नरहर कुरुंदकर यांच्या साहित्याच्या प्रस्तावित तीन खंडांपैकी ‘निवडक नरहर कुरुंदकर’ (खंड एक – व्यक्तिवेध) हा पहिला खंड पुढील आठवडय़ात प्रकाशित होत आहे. या खंडांचे संपादन    विनोद शिरसाठ यांनी केले असून ते देशमुख आणि कंपनीतर्फे प्रकाशित होत आहेत. पहिल्या खंडात नरहर कुरुंदकर यांनी स्वत:च्या ग्रंथसंग्रहाविषयी लिहिलेला लेख
संपादकांनी मला ‘माझा ग्रंथसंग्रह’ या विषयावर लिहिण्यास सांगितले आहे. या विषयावर लिखाण करण्यास उभ्या महाराष्ट्रात जी मोजकी अपात्र माणसे असतील त्यांपकी एक मी आहे. दोन मुद्यांवर अनेक वेळा माझ्यासंबंधी गरसमज होतो. एक म्हणजे अभ्यासू आणि ज्ञानी म्हटल्यावर ज्या प्रकारचा माणूस आपल्या नजरेसमोर असतो, त्या प्रकारचा माणूस मीसुद्धा असणार, असा गरसमज होतो. मी तसा माणूस नाही. अभ्यासू वृत्तीच्या माणसाला त्याच्या अभ्यासाचा विषय सापडलेला असतो, त्या विषयाच्या चिंतनात तो रमलेला असतो. माझे तसे नाही. कारण प्रसंगामुळे कोणताही अभ्यास माझ्यावर येऊन पडतो. अलीकडचा लाडका शब्द वापरायचा तर असे म्हणता येईल की, नियती माझ्यावर अभ्यास लादते. दुसरी बाब अशी की, माझा ग्रंथसंग्रह नाही. ग्रंथ विकत घ्यावेत, गरज पडेल तेव्हा त्यांचा आधार घेता यावा यासाठी ते घरी ठेवावेत, जतन करावेत अशी सवय मला कधी लागलीच नाही. डॉ.रा.चिं. ढेरे यांच्यासारख्या माझ्या मित्रांच्याकडे जेव्हा मी जातो तेव्हा मला फार संकोच वाटतो. डॉ.रा.चिं. ढेरे यांची आíथक परिस्थिती नेहमीच माझ्या तुलनेने वाईट राहिली; पण पुस्तके विकत घेण्याचा व जतन करण्याचा त्यांना विलक्षण छंद आहे. त्यांचे घर पुस्तकांनी भरलेले असते. माझ्या घरी फारशी पुस्तके नसतात. ग्रंथखरेदीचा मला मनापासून कंटाळा. कुणी भेट दिला तर आणि क्वचित विकत घेतलेला ग्रंथ माझ्या घरी येतो. कुणी उचलून नेला नाही तर ग्रंथ माझ्याकडे उरतो. थोडक्यात म्हणजे, माझा ग्रंथसंग्रह नाही. ती सवयच मला लागली नाही.
झाले हे चांगले की वाईट, याबाबत माझे उत्तर स्पष्ट आहे. हे वाईट आहे. त्याज्य आहे. चांगले नाही. पण जर एखादा दोष आपल्यात असेल, तर तो का झाकावा? सत्य सांगणेच भाग आहे. माझ्या विद्यार्थ्यांना, मित्रांना माझा नेहमी सल्ला असतो की कृपया चांगले व्हा. माझ्यासारखे होऊ नका. मी अनुकरणीय नाही.
