16 January 2021

News Flash

अरतें ना परतें.. : तुकोबांचा डंख

तुकोबा अगदी पहिल्यांदा कधी भेटले असावेत, सांगता यायचं नाही.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण दशरथ बांदेकर

कवी आणि कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर हे मराठी साहित्यातलं एक आघाडीचं नाव. या पाक्षिक सदरात ते व्यक्त होणार आहेत.. भोवतालच्या व्यामिश्र घटना-घडामोडींबद्दल!

कवी अरुण कोलटकर एकदा अशोक शहाणेंशी बोलताना सहज म्हणाले, ‘‘विठोबाशी माझी डायरेक्ट ओळख नाही; पण मी तुकारामाला ओळखतो अन् तुकारामाची नि विठ्ठलाची चांगलीच ओळख आहे.’’ वरकरणी हे विधान कुणालाही चमकदार वाटेल, पण त्यामागचा लक्ष्यार्थ ध्यानात घेतला तर तुकोबाच्या संवेदनेशी स्वत:ला जोडून घेऊ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या बाबतीत हे खरं आहे असं म्हणावं लागेल. तुकोबांना विठ्ठलाचे पिशें लागले होते. पण तुकोबाच्या अभंगांशी जवळून परिचय झालेल्या अनेकांना दस्तुरखुद्द तुकोबाचे पिशें लागले असल्याचे दिसून येईल. कोलटकरांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘मरण पुढय़ात उभं ठाकलेलं असताना माणसाने मोठय़ाने हसावं तशी तुकारामाची कविता आहे.’’ ‘तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा। जाऊं त्या माहेरा निजाचिया।। ’ असं म्हणणाऱ्या तुकोबाच्या बाबतीत हे नक्कीच पटण्यासारखं आहे.

तुकोबा अगदी पहिल्यांदा कधी भेटले असावेत, सांगता यायचं नाही. पण घरात आजोबांची एक जीर्ण गाथा होती; म्हटलं तर ती पहिली ओळख. नावापुरती तरी. म्हणजे तुकाराम नावाचा एक संत आणि त्याने लिहिलेले हे पुस्तक, इतपत किमान. त्यात काय आहे वगैरे ते पुढे खूप नंतर कळलं. थोडी अक्षरओळख झाल्यावर मग घराच्या आडव्या तुळयांवर चुन्यानं लिहिलेल्या ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।। ’ किंवा- ‘शांतीपरते नाही सुख। येर अवघेचि दु:ख।।’  यांसारख्या सुभाषितवजा ओळी याच तुकोबाच्या आहेत हे कळत गेलं. अशा कितीतरी ओळी गाथा प्रत्यक्षात वाचण्याआधी किंवा त्या आपल्या देवघरात असलेल्या तुकारामबावांच्या गाथ्यातील आहेत हे कळण्याआधीच मनात घट्ट रुतल्या गेल्या होत्या. मुंबईकर थोरले चुलते मे महिन्यात गावी यायचे. तेव्हा ही गाथा उघडून त्यातले अनेक अभंग ते सकाळ-संध्याकाळ मोठय़ाने वाचत असत. त्यांच्या तोंडी उठता-बसता, गाववाल्यांशी वा अगदी घरच्यांशीही बोलताना गाथेतील वचने असत. ‘आले देवाचिया मना। तेथे कोणाचे चालेना।’  किंवा- ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असो द्यावे समाधान।।’  यांसारखी बोलता बोलता ते उद्धरत असलेली कैक वचने तुकोबाच्या गाथेतील होती, हे हळूहळू आकळत गेलं. दुसरे मधले मुंबईकर चुलते चतुर्थीला गावी यायचे. त्यांचा गळा गोड होता आणि त्यांना भजनांची विलक्षण आवड होती. आमच्याकडे गणपतीच्या दिवसांत घरोघर भजनं असतात. त्यामुळे अर्थातच काकांना आपली गायनाची हौस भागवायला भरपूर संधी असे. काकांच्या भजनातल्या त्या गाण्यातही तुकोबाचे अनेक अभंग असत.

