आपली वस्तू कुणी हिरावून घेऊ  नये म्हणून माणूस नेहमीच धडपडतो. या धडपडीचे मूर्तरूप म्हणजे कुलूप! ख्रिस्तपूर्व २५०० ते ६०५ या काळात अस्तित्वात असलेल्या असिरिया संस्कृतीतील ‘निनेवेह’मध्ये कुलपाचे lok03सर्वात प्राचीन असे अवशेष सापडले आहेत. सध्या इराण व इराक असलेल्या ठिकाणी ही राजवट होती. याच पद्धतीची लाकडी कुलपे आणि किल्ल्या पुढे इजिप्तमध्येही विकसित झालेली दिसतात.
इजिप्तमध्ये विकसित झालेल्या लाकडी छोटी खिट्टय़ा असलेल्या कुलपाची रचना अगदी साधी होती. किल्ली आत सरकवली की कुलपातील कोयंडय़ात असलेल्या भोकांमधील खिट्टय़ा सरकून कोयंडा सरकवता येत असे. किल्ली काढली की खिट्टय़ा परत जागेवर बसून कोयंडा अडकवत असत.
धातूचे कुलूप सन ८७०-९०० च्या दरम्यान अस्तित्वात आले असे मानले जाते. मात्र १८ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर अधिकाधिक दर्जेदार आणि गुंतागुंतीची रचना असलेली कुलपे आणि किल्ल्या तयार होऊ  लागल्या. कारण निर्मितीची प्रक्रिया अधिक अचूक आणि standardisation असलेली होत गेली. १७७८ मध्ये रॉबर्ट बरोनने तरफा असलेले कुलूप तयार केले. हे तंत्रज्ञान आजही वापरले जाते. यात विशिष्ट आकाराच्या तरफा/ पट्टय़ा ठरावीक अंतराने उचलून कोयंडा सरकवण्याची क्लृप्ती वापरली होती. दाराला असलेला कडी-कोयंडा हीच मूळ ठेवण समोर ठेवून कुलपे तयार होऊ  लागली.. तंत्रज्ञान फक्त ती हालचाल बंदिस्त आणि सगळ्यांना उपलब्ध न ठेवता फक्त किल्लीच्या मालकालाच कशी करता येईल या दिशेने काम करत होते.आधुनिक कुलपाची यंत्रणा
वरील चित्रात कुलपाची यंत्रणा कशी असते हे दिसते. कुलपाच्या आतमध्ये विशिष्ट आकार कोरलेल्या पट्टय़ा/ तरफा असतात. हे कोरलेले आकार असमान असतात. याची रचना करताना पट्टय़ा ठरावीक उंचीने उचलल्या गेल्या की हे सर्व आकार मिळून एक रस्ता तयार करतात. त्या रस्त्याने कुलपातील कोयंडय़ाला असलेली खिट्टी पुढे अथवा मागे सरकवली जाते. या तरफा/ पट्टय़ा ठरावीक उंचीने उचलण्याचे काम किल्लीवर असलेल्या खाचा करतात. आपण किल्ली फिरवली की ती कुलपातील तरफा उचलत जाते आणि ज्या क्षणाला सर्व तरफा पूर्वनिर्धारित स्थितीला उचलल्या जातात, त्या क्षणाला कोयंडा खिट्टीसकट सरकण्याचा मार्ग lr21 lr20 lr18मोकळा होतो. किल्लीवरीलच एक उंचवटा कोयंडा मागे सरकवतो आणि कुलूप उघडते. कुलूप बंद करतानाही हीच प्रक्रिया होत असते. पण यावेळी कोयंडा पुढे ढकलला जातो आणि कुलूप बंद होते. हे प्रत्येक कुलपाला एकच किल्ली लागण्याचे तंत्र जेरेमिया चब याने १८१८ मध्ये शोधून काढले.
तो एक किस्साच आहे. पोर्टमाऊथ बंदरात झालेल्या एका चोरीमुळे ब्रिटिश सरकारने फक्त एकाच किल्लीने उघडणारे कुलूप तयार करण्याची स्पर्धा जाहीर केली.चबने त्यात भाग घेतला आणि कुलूप उघडण्याचे अनधिकृत प्रयत्न हाणून पाडणारे आणि असे चाळे केल्याचे मालकाला समजण्याची सोय असलेले चब डिटेक्टर कुलूप तयार केले. तीन महिने अथक प्रयत्न करूनही प्रशिक्षित चोरही हे कुलूप उघडू शकले नाहीत आणि चबने १०० पौंडाचे बक्षीस जिंकले.
पुढे ब्रामा, चब आणि येल या तंत्रज्ञांनी यात अनेक सुधारणा करत असतानाच त्यांचे व्यावसायिक उत्पादनही सुरू केले. यातील येलनी कुलपाचा आकार बदलून तो गोलाकार करतानाच त्याच्या किल्लीमध्येही बदल केले. ती चपटी करून तिच्या लांब कडांवर खाचे पडले आणि कुलपातल्या  पट्टय़ांच्या जागी पिना आणि स्प्रिंग आणून त्याचा आकार लहानही केला. याच पद्धतीची कुलपे आज आपण वापरत आहोत.
जग जसजसे अधिक हायटेक होत होते, तसतशी कुलपांची संकल्पनाही बदलत होती. यांत्रिक बदलांमध्ये मुख्यत: किल्लीला पर्याय येत गेले. त्यात मग आकडे जुळवून कुलपे नियंत्रित होणे, मोठमोठय़ा तिजोऱ्या अधिक सुरक्षित करण्यासाठी त्याला चक्र आणि आकडे असे दोन नियंत्रक बसवणे अशासारखे अनेक पर्याय उपलब्ध होत गेले. साध्या एक खटका असलेल्या सायकलच्या कुलपापासून ते दोन किल्ल्या लावूनच उघडणे शक्य असलेल्या अतिसुरक्षित कुलपापर्यंत होत गेलेली तांत्रिक प्रगती आपल्यासमोर आहे.
आज अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या विद्युत चुंबकीय (electro magnetic) कुलपांनी कुलपांचे स्वरूपच आमूलाग्र बदलले. त्यातील यांत्रिक भाग जाऊन त्याची जागा चुंबकीय बलाने घेतली. किल्लीच्या जागी बटणे आणि गुप्त नंबर असलेल्या विद्युत चुंबकीय पट्टय़ा आल्या. अंगठा किंवा चेहरा/ डोळ्याच्या रेखांनी बनलेले विजाणूचित्र (Electronic picture) आता किल्ली बनून कुलपाची कळ उघडू लागले आहे.
त्यामुळे किल्ली सांभाळण्याऐवजी आता अंगठा जपावा लागतो!  

-दीपक देवधर

Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?