News Flash

भारतीपूर

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त दिवंगत कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांच्या प्रतिष्ठेच्या 'मेन्स बुकर प्राइझ'साठी नामनिर्देशित 'भारतीपूर' या कादंबरीतील हा काही अंश.. उमा कुलकर्णी यांनी केलेला त्याचा

| August 31, 2014 01:18 am

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त दिवंगत कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांच्या प्रतिष्ठेच्या ‘मेन्स बुकर प्राइझ’साठी नामनिर्देशित ‘भारतीपूर’ या कादंबरीतील हा काही अंश..
उमा कुलकर्णी यांनी केलेला त्याचा अनुवाद नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रकाशित होत आहे.
एकटाच निघाला की जगन्नाथ वाटेवरल्या तळ्याला वेढा घालून जात नाही. त्यामधूनच उडय़ा मारत जायची त्याची पद्धत. कोवळ्या उन्हाची वेळ. डिसेंबर महिन्यातली थंडी. वेगात चालायला आल्हाद वाटेल अशी हवा. सकाळीच कॉफी-नाश्ता उरकून चिक्कींना ‘श्रीपतीरायांना भेटून येतो’ असं सांगून तो बाजाराकडे निघाला होता. मधूनच हाताला येणारी कोवळी पालवी चिरडून हुंगत चालत असताना त्याच्या मनात गेला महिनाभर घोळणारं सगळं कसं मांडायचं याचा विचार चालला होता. याच विचाराच्या तंद्रीत वेगानं डोंगर उतरत असलेल्या जगन्नाथाला बेलतंगडी नरहरीराय सामोरे आले. डोक्याला मुंडासं, कानात खडे, सुकलेला चेहरा, डोळ्यांत भांबावलेले भाव.
‘कसं काय चाललंय? देवदर्शनाला वाटतं!’
पिशवी आणि छत्री एका हातात घेत त्यांनी नमस्कार केला. शंभर ठिकाणी भ्रमंती केलेली विटकी छत्री, एका कानाच्या पाळीवरचा खडा पडून गेलेला, धुळीनं माखलेली अनवाणी पावलं.
‘नाही! असाच.. बाजारात म्हणून..’
ते पुढं काहीतरी नीट समजण्यासारखं बोलतील म्हणून जगन्नाथ तसाच उभा राहिला. नरहरीराय खिशात हात घालून काहीतरी शोधत होते. जगन्नाथ गोंधळात पडला. यांना घरी नेऊन कॉफी-खाणं दिल्याशिवाय तसंच जाऊ द्यावं की देऊ नये?
‘घराकडं चला. कॉफी-खाणं घ्या. मी येतोच दुपापर्यंत..’
जगन्नाथानं जरा घाईत असल्याचं दाखवत, लुंगी आवरत नरहरीरायांकडे पाहिलं. ते धडपडत दोन्ही खिसे शोधून पाहत होते. ते काय शोधत असतील याचा जगन्नाथाला अंदाज येईना. शेवटी त्यांनी खिशातल्या कागदांमधून एक कागद काढून त्याच्यासमोर धरला. जगन्नाथाला त्याचा अर्थ समजला नाही. जणू काही बोलणं हाच अपराध आहे असा चेहरा करून ते म्हणाले, ‘तुमच्या वडिलांच्या काळात घेतलेलं कर्ज अजून फेडलं नाही म्हणून तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे म्हणा! म्हणून तुम्ही असं लिहिलं असेल. पण मी तरी काय करू? पाच मुलांची लग्नं करता करता ही अवस्था झाली माझी! त्यात यावर्षी पीकही हाताला लागलं नाही.’
नरहरीरायांच्या चेहऱ्यावरील कातरतेचा आता कुठं जगन्नाथाला खुलासा झाला. याच मजकुराची शंभर-दीडशे पत्रं लिहिताना त्याचंही मन कदाचित शांत असेल असंही नाही.
‘छे: छे:! तसं नाही, नरहरीराय! तुम्ही घेतलेलं कर्ज द्यायची गरज नाही, म्हणूनच मी लिहिलंय ते! आमचे अप्पा आणि त्यानंतर आमच्या रायटरनी हा कर्ज द्यायचा व्यवहार चालवला होता ना! व्याज वसूल करायचं, त्यासाठी मंजुनाथाची शपथ घालायची- या सगळ्या गोष्टी मला आवडत नाहीत. इतरांनाही मी असंच लिहिलंय. घराकडं जा तुम्ही. आपण नंतर बोलू यावर!’
नरहरीरायांच्या केविलवाण्या चेहऱ्यावर जगन्नाथाचं बोलणं समजल्याचे काहीही भाव नव्हते. ते दंतविहीन तोंडाचं बोळकं हसायचं म्हणून हसलं, इतकंच. काय बोलावं, याचा विचार करत ते तसेच उभे राहिले. शेवटी जगन्नाथच ‘घरी जाऊन आराम करा..’ असं सांगून पुढे निघाला.
