13 November 2019

News Flash

शिकवणे म्हणजे शिकणे

‘मीमराठी विषय शिकवतो’ असे म्हणण्याऐवजी ‘मी मातृभाषेचे अध्यापन करतो’ असे म्हटले की एकदम आपण उदात्त, उन्नत असे जे जे काही असते ते करतो आहोत असे

| September 8, 2013 12:08 pm

‘मीमराठी विषय शिकवतो’ असे म्हणण्याऐवजी ‘मी मातृभाषेचे अध्यापन करतो’ असे म्हटले की एकदम आपण उदात्त, उन्नत असे जे जे काही असते ते करतो आहोत असे वाटते. इतर विषयांना प्रवेश मिळत असतानाही मी एम. ए. होण्यासाठी मराठीची निवड का केली, हे सांगण्यासाठी अनेकजण बराच वेळ खर्ची घालतात. अहमहमिका की काय म्हणतात ती लागते. (काय शब्द आहे हो हा! सहजपणे किंवा वेगाने उच्चारताही येत नाही. बोलण्याआधी दोन वेळा तो मनोमन घोळवावा लागतो, तेव्हा कुठे यशस्वी उच्चारण होते.) बरे, या शब्दाचा संबंध विद्वत्तेशी, भाषिक कौशल्याशी कोणी जोडला कुणास ठाऊक. पण अहमहमिका, अव्याहतपणे, संदर्भ, विचारपरिप्लुत, साकल्य, अभिव्यक्ती हे शब्द वापरावेच लागतात. मग शिकविण्याचा विषय कोणताही असो. भाषेवरचे प्रभुत्व (?) अकरावीच्या किंवा बी. ए. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यामध्ये शिक्षकांना कोणता आनंद मिळतो, कुणास ठाऊक! अवघड शैली, संस्कृतप्रचुर शब्द, संदर्भाचा सोस म्हणजे उत्तम शिक्षण असा काहीसा गैरसमज यामागे असावा. शिकविण्याचा विषय, विद्यार्थ्यांचे  शारीरिक आणि मानसिक वय, त्यांची यावर्षीची गरज यांच्याशी शिक्षक अध्यापनाला जोडून घेतो की नाही, आणि ताडून पाहतो की नाही, याचा विचार झाला पाहिजे.
मी एम. ए. होतो तेव्हा मला ‘वाङ्मय पारंगत’ अशी पदवी मिळते. माझे ‘पारंगत’ होणे म्हणजे दोन वर्षांत आठ पेपरपैकी निम्म्या पुस्तकांचा अभ्यास करून पन्नास टक्के गुण मिळविणे, असे असते. अंदाजे चाळीसेक पुस्तकांमध्ये सामावलेले वाङ्मय मी वाचतो, अभ्यासतो आणि पारंगत होतो. नंतर मी पीएच. डी. पदवी मिळवतो. त्यासाठी संशोधन करतो. जेव्हा अशा विद्यार्थ्यांना प्राध्यापकाची नोकरी मिळते, तेव्हा त्यांच्यामध्ये पहिला बदल हा घडतो, की त्यांचे हसणे बंद होते. चेहऱ्यावर गांभीर्याचा तणाव येतो. कोणी विनोद केला तर ते माफक हसतात. ते झपाझप चालत नाहीत. वर्गावर जाताना धीरगंभीरपणे पावले टाकत जातात. दोन-तीन जाडजूड पुस्तके उजव्या हातात धरून छातीशी कवटाळून चालतात. प्राध्यापक महोदय कृश आणि किरकोळ प्रकृतीचे असतील तर हातातील ज्ञानाच्या ओझ्यामुळे किंचित पुढे झुकून चालतात. लवकरात लवकर चष्मा लागावा अशी इच्छा ते बाळगतात. चष्म्याची फ्रेम सोनेरी काडय़ांचीच ठेवायची असेही ते ठरवून टाकतात. एवढा सगळा जामानिमा केला; पण शिकविण्याचे काय? शिकवताना डोळे समोरच्या भिंतीवर खिळलेले किंवा खिडकीबाहेर.. विद्यार्थ्यांच्या नजरेला नजर न भिडविण्यामागे संकोची स्वभाव नसतो, तर आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि गृहपाठ न झाल्याची जाणीव असते. मग विस्मरणशक्ती वाढते आणि शस्त्रविहीन झालेले सर वर्गाला आदेश देतात- ‘लिहून घ्या.’
‘भाषेवरचे प्रभुत्व’ या विषयासंबंधी मला खदखदा हसविले ते बालकवींच्या ‘श्रावणमास’ या कवितेने. पाठय़पुस्तकांमध्ये ही कविता चौथ्या वर्गाच्या पुस्तकातही असते, दहावीच्या पुस्तकातही असते, बी. ए. भाग-२ च्या पुस्तकातही असते आणि एम. ए.च्या ‘बालकवी समग्र’ या पुस्तकातही असते. ही कविता सुंदर आहे, पण साधी नाही, असे खूपदा वाचल्यानंतर लक्षात आले. माझ्या मनात प्रश्न आला तो वेगळाच. मी चौथीच्या आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ही कविता शिकवू शकेन का? ‘ते’ भाषिक कौशल्य माझ्याजवळ आहे का? नसेल तर मी ‘पारंगत’ कसा? ‘भाषाप्रभू’ आणि ‘शब्दप्रभू’ हे शब्द तेव्हापासून चमत्कारिकच वाटायला लागले.
