12 August 2020

News Flash

त्यागाला मर्यादा नसते..

‘धि गोवा हिंदु असोसिएशन’चे एक अध्वर्यु रामकृष्ण नायक यांनी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे संस्थेच्या व्यापांतून निवृत्ती घेतली त्यावेळी सुहृदांना उद्देशून लिहिलेले पत्र..

‘धि गोवा हिंदु असोसिएशन’चे एक अध्वर्यु रामकृष्ण नायक यांनी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे संस्थेच्या व्यापांतून निवृत्ती घेतली त्यावेळी सुहृदांना उद्देशून लिहिलेले पत्र..

प्रिय..  यांस-

स्नेहमंदिर प्रकल्प, त्याची उभारणी आणि त्याची यशस्वी वाटचाल यांच्याशी संबंधित आपणा सर्वास नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा; आणि इतकी वर्षे स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने देत असलेल्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी मन:पूर्वक आभार.

‘स्नेहमंदिर’च्या या अभिमानास्पद वाटचालीचा मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला त्याची दोन कारणे जाणवतात. मी आता थकलो आहे, गलितगात्र झालो आहे. त्यामुळे अनिच्छेने का असेना, तुम्हा सगळ्या सहकाऱ्यांचा, मित्रांचा, आश्रयदात्यांचा निरोप घेण्याच्या तयारीत मी आहे. अशावेळी मला ‘स्नेहमंदिर’च्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीचा सगळा प्रवास एखाद्या चलत्चित्रपटाप्रमाणे माझ्या मन:चक्षूंसमोर सरकत आहे आणि एक अपूर्व असे समाधान मी अनुभवत आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या जबाबदारीतून मुक्त होताना कृतार्थतेची अनुभूती पण मला जाणवत आहे.. आपणा सर्वानाही ती जाणवत असली पाहिजे.

संस्थेच्या जबाबदारीतून बाजूला होण्याचा निर्णय घेण्यामागे दोन कारणे आहेत. माझे शरीर आता पूर्ण थकले आहे. ज्या माझ्या शरीराने आणि सर्व अवयवांनी कसलीही कुरकूर न करता आतापर्यंत प्रत्येक कार्यात आणि उपक्रमांत साथ दिली होती, ती आता दीर्घ रजेची मागणी करू लागली आहेत; आणि येत्या वर्षभरात माझे हे शरीर विकलांग अवस्थेत जाईल असे संकेत मला मिळू लागले आहेत. अशा वेळी संस्थेला तिच्या निकोप वाटचालीसाठी कोणती धोरणे उपकारक ठरली त्याचा वेध घेणे, तसेच ज्या मूलभूत गोष्टी अंगीकारल्या त्याचा आढावा घेणे उचित तसेच पुढच्यांना मार्गदर्शक ठरेल असे मला वाटले. कदाचित कोणाला हे सगळे पाल्हाळ वाटू शकते. त्याबद्दल क्षमा असावी. या ठिकाणी वाचलेल्या आणि अनुभवलेल्या एका कवितेच्या चार-पाच ओळी उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही.

‘मला होते जाणीव- एक क्षणभर- मी नाही अनेकांतला एक

एकमेव तर मी आहे, केवळ अनेकांतला एक,

सर्वातील, सर्वाच्या आणि सर्वासाठी;

अजूनही चालतोंचि वाट॥ माळ हा सरेना

विश्रांतीस्थळ केव्हा येईल कळेना॥’