सगळ्या प्रॉमिसरी नोट्स फाडून टाकताना जगन्नाथानं याचाही विचार केला होता. कर्जाचा हा संबंध पूर्णपणे तोडून टाकणं म्हणजे या लोकांबरोबरचे जुने संबंध तोडून टाकणं! यांच्याशी संबंध राखायचे म्हणजे नवं काहीतरी निर्माण केलं पाहिजे. पण नेमकं काय निर्माण करायचं? त्याला ठाऊक होतं, चिक्कींनी दिलेली कॉफी पिता पिता नरहरीराय चकित होऊन विचार करत राहतील- हजारो रुपयांचं कर्ज जगन्नाथानं का सोडलं असेल? यानंतर कर्ज हवं असेल तर काय करायचं? चिक्कीही घाबऱ्या झाल्या असतील. आपल्या उशाशी आपल्या नकळत आणखी एक मंतरलेला ताईत ठेवायला लावतील. नवस बोलतील. आपण देवळाचं विश्वस्तपद सोडून दिल्याचं त्यांना समजलं आहे. गावातही याची बरीच चर्चा चालली आहे. मंजुनाथाच्या दर्शनासाठी राष्ट्रपती आले होते तेव्हा त्यांच्या भेटीसाठी जगन्नाथालाही निमंत्रण होतं. चिक्की किती आनंदल्या होत्या! पण जगन्नाथानं ‘येणार नाही’ म्हणून सांगितलं तेव्हा त्या हळहळल्या होत्या. त्याच दिवशी त्यानं देवळाच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला होता.
धावतच उतार उतरून जगन्नाथ रस्त्यावर आला. इथून फर्लागभर चालून गेल्यावर बाजार सुरू होतो. टोल गेटापासूनच वेगळ्या वासांना सुरुवात होत होती. दोशाचा वास भरलेली हॉटेलं, चेहरे उभे किंवा आडवे करून दाखवणाऱ्या आरशांची हजामतीची दुकानं.. तिकडं कुठंही न पाहता जगन्नाथ चालत राहिला. तरीही तो दिसला की बघणारे थांबत होते. बसलेले उठून उभे राहत होते. ‘हे काय! गाडीऐवजी पायीच चालत आलात?’ अशी चौकशी करत होते. काहीजण तर विनाकारण त्याच्या मागोमाग चालत येत होते. काहीजण आपण इथं आहोत याचा विनाकारण संकोच वाटून घेत होते. बहुतेक सगळे ‘देवदर्शनाला वाटतं!’ हे मात्र हटकून विचारत होते.
वक्कलिगांचं विद्यार्थी वसतिगृह ओलांडून जगन्नाथ पुढं निघाला. त्याच्या शेजारीच श्रीमंजुनाथ कृपापोषित हायस्कूल. मुलं ग्राऊंडवर व्हॉलीबॉल खेळत होती. अजूनही हायस्कूल वाढलं नाही. फार फार तर दोन खोल्या वाढल्या असतील. दोन आठवडय़ापूर्वी गावचे आमदार गुरप्पागौडांनी ‘तुमच्या आईच्या नावानं एक िवग बांधून द्या,’ असा आग्रह केला होता. तेव्हा त्यानंही ‘बघूया’ म्हणून विषय बदलला होता. ‘राष्ट्रपती येणार म्हणून रस्त्यावर घातलेल्या लाल मातीचा खर्च अनावश्यक होता,’ असा वाद घालायला जाऊन तो गप्प बसला होता. हायस्कूलच्या मागच्या बाजूला ट्रॅव्हलर्स बंगला. मागं गांधीजी गावात आले होते तेव्हा त्यांना इथं उतरवायची व्यवस्था केली होती म्हणे. पण गांधीजी आले ते सरळ शूद्रांच्या वस्तीवर गेले! त्यावेळी जगन्नाथाचे वडील गावचे मुख्य असल्यामुळे त्यांच्यावरही तिथं जायची पाळी आली. त्यानंतर पंचगव्यानं शुद्धी केली म्हणा! ती सगळी कथा श्रीपतीरायांकडून विस्तारानं ऐकलेली! फक्त गांधीजी हे एकटेच असे होते, की ज्यांनी मंजुनाथाचं दर्शन घेतलं नाही! आता तर असा एकही मंत्री नाही, ज्यानं या देवस्थानाचा प्रसाद घेतला नाही.