वरील विवेचनाचा अर्थ पुस्तकांनी मला झपाटले नाही अगर दुर्मीळ पुस्तकांच्या शोधार्थ मी धडपडलो नाही, असा मात्र करायचा नाही. याचा अर्थ इतकाच की जे मिळत गेले ते वाचण्यावर माझा भर राहिला. मुद्दाम दुर्मीळ पुस्तकांच्या नादी मी लागलो नाही. पण कधी कधी तेही करावे लागतेच. यामुळे या संदर्भातील काही गमतीदार व सहज आठवणाऱ्या आठवणी नमूद करतो. त्यांच्याकडे गंमत म्हणून पाहायचे. फार गंभीरपणे पाहायचे नाही.
मी ‘पीपल्स कॉलेज’ नांदेड येथे इ.स.१९६३ साली प्राध्यापक म्हणून नोकरीस लागलो. त्या वर्षीची एक गोष्ट आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष पू.स्वामी रामानंदतीर्थ कॉलेज पाहावयास आले होते. माझी व त्यांची जुनी ओळख. फक्त नव्याने प्राध्यापक झालो होतो. त्याच वेळी एक पुस्तकविक्रेता आला होता. त्याच्याजवळ विल डय़ूराँटने लिहिलेला संस्कृतीचा इतिहास होता. अनेक दिवस मी त्या ग्रंथाचे नाव ऐकत होतो. टॉयन्बीचा इतिहास विश्लेषण करणारा महाग्रंथ आणि डय़ूराँटचा हा ग्रंथ (मूळ नाव : द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन, एकूण खंड ११) वाचण्याची मला जिज्ञासा होती आणि नांदेडला हे खंड उपलब्ध नव्हते. अनपेक्षितपणे हवा असणारा ग्रंथ घरात-दारात येऊन उभा ठाकला. मी पू.स्वामीजींना म्हटले, ‘‘हा फार प्रसिद्ध ग्रंथ आहे. आपल्या महाविद्यालयासाठी विकत घ्या.’’ स्वामीजी म्हणाले, ‘‘ग्रंथ पूर्ण नाही. (आमच्या विक्रेत्याकडे पहिले सात खंडच होते.) दुसरे, कुणीतरी वाचून तो चांगला आहे, असे म्हटले पाहिजे. न वाचता चांगले म्हणणाऱ्याला महत्त्व कोण देणार? तिसरे म्हणजे, इथे तरी हा ग्रंथ वाचणार कोण? शेवटचे म्हणजे किमतीचे काय?’’
मी म्हणालो, ‘‘स्वामीजी, किमतीचे तुम्ही पाहा. संपूर्ण ग्रंथ वाचण्याची जबाबदारी माझी. वाचून झाल्यानंतर मी तुम्हाला माझे मत सांगतो.’’ स्वामीजींनी हे मान्य केले आणि प्राचार्याना ‘ग्रंथ खरेदी करा’, म्हणून सांगितले. पुस्तक विकत घ्या म्हणून सांगणे सोपे असते. सुमारे पाच हजार पाने वाचण्याची जबाबदारी घेणे कठीण असते. ग्रंथ अतिशय चांगला, माहितीपूर्ण, रेखीव इ. मी ऐकून होतो. पण वाचनाचे काय? माझा महाविद्यालयीन उद्योग सांभाळून मी तीन महिन्यांत सातही खंड वाचून संपविले. निदान मला तरी सारे लिखाण कादंबरीप्रमाणे मनोरंजक व मन भारून टाकणारे वाटले. प्रत्येक खंडाबाबतची टाचणे तयार केली आणि पुन्हा स्वामीजी नांदेडला येताच त्यांच्याकडे जाऊन मी ग्रंथ वाचला याची खात्री पटवली. त्यांना अर्थातच आनंद झाला. थट्टेवारी सारे न्यावे तसे ते म्हणाले, ‘‘कुरुंदकर, असे वाचायचे नसते. फक्त ‘वाचतो’ म्हणून आश्वासन द्यायचे असते.’’
