स्वरभास्कर पंडित जितेंद्र अभिषेकी यांची नुकतीच जयंती झाली. गानक्षेत्रातला त्यांचा दबदबा सर्वज्ञात आहेच; परंतु कुटुंबाशी, शिष्यांशी त्यांचं नातं कसं होतं, याविषयी त्यांच्या सहचारिणीने जागवलेल्या हृदयस्पर्शी आठवणी.

आपलं जवळचं माणूस- जे आपल्याला आता कायमचं सोडून गेलंय, त्याची जयंती, पुण्यतिथी आली, की आपल्या मनाची विचित्र अवस्था होते. त्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याने मनात निर्माण झालेल्या पोकळीत साठवलेल्या आठवणी या दिवशी अधिकच उचंबळून येतात. यशस्वी, प्रसिद्ध  कलाकार हा हाल, कष्ट, बरे-वाईट प्रसंग या सर्व अनुभवांतून सुलाखून निघालेला असतो. पंडित जितेंद्र अभिषेकीही याला अपवाद नव्हते.

अभिषेकी हे संगीतच आपलं जीवन, जगणं, ध्येय, श्वास मानत; नव्हे हे लेणं त्यांना वरूनच लाभलं होतं आणि ते त्यातच जगत, रमत. त्यांनी शालेय-कॉलेज शिक्षण घेतलं तेही सूर डोक्यात-मनात ठेवूनच. संगीताच्या तपश्चर्येसाठी खातंपितं घर सोडून, गाव सोडून बाहेर पडले. खस्ता खात खात ते पुण्याला आले. माधुकरी मागून ध्येय पूर्ण करायला धडपडत होते. नंतर ते मुंबईला गेले. केशरबाई बांदोडकर यांच्या घरी राहिले. बायजींनी (केशरबाई) त्यांना भरपूर प्रेम दिलं. काळजीपूर्वक त्या त्यांच्या खाण्याची, जेवायची सोय करत. सर्व कुटुंबीय त्यांना मदत करत होतं. सवलती देत होतं. राहायला घर मिळालं, रियाजाला जागा मिळाली, ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जेवणाचीही सोय झाली होती. हळूहळू पाया स्थिर होत गेला. ओळखी झाल्या. अनेकांशी संपर्क झाला. गाडी रुळावर येऊ लागली.

गानसाधना करताना त्यांनी काय त्रास सहन केला, किती अपमान सहन केले, काय सोसलं हे ते कधी सांगत नसत. एकदा मुलांनी खूप हट्ट केला तेव्हा ते बोलले, तेही थोडक्यातच. शांत, स्वरांच्या सागरात ते अखंड राहत. त्यांचा स्वभावही तसाच होता; वरून सागरशांतता, पण आत खोल काय चाललं आहे ते डुबकी मारूनही कळत नसे. पण एखादवेळेस तो शांतसागर खवळला, की त्यांचं रूप वेगळं वाटायचं. तेव्हा प्रलय, ज्वालामुखी म्हणजे हे असंच असतं का, असं वाटायचं.

कार्यक्रम संपल्यावरचा त्यांचा विरंगुळा म्हणजे लाँग ड्राइव्हला जाणं. ते आणि त्यांचे शिष्य फिरून येत. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला त्यांना फार आवडे. निसर्गाच्या सहवासात ते मनापासून रमत. आपल्या शिष्यांच्या सहवासातही त्यांचा शीण उतरत असे. मार्केटिंग, शॉपिंग त्यांना जमायचं नाही, पण आम्ही निघालो की त्यांना आमच्याबरोबर यावंसं वाटे. एकदा माझ्या मुलीला- मेखलाला ड्रेस विकत घ्यायचा होता. ती ह्यांना म्हणाली, ‘बाबा, मी आणि आई थोडा वेळ बाहेर जाणार आहोत.’ त्यावर यांचा प्रष्टद्धr(२२४)्ना ‘कुठे?’. ‘मला ड्रेस घ्यायचा आहे,’ मेखला म्हणाली. ‘मग मी येतो. चला, कुठं जायचं?’ हे म्हणाले. मेखला पटकन म्हणाली, ‘नको, नको बाबा, तुम्ही आराम करा. आम्ही टॅक्सीनं जातो. तुम्ही गाडी घेऊन जा.’ ‘नाही, मी येणारच,’ यांचा हेका.

