डॉ. राम पंडित

डॉ. जुल्फी शेख या ज्येष्ठ कवयित्री, लेखिका, समीक्षक, अनुवादक व संतसाहित्य अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात झालेल्या चुका अनावधानानेही घडू नये, अशी अपेक्षा स्वाभाविक म्हणता येईल. आपलं पुस्तक मुद्रितशोधन झाल्यावरही छपाईला जाण्यापूर्वी लेखकाने एकदा स्वत: नजरेखालून घातले नाही तर मुद्रणदोष राहण्याची शक्यता असते. नेमके यामुळेच व अन्य काही त्रुटींमुळे शेख यांचा उर्दू शायर ‘गालिब’वरील लेखसंग्रह सदोष झाला आहे.

‘उर्दू : ग़ालिब-ए-ग़जल (पत्रानुवाद)’ नावाच्या या चारशे पानी पुस्तकाचे शीर्षक लक्षणीय आहे. साधारणत: ‘ग़ज़ले-ग़ालिब’ ( ग़ालिबच्या ग़ज़ला) असे उर्दूत म्हणतात. इथे ‘गालिब-ए-ग़जल’ (ग़ज़लचा ग़ालिब) असं शीर्षक योजलं आहे. पण उर्दूचं देवनागरीकरण करताना मुखपृष्ठकाराने ‘ज’ खालील नुक्ता( टिंब) गाळला. हे पुस्तक पत्रानुवाद म्हणावं तर पंधरापैकी दोनच लेख पत्रांचे आहेत. खरं तर हा ग़ालिब, उर्दू, रूबाई, पत्रे, इत्यादी विषयांवरील लेखसंग्रह आहे, त्यामुळेच काही लेखांत ग़ज़्‍ालवरील माहितीची पुनरुक्ती आढळते ती अनुचित म्हणता येणार नाही.

शेख यांनी ग़ालिबच्या संदर्भात दिलेली माहिती व भाष्य काही त्रुटींमुळे व भाषिक मांडणीमुळे मौलिक असूनही वाचनीय ठरत नाही. त्यांनी नमूद केलेले मराठी संतसाहित्यातील वेचे व ग़ालिबसह अन्य उर्दू शायरांचे शेर पाहून त्यांच्या व्यासंगाची कल्पना येते, पण अनेक ठिकाणी उद्धृत केलेले शेर मूळ बरहुकूम नाहीत. उदाहरणार्थ, काही ठळक त्रुटी-

१ .पृष्ठ १८१-१९४ मधे ग़ालिबच्या ग़ज़्‍ालांखाली कठीण शब्दार्थ मराठीत तर पृष्ठ २९७-३२३ वरील ग़ज़्‍ालांखालील शब्दार्थ हिन्दीत दिले आहेत. डॉ. अक्षयकुमार काळेंच्या ग़ालिबवरील ग्रंथातून हे समग्र अर्थ मराठीत उपलब्ध झाले असते.

२. नावातील चुका अनेक आहेत उदा. खुस्त्रो(खुसरो), मुबाकर (बाक़र), मालकराम (मलिकराम), याफ़ाक़ (आफ़ाक़), सुफी (सफी), घनशाम (घनश्याम) इलाही अकबराबादी,(अकबर इलाहाबादी), समीर मिनाई (अमीर ),गजलांली (गज्जलांजली),उम्र (उग्र) ज़फ़र या नावाचा शेर बहादूर शहाचाच वाटेल, तो ज़फ़र गोरखपुरीचा आहे.

३. १७ वे शतक ते सन १८५७ या काळापर्यंतची मान्यवर विद्वान व ग़ज़लकारांची नावे (पृष्ठ ७९) देताना साहिर, जिगर, शकील, फ़िराक, मजरूह, कतील, मजाज, कैफी, जॉनिसार ही नावे कशी येतात? यांपैकी एकाचाही जन्म या काळात झाला नव्हता.

४ . ‘१९३३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ग़ज़्‍ालांजली’ या मराठी ग़ज़्‍ाल संग्रहात (पृष्ठ २२०-२२१) डॉ. हिरेमठ, इलाही जमादार, रमण रणदिवे, नीता भिसे, इ. वीस ग़ज़लकारांसह माधव जुलियनच्या ग़ज़ला समाविष्ट होत्या, असे विधान डॉ.जुल्फी शेख करतात. १९३३ सालापूर्वी माधवराव सोडले तर यातील कोणाचाही जन्म झाला असल्याची शक्यता नाही.

५. ‘दबीर,अनीस गज़लेच्या दुनियेचे बादशहा होते.’ (पृष्ठ १९६) हे वक्तव्य चूक आहे. हे दोघे मर्सये(शोक काव्य)चे ख्यातनाम शायर होते. त्यांच्या ग़ज़्‍ाला लक्षणीय गणल्या जात नाहीत.

६. पृष्ठ २२६ वर (‘गालिब उर्दूचे असे कवी है जिन्होने’..) भाष्यात हिन्दी मराठी भाषेची सरमिसळ झाली आहे.

७. कुली कुतूब शहाचा मतला (पिया बाज प्याला) गालिबच्या नावाने, गालिबचा शेर (इश्क में ) अमीर खुसरोच्या नावाने नमूद केला आहे. (पृष्ठ ४०)

रूबाई या काव्य विधेवरील लेखात स्वामी श्यामानंद ‘रौशन’च्या हिन्दी रूबाईयांचा परिचय वाचनीय आहे. ‘रूबाईचे ५४ छंद असून, त्यातील ३० छंदांचे आविष्कार श्रेय इल्लाम इश्कआबादी व डॉ. जार इल्लामी यांना जाते’ असे डॉ. जुल्फी शेख म्हणतात. मूलत: २४ रूबाई छंदांचा निर्माता रूदकी हा फारसी छंदवेत्ता होता. १२ छंदच इल्लाम यांनी निर्माण केले.

ग़ालिबच्या पत्रानुवादच्या लेखात, पत्रांचे अनुवाद फारसे प्रवाही झालेले नाहीत. अनुवाद बराचसा शब्दश: केलेला जाणवतो .पत्रातील व्यक्ती, संदर्भ, इ. बाबत वाचक अनभिज्ञ असल्याने, त्यातील लिखाणाचा आस्वाद घेता येणार नाही. ग़ालिबच्या पत्रशैलीचा व भाषेचा अनुवाद करणे शक्य नाही, मात्र पत्रांवरून त्याच्या स्वभावाची, सहृदयतेची, गुण-अवगुणांची थोडीबहुत कल्पना करता येते.

उर्दू, ग़ालिब व त्याच्या ग़ज़्‍ालांच्या संदर्भातील सखोल अभ्यास व माहिती या लेखसंग्रहात जाणवत असूनही उपरोक्त त्रुटींमुळे या पुस्तकाचा दर्जा हवी तेवढी उंची गाठू शकला नाही.

गालिब-ए-ग़ज़ल (पत्रानुवाद)

– डॉ. जुल्फ़ी शेख, विजय प्रकाशन,

पृष्ठे – ४००, मूल्य – ४९९रुपये.