आजूबाजूला हे असं वातावरण असल्यामुळेच असेल कदाचित, या सगळ्यातून तुकोबा हा कुणीतरी सतत आपल्यातच वावरत असलेला, आपल्या रोजच्या जगण्यात मिसळून गेलेला आपलाच एखादा पूर्वज असावा, असंही काहीतरी आपसूकच मनात रुजत गेलं असणं शक्य आहे. त्यामुळे तुकोबा वेगळा असा गाथेतून वा अन्य पुस्तकातून भेटण्याची, तिथे त्याचा परिचय होण्याची वा वेगळी काही ओळख होण्याची गरजच कधी भासली नसावी. आपण जन्माला आल्यापासून आई, बाप, भावंडं, चुलते-चुलती, शेजारीपाजारी, लंगोटीमित्र जसे आपसूकच आपले झालेले असतात, तसंच तुकोबाचंही माझ्या बाबतीत होऊन गेलं होतं. या जगातला पहिला श्वास घेतल्यापासून, पहिल्यांदा डोळे उघडून दुनियेकडे पाहिल्यापासून, रांगायला लागल्यापासून, पहिलीवहिली पावलं टाकू लागल्यापासून, आईला ‘आई’ नि बाबाला ‘बाबा’ म्हणून हाक मारू लागल्यापासून तुकोबाही आपल्या आसपासच वावरत होता. मी बोलत असलेल्या मालवणी बोलीभाषेत तो होता, वाडवडिलांपासून माझ्यापर्यंत चालत आलेल्या आमच्या सांस्कृतिक जगण्याचा भाग असलेल्या सणा-उत्सवांत होता, भजना-कीर्तनांत होता, खाण्यापिण्यात होता, जातीपातींत होता, ओव्यांत आणि शिव्यांतही होता. जणू तो कुणी वेगळा नव्हताच. माझ्याच रक्तातून अविरतपणे वाहत असलेला तो एक नैसर्गिक घटक होता.

तुकोबापर्यंत घेऊन जाणारी दुसरी गोष्टही आजोबांशीच जोडलेली. आजोबा मी जन्माला येण्याआधीच या जगातून निघून गेलेले. पण त्यांच्याविषयी लहानपणापासून घरच्यांकडून नि गावातल्या जाणत्यांकडून अनेक किस्से ऐकत आलेलो. म्हणजे नंतरच्या आयुष्यात मला कळलेल्या तुकोबाच्या आयुष्यासारखंच आज्याचंही झालं असावं बहुधा. थोडीफार तीव्रतम संवेदना आणि डोक्यात कसलं तरी खूळ असलं की सांसारिक जगण्याचं दुसरं काय होणार? अशांना मग विठूच आपला वाटणार! आजोबांचंही तसंच काहीसं झालं असावं. घरातल्या कटकटी अस झाल्या की त्यांचं विठोबाला भेटायला जाणं ठरलेलं असे. ते अचानक गायब होत आणि कधीतरी महिन्या- दोन महिन्यांनी गावात येत. शेवटी शेवटी तर ते घरामागच्या डोंगरातच जाऊन राहिले होते म्हणे! चतुर्थीच्या भजनांमध्ये ते तुकोबाच्या अभंगांच्या चालीवर स्वत: रचलेले अभंग गात असत, ही आठवण तर मला नेहमीच त्यांना नि मलाही तुकोबाशी जोडून घेणारी वाटत राहते. भजनीबुवा असलेले काका गायचे त्यातले काही अभंग हुबेहूब तुकोबाच्या अभंगांसारखे असलेले, पण खरं तर तुकोबाचे नसलेलेही होते, हे नंतर मला कळलं. पण ते दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून गाथा घरात बाळगलेल्या आपल्या आज्याचेच आहेत, हे काकांकडून कळल्यावर भलतंच आश्चर्य वाटलं होतं; आनंदही झाला होता तितकाच. त्याच दरम्यान ‘ट ’ला ‘ट’ जुळवीत मीही कविता करू लागलो होतो. त्या इथं तिथं मासिका-पेपरांतून छापून येऊ लागल्या होत्या. वडलांना, चुलत्यांना, गावातल्या काहींना ते कळल्यावर त्यांची हीच पहिली प्रतिक्रिया असायची- ‘‘आज्याच्या वळणार गेलो दिसतां! त्येंका पण असोच नाद होतो कवनां करूचो!’’ मला ही गोष्ट नेहमी सुखावणारी वाटत असे. आपण तुकोबाचा वारसा गिरवू पाहणाऱ्या आज्याशी कवितेच्या या धाग्यानं जोडले गेलोत ही जाणीव मनाला फुलवणारीच होती.