मेखला माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘आई, बाबांना सांग ना. तेसुद्धा आपल्याबरोबर येतो म्हणतायत. पण ते लगेच बोअर होतात आणि चला, लवकर उरका, असं म्हणतात.’

मी काय सांगणार? तरी मी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला, ‘अहो, तुम्ही विश्रांती घ्या. तुम्हाला कंटाळा येणार, मग घाई करणार.’

हे म्हणाले, ‘नाही नाही, मी काही घाई करणार नाही. एका शिष्याला सोबत  घेऊन येणारच.’ मेखला म्हणाली, ‘आई, आपण उद्या जाऊयात?’ यावर ह्यांचे उत्तर- ‘उद्या गेलात तरी मी येणारच. मी सांगतो ना, मी दुकानाबाहेर उभा राहतो.’ त्यांच्या या हट्टापुढे आमचा नाईलाज झाला. आम्ही गेलो. ठरल्याप्रमाणे ते दुकानाबाहेर उभे राहिले. पण राहवतं कुठे? थोडय़ा वेळानं ते दुकानात आलेच. आमच्याकडे येऊन म्हणाले,  ‘झालं का? किती वेळ लावता? केवढं काढायला लावलं त्यांना?’ दुकानदाराकडे पाहून ते म्हणाले, ‘सॉरी हं, तुम्हाला त्रास झाला असेल.’ यावर मेखला म्हणाली, ‘बाबा, तुम्ही गाडीत बसा. आम्ही आलोच’ त्यावर हे म्हणाले, ‘आम्ही बाहेर उभे राहतो. तुम्ही लवकर या. पुरे झालं तुमचं.’ मेखलाला दोन ड्रेस आवडले. त्यातला कोणता घ्यावा हे ठरवतानाच तिला हे तिच्याकडे येताना दिसले. ती उत्साहात म्हणाली, ‘बाबा, या दोन ड्रेसमधला कोणता घेऊ?’ ‘काहीही कर, पण लवकर आवर. पण दुकानदारांना कपाटातले कपडे काढायला लावू नकोस. पाहिजे तर दोन्ही घे. बिल काय झालं?’ दुकानदाराला पैसे देऊन त्यांनी लगेच प्रश्न सोडवला आणि चालायला लागले. आम्हीही निघालो. ‘काय मुन्नी, (मेखलाला आम्ही मुन्नी म्हणतो) झालं ना मनासारखं, आम्ही (ते आणि शिष्य) ठरल्याप्रमाणे बाहेरच उभे राहिलो. पण  त्या दुकानदाराची मला कीव आली, त्यांना घडय़ा घालायला मदत तरी करायची.’ यांनी आपलं मत मांडलं. मुलीनं डोक्याला हात लावला. कधीकधी मंडईतही ते उत्साहानं यायचे. (माझा  आग्रह नसायचा). पण  ते बाहेरच उभे राहत. एकदा म्हणाले, ‘तू आत जाऊन भाजी घेऊन ये.’ मी आत गेले. थोडय़ा वेळातच मला ‘एऽ एऽऽ’  अशी हाक ऐकू आली. (मला ते नावानं हाक मारत नसत). मी घाईत बाहेर आले तर हे म्हणतात, ‘अगं, इथं बाहेर भाजी स्वस्त मिळते तर तू तिकडे का गेलीस?’ महाग-स्वस्त यांना कधी कळायला लागलं मला कळेना. तो भाजीवाला म्हणाला, ‘नाही, आम्हीही तेवढाच भाव लावणार.’ ‘नाही, पण तुमची भाजी चांगली आहे.’ हे काहीतरी बोलायचं म्हणून बोलले. ‘बुवा, चला आपण तिकडे जाऊ. वहिनी, तुमचं झालं की त्या बाजूला या.’ त्यांच्या शिष्याने प्रसंगावधान राखून सर्वाचीच सुटका केली.