मी पू.स्वामीजींना एक शंका विचारली. मी म्हटले, ‘‘समजा, सारे खंड वाचून हा ग्रंथ सामान्य आहे असे माझे मत झाले असते तर मग हे पसे वायाच गेले असते की नाही?’’ स्वामीजी म्हणाले, ‘‘विचारांतील मुख्य चूक इथे आहे. पुस्तके पूर्णपणे वाचून ती वाईट, असे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा तुमची समृद्धी वाढलेली असते. त्यात ग्रंथाची किंमत वसूल झाली. मात्र हा नियम ज्याच्या जिज्ञासूपणावर माझा विश्वास आहे, त्याच्यापुरता समजायचा.’’
लहानपणापासून माझा वाचनाचा नाद वाढविणारे माझे वडील अंबादासराव कुरुंदकर, मामा डॉ.ना.गो. नांदापूरकर, गुरुवर्य कहाळेकर, नांदेडला एस.आर.गुरुजी इ.ची माया माझ्या जमेची बाजू म्हटली पाहिजे. आणि ‘तुला हवे ते पुस्तक नेऊन वाच व नंतर कॉलेजात दाखल कर’, असे सांगणारे पू.स्वामीजी, कै.जीवनराव बोधनकर, माझे प्राचार्य के.रं.शिरवाडकर हीही जमेचीच बाजू म्हटली पाहिजे. या सर्व महाभागांच्यामुळे मी अधाशी वाचक झालो हे तर खरेच, पण या मंडळींच्या माझ्यावरील प्रेमाचा परिणाम असा झाला की आपला ग्रंथसंग्रह असावा, असे मला कधी तीव्रपणे वाटलेच नाही.
परीक्षा आणि परीक्षेचे पुस्तक वाचण्याचा मला प्रचंड कंटाळा व नावड आहे. परीक्षेच्या निमित्ताने वाचन होते, अभ्यास होतो असे माझे अनेक मित्र म्हणतात. त्या सर्वाचे कल्याण असो. मी परीक्षा टाळत आलो आहे. नाइलाजाने मला एम.ए. व्हावे लागले. माझा एम.ए.चा निकाल लागला त्या वेळी मोठय़ा उल्हासाने मी डोक्याचा तुळतुळीत गोटा केला आणि विहिरीवर बसून थंड पाण्याने स्नान केले. मित्रांनी विचारले, ‘‘अरे हा काय नवा प्रकार?’’ मी म्हटले, ‘‘सुटलो. आजपासून परीक्षा माझ्या जीवनात मेली!’’ परीक्षेचे पुस्तक मी वाचू लागलो की जांभया येतात. झोप येऊ लागते. परीक्षेचे पुस्तक वाचणे मला फार कष्टाचे जाते. मग मी त्यावरही उपाय शोधले होते. बी.ए.च्या परीक्षेच्या वेळी मी देवीप्रसाद चटोपाध्यायांचे ‘लोकायत’ हे प्रसिद्ध पुस्तक जवळ ठेवले होते. सुमारे तासभर क्रमिक पुस्तक वाचले की झोप दाटून येई. मग मी ‘लोकायत’ वाचत असे. झोप तातडीने उडून जाई. ताजातवाना झालो की क्रमिक पुस्तक. या दृष्टीने प्रो.दासगुप्ता यांच्या भारतीय तत्त्वज्ञानेतिहासाचे खंड, पां.वा.काणे यांचा ‘धर्मशास्त्राचा इतिहास’, राहुल सांकृत्यायन यांचे ‘मध्य आशियाचा इतिहास’ इत्यादी ग्रंथांचा, मला माझी क्रमिक पुस्तके वाचता यावीत, यासाठी फार उपयोग झाला. या सर्व ज्ञानर्षीचा मी फार ऋणी आहे. त्यांच्या आधारेच क्रमिक पुस्तकेही वाचण्याच्या कंटाळ्यावर मी मात करू शकलो. मी माझ्या विद्यार्थ्यांना माझे अनुकरण मुळीच करू नका, असे सतत सांगतो. याचे महत्त्वाचे एक कारणच हे आहे की, परीक्षांचा मला मनस्वी कंटाळा आहे आणि विद्यार्थी परीक्षेसाठी तयार करणे हा माझा जगण्याचा धंदा आहे.