माझा सुनील देशपांडे नावाचा मित्र गणित, विज्ञान यांचे वर्ग दहावीसाठी घेतो. तो म्हणाला की, ‘गणितामध्ये ९८ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये इंग्रजीपेक्षाही कमी गुण मिळतात. तुम्ही त्यांना शिकवाल का?’ मी उत्साहाने ‘हो’ म्हणालो. (‘मातृभाषेची सेवा’ हा उदात्त विचार!) तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव असायचे. मी जे काही त्यांना सांगतो आहे, त्यापेक्षा वेगळे काहीतरी त्यांच्या मॅडमनी वर्गात शिकवलेले असायचे आणि तसेच त्यांच्याजवळच्या ‘गुरुकिल्ली’ नावाच्या विद्यार्थिप्रिय पुस्तकामध्ये असायचे. विद्यार्थी वर्गात रमायचे, एवढेच! त्या वर्षी माझी मुलगीही दहावीला होती. तीही माझ्या वर्गात यायची. जेव्हा निकाल लागला तेव्हा सर्व विषयांतील मार्कापेक्षा तिला मराठीत सगळ्यात कमी मार्क होते. दोन-तीन वर्षे मी हा प्रयोग केला. मग मित्रानेही आग्रह केला नाही आणि मीही हळूच अंग काढून घेतले.
कारणे इतरही असतील; पण मला माझी शिकविण्याची पद्धत केवळ सोपी नाही, तर विषयानुरूप आणि त्यांच्या वयानुरूप वाकवता आली नाही, हेही एक मुख्य कारण होतेच. विचार करायला लागलो की चांगली भाषा, योग्य भाषा, श्रेष्ठ भाषा, अनुरूप भाषा- कोणती? मला येते ती, की मी ज्यांच्याशी बोलतो त्यांना समजते ती?
‘श्रावणमास’ या कवितेचीच स्वत:चे कान स्वत:च पकडावे अशी एक आठवण आहे. दोन-चार वर्षे ती कविता- ‘फुलराणी’ हे पुस्तक- शिकवत होतो. तल्लीन व आनंदरूप होऊन आणि विद्यार्थ्यांना करून! त्या कवितेचे खरेखुरे सौंदर्य फक्त दोघांनाच कळले, या भ्रमात होतो. एक म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि दुसरा मी. पण एका वर्षी अचानकच असे वाटले की, मीच माझी चोरी पकडली. मग मात्र मी ओशाळलो. या कवितेच्या शेवटल्या काही ओळींच्या कडव्यांतील पहिल्या ओळीत ‘पुरोपकंठी’ हा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ लागेना. शिकवण्याच्या नादात विद्यार्थ्यांना तो सांगण्याचे राहून गेले की मी हेतूपूर्वक टाळले? माझे अज्ञान लपवले? एकीकडे मीच शिक्षक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगणार, की वर्गात जाण्याच्या तीन दिवस आधी आपण जो धडा शिकवणार असू त्याची सर्व पाने शब्दश: वाचा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे की नाही, हे पहा. नाहीतर वर्गात एखाद्या विद्यार्थ्यांने ‘सर, एकसमयावच्छेदेकरून म्हणजे काय?’ असे विचारले आणि तुम्हाला सांगता नाही आले, तर फजिती व्हायला नको.
मग ‘पुरोपकंठी’ म्हणजे काय? त्यासाठी मराठी-मराठी शब्दकोश, मराठी-हिंदी शब्दकोश, मराठी-इंग्रजी शब्दकोश, संस्कृत-मराठी शब्दकोश असे धुंडाळणे सुरू केले. आणि एखाद्या शब्दाचा वा संदर्भाचा शोध घेण्याचा नाद आणि ध्यास ज्यांना आहे अशा डॉ. विमल भालेराव यांच्याकडे पदर पसरला तेव्हा कुठे ‘पुरोपकंठी’साठी प्रतिशब्द सापडला नाही, पण त्याचा अर्थ लागला. (तो काय, ते सांगत नाही. कारण जिज्ञासूंनाही माझ्याइतकेच कष्ट पडावेत अशी सुप्त आणि दुष्ट इच्छा माझ्या मनात आहे.) असो. पण आपण शिक्षक म्हणून जबाबदारीने वागलो नाही, निष्काळजीपणा केला अशी खंत अनेक दिवस जाणवत  राहिली.
