02 March 2021

News Flash

विघ्नसंतोष

एकीकडे विघ्नहर्त्यां देवाची आराधना फार मोठय़ा प्रमाणावर सुरू असताना दुसरीकडे विघ्नकर्तेही मोठय़ा संख्येने वाढीस लागलेले दिसतात.

| September 22, 2013 01:01 am

एकीकडे विघ्नहर्त्यां देवाची आराधना फार मोठय़ा प्रमाणावर सुरू असताना दुसरीकडे विघ्नकर्तेही मोठय़ा संख्येने वाढीस लागलेले दिसतात. त्यामुळे विघ्ने करण्याची ‘जबाबदारी’ आपली आणि ते हरण करण्याची जबाबदारी बाप्पाची- असा एकूणात सोपा मामला दिसतो आहे. ‘विघ्नसंतोष’ याचा अर्थ कुणी काही चांगले करीत असेल किंवा कुणाचे काही भले होत असेल तर त्यात अडथळा आणून त्याची होणारी दुर्दशा पाहताना मौज वाटणे. हा आपला सामाजिक विरंगुळा आहे फार पूर्वीपासून!
कुणी जलदगतीने उत्तम काम करीत असेल तर त्याला चाट घालून तो पडला आणि त्याचे दात पडले की आपले दात दाखवणे आणि वर- ‘‘सांगत होतो इतक्या जोरात जाऊ नकोस म्हणून! आता पडले ना दात? बस आता आयुष्यभर बोळके घेऊन!’’ असा तोंडभरून आशीर्वाद देणे, याला ‘विघ्नसंतोष’ म्हणतात. यात ‘संतोष’ कसा आणि कुठे आहे, हे फक्त विघ्नसंतोषी माणसांना कळते. साधारणपणे कूपमंडुक वृत्तीची माणसे विघ्नसंतोषी असतात. कुणीही विहीर सोडून समुद्रात जाऊ म्हणाला, किंवा विहीरच मोठी करू म्हणाला, की त्यांना अतोनात त्रास होतो. अशावेळी ती आपल्या उद्योगाला लागतात आणि त्या गोष्टी होऊ देत नाहीत.
ज्या समाजात विघ्नसंतोषी माणसे जास्त- त्या समाजाची कधीही प्रगती होत नाही. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ असे कधीही होत नाही. कुणी नवीन छान कल्पना काढली की तसे होऊ शकणार नाही, असा वाद घालून ती कल्पना अंकुरण्याआधीच तिचा गर्भपात करायचा, ही वृत्ती असली की नवीन काही होत नाही. भारतात ज्ञानापेक्षा अनुभवाला अवास्तव महत्त्व असल्याने अनुभवाच्या बुरख्याखाली विघ्नसंतोषी वृद्ध मुलांच्या उन्मेषांना मारून टाकतात. भारतात कित्येक वर्षांत नवीन शोध लागलेले नाहीत. आत्ता तुम्ही बसलेल्या खोलीतील यच्चयावत गोष्टी बघा. एकही गोष्ट भारतात शोधलेली नाही. भारतातले लोक परदेशात जाऊन संशोधन करतात आणि नोबेलही पटकावतात. कारण त्यांच्या ज्ञानाची तिथे कदर होते. अनुभव नसला तरी कुणी त्यांना कमी समजत नाही. त्यांच्या ज्ञानाला अवसर दिला जातो. अनेक लोक मदतीला पुढे येतात. नोबेल मिळाल्यावर आमचा गळा दाटून अवरुद्ध होतो. ‘भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञास नोबेल’ अशा वार्ता वृत्तपत्रांत झळकतात. त्यांना भारतात बोलावून ढोलताशे वाजवून त्यांच्या मिरवणुका काढल्या जातात. कल्पना चावलासारखी अंतराळवीर अमेरिकन टीव्हीवर सांगते, ‘‘मी अमेरिकन आहे; भारतीय नाही.’’ तरी आम्ही तिच्या नावाचे ढोलताशे बडवत भारतीय वंशाची महिला अंतराळवीर म्हणून गळे काढत बसतो. सध्या सुनीता विल्यम्सच्या नावाने तेच चालू आहे. पण इथे भारतात मात्र काम करणाऱ्या प्रत्येकाची ऊर्जा मारून टाकली जाते. अनुभव हा ज्ञानाचा गळा घोटत राहतो.
