18 November 2019

News Flash

या टोपीखाली दडलंय काय?

‘पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा’, ‘नीट विचार केला की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सापडतंच’ असं आपण नेहमी म्हणतो.

‘पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा’, ‘नीट विचार केला की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सापडतंच’ असं आपण नेहमी म्हणतो. पण हा विचार आपण करतो कसा? असा एखादा निर्णय घेताना किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण स्वत:चं निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं? बऱ्याचदा आपण निर्णयावर आधीच पोहोचलेलो असतो आणि तो निर्णय कसा बरोबर असण्याची शक्यता आहे याची कारणं फक्त विचार करताना शोधतो. किंवा एखादा प्रश्न सोडवताना आपण एकाच प्रकारच्या विचारात अडकून पडतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही सापडत नाही. ‘कॉग्निटिव्ह बायसेस’च्या लेखात बघितल्याप्रमाणे, आपलं मन हे बऱ्याच गोष्टींनी प्रभावित होत असतं. त्यामुळे ते भरकटलं जाऊन बऱ्याचदा आपण सारासार, सर्वागीण विचार करू शकत नाही. यावर उपाय काय?

एडवर्ड डी बोनो यांनी मनाला आणि पर्यायाने विचारांना भरकटू न देता शिस्तबद्धरीतीने कसा विचार करता येऊ शकतो, हे त्यांच्या ‘सिक्स थिंकिंग हॅट्स’ या संकल्पनेद्वारे जगासमोर मांडलं. एकटय़ाने किंवा गटाने निर्णय घेताना किंवा एखादी समस्या सोडवताना विचार कसा करावा याबद्दल ही संकल्पना मार्गदर्शन करते. यात सहा रंगांच्या हॅट्स (टोप्या) या विचार करण्याचे सहा दृष्टिकोन दर्शवतात. एक-एक रंगाची टोपी डोक्यावर ठेवली आहे असं समजून त्या दृष्टिकोनातून हाती घेतलेल्या प्रश्नाकडे बघायचं, असं ही संकल्पना सांगते. सहा रंगांच्या या टोप्या नेमकं काय दर्शवतात, हे पाहू.

(१) पांढरी टोपी: पांढरी टोपी म्हणजे माहिती आणि तथ्य याआधारे विचार करणं. निर्णय घेण्यासाठी वा समस्या सोडवण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे? त्यातील कोणती माहिती उपलब्ध आहे आणि कोणती मिळवावी लागेल? उपलब्ध माहिती काय सांगते आहे? या माहितीचा उपयोग मला प्रश्न सोडवण्यासाठी कसा होऊ शकेल? असे प्रश्न या पांढऱ्या टोपीखाली दडलेले असतात; ज्यांच्या उत्तरातून एखाद्या गोष्टीचं माहितीच्या आधारे तर्कसंगत विश्लेषण करता येतं.

(२) लाल टोपी: लाल टोपी म्हणजे भावनिक दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे पाहणं. आपल्या मनातील आवाज आपल्याला काय सांगतो, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनाला काय वाटतं, हे यातून दिसून येतं. जेव्हा तुम्ही लाल टोपी घालून विचार करता तेव्हा तुम्ही भावना, अंत:प्रेरणा यांना महत्त्व देता. अशा प्रकारे विचार करताना मनाला जे काही वाटतं, ते का वाटतं याचं स्पष्टीकरण देण्याचीही गरज नसते. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या आणि आपल्यासोबत असणाऱ्यांच्या भावना काय आहेत, हे यामुळे कळून येतं.

(३) काळी टोपी: काळा रंग इथे नकारात्मकता दाखवतो. ज्या गोष्टीचा आपण विचार करतोय त्याचे नकारात्मक पलू यातून समोर येतात. काय चुकू शकतं, पुढे येणाऱ्या संभाव्य अडचणी, धोके आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल आपण विचार करतो. खरं तर ही व्यावहारिकपणे  विचार करण्याची संधी असते; ज्याद्वारे आपण पुढे येणारे धोके ओळखून त्यासाठी नियोजन करू शकतो. आपण बरेच जण खूप वेळा हीच अदृश्य टोपी घालून वावरत असतो.

