साप हा निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. परंतु सापांविषयी आपल्या मनात एक प्रकारची भीती असते. अर्थात याला कारणीभूत आहेत ते आपल्या मनात सापांविषयी असलेले अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा. दुर्दैवाने त्याचा विपरीत परिणाम सापांच्या संख्येवर होत आहे. एकीकडे नागाची पूजा करायची आणि दुसरीकडे त्याच्याविषयी मनात अनेक गैरसमज पोसत तो आपला शत्रू असल्यासारखे वर्तन ठेवायचे, ही दोन टोके सापाविषयी आपल्याकडे आढळतात. या पाश्र्वभूमीवर प्रदीप कुळकर्णी यांचे ‘साप आपला मित्र’ हे पुस्तक सापांविषयीचे आपल्या मनातील अनेक गैरसमज दूर करणारे आहे.
या पुस्तकात विविध प्रकारच्या सापांच्या जाती, त्यांचे विशेष, विषारी आणि बिनविषारी साप यांच्यातील फरक अशी उपयुक्त माहिती मिळते. वाळा, खापरखवल्या, अजगर, डुरक्या घोणस, मांडवळ, नानेटी, गवत्या, दिवड अशा विविध प्रकारच्या आणि वैशिष्टय़पूर्ण नावांच्या सापांची माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक सापाची वैशिष्टय़ेही सांगितली आहेत. पुस्तकातील सापांची छायाचित्रे वेधक आहेत. ही छायाचित्रे पाहून निसर्गाच्या वैविध्यतेचे आश्चर्य वाटते. साप विषारी की बिनविषारी हे कसे ओळखावे, भारतात आढळणाऱ्या विषारी सापांविषयीची माहिती, साप चावल्यावर कोणते प्रथमोपचार केले जावेत, सर्पदंश झालेल्या माणसाला घाबरवून न सोडता त्याला कसा धीर द्यावा, विषप्रतिबंधक लस आदी महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तकात दिलेली आहे. सापांविषयीची रंजक माहितीही यात वाचावयास मिळते. लेखकाचे सापांविषयीचे विविध रंजक अनुभव वाचून सापांविषयीचे आपले अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होते. आपण करीत असलेली नागपूजा ही नागहत्येस कशी कारणीभूत ठरू शकते, तसेच रंगहीन सापांची माहितीही मनोरंजक आहे.
पुराणकथांमध्ये सापांविषयी कोणते संदर्भ, उल्लेख येतात याची माहितीही त्यातून मिळते. परंतु त्यातून अंधश्रद्धा पोसली जाण्याची शक्यता वाटते. त्यापेक्षा आधुनिक विज्ञानाची कास धरून सापांविषयी खरी माहिती करून घ्या आणि निसर्गातील या महत्त्वाच्या घटकाला वाचवा, असे आवाहनही लेखक या पुस्तकाद्वारे करतो.
‘साप आपला मित्र’-
प्रदीप कुळकर्णी, पृष्ठे- ८८, किंमत- १२० रुपये.