इथून पुढे बाजारपेठ दरुगधीनं भरलेल्या कितीतरी रस्त्यांत विभागली होती. बाजारपेठ खोलगट भागात वसली होती. श्रीमंजुनाथस्वामीच्या देवालयामुळे तयार झालेली. कुठलाही विचार न करता अनाहूतपणे कुठं कुठं पसरलेली. रस्त्याच्या वळणावर लघवीचा वास. िभतीवर कित्येक वर्षांपासून असलेली लिव्हर क्युअरची जाहिरात. ‘गुरप्पागौडांना मत द्या’ असं आवाहन करणारं अलीकडचं लेखन. दुकानांसमोर वावरणारे शेतकरी. कोळी समाजातल्या बायका. त्यांची गुडघ्यापर्यंतची लुगडी. कानांत बुगडय़ा. नाकांत मुगवटं. करकच्चून बांधलेल्या अंबाडय़ावर माळलेले गजरे. देवळात एखाद्या लग्नासाठी किंवा भूतरायाचा एखादा नवस फेडायला किंवा करायला आलेल्या! कदाचित लुगडी-पोलक्याची कापडं आणायला म्हणून आलेल्या! कारण काहीही असो, बलगाडय़ा जुंपून आलेली आणि मोठय़ा कौतुकानं बाजारात फिरणारी माणसं. इंग्लंडमध्ये पाच र्वष राहिलेला जगन्नाथ यातलं काहीही विसरला नव्हता. तर मग काहीच बदल झालेला नाही की काय? की आपल्याला तो दिसत नाही म्हणायचं?
यानं बघितलं तर? बघितलं तर उठावं लागेल.. दुकानांमध्ये बसलेले थोडे अवघडले होते. पण तिकडं न बघता जगन्नाथ झपाझप पुढे चालत राहिला. अधूनमधून टाईट पँटी दिसत होत्या. देवदर्शनासाठी आलेल्यांची कदाचित मुलं असतील म्हणा! पण दुकानांच्या कट्टय़ांवर बसलेले मात्र सगळे अगदी जुनेच! सकाळी खाल्लेले पोहे किंवा दोसे पचायची वाट बघत बसलेले! यांच्या बायका संपाकघरात धुरानं भरलेल्या चुलींपुढे बसलेल्या असतील. हे इथं बाजारात परस्परांचा सहवास अनुभवत मुकाटय़ानं बसलेले. देवदर्शनासाठी येणारे नवे चेहरे न्याहाळत. अशा प्रकारे एकमेकांकडे हजेरी लावून जेवायच्या वेळी घराकडे किंवा घरात अडचण असेल तर देवळाकडे जेवणासाठी जातील. एकूण काय, मंजुनाथावर विसंबून जगत असतात ही माणसं! जवळपासच्या कुठल्यातरी गावात यांची खाचरं असतील. त्याच्या चिखलात कुणीतरी दुसराच शेतमजूर राबत असेल. भूतरायाला घाबरून यांना तो खंड देत राहतो. भोपळे, काकडय़ा आणि केळीचे घडही देतो. कसंबसं उदरभरण होत राहतं. कुणीतरी बाळंत होतं, कुणीतरी मरतं! दरवर्षी काही नाही म्हटलं तरी पाच-दहा सोयर, पाच-दहा सुतकं, पाच-दहा लग्नं.. एकूण काय, काळ पुढे चालत राहतो..
जगन्नाथ घाबरा झाला. मनातल्या मनात मार्गारेटला लिहीत असलेल्या पत्रात त्यानं लिहिलं, छ्रऋी ँं२ ूीं२ी ि३ ुी ँी१ी. मंजुनाथस्वामी या जीवनाचा कॅन्सर बनला आहे. ही बाजारपेठ म्हणजे त्याच्यावर वाढलेला कॅन्सर आहे..
श्रीमंजुनाथ बस सर्वसिची पहिली बस शिवमोग्याहून येऊन धूळ उडवत रस्त्याच्या टोकाला जाऊन उभी राहिली. ही अशी प्रत्येक रस्त्याच्या कडेला उभी राहते. शेंडी राखलेली आणि पंचा नेसलेली ब्राह्मण पोरं तिथं गर्दी करतात. आलेल्या प्रवाशांना त्रास देतात- ‘आमच्या घरी चला, आमच्या घरी चला.’ यात्रेकरूंना उतरण्यासाठी जगन्नाथाच्या वडिलांनी बांधून दिलेली धर्मशाळा आहे; पण ती अपुरी पडतेय. किती द्यायचे, वगरे व्यवहार ठरला की मुलं यात्रेकरूंची ट्रंक उचलतात. नदीत अंघोळ, देवाचं दर्शन, पितरांना तर्पण, पुण्यस्थळांचं दर्शन, डोंगरावरच्या भूतरायाला नवेद्य याबरोबरच परतीचं रिझर्वेशन या सगळ्याची खात्री देऊन आपल्या घरी घेऊन जातात. त्यातही काही इरसाल मुलं एकाच घरची असली तरी वेगवेगळ्या घरची असल्यासारखं दाखवून यात्रेकरूंची फसवणूकही करतात. यात्रेकरू बायको-मुलांना घेऊन त्यांच्या धुरानं भरलेल्या घरी जातात. चार-दोन दिवस मुक्कामही करतात. अशा प्रकारे दररोज नवनवे चेहरे बघत असलेली अगदी जुनी बाजारपेठ आहे ही!
‘नमस्कार, जगन्नाथराव! स्वारी देवदर्शनाला निघालेली दिसते!’