मित्रहो! मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन कॉलेजात जाईपर्यंत वडिलांचा प्रत्येक हुकूम शिरसावंद्य मानून त्याचे तत्परतेने पालन करणे हे मी माझे कर्तव्य मानत होतो. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त शाळेतील मास्तरांना रोज जेवण नेऊन पोचविणे, शाळेत शिक्षक गैरहजर असल्यास बिगरीचा (पूर्व प्राथमिक) वर्ग घेणे, ही कामेही  मी करीत असे. यात बदल झाला तो कॉलेजात गेल्यावर. मात्र मी मॅट्रिक उत्तीर्ण होऊन कॉलेजात जाऊ लागल्यापासून बदल झाला तो वडिलांच्या माझ्याबरोबरच्या वागण्यात. ते मला एखाद्या प्रश्नावर आणि विषयासंबंधी माझे मत विचारू लागले, मला विश्वासात घेऊ लागले आणि एका मर्यादेपर्यंत बरोबरीच्या नात्याने वागवू लागले. माझ्या मनात वडिलांविषयी नितांत आदर आणि कौतुक याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही भावना नव्हती. पुढे वडिलांशी बऱ्यापैकी जवळीक निर्माण झाली.

मात्र, हे भाग्य माझ्या आईच्या वाटय़ाला कधीच येऊ शकले नाही. आपण करीत असलेल्या कार्याच्या वा कामाच्या संबंधात ते तिच्याशी कधीच बोलले नाहीत. तिला विश्वासात घेणे तर दूरच! घरांत पै-पाहुणे येतच असायचे. पण त्याचीसुद्धा आगाऊ कल्पना वडिलांनी तिला कधी दिली नाही. मामा वरेरकर, बाकीबाब बोरकर यांच्यापासून अनेक नामवंतांची आमच्याकडे ये-जा चालू असे. पण त्याची कल्पना पत्नीस द्यावी असे माझ्या वडिलांना कधीच वाटले नाही. आई हे सगळे निमूटपणे सहन करीत असे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन गोव्यात पहिली कन्याशाळा चालविणारे, मुलींना व्ह. फा. परीक्षेसाठी कारवारला नेणारे माझे वडील! पण त्यांना स्वत:च्या धर्मपत्नीच्या भावना जाणून घ्याव्यात असे कधीच वाटले नाही. माझे वडील आणि आई जणू काही दोन भिन्न जगांत वावरत होती.‘स्नेहमंदिर’ची अल्पावधीत एवढी वाढ कशी होऊ शकली, यावर शांतपणे विचार केला असता काही गोष्टी ठळकपणे माझ्या लक्षात येतात. गेल्या ३५ वर्षांत जो अनुभव आला तो आपणासमोर मोकळेपणाने ठेवावा असे मला वाटते. त्यासंदर्भात काही वैयक्तिक घरगुती घटनांचा उल्लेख नाइलाजाने करावा लागत आहे. प्रसिद्ध गोमंतकीय साहित्यिक प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई आणि माझे वडील यांच्यात अतिशय जवळिकीचे संबंध होते. प्रा. सरदेसाई यांचा गोव्याच्या मुक्तीलढय़ाशी प्रत्यक्ष संबंध असल्याने त्यांना गोव्यात राहणे अशक्य झाले. त्यांना मुंबईला पाठविण्याची व्यवस्था माझ्या वडिलांनी केली. मुंबईत त्यांना किलरेस्कर ग्रुपमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांचे सर्व प्रश्न सुटले. त्यांनी माझ्या वडिलांवर ‘गोव्याचे धोंडो केशव कर्वे – केशव अनंत नायक : स्त्रीशिक्षणाचे कैवारी’ या मथळ्याचा लेख लिहून तो ‘स्त्री’ मासिकाकडे प्रसिद्धीसाठी पाठविला. संपादकांना तो आवडला आणि त्यांनी केशव अनंत नायक यांच्या फोटोसह लेख पाठविण्यास लक्ष्मणरावांना सांगितले. मी कॉलेजशिक्षणासाठी मुंबईला असल्याने त्यांनी मला वडिलांना पत्र पाठवून फोटो मागविण्यास सांगितले. मी लगेच वडिलांना पत्र पाठवून तशी विनंती केली. पंधरा दिवसांनी एक जाडजूड पाकीट आले. ते १५ पानी पत्र होते. ‘कोणत्याही परिस्थितीत कोणालाही हा लेख प्रसिद्ध करण्यास माझी परवानगी नाही..’ असे वडिलांनी कडक शब्दांत लिहिले होते. सामाजिक संस्था, त्या कशा चालवाव्यात यासंबंधी त्या पत्रात सूचना होत्या.