अक्षरांचं बोट धरून चालायला सुरुवात केल्यावर काही वर्षे उत्साहाने कविता लिहिल्या; पण लवकरच तुकोबांचा हा वारसा निभावून नेणं आपल्यासारख्या येऱ्यागबाळ्याचं काम नाहीये, हे लक्षात येत गेलं. पहिलं म्हणजे- आपलं अवघं आयुष्य त्यातल्या कोनाकंगोऱ्यांसहित सामावून घेईल अशी कविता लिहिता येणं किती अवघड आहे याची जाणीव होऊ लागली. कविता हा विलक्षण आत्मनिष्ठ प्रकार आहे हे तर होतंच, पण त्यासाठी तुमचं सतत स्वत:च्या आत डोकावत राहणं, आपल्या नेणिवेच्या तळघरात दडलेले चित्रविचित्र आकार नि आवाज धुंडाळत बसणं नि त्यांचे अर्थ लावू शकणारी खास स्वत:ची अशी भाषा शोधणं ही भलतीच दमछाक करणारी गोष्ट होती. बाहेरच्या वर्तमानातील दाब वाढत जात असताना आपल्याला धड आपलंही काही शोधता येत नाहीये की बाहेरच्या कोलाहलाविषयीही बोलता येत नाहीये अशी एक चमत्कारिक जाणीव मला होऊ लागली होती. अशा काळात आपलं कवी असणं ही ओळख टिकवून ठेवणं, त्यासाठी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ म्हणत स्वत:शीच संघर्ष करीत दैनंदिन जगण्यातील आवश्यक ती नैतिकता टिकवून ठेवणं, हीदेखील अवघड गोष्ट ठरत होती. कवी असणं ही कितीही सुखावणारी गोष्ट असली तरी प्रसिद्धी-पुरस्कारांचे मोह टाळून ‘माझीया कविकुळा बोलू लागेल’ असं म्हणत कवीपण शाबूत राखणं कठीणच होतं. त्यासाठी तुकोबासारखंच अंतर्बा पारदर्शक असणं गरजेचं असतं; जगणं आणि लिहिणं एकच असावं लागतं. त्याचाच तर माझ्यापाशी अभाव होता.

आता तर पक्कं कळून चुकलंय की, तुकोबांचा वारसा जपायचा तर निव्वळ कवितेचा नव्हे, तर माणूसपणाचाही वारसा जपता यायला हवा. तुकोबाच्या कवित्वाशी जोडून घ्यायचं तर तुकोबाच्या आत्मसंघर्षांशी जोडून घेता यायला हवं. तुकोबांच्या संवेदनेशी नातं जोडायचं तर आपलं मीपण संपवून त्याच्यासारखं आकाशाएवढं होता यायला हवं. यातलं काहीच आपल्यापाशी नसताना तुकोबाचा डंख माझ्यात भिनलाय, म्हणत नुसतंच कवी म्हणून मिरवण्याला काहीच अर्थ नसतो. आपलं मन प्रचंड चंचल आहे; स्खलनशील आहे. भुकेच्या, तृष्णेच्या, भय आणि विकार-वासनांच्या मोकाट जनावरांना जोवर आपण आपल्या शेतातून हुसकावून लावू शकत नाही, तोवर ‘तुका म्हणे, काही न धरावी आस’, हेच खरं असावं.

samwadpravin@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 12:05 am

Web Title: tukobancha dunkh article by praveen dashrath bandekar abn 97
Next Stories
1 केवळ बँक आणि अधिकाऱ्यांवर ताशेरे अन्यायकारक
2 अंतर्नाद : नमन : ‘कजरारे’ ते ‘दिगंबरा’
3 संभाव्य महासत्तांची तौलनिक चिकित्सा
Just Now!
X