जगन्नाथानं उजवीकडे वळून पाहिलं. हे आपल्याला चिडवणं आहे की इथली नेहमीचीच बोलायची पद्धत म्हणायची ही? त्याला हटकणारे होते- गावच्या पंचांगाचे जनक नागराज जोईस. राष्ट्रपती आले होते तेव्हा यांनीच त्यांचे संस्कृतमध्ये गुणगान करणारे श्लोक रचून, त्याची पत्रकं छापून वाटली होती. त्यांचा मुलगा शिवमोग्यात वकील आहे. मागं एकदा मठाच्या स्वामींनी त्यांनी पारंपरिक पद्धतीनं गणित न करता इंग्लिश पद्धतीनं गणित करून पंचांग काढलं म्हणून बहिष्कार घातला होता. त्याविरुद्ध लढा देऊन आपण कसं जिंकलो, याविषयी ते नेहमीच सांगतात. आपण आधुनिक असल्यामुळे आपल्याला हे आवडतं, हे या कोत्या बुद्धीच्या जोईसांना चांगलं ठाऊक आहे! हे नागराज जोईस ‘देव नाही’ असंही वादविवादात सिद्ध करू शकतात! मंजुनाथाचे मुख्य पुजारी सीतारामय्या हे यांचे भाऊबंद. त्यामुळे यांना पोटशूळ असणं साहजिकच आहे म्हणा!
बळेच बोलावलं म्हणून जगन्नाथ त्यांच्या घराच्या पायऱ्या चढून ओसरीवर जाऊन बसला. नागराज जोईसांचा धाकटा मुलगा एकटाच घरी परतला. त्याच्याबरोबर यात्रेकरू नव्हते. जोईसांचा चेहरा पडला. बळ्ळारीहून एक कुटुंब आलं आणि उडुपांच्या घरी गेलं असं त्यानं सांगितलं. त्याचं ‘असू दे! पुढच्या बसची वाट पाहा,’ असं सांगून समाधान करत त्यांनी जगन्नाथासाठी आतून खुर्ची आणायची तयारी दर्शवली. पण जगन्नाथनं नकार देऊन तो चटईवरच बसला. आधीच ‘कॉफी नको’ म्हणून सांगत त्याने त्यांच्या शिवमोग्याच्या वकील मुलाच्या प्रॅक्टिसची चौकशी केली. ‘या भागात सगळीकडे भूतरायाचा अंमल चालतो ना! वकिलांची प्रॅक्टिस कशी चालणार?’ जोईसांचा स्वर तक्रारीचा होता. कानातल्या चमकत्या खडय़ांमुळे आणखी लाल दिसणारा आपला चेहरा त्याच्यापाशी नेत ते जवळच बसले. ते पुढं बोलू लागले. आता त्यांचा आवाज एखादं गुपित सांगावं तसा झाला होता. आज त्यांना बराच निवांतपणा असावा. डोकंही चकचकीत भादरलेलं दिसत होतं. सोन्यात गुंफलेली रुद्राक्षाची माळ गळ्यात रुळत होती. यात्रेकरूंना आकर्षति करणारी ही महत्त्वाची साधनं! हे सोनं, हे कानांतले लखलखते खडे, हे बोलण्यातलं कौशल्य, अगदी जवळ जाऊन खासगीतल्यासारखं बोलायची ही पद्धत!
‘श्रीमंजुनाथाची स्थापना परशुरामानं केली म्हणतात, हे काही खरं नाही. मी माझ्या मनचं नाही सांगत! कुणा संशोधकानं िलग बाजूला करून पाहिलं तर सहज समजेल ते! अलीकडे तिथं भेगही पडली आहे. फक्त तीन इंच खोल आहे. का ठाऊक आहे? यदुतीर्थस्वामींनी त्याची स्थापना केलीय. मला विचारा ना! सांगतो मी! मी भाऊबंदांच्या मत्सरापोटी बोलतोय म्हणून कुणी यावर विश्वास ठेवणार नाही म्हणा!’
नागराज जोईस आणखी जवळ सरकले. डोळे विस्फारून आणखी कानाशी येत म्हणाले, ‘तुम्ही शिकलेले आहात. तुम्हाला मी काय सांगतो ते समजेल. अद्वैत सिद्धान्तात भूताराधनेला जागा कुठं आहे? तुम्हीच सांगा! आता खरी पूजा कुणाची होते? खरं सांगा!’ जोईसांचा आवाज आणखी खर्जात गेला. त्यांची नजर निष्ठूरपणे जगन्नाथवर खिळली.
‘बोला ना! लोक कुणाला घाबरतात? राष्ट्रपतींनीही पूजा केली ती कुणाची? मंजुनाथाला काय मिळावं आणि काय नाही, हे कोण ठरवतं?’
जोईसांनी काही न बोलता काही क्षण जगन्नाथाकडे पाहिलं.