मी उपलब्ध असेल ते वाचतो. दुर्मीळ पुस्तकांचा मुद्दाम पाठलाग करीत नाही. पण कधी कधी तोही उद्योग करणे भाग पडते. दोन वर्षांपूर्वी ‘मनुस्मृती’चा मी अभ्यास करीत होतो. मूळ मनुस्मृती भाष्यासह वाचणे, इतरांचे मनुस्मृतीवरील विवेचन वाचणे हे तर चालू होतेच. पण एक नोंद अशी सापडली की, जनार्दन महादेव गुर्जर यांनी इ.स.१८७७ मध्ये मनुस्मृतीचे भाषांतर मुंबईतून प्रसिद्ध केले. माझ्या माहितीनुसार हे मनुस्मृतीचे पहिले मराठी भाषांतर आहे. आधुनिक राजकीय, सामाजिक जाणिवांचे फारसे संस्कार ज्या मनावर झालेले नाहीत, त्यांनी मनुस्मृतीचा अर्थ कसा लावला हे पाहण्याची प्रबळ जिज्ञासा माझ्या मनात निर्माण झाली. इ.स.१८७७ म्हणजे काही फार जुना काळ नाही आणि गुर्जर म्हणजे काही मनुस्मृतीवरचे फार मोठे अधिकारी नाहीत, हेही मला कळत होते. गुर्जर कुल्लुकभट्टाला अनुसरूनच अर्थ लावणार, त्यात वेगळे काही असणार नाही; फरक फक्त एकोणिसाव्या शतकातील शास्त्रीमंडळीची संस्कृतप्रचुर मराठी व आजची प्रौढ मराठी इतकाच असणार हे सर्व मला कळत होते. पण मला गुर्जरांचे भाषांतर हवे होते. माझ्या मित्रांना, विद्यार्थ्यांना मी कल्पना दिली. हस्तेपरहस्ते या ग्रंथाचा शोध सुरू झाला. जुनी ग्रंथालये, जुन्या पुस्तकांचे संग्राहक यांच्याकडे शोधाशोध झाली. धावपळ, यातायात दुसरेच करीत होते. मी फक्त घरी मला ग्रंथ हवा म्हणून सांगत होतो. माझ्या बाबतीत पुष्कळदा असे होते. मला सयाजीराव गायकवाड मालेतील अभिनव भारतासह असणारा नाटय़शास्त्राचा दुसरा खंड हवा होता. एकाने सदर ग्रंथ नांदेडमध्ये कुठेही उपलब्ध नाही, ही माहिती आणली. माझे त्या वेळचे प्राचार्य के.रं. शिरवाडकर यांनी विद्यापीठात जाऊन तिथे तो खंड शोधला व मला आणून दिला आणि विचारले, ‘बोला, अजून काय हवे?’ हाच प्रकार ‘मनुस्मृती’बाबत होणार असे माझे अनुमान होते. सहा महिने इथे नाही, तिथे नाही, असे चालले होते. यातायात करणारे करीत होते. मी फक्त अधिकच हटवादीपणे मला गुर्जरकृत भाषांतर हवे म्हणून सांगत होतो.. आणि एक दिवस, माझे गुरुतुल्य मित्र एकनाथ महाराज खडकेकर यांनी ते भाषांतर समोर आणून ठेवले. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, दुर्मीळ पुस्तकासाठी प्रयत्न करण्याचा योग इच्छा नसली तरी मधून मधून येतोच.
मी वाचावे, मी अभ्यास करावा, मी लिहावे यासाठी झटणारे शंभरजण भोवती असतात, म्हणून माझे निभावून जाते, ग्रंथसंग्रह नसला तरी चालते. इतरांना हा भाग्ययोग कसा येणार?

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी