कौस्तुभ केळकर- नगरवाला

 

जिगरी मतर सदाभौ यांसी,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

टपालकीच्या मुळावर घाव घालून ऱ्हायलाय की तुमी सदाभौ. लिवावं की न्हाई लिवावं, सवाल आमच्या माईंडमंदी राहून राहून येऊन ऱ्हायलाय गडय़ाहो..

माईंड ईट सदाभौ.. आमी तुमाला ल्येटर लिवनारच आन् तुमी बी लागलीच त्येचा जवाब धाडनार मंजी धाडनारच. उलटटपाली. आपलीतुपली टपालकी चालू ऱ्हानारच. आवं, तुम्चं ल्येटर आलं की आम्च्या मनाच्या कानामंदी पंकजबापू गानं गाया लागत्यात..

‘चिट्टी आई है, चिट्टी आई हे..’

मनाची उदासी येकदम गायब हुती बगा. तुमी सौताच्या अक्षरात लिवलेलं ल्येटर. येक-येक अक्षर जित्तं वाटतं बगा त्येतलं. दोस्तीच्या प्रिमाचा सुगंद घेवून येतू परत्येक शबुद. आपलेपनाचा वोलावा जपनारी ल्येटरची शाई कंदीच सुकनार न्हाई सदाभौ.

त्ये दोस्तीवाल्या पिक्चरमंदी दावतात बगा.. हीरो आपल्या जिगरी दोस्ताला ल्येटर लिवतो. दोस्त त्ये वाचत आसताना अक्षरान्च्या पिछाडीला हीरो सौता बोलतू. सदाभौ, तुम्च्या परत्येक ल्येटरमंदी तुमी सौता या दादासायेबाशी बोलून ऱ्हायलाय. येकदम लाईव्ह टेलीकाश्ट. व्हिडीओ कालिंगला बी जमनार न्हाई अशी जादू हाई टपालकीच्या अक्षरामंदी.

तुम्च्या ई-मेल, कायाप्पावालं म्येसेज मुर्दाड आसत्यात. कोरडय़ा अक्षरान्चं वझं पेलवत न्हाई त्येस्नी. फूनची बातच और हाई. कामाबिगर बोलनं फूनला जमत न्हाई आजकाल. कसा हाईसा.. आसं ईचारा. सामनेवाला ईचारतोच- काय काम हाई? फूनवरच्या खुशालीला सेल्फीशपनाचा डावूट येऊन ऱ्हायलाय. त्यापरीस टपालकीच ब्येश्ट. खुशाली कळती. चांगल्याचं कवतीक करायचं. वंगाळ वागलं तर कान उपटायचं. येकदम ब्येझिझक.

आपलं मानूस टपालकीतच भेटून ऱ्हायतंय.

आम्च्या गावाकडची पंदरा-ईस पोरं नगरला कालेजात हाईत. हाश्टेलमंदी वस्तीला. गावाकडची मुक्कामाची यष्टी सक्काळी धा वाजता नगरला पोचती.. टपावर पोरान्साटी जेवनाचं डबं घेवून. समदी पोरं धा वाजता नगरच्या यष्टी स्टॅन्डावर हाजीर! येकदम खूश. गावाकडच्या मातीचा वास आसतु यष्टीच्या चाकान्ला. जेवनाच्या डब्यातला पयला घास प्वोटात ग्येला की त्येन्ला आये भ्येटते तेन्ची. मायेचं वझं होत न्हाई यष्टीला. बायोलाजी आमाला जादा ठावं न्हाई. तरीबी तुमास्नी सांगतूया- आपल्या हार्टला बी प्वाट आसतंय सदाभौ. मायेनं, पिरमानं े प्वाट भरलं की आनंदाची ढेकर येती. तुम्चं ल्येटर आम्च्यासाटी या जेवनाच्या डब्यावानी हाये. ल्येटर गावलं की हार्टचं प्वाट गच्च भरून जातं. दिल का दिल से रिश्ता जपून ऱ्हायलाय जनू टपालकीचा शिलशिला.

तवा सदाभौ, लिखते रहो..

तुम्चं परत्येक ल्येटर आमी जिवापाड जपलं हाई. पुडंमागं कुनाच्या हाती गावलं तर येकदम फ्येमश हुनार त्ये समदं. माज्या-तुम्च्या जुळती तारा, मधुर सुरांच्या बरसती धारा. दोन दोस्त कंच्या बी अपेक्शेबिगर येकमेकांची सुकदुक्कं वाटून घेत्यात. परत्यक्ष भेट न्हाई जाली तरी बी ल्येटरमंदी गळाभेट घेत्यात. अशी टपालकी समद्यास्नीच भावनार गडय़ाहो.

नमनाला घडाभर त्येल ग्येलं या टायमाला सदाभौ. चालतंय की!

तुमी फस्सक्लास हाये म्हना की.

समादान, क्लास आपुन ठरवू तसा.

फस्सक्लास न्हाई तर श्येकन्ड क्लास.

रेल्वेमंदी बी थर्ड क्लास नसतुया आजकाल. तुमी पास जाला े ईशेष. गावाकडं पािशग क्लासचं वान्दे. आमी आपलं काठावर पास. तरीबी आमी सुखी हावोत. आवं, बळीराजा येटिंग रूममंदी मान्सून एक्श्प्रेशची वाट बघून ऱ्हायलाय. जिवाची नुस्ती काहिली होतीया. तगमग तगमग. गाडी जरा ल्येट जाली. पर आली ती येकदम सुसाट. जिमिनीवर ढगान्च्या टाकीचा रंपाट शावर. वावरात चिक्कल. रोपं तरारून वर आली हाईती. पावसाच्या धारामंदी घामाच्या धारा मिसळून गेल्याती.

रान हिरवंगार. श्रावनाची चाहूल.

राबनाऱ्या हातान्ला फकस्त ‘आज’ ठावं असतो सदाभौ. उद्याच्याला बाजार समितीत चांगला भाव गावंल की न्हाई याची फिकीर करायची न्हाई. कितीबी भाव मिळून ऱ्हायला तरीबी बळीराजाचं कष्ट चुकनार न्हाईत. आजचा दिस कष्टाच्या मस्तीत जगायचा. रातच्याला शून्य मिल्टात समाधानाची झोप लागती. आमाला बिनघोर झोप लागती म्हनूनशान आमी सुखी हाये. उद्याकडनं फार आपेक्शा न्हाईत आमास्नी. आम्च्या फकस्त सौताच्या सौताकडनंच आपेक्शा हाईत. थोडा है, थोडे की जरूरत है. जिंदगीच्या एक्झाममंदी आमास्नी धो-धो मार्काची आपेक्शा न्हाई, पर काठावर पास व्हायलाच पायजेल.

सदाभौ, आम्ची थोडी जिमीन उतरंडीला हाई. समर सीझनला तिथं चर खनल्यात. सरकारनं सबशिडी दिली म्हनूनशान श्येततळं ऊबारलंया. आता पर्जन्यदेवाचं दान भरभरून पडाया पायजेल. श्येततळं पान्यानं काटोकाट भराया पायजेल. जिमिनीत मस पानी मुरलं की रानातल्या हिरीला पाझर फुटंल. सालभराची ददात मिटंल. न्हाईतर समदं मुसळ क्येरात. धो-धो न्हाई पडला तरी बी चालंल, खरीप निभावून नेईल येवढा पाऊस तरी धाड द्य्ोवा. बळीराजाच्या डोळ्यामंदी पानी नगं या साली. काठावर पास जालं आन् पुडच्या वर्गात ढकललं गेलं की गंगेत घोडं न्हालं. े वरीस निभावलं की आमी सुखी. आम्चं प्रोमोशनच. पाऊस रुसला की बळी मागतूया. कावलेला, थकलेला, हरलेला बळीराजा सौताचाच बळी देतुया. मंग येकदम सोर्गात प्रोमोशन. ईस्वेस्वरा, झालं-ग्येलं ईसरून जा. या साली कुनाला बी वरचं प्रोमाशन देऊ नगंस. समद्यास्नी जगाया बळ दे. प्वाटभर अन्न दे. समद्यास्नी पास कर. काठावरबी चालंल.

गावाकडं बाकी समदं काठावर पास हाय. रस्तं न्हाईतच. त्ये खराब हुन्याचा सवालच न्हाई. शीतभर पाऊस आन् ढीगभर चिक्कल. रस्ता न्हवं पानंदीतून जाऊन ऱ्हायलंय जनू. फटफटीची चाकं आधी चिकलात रुतत्यात. मान्सं तोंडघाशी पडत्यात. पांढऱ्या कापडावर चिक्कलाचं मस डाग पडत्यात. दाग अच्छे होते है ना? आमी त्येच्यामंदीबी सुख शोधून ऱ्हायलोय गडय़ाहो.

चिक्कल नसता तर रापचिक आपटलू आसतू. हाड ब्रिक झालं तर मानूस जायबंदी. इस्वेस्वराची किरपा. रस्ते न्हाईत म्हनूनशान चिक्कल. चिक्कल न्हवं, मक्खनच जनू. कितींदाबी चिक्कलामंदी घसरा, जिवाला घोर न्हाई.