‘श्रीमंजुनाथाच्या नावानं जे काही दिलं जातं ते भूतरायालाच ना? तुम्हीच सांगा, त्याला लाल भाताचा नवेद्य कशासाठी? त्याचे गण लाल कपडे का नेसतात? मंजुनाथाचा प्रसाद म्हणून भूतनाथ कपाळाला आणि छातीला लाल कुंकू लावतो. ते लालच असलं पाहिजे, हे कशाला? याला आधार काय? इथं विभूतीऐवजी कुंकवाचा प्रसाद दिला जातो. त्याचा अर्थ काय?’ जोईसांनी आपल्या कपाळावरचा मंजुनाथ+भूतनाथाचा प्रसाद म्हणून लावलेल्या कुंकवाकडे बोट दाखवलं. काही क्षण मौनात गेल्यावर तेच पुढं म्हणाले, ‘भूूतरायाला लागतो तो रक्ताचा बळी. इथं प्रश्न येतो- या भूतरायाचा आणि मंजुनाथाचा संबंध काय?’
जोईसांनी ओसरीवर टांगलेला मंजुनाथाचा फोटो दाखवला. मुठीच्या आकाराचं िलग झाकून टाकणारा सौम्य चेहरा. त्या चेहऱ्यावर वीतभर उंचीचा सोन्याचा मुकुट. जगन्नाथ चित्राकडे लक्ष देऊन पाहत असल्याचं बघून जोईसांनी त्या मुकुटाचंच उदाहरण घेतलं.
‘आता हा मुकुट. तुम्ही लहान असताना तुम्हाला झटके यायचे. तीन दिवस तुमची शुद्ध हरपली होती. माझ्या मांडीवर घेऊन मीच मृत्युंजय जप केला होता. सोबत सुबराय अडिगही होते. त्यांना विचारा हवं तर! जोरात चिमटलं तरी तुम्हाला जाग आली नाही. तेव्हा मीच तुमच्या आईंना सांगून मंजुनाथाला सोन्याचा किरीट करून द्यायचा नवस बोलायला लावला! जर मला देवळाच्या समृद्धीची काळजी नसती तर मी असा नवस बोलायला सांगितलं असतं का? पण मंजुनाथाच्या मस्तकावर हा किरीट आला तरी तुमचा जीव वाचवायला पूजा करावी लागली ती भूतरायाची! याचाच अर्थ असा की, मंजुनाथाच्या नावाखाली सगळं काम करतो तो भूतरायाच! श्रोत्रियानं या भूतरायाची पूजा करणं योग्य आहे का?’
उदाहरणासाठी किरीट घेतल्यामुळे जगन्नाथाच्या आईलाच अपराध्याच्या जागी उभं केल्यासारखं झाल्याचं लक्षात आलं आणि आपल्या बोलण्याच्या चलाखीवर ते स्वतच चकित झाले. परिणामी पुढं काय बोलावं, हे त्यांना सुचेना. काहीतरी बोलायचं म्हणून ते म्हणाले, ‘एकूण काय, अशी लोकांची श्रद्धा! अशीच श्रद्धा नसती तर राष्ट्रपती इथं आले असते काय? त्यांना हृदयरोगाची भीती आहे. इथून परतत असताना त्यांचा चेहरा कसा खुलला होता, पाहिलंत ना! माझं संस्कृत काव्य बघून त्यांना फार आनंद झाला. त्याला फ्रेम घालून दिली मी! तेही ती फ्रेम विमानातून घेऊन गेले!’
जगन्नाथाला आतून हसू येत होतं. ते आवरत त्यानं विचारलं, ‘श्रीमंजुनाथाचा आणि भूतनाथाचा काहीतरी संबंध आहे म्हणालात ना? काय तो?’
‘या प्रदेशातले मूळ रहिवाशी आहेत ती गुडघ्यापर्यंत पंचा नेसणारी माणसं! मेंढी-बकरी खाणारी! त्यांचा देव हा भूतराया. ब्राह्मण यतींनी या भूतरायावर मंजुनाथाची स्थापना केली आणि या प्रांताचे मूळनिवासी आपल्याला दबून राहतील असं केलं.’
‘म्हणजे याचा अर्थ असा झाला की, आता भूतराया सगळे निकाल या मूळ रहिवाशांच्या बाजूनंच देतोय! नाही का!’
चलाख जोईसांना जगन्नाथाच्या बोलण्यातली खोच लक्षात आली होती. त्याचबरोबर आपलं बोलणंही कुठल्या कुठं गेलं, हे जाणवून ते म्हणाले, ‘काहीही म्हणा! हा देव भलताच जागरूक आहे हे खरं! पूजा करणाऱ्यांनी ती निष्ठेनं केली पाहिजे, एवढंच! मंजुनाथ फक्त निमित्तमात्र राहू नये, एवढंच माझ्या बोलण्याचं तात्पर्य!’
जोईसांची बोलण्यातली कसरत बघून जगन्नाथ उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘यावर तुम्ही एक लेख लिहायला पाहिजे!’
‘तुमचा पािठबा पाहिजे! मी मंजुनाथाचा महिमा लिहिला तोही तुमच्या मातोश्रींनीच प्रकाशित केला. तुम्हाला हवी का त्याची एक प्रत? देऊ?’
‘नको! आहे घरात..’ म्हणत जगन्नाथ निघालाच. त्यांचं ‘हे काय! कॉफी न पिताच निघालात!’ हे बोलणं फारसं ऐकून न घेता, ‘असू द्या.. पुन्हा भेटू..’ म्हणत जगन्नाथ पायऱ्या उतरून रस्त्यावर आला.