लहानातल्या लहान मुलाने किंवा मुलीने एखादी छान गोष्ट सांगितली की त्याचे तत्क्षणी कौतुक करून त्या सूचनेचा अवलंब केला गेला पाहिजे. त्याऐवजी भारतीय आदिढुढ्ढाचार्य घसा खाकरून म्हणतात, ‘‘हे म्हणायला सोपे आहे. आम्ही काय इतकी वर्षे भिंतीला तुंबडय़ा लावीत होतो? उगाच आपली उचलली जीभ लावली टाळ्याला! जा, तो अभ्यास पुरा कर आधी. बापाला शिकवतोय- मुले कशी होतात ते.’’ झाले!!! नुसती कल्पनाच मरत नाही; तर एक आइनस्टाईन मरून जातो.. एक सत्येंद्रनाथ बोस मरून जातो.. एक रविशंकर मरून जातो. त्याच्या लक्षात येते- इथे वेगळे काही बोलायचे नाही. करायचे तर अजिबात नाही. जगातल्या जवळजवळ सर्व मान्यवर शास्त्रज्ञांनी- म्हणजे अगदी गॅलिलिओ, न्यूटनपासून ते फेनमानपर्यंत- आपल्या साऱ्या दिशा हलवून टाकणारे शोध वयाच्या तिशीच्या आतच लावले आहेत. भारतातली बाळे तिशीच्या आत ‘लग्न कुणाशी करू?’ हे आई-बापाला विचारीत असतात; शोध लावणे विसराच.
अशी असंख्य जिवंत प्रेते समाजात वावरत असतात. कुठलेही नवोन्मेष मनात आले तरी ते दाबून टाकायला ते शिकतात. अति झाले तर खरेच जीव देतात. आमची सामाजिक खात्रीच आहे, की आम्ही तृतीय दर्जाचेच आहोत. आमच्यात काही भव्य-दिव्य असे करणारा माणूस होईलच कसा? ते सगळे परदेशात असते. त्यांनी काही केले की, मग त्याची आपण कॉपी करायची आणि धन्य धन्य व्हायचे. आम्ही आमच्या इथे नवीन काही होऊ देणारच नाही. फक्त तिकडच्या गोष्टी आणायच्या आणि इथे विकायच्या!
राजकीय ‘अनुभवी’ नेत्यांनी आपली स्थिती काय करून ठेवली आहे, हे आपण पाहतोच आहोत. त्याचे मुख्य कारण म्हणजे ‘विघ्नसंतोष’!!! सत्तारुढ झाल्यावर त्यांचा निम्म्याहून जास्त वेळ सत्तेत राहण्यासाठी करायच्या प्रयत्नांत जात असेल तर त्यांच्यात देशासाठी काही करायला ऊर्जा कुठून राहणार? विरोधी पक्षांचे सारे लक्ष सत्ताधारी पक्षाला खाली खेचणे, यापुरतेच मर्यादित. सत्ताधारी पक्षाने काही चांगले काम केले तर विरोधी पक्ष कधीही मोकळेपणे कौतुक करणार नाही. ते काम नुसते चुकीचेच नाही, तर देशविघातक कसे आहे, हे ते लोकांना पटवणार. पण देशासाठी सत्ताधारी पक्षाला सहकार्य करणार नाहीत. आजतागायत कोणत्याही पक्षाने असा आदेश काढल्याचे ऐकिवात नाही, की ‘आमच्या पक्षाचे कार्यकर्ते रहदारीचे सर्व नियम पाळतील.’ ही देशसेवा आहे, असे ‘ज्ञान’ त्यांना नाही. त्यांच्या ‘अनुभवा’नुसार देशसेवा म्हणजे पाकिस्तानविरुद्ध निदर्शने करणे, मोर्चे काढणे आणि रहदारीत विघ्ने उत्पन्न करणे, एवढेच. तरुण राजकीय नेत्यांनी एवढा आदेश काढावा.. सर्वसामान्यांचे आयुष्य मजेत जाईल.
धार्मिक ‘अनुभवी’ नेत्यांनी धर्माचे जे काही केले आहे तेही आपल्याला ठाऊक आहे. दुसऱ्या धर्माविरुद्ध बोलणे म्हणजे धर्माचरण- एवढेच त्यांना माहिती आहे. आजतागायत कोणत्याही धार्मिक नेत्याने असा आदेश काढलेला ऐकिवात नाही,की आमच्या धर्माचे लोक कधीही अतिक्रमण करून प्रार्थनास्थळे बांधणार नाहीत. जी बांधली असतील ती आम्ही स्वखर्चाने काढून टाकू. असे वागणे हे धर्माचरण आहे असे त्यांचा ‘अनुभव’ सांगत नाही. पण रहदारीला अडथळा करून प्रार्थनास्थळे उभारणे, महाप्रार्थना करणे म्हणजे ‘विघ्न’ उत्पन्न करणे- हा त्यांचा संतोष असतो.
विविध पुतळे उभारताना असलेली रहदारी आणि काही वर्षांनंतर वाढलेल्या रहदारीमुळे आता त्यांचा अडथळा होतो आहे असे समजले तरी त्या महापुरुषांचे अनुयायी पुतळा हलवू देत नाहीत. आपणहून तो दूर करणे सोडाच; कारण- ‘विघ्नसंतोष’! समाजातल्या सर्व स्तरांत, सर्व जातीजमातींत, सर्व स्त्री-पुरुषांत हा विघ्नसंतोष भिनला आहे. आपण सर्व एकमेकांसाठी ‘स्पीडब्रेकर’ बनलो आहोत. आपण सर्व टोपलीतले खेकडे झालो आहोत. कुणी वर जातो आहे? खेचा त्याला! टोपलीतच ठेवा.
आपल्याला आपल्या आसपासच्या तारुण्याला उभारी द्यायची आहे. त्याआधी आपल्याला स्वत:चे तारुण्य टिकवायचे आहे. ज्ञानाला सलाम करायचा आहे. अनुभवाचे कौतुक पुरे झाले. अनुभव कधीच धोका पत्करत नाही. आणि धोका पत्करल्यावाचून यश नाही. आयुष्यातली सगळी मजा धोका पत्करण्यात आहे. धोका न पत्करता जगणे आणि आत्महत्या करणे- सारखेच आहे. तरुणांच्या नवनवीन कल्पनांना वैचारिक आणि आर्थिक पाठिंबा त्वरित मिळायला हवा. पुढचे आयुष्य त्यांचे आहे. ८० वर्षांचे पंतप्रधान अत्यंत धोकादायक अशा अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता देतात तेव्हा त्यांच्या धोक्याशी त्यांच्या वयाचे गणित बरोबर असते. जगात जपान आणि जर्मनीसारखी अतिप्रगत राष्ट्रे अणुऊर्जेचे प्रकल्प धोकादायक असल्याने बंद करत असताना आपल्यासारखे ढिसाळ कार्यपद्धती असणारे देश असे प्रकल्प कधीही नव्हते अशा क्षमतेचे उभारायला निघाले आहेत. काय म्हणावे याला? साऱ्या जगात उत्तम सूर्यप्रकाश असणारा आपला देश सौरऊर्जेबाबत पश्चिमेकडून काही ज्ञान मिळते का, अशी वाट बघत बसला आहे.
तेव्हा आपण आधी आपल्या कुटुंबापासून सुरुवात करू. एखादी छान कल्पना कुणी मांडली तर तिचे कौतुक करू. धोपट मार्ग सोडून कुणी जात असेल तर त्याला मदत करू. समजा, तो अडचणीत आला, तर ‘सांगत होतो नको करू म्हणून!’ असे कुजके न बोलता त्याला अगर तिला उठवून, आधार देऊन परत मार्गस्थ व्हावयास मदत करू. आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या लहान मुलांकडे विस्मयाने पाहू. ती कशी वागतात व बोलतात, हे पाहत त्यांच्याकडून खूप शिकू या. त्यांना कमीत कमी उपदेश करू या.
‘विघ्नसंतोष’ हा समाजाला मिळालेला शाप आहे. भले आपला कुणी शत्रू असेल, पण समाजोन्नतीसाठी काही चांगले करीत असेल तर आपण त्याच्याबरोबर राहून त्याला पाठिंबा दिला पाहिजे. हलवायाशी भांडण असले तरी मिठाईशी भांडण काय कामाचे? मिठाई चांगली असेल तर चांगलीच म्हणायची. आधीच ठरवायचे नाही की, या हरामखोराची मिठाई चांगली असणे शक्यच नाही. अशाने आयुष्यातली मजा जाते. आपल्याही आणि हलवायाच्याही! चांगल्याला चांगले म्हटले तरच ते करणाऱ्याला उभारी देते.. उत्साह द्विगुणित होतो.. वाल्याचा वाल्मीकी होऊ शकतो. पाहा करून.. आयुष्य मजेत जाईल!!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 1:01 am

Web Title: troublemaker
टॅग : Society
Next Stories
1 लोढणी टाका
2 परमार्थ पुरे, स्वार्थ साधा!
3 धर्म सोडा, धार्मिक व्हा!
Just Now!
X