(४) पिवळी टोपी: पिवळा रंग हा प्रकाशाचा, सकारात्मकतेचा आणि उत्साहाचा रंग मानला जातो. यामध्ये काळ्या टोपीच्या एकदम उलट विचार करावा लागतो. आशावादी दृष्टिकोन ठेवून कोणत्या चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे, हे यातून शोधलं जातं. संधी, शक्यता आणि त्यातून मिळणारे फायदे हे या प्रकारच्या विचारातून बाहेर येतात. एखादी गोष्ट आपण का करतोय याची स्पष्टता तर यामुळे मिळतेच; पण त्याचबरोबर ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रेरणाही यातून मिळू शकते.

(५) हिरवी टोपी: हिरवा रंग हा सर्जनशीलतेचा रंग आहे. मुक्तपणे, ‘Out of the box’ विचार करण्याची ही संधी. आपण नवीन काय करू शकतो? एखादी समस्या दुसऱ्या कोणत्या वेगळ्या प्रकारे हाताळू शकतो का? असं विचारमंथन यात करण्यात येतं. काळ्या टोपीच्या विचारांतून बाहेर आलेल्या अनेक समस्यांवर इथे उपाय शोधले जातात.

(६) निळी टोपी: निळा हा सर्वसमावेशक आकाशाच्या छत्रीचा रंग. याचा उपयोग या वेगवेगळ्या विचारपद्धतींचं व्यवस्थापन करण्यासाठी होतो. आपल्याला कशाचा विचार करायचा आहे? कोणती समस्या सोडवायची आहे? त्यासाठी कोणते वेळेचे, संवादाचे नियम सर्वानी पाळणं अपेक्षित आहे, इत्यादी विचार ही निळी टोपी घालून सुरुवातीलाच करणं अपेक्षित आहे. तसंच सर्वात शेवटी जेव्हा इतर सगळ्या रंगांचा विचार करून झाल्यावर त्या विचारमंथनाचं विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढणं हेदेखील निळी टोपी घालून करण्यात येतं.

नवीन कल्पना शोधण्यासाठी किंवा एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विचारमंथनात ‘सिक्स थिंकिंग हॅट्स’चा उपयोग होतो. खरं तर आपल्या स्वभावानुसार एक टोपी आपल्या डोक्यावर आधीच असते. अति टीका करणारे निराशावादी, अतिउत्साही आशावादी, केवळ हृदयाने काम करणारे भावनिक लोक आणि तर्कसंगत विचार करणारे व्यवहारी लोक आपण आजूबाजूला नेहमीच बघत असतो आणि आपणही त्यातलेच एक कोणीतरी असतो. समूहात किंवा गटात चर्चा करताना ‘सिक्स थिंकिंग हॅट्स’मुळे चच्रेला एक दिशा मिळते आणि वैयक्तिक स्वभावामुळे निर्माण होऊ शकणारी कोंडीही टाळता येऊ शकते. उदा. निराशावादी आणि आशावादी लोक आपापला मुद्दा धरून वाद घालत बसले तर इतर पलूंवर चर्चा होणारच नाही. वैयक्तिकदृष्टय़ा ‘सिक्स थिंकिंग हॅट्स’मुळे आपल्यालाही  एक संधी मिळते- आपली नेहमी असणारी टोपी डोक्यावरून जाणीवपूर्वक काढून दुसऱ्या पद्धतीने विचार करून पाहण्याची! या लेखमालेच्या माध्यमातून आपणही अनेक क्षेत्रांतल्या विविध संकल्पनांद्वारे वेगवेगळ्या विचारपद्धती समजावून घेत आहोत. एक वैचारिक साधन म्हणून आपण जर या विचारपद्धतींचा वापर करू शकलो तर त्या टोपीखालच्या माणसाला आणि त्याच्या आजूबाजूच्या जगाला आपणही कदाचित वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकू.

parag2211@gmail.com

First Published on June 30, 2019 12:06 am

Web Title: six thinking hats
Just Now!
X