चक्रव्यूहासारखे रस्ते. काहीही निर्माण होणार नाही इथं! मंजुनाथाचा महिमा वाढत चालला तसे हे गटारं नसलेले रस्तेही वाढत चालले आहेत. शूद्रांनी महिनाभर इथला मला उचलणार नाही असं ठरवलं तर सगळीकडे एवढी दरुगधी पसरेल, की मंजुनाथाचा गाभाराही त्यानं भरून जाईल! जगन्नाथाच्या अंगावर केवळ या विचारानंच किळस वाटून काटा आला! ब्राह्मण आणि व्यापाऱ्यांचं प्रस्थ असलेल्या या रस्त्यांवर एकाही चांगल्या गोष्टीची निर्मिती होत नाही. का? भारतीपुराच्या मलभर पलीकडे पाथरवट लोक राहतात. चंदनाच्या लाकडात मूर्ती कोरणारे आहेत. दोनच मलांवर चामडय़ाचा कठपुतली खेळ दाखवणारे आहेत. पण भारतीपुराच्या बाजारपेठेत कधीच कसलंच सौंदर्य नव्हतं. असं का? अधूनमधून बांधली जाणारी तोरणं सोडली, राष्ट्रपती आले तेव्हा टाकलेली आणि आता चिखल होऊन राहिलेली लाल माती सोडली तर.. मुलांनी रस्त्यावर केलेली विष्ठा पायाखाली येणार नाही याकडे लक्ष देत जगन्नाथ थोडय़ा रुंद रस्त्याकडे वळला.
या बाजारपेठेची अत्युत्तम रचना म्हणजे नागराज जोईसांनी अनुष्टुभ छंदात रचलेला ‘श्रीमंजुनाथ महिमा’च असणार! जगन्नाथाला हसू आलं. आपण बोलू नये ते बोललो म्हणून स्वत:वर वैतागला असेल तो! आपल्या आईनं प्रकाशित केलेल्या त्या दोन आणे किमतीच्या पुस्तकात जगन्नाथाचा जीव वाचवलेल्या त्या किरीटाचं वर्णन होतं. हे किरीट धारण करणारा मंजुनाथ बालकांना आयुरारोग्य प्रदान करू दे, अशा अर्थाचा एक श्लोक होता आणि मंजुनाथाची सत्ता मान्य करून प्रजेचं रक्षण करणाऱ्या भूतरायाच्या प्रतापाचं वर्णन होतं! ‘रांगोळ्या आणि तोरणांमुळे, भक्तमंडळींच्या प्रभावळीमुळे सुशोभित असलेला मंजुनाथ भिल्ल-किरात, महातपस्वी, अनाथरक्षक जगन्नाथ-माता सीतादेवी यांच्यामुळे या विशाल भूधरेवर ओळखलं जाणारं हे नगर भारतीपूर!’अशा अर्थाचं वर्णन होतं. त्यामुळेच कदाचित इथं काहीही होणं शक्य नाही. नवं काही बनणार नाही. God has made life sterile. … जगन्नाथनं मार्गारेटला लिहीत असलेल्या पत्रात आणखी एक पॅराग्राफ घातला. त्याला तीव्रपणे वाटलं, तिला लिहून खूप दिवस झाले. हे सगळं तिला कळवायला पाहिजे.
‘काही महिन्यांपूर्वी दिल्लीला गेलो होतो. डिअर मार्गारेट, हैदराबादहून विमान निघायची वेळ झाली होती. नेमक्या त्याचवेळी संपूर्ण देशात प्रसिद्धी पावलेला शिर्नाळीबाबा नावाचा एकजण चढला. त्याच्या शेजारी एक प्रसिद्ध वैज्ञानिक बसला होता. बाबाचा परमभक्त. त्याशिवाय विमानात श्रीमंत व्यापारी आणि कुठल्यातरी कॉन्फरन्ससाठी म्हणून आलेले २५ व्हाइस चान्सलर्स होते. शिर्नाळीबाबाचा करिश्मा तूच तुझ्या डोळ्यांनी पाहायला हवास! भक्त विज्ञान्यानं दिवा लावण्यासाठी हात वर केला तर बाबांनी त्यांना थांबवलं! प्रत्यक्ष सौजन्याची मूर्ती! चार-पाच अमेरिकन हिप्पी मुली लगोलग बाबांच्या पाया पडल्या. बाबांच्या मायाजालामुळे त्यांच्या हातात विभूती आली. ती त्यांनी खाऊन टाकली. एअर होस्टेस बाबांच्या पाया पडल्या. या बाबानं केवढी स्पिरिच्युअल शिव्हर्ली कमावली आहे म्हणून सांगू! भक्तानं त्याचे पाय धरायच्या आधीच तो भक्ताच्या डोक्याला हात लावतो! मधाळ हसत हात पसरतो! भक्ताच्या हातात सोन्याचं पदक किंवा विभूती असते. या बाबानं सगळी राजभवनं व्यापून टाकली आहेत. देशभरातल्या लोकांना भजनी लावलं आहे. दरिद्री कंगालापासून राष्ट्रपतीपर्यंत सगळे मानतात, अशी एकमात्र व्यक्ती म्हणजे हा बाबा! सगळ्या वर्णभेदाला छेद देणारं एकमेव सत्य म्हणजे हा बाबा! प्रिय मार्गारेट, देवाचा नाश केल्याशिवाय आपण कधीच क्रिएटिव्ह होऊ शकणार नाही. आपण सगळे देवाच्या गर्भातले भ्रूण असावेत तसे आहोत. अजून आपला जन्मच झालेला नाही इतिहासाच्या मंथनात सापडलेलोच नाही. यातून छेद देऊन बाहेर पडलं पाहिजे..’
