आंबेडकरी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुहास सोनावणे यांनी ‘शब्दफुलांची संजीवनी’, ‘सत्यआग्रही आंबेडकर’, ‘ग्रंथकार भीमराव’, ‘बहुआयामी’ आणि    ‘डॉ. आंबेडकर आणि समकालीन’ ही पाच पुस्तके संपादित केली असून ती आज (२० जानेवारी) ‘अनुभव अक्षरधन’तर्फे प्रकाशित होत आहेत. या पुस्तकांना सोनावणे यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांचा हा संपादित अंश..
शब्दफुलांची संजीवनी..
या पुस्तकातील १३ लेखांपैकी डॉ. गंगाधर पानतावणे यांचा   ‘डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन’ हा लेख तसा पाहिला, तर त्यांच्या लिखाणावर आधारित आहे. पण काही ठिकाणी     डॉ. पानतावणे यांनी बाबासाहेबांच्या भाषणांतील उतारे घेतल्याने त्या लेखाचा समावेश प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. इतर सर्व लेख मात्र निखळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणांवर आधारित आहेत.
एका अर्थाने डॉ. आंबेडकरांनी वेळोवेळी केलेली भाषणे, दिलेल्या मुलाखती, सादर केलेली निवेदने ही सारी आंबेडकरी चळवळीच्या पाऊलखुणा आहेत. एखाद्या पाऊलवाटेने पुढे निघून गेलेल्या व्यक्तीच्या मातीत उमटलेल्या पाऊलखुणांनी त्या व्यक्तीच्या मार्गक्रमणाचा शोध घेता येतो, त्याप्रमाणे बाबासाहेबांची भाषणे व इतर साहित्यावरून आंबेडकरी चळवळीच्या वाटचालीचा ‘ब्लू प्रिन्ट’ वाचकांच्या व अभ्यासकांच्या डोळ्यांपुढे साकारत जातो.
देशाच्या राजकीय, सामाजिक चळवळीचा इतिहास बाबासाहेबांच्या भाषणांतून व इतर संदर्भ साहित्यातून उलगडत जातो. स्वाभिमानशून्यतेमुळे निराश झालेल्या, खचलेल्या, पिचलेल्या अस्पृश्य, दलित समाजाला आपल्या ओजस्वी वाणीद्वारा वाघाचे बळ देणारे एकमेव आंबेडकर त्यामुळे तमाम दु:खितांचे-पीडितांचे मसिहा ठरतात.

सत्यआग्रही आंबेडकर..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याचे आग्रही असल्याचे शीर्षकातून सूचित केले असले तरी या शब्दाचा प्रत्यक्षात   डॉ. आंबेडकरांच्याच लेखणीतून उच्चार झाला आहे. तो दाखवतानाच बाबासाहेबांची सत्याग्रहासंबंधीची भूमिकाही वाचकांसमोर येईल आणि त्यांच्या व महात्मा गांधींच्या सत्याग्रहातील फरकही स्पष्ट होईल, असा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. या शिवाय डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहांचा जसा समावेश करण्यात आला आहे, तसाच त्यांच्या अनुयायांनी केलेल्या सत्याग्रहांचा आणि बाबासाहेबांनी केलेल्या कार्यावरील लेखांचाही समावेश आहे. उदाहरणेच द्यायची झाली तर रा. सू. गवई व बाबासाहेबांच्या विश्वासातील त्यांचे ग्रंथपाल शां. शं. रेगे यांच्या लेखांची देता येतील. या दोघांचे आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे स्थान व कार्य पाहून त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर माझ्या ‘ब्रिटिश मंत्रिमंडाळातील डॉ. आंबेडकर’ या लेखाद्वारे भारतीय जनजीवनाशी संबंधित बाबासाहेबांचे काय लोकांसमोर यायला हवे, या उद्देशाने माझ्या लेखाचा समावेश तो निखळ सत्याग्रहाशी संबंधित नसला तरी करण्यात आला आहे.
बाबासाहेबांचे सत्याग्रहासंबंधीचे विचार खरोखरीच चिंतन व मनन करण्यासारखे आहेत. त्यांच्या या व्याख्येची फूटपट्टी  म. गांधीजींनी पुढील काळात विविध प्रसंगी केलेल्या अनेक सत्याग्रहांना व उपोषणांना लावली किंवा आधुनिक काळात गांधीजींचे प्रतिरूप मानले जाणाऱ्या अण्णा हजारे यांच्या सत्याग्रहांना लावली, तर त्यांच्या सत्याग्रहांमध्ये सत्य आग्रहांऐवजी त्यांच्या दुराग्रहांचा अंश अधिक होता, असेच आढळून येईल. विशेष म्हणजे डॉ. आंबेडकरांचे हे विचार खूप आधीचे आहेत. द्रष्टय़ा महापुरुषांचे विचार असेच भावी काळातही दिशादिग्दर्शन करणारे असतात.

ग्रंथकार भीमराव
डॉ. आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोजकी असली तरी ती विचार प्रवर्तक आहे. मात्र उपलब्ध वेळ आणि लेखांसाठी उपलब्ध जागेचा विचार करून त्यांच्या ग्रंथांचा सर्वस्पर्शी आढावा घेऊन मान्यवरांनी केलेले लिखाण, त्यांच्या ग्रंथांचा सर्वस्पर्शी आढावा घेऊ शकणार नाही, याची जाणीव वाचकांनी ठेवावी. शिवाय लेखांमध्ये ग्रंथाचे सार अथवा व्यक्त झालेले सारे विचार, शब्दमर्यादा आणि जागेअभावी व्यक्त करू शकले नसतील, याचीही जाणीव वाचकांनी ठेवलेली बरी. या सर्व लेखांचा समावेश करताना ग्रंथप्रसिद्धीचे मुद्रणवर्ष प्रमाण मानून लेखांचा समावेश केला आहे. त्यामुळे वाचकांच्या नजरेसमोर अदृश्यरूपाने बाबासाहेबांच्या विचारविश्वाचा वरवर जाणारा आलेख साकारण्यास मदत होईल.
डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची प्रभावी लेखनशैली, जी वाचणाऱ्यांच्या चित्तात चेतना निर्माण करते, तर काहींना कार्यप्रवृत्त करते. त्यांची वैचारिक क्षमता एवढय़ा उच्च कोटीची होती की, ती वाचणाऱ्याला खिळवून ठेवते. पेटवलेली सुगंधित अगरबत्ती संपली, म्हणजे वासाचा दरवळ सभोवतालच्या वातावरणात जाणवतो, तशी स्थिती आंबेडकरांचे ग्रंथ वाचणाऱ्याची होऊन जाते. ग्रंथवाचन थांबले, तरी त्या विचारावर तो सारखा विचार करत राहतो, तसेच त्यांची शैली विषय मांडतांना जेवढी प्रभावी वाटते, तेवढीच ती न्यायाधीशाच्या भूमिकेत तुमच्यासमोर प्रकट होते. वक्रोतीपूर्ण वाक्ये, वाक्प्रचार आणि सुभाषितांची अधूनमधून पखरण लक्ष वेधून घेते. आंबेडकर ज्ञानाचे महामेरू, त्यामुळे ज्ञानाचे ते सखोल आणि ज्ञानकोशाप्रमाणे अर्थ उलगडणारे ठरते. त्यांचे लिखाण हे लेखक म्हणून उतरलेले दिसत नाही, तर ते एका विचारवंताचे बोल वाटतात. प्रसंगी काही वेळा लिखाण प्रक्षोभ वाटणारे असले तरी ते लेखकांना आणि विचारवंतांना उद्युक्त करणारे आहे. आंबेडकरांनी केवळ नाव मिळावे, म्हणून ग्रंथलेखन केले नाही तर मांडलेला प्रश्न सोडवण्यासाठी केलेले एका इतिहासकार आंबेडकरांचे ते लिखाण ठरते. विरोधकांच्या मताचे खंडन करून त्यांनी समाधान मानले नाही तर विरोधी विचार जमीनदेस्त केल्याशिवाय ते थांबले नाहीत. अशी त्यांची चित्ताकर्षक, चिवारप्रवर्तक लेखणी कायमची थंडावली असे झाले नाही तर त्यावर त्यांच्यासोबत अधूनमधून वादाचे वादळ उभे राहिले आणि हेच डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथलेखनाचे वैशिष्टय़ मानले पाहिजे.