शिष्यांच्या सहवासात त्यांचा आनंद ओसंडून येत असे. गुरू-शिष्यातलं आगळंवेगळं दैवी नातं यांच्यामुळे मला कळलं. आम्हाला कुणालाही या नात्याबद्दल काही वाटत नसे- ना राग,  ना असूया. यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिष्यगण जमायचे. त्यांना अंघोळ घालायचे. एकदा पेलाभर दूध घेऊन त्यांना अंघोळ घातली. नाश्ता झाल्यावर मुलं म्हणाली, ‘वहिनी, आज तुम्हाला सुटी. आम्ही स्वयंपाक करून बुवांना वाढणार.’

‘आणि रियाज कोण करणार? काही नाही, आज रियाज झाला पाहिजे.’-हे म्हणाले. ‘आम्ही सगळं करू. पटकन स्वयंपाक करून आम्ही रियाजाला बसतो.’ ‘मग मी जरा बाहेर जाऊन येऊ?’ मी मुलांना विचारलं. ‘या, या. एका तासात स्वयंपाक तयार असेल. तुम्ही जेवायला आलं पाहिजे. मी म्हणाले, ‘आमंत्रणाबद्दल आभार. मी येईनच!’

तेव्हा मोबाइल नव्हते. मला वेळेवर यावंच लागणार होतं. स्वयंपाकघरात कुठे काय ठेवलंय हे सर्वानाच माहीत होतं. कधी लहर आली की गुरू-शिष्य एखादा पदार्थ करायचे. तेव्हाचं दृश्य पाहण्यासारखं असायचं. प्रत्येकजण काहीतरी काम करत असे आणि त्यांचे गुरू  ‘हे असं करा, तसं करा, हे आणा, ते आणा’ असं मार्गदर्शन करत. तेव्हा एखादा ऑर्केस्ट्रा सुरू आहे, असं मला वाटायचं. पण जे काय तयार व्हायचं ते चांगलंच व्हायचं. पण पसारा आवरता आवरता मला नको वाटायचं.

प्रत्येक शिष्याच्या मनात यांच्या गोड आठवणी जाग्या आहेत.  ‘हे’ गेले नाहीत, आमच्यात आहेत, असंच आम्हाला वाटतं. आज त्यांचे शिष्य आपल्या क्षेत्रात घट्ट पाय रोवून आहेत. कलेशी प्रामाणिक आहेत. काहीही चांगलं झालं, साधी सायकल घेतली तरी त्यांचे शिष्य त्यांच्या फोटोला नमस्कार करतात. शुभकार्य ठरलं की  प्रथम घरी येऊन त्यांच्या फोटोला नमस्कार करणार. पेढा ठेवणार.

गुरुपौर्णिमेला सर्व शिष्य एकत्र येणार, हे ठरलेलं. शौनकही याच क्षेत्रात असल्यामुळे हे नातं अजूनही दृढ आहे. संघर्ष होतात, मतभेद होतात, पण तेवढय़ा पुरतेच.

मला आज धन्य वाटतं. जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सुसंस्कारी मुलं आणि माझ्या मुलांप्रमाणेच ह्यांचा शिष्य परिवार. अजून काय मागायचं देवाकडे? अभिषेकींच्या रूपाने त्याने मला भरभरून दिलं. यांनी जे पेरलं त्याचं मुलांनी नंदनवन केलं आहे. हे नंदनवन असंच फुलत राहावं एवढंच देवाकडे माझं मागणं.