असा प्रकार आणखीही एकदा घडला. पण तो लवकर निस्तरला. तो सामान्यज्ञानाशी संबंधित होता. पण जरुरी होता शिक्षकासाठी! कविता मर्ढेकरांची होती आणि ओळ अशी होती.. ‘असेच होते गांधीजी अन् असेच होते टैकोब्राही.’ बरे, विद्यार्थी प्रश्न किंवा शंका विचारतील अशी सुतराम शक्यता नव्हती. कारण एम. ए.च्या वर्गात शिकवणारा मराठीचा  प्राध्यापक म्हणजे आपला उद्धार करावयास परमेश्वराने पाठवलेला अवतारी पुरुष आहे अशी त्यांची खात्री असते. विद्यार्थिनींचे चेहरे जनाबाई, मुक्ताबाई यांच्यासारखे आणि विद्यार्थ्यांचे चेहरे तुकोबा-नामदेव यांच्यासारखे ‘हर्षखेद ते मावळले’ या अवस्थेला पोचल्यासारखे.
मी समजत होतो की, ‘टैकोब्राही’ याचा अर्थ टैकोब्रासुद्धा. ‘ही’ हे अक्षर (संग्रहवाचक) शब्दयोगी अव्यय आहे असेच समजत होतो. पण विश्वकोश पाहिल्यावर कळले की, ‘टैकोब्राही’ असेच त्या खगोलशास्त्रज्ञाचे नाव आहे. दोन वर्षे निष्काळजीपणा केला तो ‘शिक्षक’ या पदाला शोभणारा नव्हता. (शिक्षकी ‘पेशाला’ शोभतो का हो?)
तसे समाधान करून घ्यायचे तर ‘वाईटापेक्षा कमी वाईट चांगले’ असा निकषही लावता येतो. माझा एक मित्र मराठीचा प्राध्यापक आहे. आता निवृत्तीला आलाय. शरद त्याचे  नाव. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. शरद म्हणाला, ‘नारायणराव, तुमच्याजवळचे एक पुस्तक पाहिजे. असेल तर पहा.’
‘कोणतं?’ मी म्हणालो.
‘त्याचं काय आहे पहा. माझी मिसेस म्हणाली की मीसुद्धा मराठीत एम. ए. करते म्हणून. तर फॉर्म भरला आम्ही. एक कादंबरीचा पेपर आहे. त्यात साताठ कादंबऱ्या आहेत. चार-पाच भेटल्या. बाकीच्या भेटेनात. तुमच्याकडे..’
मी त्याला टोकत म्हणालो, ‘तुला कोणती कादंबरी पाहिजे? तिचं नाव?’
शरद विचारात पडून म्हणाला, ‘नाव तर आता नक्की आठवून नाही राहय़लं. पण कोण्यातरी वकिलानं ती कादंबरी लिहिली आहे.. हां, आठवलं पाहा.. लेखकाचं नाव आहे- बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर.’
मी मख्खपणे म्हणालो, ‘आणि कादंबरीचं नाव आहे- भाऊ पाध्ये.’ शरद आनंदाने ओरडला, ‘करेक्ट. बरोब्बर. आहे का तुमच्याजवळ?’ मी शांतपणे म्हणालो, ‘पुस्तक माझ्याजवळ नाही. पण शरद, एक सांगतो- तू बायकोला मार्गदर्शन नको करूस. ती एम. ए. होणार नाही कधीच..’
आपल्याला झटपट सगळे प्राप्त व्हावेसे वाटते. तेही कमी कष्टांत किंवा विनाकष्ट. हल्ली शहाणपणापेक्षा चातुर्याला महत्त्व आले आहे. ‘आधुनिक मराठी कविता’ या पेपरसाठी केशवसुत, मर्ढेकर, सुर्वे या तीन नावांनंतर अशा एका कवीचे नाव आणि संग्रहाचे नाव पाहायला मिळते, की ज्याला फक्त निवड समितीचे सदस्यच ओळखत असावेत. यापूर्वी ‘लॉबी’, ‘फिल्डिंग’ असे शब्द राजकारण किंवा उद्योग अशा क्षेत्रांत चलनात होते. आता ते शैक्षणिक क्षेत्रातही आले आहेत. असे म्हणतात, की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मंत्रिमंडळाची मांडणी आणि खातेवाटप व्हायचे असते तेव्हा देशभरातील उद्योगपती दिल्लीत जमा होतात. अर्थमंत्री, उद्योगमंत्री कोण होतो, कोण व्हावा, यासाठी ते कार्यरत असतात म्हणे. अलीकडे विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमामध्ये कोणती पुस्तके लागावीत, यासाठी प्रकाशक सक्रिय असतात. उद्योगपतींना आणि प्रकाशकांना कोणी म्हणत नाही, की ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?’ आपणच आपले अंगण त्यांना ‘लीज’वर दिले आहे. शिक्षक आपली परंपरा महान आणि प्राचीन असल्याचे सांगतात. म्हणूनच स्वत्व जपायचे की गहाण टाकायचे, हेही त्यांनीच ठरवायचे आहे.

First Published on September 8, 2013 12:08 pm

Web Title: teaching means learning