News Flash

संयतनाटय़!

कलेच्या फुलबाज्या प्रतिमा-प्रतीकांद्वारे तेवत ठेवणारे जुने संयत चित्रपट आजच्या पिढीला कालबाह्य़ वाटतात. मग ते सिनेमामध्ये क्रांती घडविणाऱ्या फ्रेंच न्यू व्हेव्हमधील ‘दादा’ दिग्दर्शकांचे असोत, की आणखी

| December 30, 2012 03:40 am

संयतनाटय़!

कलेच्या फुलबाज्या प्रतिमा-प्रतीकांद्वारे तेवत ठेवणारे जुने संयत चित्रपट आजच्या पिढीला कालबाह्य़ वाटतात. मग ते सिनेमामध्ये क्रांती घडविणाऱ्या फ्रेंच न्यू व्हेव्हमधील ‘दादा’ दिग्दर्शकांचे असोत, की आणखी कुणाचे. दोष आजच्या पिढीचा नाही. त्यांच्या डोळ्यांच्या बदललेल्या सवयीचा आहे. एमटीव्हीच्या वेगभरल्या लहान-लहान दृश्यांचा परिणाम, सर्व दृश्यमाध्यमांपासून ते चित्रपट संकलनाला आपसूकपणे या वेगाने घातलेल्या मोहिनीचा परिणाम आणि गॅझेट्स व व्हिडीओ गेम्सचा परिणाम आजच्या पिढीच्या दृश्यसंकल्पना तयार करण्यावर झालेला आहे. त्यामुळे सतत काही ना काहीतरी घडवीत ठेवणारे वेगवान दृश्यांचे चित्रपट हे सर्वसाधारण प्रेक्षकाच्या आवडत्या गटात, तर वेग टाळणारे सिनेमे आर्टफिल्मच्या लेबलखाली बाजूला ठेवलेले दिसतात.
 चित्रपटांची १९९० आधीचे व त्यानंतरचे अशी विभागणी केल्यास तंत्रातील सुधाराबरोबर कथामांडणीही तितकीच चकचकीत झाल्याचे दिसून येईल. प्रेक्षकांच्या दृश्यसंकल्पनांच्या आवर्तनामधल्या या काळात चित्रकर्त्यांनीही आपल्या निर्मितीमध्ये आमूलाग्र बदल केले.  प्रतिमा-प्रतीकांच्या कलात्मक फुलबाज्या चालवण्याचा प्रकार संयतनाटय़ मांडून चित्रकर्त्यांनी यशस्वी केला. रिचर्ड िलकलेटर (बिफोर सनराईझ), जिम जारमुश (ब्रोकन फ्लॉवर), वेस अ‍ॅण्डरसन (रॉयल टिननबम) यांच्यासारखे अमेरिकेत इंडिपेंडंट सिनेमाची धुरा वाहणारे दिग्दर्शक आणि त्याच वेळी हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात कलात्मकतेशी बांधीलकी जपणारे स्टीव्हन सोडरबर्ग (ट्राफिक, ओशन मालिका), पॉल थॉमस अ‍ॅण्डरसन (मॅग्नोलिया, देअर विल बी ब्लड) यांचे चित्रपट पाहिल्यास त्यात वेगवान घटना दिसणार नाहीत, संकलनाची एमटीव्हीची तोकडय़ा-तोकडय़ा दृश्यांची मालिका दिसणार नाही, पण त्यातील संयतनाटय़ सर्वच प्रकारचा चित्रपट पाहणाऱ्यांना पकडून ठेवणारे दिसेल. हाच प्रकार जपानमध्ये तकाशी किटानोच्या गँगस्टरपटांमध्ये, ऑस्ट्रेलियाच्या रोल्ड डी हीर या दिग्दर्शकाच्या आदिवासी कथा मांडणाऱ्या चित्रपटांमध्ये, रमीन बहरानी या दिग्दर्शकाच्या अमेरिकेतील स्थलांतरितांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमांमध्ये, टेरेन्स मलिक यांच्या शांततेचे संगीत ऐकविणाऱ्या चित्रपटांमध्ये, हाँगकाँगमधील वाँग कर वैच्या प्रेमपटांमध्ये आणि तवानी अँग लीच्या भव्य-दीव्य सिनेमांमध्येही पाहायला मिळतो. उपरोल्लेखित सर्व दिग्दर्शकांचे चित्रपट या माध्यमाबाबत थोडेसे कुतूहल असणाऱ्यांनाही वेडावून सोडणारे आहेत. त्यांनी मांडलेले विषय भिन्न असले, तरी त्यांच्या चित्रपटातील एकसमान धागा आहे तो त्यांतील संयतनाटय़ाचा. त्यावर कुणी संथपणाचा आरोप करू शकत नाही आणि संयत असल्याचे कारण सांगून ते चित्रपट पाहण्याचे टाळू शकत नाही.
संयतनाटय़ घडविण्यात निष्णात असलेल्या या दिग्दर्शकांच्या पंक्तीत बसवावा, असा बेन झाइटलिन या नवख्या दिग्दर्शकाचा ‘बीस्ट्स ऑफ द सदर्न वाइल्ड’ हा चित्रपट यावर्षी सनडान्स चित्रपट महोत्सवापासून भरपूर गाजत आहे. चित्रपटाला निश्चित कथा नाही, ओळखीचे चेहरे नाहीत. येथे कॅमेऱ्यासमोर पूर्वी कधीही उभे न राहिलेले, अभिनयाचा गंध नसलेले आणि त्यात कसलाही पल्ला गाठण्याची आकांक्षा नसलेले कलाकार आहेत. हा संपूर्ण चित्रपट म्हणजे अमेरिकेच्या दक्षिण लुईझियाना प्रांतातील प्रगत जगापासून पूर्णपणे विलग असलेल्या ‘बाथटब’ येथील समुदायाचे रानवट अवस्थेतील जगण्याचे चित्रण आहे. मात्र डिस्कव्हरी वाहिनीवरील माहितीपटासारखे त्याचे स्वरूप नाही.
