07 April 2020

News Flash

ओळख

मी बुचकळ्यात पडलो. अमेरिकन नागरिक जाता-येता ‘ओह, शिट्!’, ‘ओह, शिट्!’ करत असतात हे माहीत होतं.

| September 1, 2013 01:05 am

आठव्या मजल्यावरच्या ‘सी’ अक्षराची चकती ठोकलेल्या दारावरची बेल मी वाजवली. तिसऱ्यांदा वाजवल्यावर धाडकन् दरवाजा उघडला आणि प्रथम एक बकऱ्याएवढा काळाढुस्स कुत्रा अणि मागोमाग त्याला मॅचिंग साइझची पांढरीफटक चेटकीण या दोघांनी माझ्या अंगावर भुंकून मला हैराण केलं. कुत्र्याचा प्रॉब्लेम काय होता ते कळलं नाही, पण मिस व्हाइट ‘कोण पाहिजे?,’ असं परत परत विचारत होती, हे काही वेळानं उमगलं. मी उत्तर दिलं, ‘क्षितीज.’
ती ओरडली, ‘ओह, शिट्!’
मी बुचकळ्यात पडलो. अमेरिकन नागरिक जाता-येता ‘ओह, शिट्!’, ‘ओह, शिट्!’ करत असतात हे माहीत होतं. पण क्षितीजचा पाश्चात्य उच्चारी ‘शिटिज्’ झाला आणि मग आकुंचन पावून ‘शिट्’ झाला आणि ‘ओह, शिट्!’ ही वस्तुत: क्षितीजला रागारागानं मारलेली लाडिक हाक असावी हे मला पटलं. यजमान आधी बाहेर येतो की यजमानीण मला आत बोलावते याची वाट बघत मी थांबलो. क्षितीजनं लग्न केल्याचं कानावर आलं नव्हतं. पण परदेशी मुलीशी लग्न केलं तर भारतीय कुलदीपक काही काळ ती ब्रेकिंग न्यूज फोडत नाहीत हे कानावर आलेलं होतं. तरीही क्षितीजनं स्वत:पेक्षा वयानं आणि आकारानं इतक्या वरिष्ठ असलेल्या भवानीशी लग्न करायला नको होतं असं प्रकर्षांनं वाटून गेलं. बाई गोरी असली म्हणून काय झालं?
‘ओह, शिट्!’ बाईनं परत ओरडून दरवाजा धाडकन् बंद करून टाकला. मी लिफ्टजवळ पोहोचेपर्यंत कुत्र्याच्या भूभूत्कारानं माझी पाठ सोडली नाही. लिफ्टमधून क्षितीजला फोन लावला. मी त्याला झापण्यापूर्वी तोच माझ्या अंगावर आला, ‘‘आहात कुठे काका? अर्धा तास वाट बघतोय तुमची.’’
‘‘कुठे म्हणजे? आता परत जातोय. तुझ्या आठ सी नंबरच्या फ्लॅटबाहेर अपमान करून घेतला. तुझी बायको म्हणजे एक नंबरची..’’
‘‘आठ सी? माझ्या अपार्टमेंटचा नंबर अठरा-जी आहे.’’
मी खिशातून पत्ता लिहिलेला कागद काढला. घडी उघडली. कागद दुमडलेल्या जागी अठरातला एक गहाळ झाला होता. उभ्या उभ्या पत्ता लिहिताना ‘जी’ अक्षराची ‘सी’ झाली होती.
‘अठरा-जी’मध्ये गेल्यावर मी क्षितीजला मनमुराद झापला. माझा मुख्य मुद्दा हा, की दाराबाहेर नावाची पाटी लावलेली असती तर हा घोटाळा झाला नसता.
तो ठसक्यात म्हणाला, ‘‘इथं तशी पद्धतच नाही. शहराबाहेरच्या स्वतंत्र बंगल्यांवरही नेमप्लेट नसते.’’   
‘‘का नाही लावत? भारतात कोणी घर बांधलं तर त्याला एक छानसं नाव देतात. ते नाव कोरलेला प्रशस्त दगड कुंपणाच्या िभतीत बसवतात. बाजूला घरमालकिणीचं आणि खाली घरमालकाचं नाव रंगवलेली एक सुबक पाटी लावतात. शहरातल्या गृहसंकुलात फ्लॅट घेतला तरीही दारावर फॅशनेबल नेमप्लेट लावतात. त्यामुळे बंद दरवाजामागे नक्की कोण राहतंय, हे एका नजरेत समजतं. तुम्हा अमेरिकन लोकांचा प्रॉब्लेम काय आहे?’’
 ‘‘नॉन-डिस्क्लोजर! दारामागच्या घरात कोण राहतं, ते उगीच परक्या लोकांना कशाला कळू द्यायचं?’’
‘‘ओह, शिट्! परके गेले झक मारत. तुमच्या पाहुण्यांना नक्की कोणतं दार ठोठवायचं, हे नको कळायला?’’
‘‘ओह, शिट्! पाहुणे कुठे येतात इकडे? आणि जे कोणी येतात ते तसे स्मार्ट असतात. अठराचे आठ करत नाहीत.’’