……………
‘ए वासू!’
जगन्नाथानं त्याचा हात धरून ओढला. दहा वर्षांत न भेटलेला मित्र हॉटेलमध्ये घुसत होता. तेच फटीत अंतर असलेले दात, गोल चेहरा, त्याच हिटलरकट मिशा! केस कमी झालेत. कपाळावर कुंकू लावलंय. शिवमोग्यात शिकत असताना दोघं रात्र-रात्र जागून क्रांतीच्या गप्पा मारायचे.. मसालापुरी खाताना, काकाच्या दुकानात चहा पिताना! क्रांतीसाठी कुठल्याही त्यागाची तयार असलेला हा मुलगा! तसं पाहिलं तर आपणच भित्रट होतो तेव्हा! बेचाळीसच्या चळवळीत पोलिसांनी कितीही मारलं तरी टपाल कुठं दडवून ठेवलंय, हे वासूनं सांगितलं नव्हतं.
जगन्नाथनं उत्तेजित होऊन त्याचा दंड घट्ट धरला आणि त्याच्या कपाळावरच्या गंधाकडे बघत विचारलं, ‘काय रे ए रास्कल! हे  गंमत म्हणून लावलंस काय?’
वासूनं स्वतला सावरलं आणि उद्गारला, ‘जगण्णा, नाही काय!’
वासूनं पँट आणि बुशशर्ट घातला होता. जगन्नाथच म्हणाला, ‘चल, घरी जाऊया.’ आपण श्रीपतीरायांना भेटायला निघाल्याचा जगन्नाथाला विसरच पडला होता. ‘का रे वासू, इतका का रोड झालास? इथं केव्हा आलास? कुठं असतोस हल्ली? बऱ्याचजणांना विचारलं तरी तू कुठं आहेस, ठाऊकच नाही म्हणत होते सगळे!’
वासूचं लक्ष मात्र दुसरीकडेच कुठंतरी होतं.
‘थोडा कामात आहे. नंतर भेटतो..’
जगन्नाथ एकाएकी निराश झाला. त्याला जेवढा आनंद झाला, तेवढा वासूला झालेला दिसला नाही. शिवाय तो बराच खचलेला दिसत होता. त्याच्या कपाळावरचा मंजुनाथाचा प्रसाद बहुतेक गमतीचा भाग नसावा. जगन्नाथाला क्षणार्धात दोघांमध्ये एक िभत उभी असल्यासारखं जाणवलं. तरीही यातलं काहीही न दाखवता तो म्हणाला, ‘चल रे! कॉफी पिऊ या.’
‘तू या हॉटेलमध्ये येशील?’
‘न यायला काय झालं? ऊल्ल’Donlt be stupid!’
हॉटेलचा मालक जगन्नाथाला बघताच उठून उभा राहिला. कॉफी पीत असलेले काही शेतकरीही उठून उभे राहिले. जगन्नाथाला अवघड वाटलं. गावात आल्यापासून तो पहिल्यांदाच हॉटेलात आला होता. मालकानं स्वत: काळ्या दगडी टेबलावर फडकं फिरवून त्या दोघांना खुर्चीवर बसवलं. जगन्नाथाच्या ओळखीची नोकरमाणसं आत जाऊन बसली. वासू ‘कॉफी’ म्हणाला. मालक स्वत: कॉफी आणायला आत गेला.
‘या गावात तू किती मोठा माणूस आहेस, हे आता तरी समजलं की नाही?’ वासूचा थट्टेचा सूर ऐकून जगन्नाथाला आनंद झाला.
‘काय करतोयस सांग!’ गरम कॉफीचा घोट घेत जगन्नाथनं विचारलं.
