अमेरिकेत आल्यावर माझ्या लक्षात आलं की, प्रत्येक बारीकसारीक गोष्टीतही एकमेकांना ‘थॅँक्यू’ म्हणतात! हे ‘थॅँक्यू’ प्रशिक्षण मी आल्या आल्याच इतकं आत्मसात केलं की, एकदा ‘एलेव्हेटर’लाही  ‘थॅँक्यू’ म्हणून टाकलं!
त्यामुळे इथे ‘थँक्सगिव्हिंग’चा सण साजरा होतो हे समजल्यावर एवढं आश्चर्य नाही वाटलं. lok03माझा पहिला ‘थँक्सगिव्हिंग’ साजरा झाला बेवर्ली आणि फ्रँक रुटॅन कुटुंबाच्या घरी! (मी विद्यार्थिनी असताना त्यांच्या घरी भाडय़ाची खोली घेऊन राहत होते.) या सणाची तिची तयारी तीन महिने चालू होती! तिच्याकडे छान रंगीत चित्रांची ‘गुर्मे कुकिंग’ची पुस्तकं होती! या सणाला काय करायचं हे बरंचसं ठरलेलंच असतं. तरीही बेवर्ली तिच्या खास खास पाककृत्यांचा विचार करत होती. मला तर ते आपल्या दिवाळीसारखंच वाटलं. म्हणजे लाडू, चकल्या वगैरे तर ठरलेलंच असतं- पण तरी ‘वहिनी तुम्ही रव्याच्या लाडूचं ते कसं करता?’ असं पूर्वी शेजारणी एकमेकींना विचारत तसं! (हल्ली ‘गूगल’ला किंवा चितळ्यांना विचारतात म्हणे!) घरात लग्न समारंभासारखी तयारी चालू होती! सामानाच्या याद्या- माणसांच्या याद्या- मग टेबलावर कोण कुठे बसणार त्याची टिपणं- कोणता पदार्थ कोणत्या भांडय़ातून वाढायचा- ओव्हनमध्ये काय- चुलीवर काय- पदार्थ उरला तर कशात काढायचा, भांडी कोण धुणार, इत्यादी.  बेवर्लीनं अगदी प्रत्येक क्षणाचं पद्धतशीर नियोजन केलं! जेवणघराची खोली रंगवून घेतली. जसा सणाचा दिवस जवळ आला तशा वर्तमानपत्रांत ‘थँक्सगिव्हिंग’ सेलच्या जाहिराती आल्या. बेवर्लीने कूपन्सची कात्रणं कापून कोणत्या दुकानातून काय घ्यावं याचाही अभ्यास केला! चार दिवस आधी सामान आलं. दोन दिवस आधी जेवणघर सजवून सुंदर ठेवणीतल्या बशा वगैरे मांडून तयार झालं. कोंबडीसारख्या ‘टर्की’ पक्ष्यांची चित्रं असलेले टेबल नॅपकिन्स-टेबल मॅट्स आणि साजेशी गृहसजावट. मेणबत्त्या-पानगळीच्या पानांच्या रंगांच्या वेलबुट्टय़ा, ‘पाइनकोन्स’च्या वासाचा घमघमाट! – काही पदार्थ आदल्या दिवशी बनवले तर काही सणाच्या दिवशी सकाळी! फ्रँकचं काम होतंlr08 तो भला मोठ्ठा ‘टर्की’ नामे पक्षी आणून त्याच्या पोटात भात आणि असलं काही ‘स्टफिंग’ भरून ओव्हनमध्ये ‘बेक’ करण्याचं! (तो ‘टर्की’ नावाचा पक्षी मूर्ख असतो असं म्हणतात!) मी आणि बेवर्ली बाकीचं सर्व! कोणी काय करायचं याच्या सूचना आणि सर्व कसं चोख! मी शाकाहारी म्हणून बेवर्लीनं मुद्दाम एकाऐवजी दोन भाज्या उकडल्या होत्या. शिवाय सॅलड आणि ‘पंपकिन पाय’ म्हणजे लाल भोपळ्यापासून बनवलेला गोड पदार्थ! तिचा पद्धतशीरपणा आणि कामाचा चटपटीतपणा  वाखाणण्याजोगा!
बरोबर वेळेला त्यांची मुलं आणि सुना-जावई उगवले! ठरलेल्या ठिकाणी बसले! ठरावीक वाइन डेव्हिडनं सर्वाना दिली आणि पुन:पुन्हा ‘धिस लुक्स ग्रेट- थँक्स फॉर मेकिंग धिस डिनर’ असं सर्वानी बेवर्लीला सांगितलं. मग ‘ग्रेस’ म्हणण्याचा कार्यक्रम! नुसतंच ‘देवाला’ थँक्यू म्हणायचं नाही तर कशाबद्दल ‘थँक्यू’ तेही सांगायचं! कोणी ‘वर्ष सुखाचं आणि आरोग्यदायी गेल्याबद्दल’ कोणी देवासोबत जोडीदार आणि मित्र यांनाही कशा कशाबद्दल ‘थँक्यू’ म्हटलं..
‘आमच्या कुटुंबात सहभागी झाल्याबद्दल थँक्यू’ असं मला बेवर्लीनं तर ‘Dear Rutan family; Thank you for including me as your subroutine’ असं म्हणून मीही रंग भरला मेजवानीत! सर्वात शेवटी सर्वानी ‘आमेन’ म्हणायचं आणि भोजन सुरू! प्रत्येक पदार्थ म्हणजे ‘कोर्स’ला वेगळ्या सजावटीची बशी- त्या उचलून, आत ठेवून दुसऱ्या आणण्याची-मांडण्याची वेबर्ली आणि एलीची गडबड! पण ते ठरल्याप्रमाणे! उगाच बाकीचं कोणी उठून गोंधळ करत नव्हतं! माझं काम तो ‘पंपकिन पाय’ नामे गोड पदार्थ बशांत भरून आणण्याचं होतं! त्यासाठी माझं आदल्या दिवशी प्रशिक्षण करण्यात आलं होतं!  कोणताही गोंधळ, गडबड न होता- बश्या, पेले-भांडी धुवून ती अडकवण्यापर्यंतची सर्व कामं ठरल्याप्रमाणे चोख! तीन तासांत समारंभ संपून मुलं आपापल्या गाडय़ांतून घरोघर गेलीसुद्धा! जाताना ‘Everything was so perfect. Dinner was delicious. Thank you for the dinner’ असं पुन:पुन्हा सांगायला विसरली नाहीत! मीही बेवर्लीला प्रेमाने ‘दमलीस बाई! छान झालं हो सर्व’ असं सांगितलं आणि तिनं मला ‘Thank you for your big help’ असं म्हटलं.
अशा कौटुंबिक जेवणाच्या वेळी स्वत: सर्व बनवणाऱ्या बेवर्लीसारख्या अन्नपूर्णा फार थोडय़ा. बहुतेक साऱ्या ‘सोयपूर्णा!’ थँक्सगिव्हिंगचं जवळजवळ सर्व तयार मिळतं! फार तर एक दोन ‘कॅन्स’ उघडून उपडी करायचे नक्षीदार भांडय़ांत! पण वर्षांतून एकदा होणाऱ्या, पाच-सहा माणसांच्या त्या जेवणाचा मोठ्ठा बोभाटा! दोन महिने आधीच बायकांना टेन्शन! पाककृत्या टीव्हीवर, गूगलवर-वर्तमानपत्रांत येत असतात! थँक्सगिव्हिंगचं जेवण म्हणजे सॅलड, क्रॅनबेरी सॉस, उकडलेली ब्रॉकली, ‘बीन्स’ म्हणजे शेंगा उकडून केलेला पदार्थ, उकडलेल्या बटाटय़ांचा मॅश पोटॅटो, स्वीट याम्स (उकडलेली रताळी), टर्कीच्या पोटातलं स्टफिंग, ब्रेड, टर्की आणि ‘पंपकिन पाय’! ते जेवण बनवायला लागतात फार तर तीन तास! ‘टर्की’ मात्र ओव्हनमध्ये काही तास ‘रोस्ट’ किंवा भाजावा-शिजावा लागतो! प्रत्येक घराची संस्कृती आणि गृहिणीचं व्यक्तिमत्त्व ‘थँक्सगिव्हिंग डिनर’मध्ये डोकावतं! मी एका ‘ग्रीक’ अमेरिकन घरी पाहिलं तर तिथे एकदम भारतीयांसारखं ऐसपैस वातावरण! ‘बिग फॅट ग्रीक थँक्सगिव्हिंग!’ भरपूर माणसं, गोंधळ, दंगा! मज्जा! इत्यादी. काही विद्यापीठांत प्राध्यापक मंडळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मुद्दाम घरी जेवायला बोलावतात.
आता ‘व्हेजिटेरियन’ आणि ‘व्हेगन’ थँक्सगिव्हिंग डिनर्स असतात! सोयाबिनच्या ‘टोफू’चा टर्की त्यासाठी बनवतात. बेवर्लीकडे ‘आदर्श थँक्सगिव्हिंग’चे प्रशिक्षण घेतल्यामुळे आमच्या घरी दर वर्षी हा सण साजरा होतो. नातेवाईक आणि मित्रमंडळी मिळून २०-२५ माणसं येतात! क्रॅनबेरी सॉसला कढिलिंब-मेथीची फोडणी देऊन या सणाला आम्ही चविष्ट भारतीय साज चढवतो! थँक्सगिव्हिंगच्या जेवणात अमेरिकन माणूस सुमारे पाच हजार कॅलरीजचा म्हणजे दोन-अडीच जेवणांचा खुराक फस्त करतो. या सणाला गाडय़ा, रेलगाडय़ा आणि विमाने मिळून वर्षांतला जास्तीत जास्त संख्येने प्रवास होतो. या सणाला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक तशी सामाजिकही बाजू आहे!
हा सण आपल्या दिवाळीसारखाच धनधान्य समृद्धीचा! आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण! दिवाळीच्याच सुमारास येतो आणि दिवाळीच्या वसुबारसाला जशी दान करण्याची, आपल्यातील धनधान्य गरिबांना देण्याची आपली जुनी प्रथा तशी या थँक्सगिव्हिंग सणाला गरीब आणि बेघर लोकांना जेवण देण्याची प्रथा आहे. चर्चेस, सामाजिक संस्था त्याची योजना करतात. कंपन्या, दुकाने आपापल्या दारात पिंपे ठेवतात. त्यात लोक फूड कॅन्स घालतात. ठिकठिकाणी असे ‘food can drives’ होतात आणि लोक सढळ हातांनी मदत करतात.
या सणाच्या प्रथेचं मूळ इंग्लंडमधील प्रॉटेस्टंट पंथाच्या परंपरेत आहे. कॅनडा, अमेरिका आणि इतरही काही देशांत ‘थँक्सगिव्हिंग’ची प्रथा आहे. इंग्लंडमधून ही प्रथा घेऊन अमेरिकेत जे लोक आले, त्यातल्या मॅसॅच्युसेट राज्यातल्या फ्लिमथ या भागात १६२१ मध्ये पहिले ‘थँक्सगिव्हिंग डिनर’ झाले असे म्हणतात. १०० लोकांच्या वसाहतीतल्या सुमारे ५० लोकांचा दुष्काळ आणि अडचणींत मृत्यू झाला. वसाहतवाल्यांना शेतीसाठी स्थानिक रेड इंडियन लोकांनी मदत केली. तेव्हा पहिल्या चांगल्या पिकानंतर ५० युरोपियन आणि त्यांनी पाहुणे बोलावलेले ९० रेड इंडियन्स असे ते भोजन झाले! त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टनने १७८९ मध्ये एक जाहीरनामा काढून ही भोजनप्रथा देशभर सुरू करावी असे ठरवले! १८६३ मध्ये लिंकनसाहेबांनीही जाहीरनामा काढून हा ‘राष्ट्रीय दिन’ म्हणून पाळावा असे ठरवले.
‘थँक्सगिव्हिंग’ हा कोणत्याही भेटवस्तू एकमेकांना न देता निव्वळ कौटुंबिक सहभोजन करण्याचा सण- सरकार दरबारी त्याचा दिवस असतो नोव्हेंबरचा चौथा गुरुवार! म्हणजे तब्बल चार दिवसांची सुटी- तद्दन सणासुदीचे जेवण- शुक्रवारी ‘Black Friday’ म्हणजे खरेदी न करण्याचा दिवस (पण त्या दिवशी दुकानात नाताळच्या खरेदीची झुंबड उडते) आणि शनिवारपासून नाताळची तयारी- म्हणजे घरी-दारी-सरकारी उत्सवी वातावरणाची सुरुवात! १९२४ पासून या दीर्घ उत्सवाची ‘शोभा यात्रा’ म्हणजे ‘Macy’s Thanksgiving Parade’ काढण्याची आणखी एक परंपरा! न्यूयॉर्क, डेट्रॉइट अशा ठिकठिकाणी या शोभायात्रा निघतात- शेवटचा ‘रथ’ सांताक्लॉजचा! वर्षभर मनापासून काम करा.. आपल्याला काम देणाऱ्या हातांबद्दल, काम करायला शक्ती आणि आरोग्य देणाऱ्या परमेश्वर किंवा तत्सम शक्तीबद्दल आणि आनंद देणाऱ्या सहोदरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी.
ज्यांनी पिडलं, त्या ‘टर्की’ वृत्तीच्या मूर्ख लोकांना क्षमा करावी- ज्यांची चूल अडली त्या दुर्दैवी लोकांना आपल्यातला वाटा द्यावा..
आणि मग भरभरून आनंदाचा, भेटवस्तूंचा वर्षांव करत येणाऱ्या सांताक्लॉजच्या स्वागतासाठी गुढय़ातोरणं उभारावीत- त्यासाठी असतो हा राष्ट्रीय कृतज्ञता दिन! ‘व्हॅलेंटाइन्स डे’ आणि ‘नाताळ’सारखा हा ‘कृतज्ञता दिन’ही जगभर- विशेषत: भारतात साजरा व्हावा!