News Flash

चवीचवीने… : सुगरण आत्या

काही काही पदार्थ मात्र चौघींनी मिळून एकेकीला बहाल करून टाकले होते.

घावन

|| भूषण कोरगांवकर

लहानपणी शाळेला लागणाऱ्या प्रदीर्घ सुट्ट्यांचं मला तीनच गोष्टींसाठीआकर्षण असायचं- वाचन, नातेवाईकांकडे राहायला जाणं आणि त्यांनी बनवलेल्या अनेकविध पदार्थांवर ताव मारणं. आमचा कुटुंबकबिला फार मोठा. आईची नऊ भावंडं आणि बाबांची सहा सख्खी आणि सख्ख्याइतकीच जवळची सात मामे-भावंडं. त्यामुळे भरपूर पर्याय आणि व्हरायटी. कुडाळच्या मामीच्या हातचे मोदक, रजनीकाकीची साबुदाण्याची खिचडी, दादरची आजी, लीलाकाकी आणि बेबीआतेच्या हातची आंबट-तिखट माशाची आमटी, पाटकरकाकांचं मटण, कुंदाआतेचा कोलंबीभात, शैलामावशीची कैरीची भाजी, चंदामावशीच्या हातचं जिऱ्याचं वरण, सतीशकाकांचं श्रीखंड, स्मितामामीचे नाश्त्याचे नवनवीन पदार्थ आणि कमलकाकी बनवत असलेले तमाम गुजराती पदार्थ हे माझ्या विलक्षण आवडीचे होते. पण माझा जास्तीत जास्त मुक्काम दोनच घरी असायचा : अनुआते आणि लिलुआते. त्यांच्याकडे प्रत्येकच पदार्थ अफाट चवीचा बनायचा. मुळात माझ्या चारही सख्ख्या आत्या एक से बढकर एक सुगरणी. थोरली फळी म्हणजे वेंगुल्र्याची केशरआते आणि गोव्याची पुष्पाआते आणि धाकली फळी म्हणजे मुंबईच्या  लिलुआते आणि अनुआते.

वेगवेगळ्या प्रकारचे लाडू ही चौघींचीही खासियत. ताज्या डाळीचे, डाळव्याचे, मुगाचे सालासकट आणि साल काढून, नाचणीचे, तांदळाचे, गव्हाचे, सातूचे, पोह्यांचे, कुरमुऱ्याचे… आणि नेहमीचे रवा, बेसन, राघवदास हे तर होतेच. चौघींमध्येही ‘कधी छुपी, कधी उघड’ स्पर्धासुद्धा होती. पण काही काही पदार्थ मात्र चौघींनी मिळून एकेकीला बहाल करून टाकले होते. ते निर्विवादपणे तिचे तिचेच उत्तम होतात असा सर्वानुमते ठराव झाला होता. उदा. केशरआतेच्या खापरोळ्या, शिरवळ्या, काळ्या वाटाण्याचा सांबारा; पुष्पाआत्तेची उडदा-मेथी, सासव, किसमूर; लिलुआतेचे घावणे, कोथिंबीरवड्या, धोंडस; आणि अनुआतेच्या पुरणपोळ्या, करंज्या आणि आप्पे.

अनुआतेचं नावच अन्नपूर्णा. ती वर्सोव्याला आरामनगरला राहायची. बैठ्या घरांची, रो-हाऊस पद्धतीची ही कॉलनी. तीन खोल्यांचं त्यांचं कौलारू घर रांगेत पहिलं. तिन्ही बाजूची मोकळी जागा त्यांचीच असल्यासारखी. आसपासच्या फिल्मी वातावरणामुळे आपण कुठल्या तरी उच्चभ्रू वस्तीतल्या मोठ्या बंगल्यात जातोय असं तेव्हा वाटायचं. तिचं अख्खं सासर हे खाण्यात आणि खिलवण्यात एक नंबर. मांसाहार, सुका मेवा, साजूक तूप असा सगळा सढळ हस्ते कारभार. तिच्या सासूबाई प्रमिलाताई वायंगणकर मूळच्या कराचीकर. फाळणीनंतर सगळे इकडे आले. तिथल्या शेजाऱ्यांकडून शिकलेले बिर्याणी, कबाब यांच्याबरोबरीने आपल्या पद्धतीचे सगळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा.