बहुआयामी
डॉ. आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व हे चिमटीत न येणाऱ्या पाऱ्यासारखं आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रतीकात्मक स्वरूपात ज्यातून व्यक्त व्हावं असा शब्द शोधूनही सापडत नाही. त्यांना ‘अष्टपैलू’ म्हणावं, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात त्याहून अधिक पैलू होते. त्यांना ‘कॅलिडोस्कोप’ म्हणावं तर त्यांची संख्याही त्यांच्या अंगात असणाऱ्या गुणांच्या संख्येनं गोठते. ‘पॉलिगॉन’ हा शब्द बहुकोन अथवा बहुकोणाकृती म्हणून वापरला जातो. पण त्या कोनांनाही मर्यादा पडतात. ‘बहुश्रृत’ म्हणावं तर त्यात अनेक ज्ञानशाखांचा अभ्यास असणारा या अर्थासोबत कानांवरून अनेक विषय गेलेला असाही अर्थ ध्वनीत होतो, पण प्रत्यक्षात डॉ. आंबेडकर आपल्या मुखातून इतक्या विविध विषयांचं ज्ञान ऐकवत की, ते ऐकणाऱ्यालाच बहुश्रृत म्हणण्याची पाळी यायची. इंग्रजीत हा शब्दशोध ‘व्हर्सटाइल’ म्हणजे अगणित, पुष्कळपेक्षा जास्त विषयांचे ज्ञान असणारा या अर्थाने वापरला जातो.
कॅलिडोस्कोपमधून दिसणाऱ्या विविध आकृत्यांच्या संख्येहून अधिक आंबेडकरांची रूपं होती. डॉ. आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतातील घटनेत मागासवर्गीयांची उन्नती होण्यासाठी, त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी घटनेत कुठल्या तरतुदी कराव्यात, याचे दिशादिग्दर्शन करताना तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड होण्यापूर्वी भारतातील संस्थांनांबाबत आपले विचार घटना समितीला सादर केले होते. पुढे त्या निवेदनाचे त्यांनी पुस्तिकेच्या रूपाने प्रकाशन केले होते.
डॉ. आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुआयामी होतं की, त्यांची उपमा कुठेही हलवता येणाऱ्या तंबूशी न करता पुरातन वटवृक्षाशी करायला हवी. कारण वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीवर रूळू लागतात आणि तेथेच जमिनीत शिरून नव्यानं वटवृक्ष म्हणून निर्माण होणऱ्या वृक्षाची मुळं बनून जातात. डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व त्या पुरातन वटवृक्षाशी जरूर नाते सांगते. पारब्यांतून वटवृक्ष निर्माण होतात त्याप्रमाणे बाबासाहेबांचे विचार वाचणाऱ्यांना अधिक प्रभावित करून त्यांना अधिक कार्यप्रवण करतात. डॉ. बाबासाहेबांची ही अनेकविधरूपं जशी आहेत, तशीच त्यांची कुटुंबवत्सलता व इतर रूपे लेखरूपाने या पुस्तकात वाचायला मिळतील.

डॉ. आंबेडकर आणि समकालीन
डॉ. बाबासाहेबांच्या समकालीनांमध्ये जसे राजकीय नेते होते तसेच गाडगे महाराज, महाथेरो पूज्य भिक्खू चंद्रमणी यांसारखे प्रखर मानवतावादी भूमिकेतून वावरणारे संतपुरुषही होते. स्वातंत्र्यासाठी अपार यमयातना सोसणारे स्वा. सावरकर होते आणि लॉर्ड माउंटबॅटन व मॅक्डोनॉल्ड यांसारखे ब्रिटिश मुत्सद्दीही होते. डॉ. आंबेडकरांच्या समकालीनांमधील सर्व समाजपुरुष रा. ब. एन. शिवराज वगळता इतर पक्षांतील आहेत, तर एन. शिवराज हे बाबासाहेबांच्या पक्षातील तर आहेतच, शिवाय त्यांचे सहकारीही होते. याशिवाय ना. म. जोशी, रॅम्से मॅक्डोनल्ड, स्वातंत्र्यवीर सावरकर, जोगेंद्रनाथ मंडल, लॉर्ड माउंटबॅटन, राजेंद्रप्रसाद, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, पेरियार रामस्वामी नायकर या समकालीनांबद्दलचे लेख आहेत. बाबासाहेबांच्या चरित्रकारांनी गांधी-आंबेडकरांचे संबंध तणावाचे दाखवले आहेत. पण प्रत्यक्षात या दोघांचे सौहार्दाचे संबंध होते, हे अनेक घटनांवरून दाखवता येईल. महापुरुष व महामानव हे असामान्यच असतात, हेच खरे. हे पुस्तक आंबेडकरांच्या समकालीनांविषयीचे काही गैरसमजही दूर करण्यास मदत करेल.