्लायमॅक्सला प्रेक्षकांना ‘जागे व्हा, शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे चला, उठा!’ म्हटल्यावर अख्खा प्रेक्षकवर्ग जागेवर उभा राहिला. माझ्यातल्या नाटककाराला आणि रंगकर्मीला आता पूर्णता वाटली. नाटकाचं नाव ‘डिटेक्टिव्ह मौर्य’

जय शेतकरी! जय बुद्ध!

जय शेखर! जय कविता!

mvd248@gmail.com