त्यांच्या त्या भल्यामोठ्या एकत्र कुटुंबात चार व्यक्ती शुद्ध शाकाहारी. त्यातल्या दोघांना बटाटा वर्ज्य. त्यामुळे प्रत्येक जेवणात तीन तीन प्रकार. उदा. सगळ्यांसाठी खिमा भरलेले बटाट्याचे पॅटीस बनवले तर त्याच्या जोडीला मटार, कच्च्या फणसाचा कीस किंवा तत्सम शाकाहारी सारणाचे बटाट्याच्या आवरणाचे एक आणि कच्ची केळी/ रताळी/ सुरण यांच्या आवरणाचे दुसरे असे तीन वेगवेगळे प्रकार त्या बनवायच्या. आम्हाला तिन्ही खायला मिळायचे. सगळ्यात चविष्ट ते सगळ्यात शेवटी खायचं, ही माझी सवय. पण तिन्ही प्रकार इतके वेगळे आणि चविष्ट बनायचे की शेवटी खायला कुठला ठेवणार? त्यांच्या घरच्या प्रत्येक जेवणात माझी अशीच पंचाईत व्हायची.

‘हा एवढा व्याप करण्यापेक्षा सरळ ते दुसरं कव्हरच सगळ्यांना का नाही वापरत?’ आईला नेहमी वाटायचं. पण अशा शॉर्टकट्सना ताईंच्या राज्यात काही जागा नव्हती. ‘प्रत्येक गोष्टीक आपली आपली म्हणान एक चव आसता…’ आणि ‘सगळा कसा साग्रसंगीत होऊक होया…’ ही त्यांची आवडती वाक्यं होती. वर्सोव्याच्या समुद्रात दिवसातून कितीही वेळा खेळून या- प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन पदार्थ वाट पाहत असायचा.

अशीच चंगळ होती ती लिलुआतेच्या घरी. तिचं लग्न झालं ते बाळूमामांशी. अ‍ॅड. विजय केळबाईकर म्हणजे आईचा सख्खा भाऊ. त्यामुळे आमचं डबल नातं होतं आणि ते आम्ही त्याच तोडीने निभावलं. हर्षदा, भरत ही त्यांची मुलं आणि मी व माझ्या बहिणी सतत एकमेकांच्या घरी राहायला! घरोघरी फोन नव्हते त्या काळात आम्ही एकमेकांना पत्रंही लिहायचो.

‘जीव गेला तरी चालेल, पण बाहेरचं काहीही खायचं नाही’ ही दोन्ही घरातली कडक शिस्त. पण बाबांना चोरून, आईला मस्का मारून आम्ही पेप्सीकोला खायचो. (या पदार्थाचा पेप्सी किंवा कोकाकोला या कंपन्यांशी काही संबंध नव्हता. ‘पॉपसिकल’ म्हणजे ‘चोखून खायची बर्फाळ वस्तू’ या अर्थी ‘पेप्सीकोला’ हा अपभ्रंश असावा. जो साधारण २००० सालापर्यंत खूपच प्रचलित होता.) ऑरेंज, कालाखट्टा वगैरे पाण्याचे पेप्सीकोला चार आण्याला मिळायचे आणि दुधाचे पिस्ता किंवा व्हॅनिला फ्लेवरचे आठ आण्याला. मे महिन्याच्या गरम दुपारी जी तहान लागायची ती केवळ पेप्सीकोलाच भागवू जाणे.

एकदा लिलुआतेकडे गेलेलो असताना एका प्लेटमध्ये मांडलेले भरपूर पेप्सीकोले समोर आले. आम्ही आनंदाने वेडेच झालो. पटापट उचलून, त्याचं प्लास्टिकचं कव्हर कडेला दाताने तोडून चोखायला सुरुवात.

‘जमलंय का?’ – लिलुआतेचा प्रश्न.

‘म्हणजे? हे तू बनवलंयस?’ आम्ही अवाक्!

रसनाचं ऑरेंज सरबत प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून, त्या पिशव्या मशीनवर व्यवस्थित सील करून, फ्रीझरला ठेवून तिने ते बनवले होते.

‘सेम टू सेम दुकानातली चव!’ आम्ही लगेच पावती दिली.

त्या दिवसापासून मग ती लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचं पन्हं, मसाला दूध, थंडाई असे अनेक पेप्सीकोले बनवायला लागली. सायट्रिक अ‍ॅसिड, खाण्याचे रंग, इसेन्स अशा गोष्टी वापरून ती त्यांचा ‘लुक अ‍ॅण्ड फील’सुद्धा एकदम झकास बनवायची. दुकानातल्यापेक्षा सुंदर दिसणारे, लागणारे आणि बरेचसे तर दुकानातही न मिळणारे- अशा या पेप्सीकोल्यांनी आमची सुट्टी थंडगार आणि मजेदार करून सोडली.

अर्थात मटण, मासे, हळसांडयाची आमटी, आंबोळ्या, घावणे, बटाटेवडे, सामोसे, कटलेट्स, आप्पे या गोष्टी तर होत्याच. आप्पे आपण नेहमी गोडाचे किंवा तिखटाचे खातो; पण अनुआते एक तिखट गोड प्रकार बनवते- जो फारच भन्नाट लागतो.

अनुआतेचे आप्पे

साहित्य : दहा पिकलेली वेलची केळी, दीड वाटी रवा, पाव वाटीपेक्षा कमी गूळ, एक चमचा दही, दीड चमचा हिरव्या मिरचीचा खर्डा, दोन चमचे आल्याचा कीस, इनो, मीठ.

कृती : केळी कुस्करून वरील सर्व साहित्य त्यात घालून हाताने एकजीव करायचं. गरज भासल्यास अगदी थोडं पाणी घालायचं. अर्धा-एक तास ठेवून द्यायचं. ऐनवेळेस अर्धा चमचा इनो मिसळून आप्पेपात्रात तेल तापवून खरपूस भाजून घ्यायचे. आप्पेपात्र नसल्यास तव्यावर धिरड्यासारखेही घालता येतात. मिरची न घालता गुळाचं प्रमाण वाढवलं की आल्याच्या स्वादातले गोड आप्पेही मस्त लागतात.

घावणे म्हणजे नीर डोशासारखा कोकण-गोव्यातला पारंपरिक पदार्थ. तिथल्या सर्व घरांत हा सर्रास केला जात असला तरी लिलुआतेचे घावणे खास असतात. सर्व बाजूंनी समसमान शिजलेले, न चिकटणारे, लुसलुशीत आणि मस्त. तिची ही दोन-दोनची सोपी पद्धत वापराल तर तुमचेही तसेच येतील. तांदूळ दोन तास भिजवायचे आणि भिडाच्या तव्यावर टाकलेला घावणा दोन मिनिटं शिजू द्यायचा- हा तो फॉम्र्युला. काही जण रात्रभर भिजवतात. परंतु दोन तास भिजवूनही पुरतं.

लिलुआतेचे घावणे

साहित्य : दोन वाट्या तांदूळ (हातसडीचे, आंबेमोहोर किंवा इतर कुठलेही), सहा वाट्या पाणी, मीठ, तेल.

कृती : दोन वाट्या तांदूळ धुऊन दोन वाट्या पाण्यात दोन तास भिजत घालायचे. नंतर नुसते तांदूळ मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचे. भिजवलेल्यातलं उरलेलं सगळं पाणी, अधिकचं चार वाट्या पाणी व चवीपुरतं मीठ घालून पातळ मिश्रण तयार करायचं. भिड्याचा तवा एक चमचा तेल लावून चांगला गरम करून घ्यायचा. (नारळाच्या शेंडीने, अर्ध्या कांद्याने किंवा ब्रशने तेल लावतात. चमच्याने नाही!). त्यावर मिश्रण टाकून दोन मिनिटं (झाकण न लावता) शिजू द्यायचं. मिश्रण टाकताना बाहेरून आत असं सहज झर्रकन् टाकत जायचं. चलबिचल करायची नाही. गॅसची आच मध्यमपेक्षा किंचित अधिक. मोजून दोन मिनिटांनंतर घावणा तयार! कालथ्याने उचलून अलगद काढायचा. दुसऱ्या बाजूने शिजवायचा नाही. ताटात सुती कपडा घेऊन त्यावर हे घावणे थोडे थंड झाले की चौपदरी घडी करून रचून ठेवायचे.

या घावण्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या मस्त लागतात. जेवणात केले तर चिकन, मटण किंवा गरम मसाल्याची आमटीबरोबर मस्त लागतात. परंतु ‘रस घावणे’ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण! रस एकदम सोपा आणि फारच चविष्ट. नारळाच्या दुधात आवडीनुसार गूळ, वेलची, जायफळ व मीठ घालून ढवळलं की झालं. घावणे या रसात बुडवून किंवा त्यात भिजवून ठेवून खायचे. एकेका घासात अमृत! याचीच एक वेगळी आवृत्ती म्हणजे गूळ-खोबऱ्याचं सारण भरलेले साता-कापाचे घावणे. निव्वळ अप्रतिम. ‘वाईट कित्याक लागतले? पण इतको व्याप कोण करीत बसताला?’ असं सगळे म्हणतात. परंतु असे व्याप काढून दुसऱ्यांना वाढण्यात ज्यांना मजा येते अशा प्राण्यांपैकी माझ्या या सगळ्या आत्या.

अनुआते आणि तिची नणंद पुष्पाआक्का यांच्या तालमीत तयार झालेली त्यांची चटपटीत मदतनीस जयश्री वाउल आज लोणावळ्याला स्वत:चं दुकान आणि खाणावळ चालवते. लिलुआतेची सून तृप्ती घरच्यांच्या आणि आल्या-गेल्याच्या रसनेची तृप्ती थेट लिलुआतेच्याच ढंगात करते. चवीचा वारसा असा दमदारपणे सुरू आहे.

(छायाचित्रे : भूषण कोरगांवकर)

bhushank23@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:01 am

Web Title: testy food long holiday potato patties raw banana suran akp 94
Next Stories
1 पडसाद : विचारांची संयत मांडणी
2 पाडवा आणि गोडवा
3 इस्पिकची राणी!
Just Now!
X