‘बी.ए. पुरं केलं नाही, हे तर तुला ठाऊक आहेच. अप्पांनी घराबाहेर काढलं. तेव्हा तू इंग्लंडला गेलास. मी नाटकात शिरलो. नंतर स्वतची कंपनी काढली. ३० हजार कमावले. नंतर गमावलेही. प्रोहिबिशन आलं तेव्हा हातभट्टीची आणून विकली. त्यातही पसा केला. एका शेट्टी मुलीशी लग्न केलं. अप्पांनी सांगितलं, माझा चेहरा बघायचा नाही. आता तीन मुलं आहेत. कितीही क्रांती-क्रांती म्हटलं तरी घरी आल्यावर बायको संपाक करायला तांदूळ नाही म्हणायला लागली तर काय करायचं? ड्रग-स्टोअरच्या नावाखाली काही दिवस ब्रँडी विकली. त्यानंतर बॉम्बे शो केला. माझ्या कंपनीतल्या मुलींसाठी येणारे सगळे पोलिटिशियन्स नंतर माझे मित्र झाले. ते खोटारडं जगणं नको म्हणून तेही सोडलं. आता मला निवांतपणे राहायचं आहे. म्हणून इथं आलोय. भूतनाथाचीही आज्ञा झालीय- एक स्वीट मार्टचा स्टॉल सुरू कर म्हणून! तेच करतोय.’
‘तुझं जीवन म्हणजे एक पिक्चरस्क नॉवेल होईल बघ! मला सांग, तुझा खरोखरच भूतरायावर विश्वास आहे?’
‘काहीतरी एक मिस्ट्री आहे, हे तर तूही मानतोसच ना!’ वासूला कुठंतरी जायची घाई असल्याचं दिसत होतं. ‘जीवन म्हणजे हजार अडचणी आल्याच ना! तू तुझं सांग. तू गावी आल्याचं, जमिनींची व्यवस्था लावतोयस वगरे समजलं. कुठल्याशा इंग्लिश मुलीशी लग्न केलंस, अशी इकडं बातमी आहे. खरं आहे का?’ कॉफी संपवून वासूनं सिगारेट शिलगावली.
‘एका मुलीबरोबर राहतोय खरा! पण मी तिच्याशी लग्न केलेलं नाही.’
‘गुड! हा तर भलताच शहाणपणा! एकूण काय, तू इंग्लंडमध्ये मजा मारलीस तर!’
वासूच्या तोंडून ‘मजा’ शब्द ऐकताना जगन्नाथाच्या सगळ्या भावना पार कोळपून गेल्या. कधीकाळी अगदी जवळचा असलेला वासू कुठला आणि हा कोण? आणि मी तरी कोण? परस्परांशी संवादही होऊ शकणार नाही. मी आणि मार्गारेट एकमेकाशी नवरा-बायकोसारखे राहतो, हे खरं. लग्न केलं नाही, हेही खरं. पण हा वासू म्हणतोय तशी त्यात फक्त मजा नाही. त्यात फक्त शहाणपणाही नाही. त्यापलीकडचं काहीतरी आहे. पण हे वासूला कसं समजावून सांगायचं? आणि त्याला ते हवं आहे का?
‘ठीकाय! सवड असेल तेव्हा ये घराकडं!’ म्हणत जगन्नाथ उठला. हॉटेलच्या मालकानं पसे घेतले नाहीत. बाहेर आल्या आल्या वासू निरोप घेऊन निघून गेला. जगन्नाथही श्रीपतीरायांच्या घराकडे निघाला. नवे कडय़ा-कोयंडे शोधले पाहिजेत. या गावात सफल झालं पाहिजे. दुसरा इलाज नाही. पुन्हा बधिरपणा ग्रासू पाहतोय. पण हे शक्य आहे काय? इतिहासात काहीतरी दाखवून देणारी क्रिया, काहीतरी जबाबदारीनं करायची क्रिया, पुन्हा कोवळ्या उन्हात नवं व्हायची क्रिया, फूल व्हायची, फळ धरायची क्रिया, या आंब्याच्या झाडाप्रमाणे मोहरण्याची क्रिया..
जगन्नाथाच्या नजरेसमोरून काळे चेहरे, पिंजारलेले केस, विष्ठेच्या टोपल्या वाहून नेणारी डोकी तरळून गेली. समोर मंजुनाथाचं लखलखणारं शिखर होतं. त्यामागं सतत वाहणारं स्वच्छ पाणी, बाजारातल्या सगळ्या घाणीचा विसर पाडणारी शुभ्र वाळूची रास, त्यातले गुळगुळीत दगड. देवस्थानाच्या वरच्या बाजूला ओल्या केसांनी, कुंकू माखलेला, थरथर नाचणारा भूतराया. गर्भगृहात मुकुट घालून विराजलेला मंजुनाथ. संपूर्ण गावच भारून जाईल अशा नादानं भरून टाकणारी आपल्या पूर्वजांनी करून दिलेली घंटा!
या सगळ्यांच्या गोंगाटामधून एक अस्पष्ट विचार बाहेर येण्यासाठी धडपडत होता. जगन्नाथानं या विचाराकडे पुन: पुन्हा आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून बघायचा प्रयत्न केला होता. याचविषयी श्रीपतीरायांशी बोलायचं म्हणून त्यानं त्यांच्या अंधाऱ्या माजघराच्या दारात उभा राहून हाक मारली, ‘आहेत का घरात?’      

    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:18 am

Web Title: u r ananthamurthys novel bhartipur
Next Stories
1 चतुरकथा..
2 वेध..महाराष्ट्रीय संवेदनेचा!
3 आजचा महाराष्ट्र आणि वैचारिकता
Just Now!
X