‘एक माणूस संस्था स्थापन करू शकत नाही. तसे केले तरी ती चालू शकणार नाही. कशीबशी चालू ठेवली तरी तिची सर्वागांनी वाढ होणार नाही. ती नामशेष होईल. म्हणून लहानसा असला तरी समविचारी, एकध्येयी आणि नि:स्वार्थी, प्रागतिक विचारांचा एक गट सोबत असला पाहिजे. प्रारंभिक पीछेहाटीनंतर केवढेही मोठे यश मिळाले तरी त्याने हुरळून जाता कामा नये. यशाचे श्रेय कोणीही एकाने घेऊ नये. कारण सामुदायिक कष्ट आणि प्रयत्न यामुळे हे यश मिळालेले असते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तरी कोणीही स्वत:चा उदोउदो करू नये, सत्कार करून घेऊ नये. तसे झाले नाही तर सहकाऱ्यांच्या मनात अढी निर्माण होते. हा माणूस अधिकाराचा दुरुपयोग स्वत:च्या प्रसिद्धीसाठी करतो असा समज होईल.’ आम्ही बरीच वर्षे ही बंधने पाळली. आपल्या बोलण्यात का समतोलपणा पाहिजे, हे त्यातून लक्षात आले. श्रद्धा, निष्ठा, कार्यात सातत्य, निष्काम कर्म, स्थितप्रज्ञता या सर्व गोष्टींवर त्या पत्रात ऊहापोह करण्यात आला होता. ते सगळे माझ्या मनात घर करून बसले आहे. या गोष्टी वृत्ती आणि प्रकृती एक येण्यास उपयोगी ठरल्या.

माझ्या वडिलांच्या त्या पत्रातून त्यागाला मर्यादा असू नये याची पुरेपूर कल्पना आली आणि तेच मी पण माझ्या जीवनाचे व्रत बनविले. माझ्या वडिलांनी स्त्री-उद्धाराच्या विचारातून कन्याशाळा सुरू केली. त्याकाळी मराठी शाळांसाठी शिक्षक- म्हणजे मास्तर वेंगुर्ला, मालवण येथून आणावे लागत. शाळा सकाळ-संध्याकाळ चालत. त्यामुळे अशा मास्तरांना भोजन शिजविण्यासाठी वेळ मिळत नसे आणि भात शिजविण्यापलीकडे त्यांना स्वयंपाकपण बनविता येत नसे. त्यामुळे जेवण करायला वेळ मिळत नाही, अशी मास्तरांची तक्रार असे. या शिक्षकांना आमच्या घरून जेवण पोचविले जात असे. त्यावरून आई-वडिलांमध्ये रोज भांडण होत असे. पण वडील माघार घेत नसत. मास्तरांना जेवण पोचविण्याचे काम माझे असे. अनुदान चालू होईपर्यंत हे चालू राहिले.

मास्तरांना पगार द्यायला फीतून मिळणारे उत्पन्न अपुरे पडे. त्याची भरपाई वडील त्यांच्या दुकानातील मिळकतीतून करीत. पण पुढे हे सगळे आवाक्याबाहेर गेल्यावर मग लक्षात आले. कोर्टाचा बेलिफ सर्व मालमत्तेच्या लिलावाची नोटीस घेऊन हजर झाला आणि प्रकरण कोठवर गेले आहे त्याची कल्पना आली. तेव्हा पुढाकार घेऊन मी सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली. वडील म्हणाले, ‘‘माझी चूक झाली, आता माझ्याच्याने होत नाही. तुमच्यावर दोन्ही वेळा पेज जेवून राहण्याची पाळी येईल.’’ या कणखर माणसाच्या डोळ्यात पाणी तरारल्याचे मी आयुष्यात प्रथमच पाहिले. त्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत शाळेचे मुख्याध्यापक ज. भि. राऊत आपल्या अडचणी घेऊन आले. वडिलांचा चेहरा क्षणात हसतमुख झाला. दोघांनीही हसतखेळत शाळेच्या समस्यांवर बोलणी केली. वडिलांनी शाळा चालविण्यासाठी काढलेले कर्ज फेडण्यास मला चार वर्षे लागली. वडिलांच्या या वृत्तीला स्थितप्रज्ञतेशिवाय दुसरे काय म्हणणार?

त्यांनी माझ्या जवळच्या मित्राकडून कर्ज घेतले होते. परतफेडीचा पहिला हप्ता घेऊन मी त्याच्याकडे गेलो होतो. त्याच वेळी माझे वडील समोरच्या फुटपाथवरून चालले होते. त्यांना पाहिल्यावर माझा मित्र मला म्हणाला, ‘हो पळय, चोर वता.’ कर्ज फेडण्यासाठी मी आलो आहे हेदेखील माझा मित्र विसरला. वडिलांनी न पाळलेल्या शब्दाची किंमत मी त्यावेळी चुकती करीत होतो. त्याच्या दोघाही धाकटय़ा भावंडांची शिक्षणाची सोय मी मुंबईत केली होती, हेदेखील तो विसरला होता. मी आणि त्यानेही हे कोणास सांगितले नाही. मान आणि अपमान याचेपण शिक्षण मला तेथे मिळाले.

मित्रहो, कॉलेजात जाईपर्यंत मी वडिलांचे हुकूम पाळत होतो. शिक्षकांना जेवण नेऊन पोचविणे, वर्तमानपत्रे वाचून झाल्यावर ती शाळेत नेऊन देणे इत्यादी कामे मी करीत होतो.

ज्या वृत्तीने माझ्या वडिलांनी सार्वजनिक संसार केला, त्याचा लाभ थोडासुद्धा आपल्या पत्नीला द्यायला ते विसरले. हे असे द्विधा व्यक्तिमत्त्व का बनते? माणसे एकाच गोष्टीत/ कार्यात स्वत:ला एवढे गुंतवून का घेतात? आणि चांगुलपणा हादेखील अहंकार बनू शकतो, त्यातून एक प्रकारचे औद्धत्य येऊ शकते. संन्याशाचा संसार दाहक असतो असे म्हणतात. या विषयावर मी माझे मित्र वसंतराव कानेटकर यांच्याशी माझे मन मोकळे केले होते. त्यांनी महर्षी धोंडो केशव कर्वेपासून अनेक उदाहरणे दिली. पण उदाहरणांनी प्रश्न सुटत नसतात.

अशा खूप गोष्टी मी पाहिल्या. काही गोष्टी मी आचरल्या, काही सोडून दिल्या. पण बऱ्यापैकी समाधान होईल इतका माझ्या वृत्तीत बदल मी घडवून आणू शकलो. वृत्ती प्रकृतीला ओढून नेऊ लागली होती. अशा अनेक घटना, गोष्टी मी पाहिल्या आणि त्यातील मूलभूत कण मी वेचले. हेच माझे भांडवल.

परत एकदा आपणा सगळ्यांसमोर नतमस्तक! मी संस्था सोडणार नाही. शरीरात प्राण आहेत तोपर्यंत तुमच्याबरोबर असेन. जे काम आपण द्याल ते मी करीन. माझ्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांपैकी एक-दोन सहकारी जवळजवळ माझ्याच वयाचे आहेत. कदाचित त्यांच्याशी बोलताना, वागताना मी उणे-अधिक बोललो असेन- माझ्या स्वभावानुसार- त्यांना मी विनंती करतो की, तुम्ही मला क्षमा करावी. क्षमाशील दृष्टीने पाहून त्यांनी मला माफ करावे.

आपला स्नेहांकित

रामकृष्ण नायक

मडगाव, गोवा.

६ जानेवारी २०१८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2019 12:11 am

Web Title: the goa hindu association ramakrishna nayak mpg 94
Next Stories
1 यंगिस्तान जिंदाबाद
2 पडसाद – ..अन्यथा पुन्हा जनआंदोलन!
3 खेळ मांडीयेला..
Just Now!
X