जिमीन नांगरट करून रेड्डी हाई, तरी कुटं कुटं पाऊस आजूनबी बेपत्ता हाई. कुटं आबाळ फाटल्यागत कोसळतुया आन् उभ्या पिकास्नी आडवा करून जातुया. उद्याच्याला पीक तरारून वर आलं तर त्ये कापनीनंतर मार्केटमंदी जाईल. पन तिथंबी मार्केटमंदी भाव पडत्यात. समदी गनितं चुकून जात्यात. बळीराजाहाती येत्ये ती फकस्त वजाबाकी. बाकी- शून्य. मुद्दलबी सुटत न्हाई. बळीराजा कसाबसा काठावर पास हुतू. तरीबी त्यो हार मानत न्हाई. नव्या जोमानं, नव्या दमानं रानात जातू. फस्सक्लास उद्याकडं डोळं लावून नव्यानं सुरवात करतु.

सदाभौ, जिंदगीभर आमी काठावर पास झालू. कोई गम नही. शिकवा बी न्हाई. पर आम्च्या पोरान्च्या नशिबी फस्सक्लास पायजेल म्हंजी पायजेलच. गावाकडं शिक्षनाची वाट लई बिकट हाई. गावच्या शाळा दहावीपत्तुरच. पुडं बारावीला कालीजात जायाचं तर जावा तालुक्याला. डिग्रीसाटी जिल्ल्याच्या गावाला. गावाकडंबी टॅलेन्ट हाई. आम्ची पोरंबी डाक्टरीची एन्ट्रन्स देऊन ऱ्हायत्येत. यूपीएश्शी, एमपीएश्शीची तयारी करून ऱ्हायत्येत. पोलीसभरती, सन्यभरतीसाटी तयारी करून ऱ्हायत्येत. समद्याचं ट्रेनिंग देन्याची सोय गावाकडं व्हायला पायजेल. तुमास्नी सांगतू सदाभौ, नगरला महानगरपालिकेचं सौताचं स्पर्धापरीक्षा प्रशिक्षन केन्द्र हाई. लई अधिकारी तयार झालं तिथं. तशी सोय परत्येक तालुक्याच्या गावी झाली तर खिशाला बसनारा चटका कमी हुईल.

सदाभौ, तुमी त्यो नवीन पिक्चर बगीतला की न्हाई? ‘सुपर ३०’! डिट्टो तसा येक अक्षय परत्येक गावाला धाडा. मंग आमी सुपरनेशन हुनारच. गावचं आरोग्यबी सुदरंना सदाभौ. गावात सरकारी हास्पिटलात मुक्कामी डागदर हमेशा हवा. एक्स-रे मशीन, सोनोग्राफी, आपरेशन थेटर समद्या फॅशिलिटी नं. १ कंडिशनमंदी पायजेल. शिरियस पेशंट मोटय़ा हास्पिटलात धाडत्यात आन् कित्यांदा त्यो वाटेतच दम तोडतू. एक साल गावाकडं इन्ट्रन्शिप परत्येक शिकाऊ डागदरनं दिलसे कराया हवी. १०८ सारकी सोय बेशच हाई. तरीबी आजून लई पल्ला गाटायचा हाई.

शिक्षन, आरोग्य, शेती समद्या फिल्डमंदी आमी आजून काठावरच पास हावोत. फस्सक्लास पायजेल आसल तर समद्यांनी आभ्यास कराया हवा सदाभौ. पब्लिक आन् सरकार दोगंबी टॅलेन्टेड हाईती. टॅलेन्टला प्रामानिकपनाची आन् मेहनतीची जोड गावली की जालं. माज्या देसाला सुपरनेशन व्हायचंय. मंग आमी काठावर पास होवून कसं भागनार?

ठरलं तर मंग.. साथी हात बढाना. पुडच्या साली फस्सक्लास. इस्वेस्वराची किरपा आसू दे. आमीबी कुटं कमी पडनार न्हाई. या साली रिझल्ट दे दनादन. बेश्ट लक सदाभौ.

येक ऱ्हायलंच..

बाकी समदीकडं काठावर पास आसलं तरी आभाळामंदी आपून फस्सक्लास काडतू हमेशा. परवाच्याला चंद्रावर स्वारी करून आलो की राव. इस्रो है तो सब कुछ पॉशिबल है. वैनीसायेबास्नी तुमी काय चांद-तारे तोड लावूवाला वायदा केला आसंल तर त्यो पुरा करून टाका. आभाळातला चंद्र आता आपल्या हातात हाई. भारताचा चंद्र.

माजा देस असाच इस्वाच्या आभाळात चंद्र-सूर्यावानी चमकत ऱ्हावू दे द्य्ोवा..

मेरा भारत महान..

तुम्चा जिवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गांवकर

kaukenagarwala@gmail.com