हशपपी (क्वीवेंझ्ॉने वालिस) नावाच्या एका सहा वर्षांच्या मुलीच्या नजरेतून निसर्गाने आक्रमिलेल्या या भागाचे दर्शन घडविले आहे. तिच्या वयाच्या आकलन क्षमतेनुसार ती सांगत असलेली माहिती मात्र जीवनाचे कधीही न पाहिलेले रूप दाखविणारे आहे. आईविना आपल्या मरणासन्न वडलांसोबत राहत असलेल्या हशपपीचा समुदाय गरिबीच्या कायमस्वरूपी वस्त्रांना पांघरूनही आनंद शोधत असतो. सततचा पूर, चक्रीवादळ आणि नसíगक आपत्तींशी मत्री करणारा आजारातही खंबीर राहणारा हशपपीचा बाप िवक (ड्वाईट हेन्री) आणि हशपपी या इथल्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत, तर निसर्गाच्या रौद्राशी लढण्याची क्षमता असणारे त्यांच्याइतकेच सामथ्र्यशाली समुदायामधील लोक त्यांच्या सोबत हे संयत नाटय़ घडविण्यात हातभार लावण्यास उपयोगी ठरले आहेत.
हशपपीचे निसर्गाशी असलेले नाते उलगडत चित्रपट सुरू होतो. हशपपी तिच्या आणि समुदायाच्या दैनंदिन जगण्याचा तपशिलामध्ये परिचय करून देते. हा परिचय स्वप्नाळू असला, तरी दु:स्वप्नाहून भीषण आहे. माणसाने केलेल्या निसर्गाच्या वाताहतीचा कहर झाल्यामुळे एके दिवशी सारी पृथ्वीच पुराखाली जाणार, त्यातून मी आणि माझा बाप कसे वाचणार याचे आडाखे हशपपी काढताना दिसते. लवकरच बाथटब पुराने भरून जातो आणि हशपपीच्या आडाख्यानुसार िवक आणि ती सर्व सामर्थ्यांनिशी त्या पुराशी जगण्याचा संघर्ष करू लागतात. बेटावर उरलेल्या समुदायातील लोकांना घेऊन मोडलेले कचकडय़ाचे घर पुन्हा उभारण्यास सज्ज होतात.
आई नसलेल्या मुलीला निसर्गाच्या कुठल्याच शक्तीपुढे झुकण्यास न लागण्याचे शिक्षण देणारा बाप येथे दिसतो. आपल्या मृत्यूनंतर हशपपी एकटय़ाने या जगाशी लढताना पराभूत होणार नाही, याची खात्री त्याला असते. कणखर आणि स्वप्नाळू हशपपीचे हे शिक्षण, तिचे आईबाबतचे आणि जंगलातल्या राक्षसी प्राण्यांबाबतचे काल्पनिक विश्व येथे एकत्र मिसळण्यात आले आहे. त्यामुळे रोजच्या जगण्याच्या लढाईचे बाथटबमधील असंख्य घटनांनी भरलेले आयुष्य ती कथा नसूनही हेलावून टाकणारे नाटय़ बनले आहे.
जागतिक तापमानवाढ, शहरीकरणामुळे निसर्गाच्या केलेल्या छळाचे परिणाम, प्रगती-विकास यांची उलटी बाजू दाखविताना हे संयतनाटय़ नकारात्मक भूमिका घेत नाही. उलट कुठल्याही परिस्थितीत उभे राहण्याच्या माणसातील अंतर्गत ऊर्मीचे स्वरूप हशपपीच्या वाटेने उलगडून दाखविते. त्यामुळे दिसणाऱ्या कुठल्याच गोष्टी सुखभरल्या नसल्या तरी प्रेक्षकाच्या सकारात्मक जाणीवा छेडण्यात चित्रपट यशस्वी होतो. कलात्मक आणि व्यावसायिक या दोन्ही प्रकारातील चित्रपटांसाठी विशेष अभिनय निपुण कलावंतांची (कित्येकदा प्रेक्षकांच्या ओळखीची) फळी प्रचंड मेहनतीने राबून चित्रपटाला दिशा देण्याचे काम करीत असते. इथे चित्रपट माध्यमाचा कुठलाही परिचय नसलेल्या व्यक्तींनी ते घडविले आहे, म्हणून त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
कलात्मक आणि व्यावसायिक सिनेमामधील सीमारेषा गेल्या काही वर्षांमध्ये धूसर होत चालली आहे. तद्दन व्यावसायिक चित्रपटामध्येही कलात्मक बाबींचा अंतर्भाव दिसतो, तर कलेच्या फुलबाज्या तेवत ठेवणाऱ्या चित्रपटांनाही व्यावसायिक पातळीवर अधिक पल्ला गाठण्याची ओढ लागलेली दिसते. या मिश्रणातून संयतनाटय़ पडद्यावर मांडणारी कुशल निर्मिती सर्वच आघाडय़ांवर यशस्वी होत असल्याचे दिसते. ‘बीस्ट्स ऑफ द सदर्न वाइल्ड’ त्याचे अगदीच ताजे उदाहरण आहे.    (समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2012 3:40 am

Web Title: sober drama
Next Stories
1 फ्रेंच कनेक्शन!
2 माइण्ड गेम्स!
3 ‘मॅड’पट!
Just Now!
X