मी वरमलो, पण मुद्दा सोडला नाही- ‘‘घरात कोण राहतं ते कळलं तर काय झालं? तुम्ही गुप्तहेर, अतिरेकी, गुन्हेगार वगरे नाही ना? मग घाबरता कशाला?’’
‘‘तो प्रश्न नाहीय. इथं नीड टू नो बेसिसवर लोक वागतात. जितक्यास तितकं. शहरात वीकएंड गेट- टुगेदरला सातत्यानं भेटून मिठय़ाबिठय़ा मारणाऱ्या लोकांनासुद्धा एकमेकांविषयी काडीचीही खासगी माहिती नसते. मी या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये तीन र्वष राहतोय, पण अगदी याच मजल्यावरच्या इतर सात अपार्टमेंटमध्ये कोण राहतं, ते मला माहीत नाही.’’
‘‘हे चूक आहे क्षितीज. राहायला आल्यावर लगेचच तू प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची ओळख करून घ्यायला हवी होतीस. अडीअडचणीला शेवटी शेजारीच धावून येतात ना?’’
‘‘शेजारी? ओह शिट्! आम्ही सरळ ९११ नंबरला फोन करतो. पाच मिनिटांत फायर ब्रिगेड, अ‍ॅम्ब्युलन्स आणि पोलीस हजर होतात. कशाला हवेत शेजाऱ्यांचे उपकार? त्यांचा चोंबडेपणा कोण सहन करणार?’’
मी हात जोडले. पण कितीही डोकं खाजवलं तरी ओळख लपवण्यामागचं सयुक्तिक कारण उमजेना. त्यादरम्यान माझ्या नात्यातल्या दुसऱ्या एका ताज्या अमेरिकन नागरिकाला त्याची शिळी कार विकायची होती. बेटा राहायचा उपनगरात आणि ऑफिस महानगरात. जाहिरातीला प्रतिसाद देणारे महाभागही उपनगरातलेच. महानगरात गाडी कोण बाळगणार? तरीसुद्धा दोघेही पत्ता द्यायचे तो फक्त त्यांच्या ऑफिसचाच. घरचा नाही. असं का?
तसंच आन्सिरग मशीनवर वेलकम मेसेज रेकॉर्ड करतानादेखील हल्ली आपलं नाव न सांगण्याची फॅशन बोकाळलीय. म्हणजे ‘हे अमक्या अमक्याचं घर आहे’ याऐवजी ‘हा अमुक अमुक नंबर आहे, बीप वाजल्यावर तुमचा निरोप सांगून टाका..’ एवढाच तिरसट आदेश ऐकू येतो. पण असं केल्यामुळे नक्की काय गमावण्यापासून बचाव होतो?
शिकागोला जाण्याकरता क्षितीजबरोबर न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावर गेलो. मी हँडबॅगेज टॅगवर माझा नाव-पत्ता लिहू लागलो. क्षितीजनं त्याच्याकडचा कोरा टॅग तसाच हँडबॅगला बांधला. मी प्रश्नार्थक मुद्रेनं पाहताच माझ्या हातातल्या टॅगचं तातडीनं अणुविच्छेदन करून तो कुजबुजला-
‘‘तुम्ही भोळसट आहात, काका. टॅगवरचा नाव-पत्ता वाचून एखाद्या अतिरेक्यानं तुमच्या नावानं हाक मारून ही पिशवी तुमच्या समोरच्या घरात राहणाऱ्या माझ्या आजारी आईला दे, अशी गळ घातली तर?’’
‘‘टाळकं फिरलंय तुम्हा लोकांचं! किती टोकाचा विचार करता रे?’’
‘‘जगभरातले लोक राहतात इथं. गुड, बॅड अ‍ॅण्ड अग्ली! कोण कसले उद्योग करतो ते कसं कळणार? तिऱ्हाईतांपासून चार हात दूर राहिलेलं उत्तम.’’
माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. मी भाडभीड न ठेवता डाफरलो, ‘‘दूर तर तुम्ही राहताच रे सगळ्यांपासून. तुमचं कोणाशीच देणंघेणं नाही. इथं सुबत्ता आहे, पण तुम्हाला सुरक्षित वाटत नाही. अमेरिकन महासत्ता बलाढय़ आहे, पण भय इथले संपत नाही.’’
क्षितीजनं खांदे उडवले.   
मला राहून राहून आश्चर्य वाटतं, की सातत्यानं मुक्त अर्थव्यवस्था जोपासणारा आणि मुक्त विचारधारा जपणारा अमेरिकन समाज वैयक्तिक गोपनीयतेच्या इतक्या आहारी कसा गेला? ही अतिरेक्यांची धास्ती की अलिप्तपणाचा अतिरेक?
vardesd@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2013 1:05 am

Web Title: the identity
Next Stories
1 घमघमाट
2 आरोग्यभान
3 जीन्स
Just Now!
X