26 October 2020

News Flash

विश्वाचे अंगण : सर्वे जन्तु निराशया: की निरामया:?

१८९५ साली जर्मन संशोधक विलहेम रोंटगन यांनी अस्तित्वात असूनही दृष्टीस न पडणाऱ्या किरणांना ‘क्ष-किरण’ वा ‘विकिरण’ ही संज्ञा दिली.

विषाणू हे सजीव की निर्जीव? की दोन्ही नाहीत? यावर वैज्ञानिक जगतात मत-मतांतरे आहेत.

अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com

१८९५ साली जर्मन संशोधक विलहेम रोंटगन यांनी अस्तित्वात असूनही दृष्टीस न पडणाऱ्या किरणांना ‘क्ष-किरण’ वा ‘विकिरण’ ही संज्ञा दिली. आज हे किरण आपल्या आरोग्य जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. २०१८ च्या फेब्रुवारीत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ समितीच्या सार्वजनिक आरोग्यास अतिशय धोकादायक असणाऱ्या रोगांच्या यादीत इबोला, सार्स, झिका, रिफ्ट व्हॅली ताप (केनियात आढळल्याने) हे रोग होते. ‘यापूर्वी कधीही पाहिले नव्हते असे जंतू प्राण्यांपासून उद्भवू शकतात. अशा क्ष- विकारांमुळे जगात पुढील महासाथ येऊन आर्थिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त होईल,’ असा इशारा रोंटगन यांनी दिला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाकित केलेला हा क्ष-विकार कोविड १९ च्या रूपाने आला. सार्स-कोविडचं भाकित करणारे पर्यावरणीय विकारतज्ज्ञ व ‘इको-हेल्थ अलायन्स’चे प्रमुख डॉ. पीटर डॅस्झ्ॉक म्हणतात, ‘निसर्गविनाशामुळे जागतिक पातळीवर येणाऱ्या साथी वाढत आहेत. मागील तीन जागतिक साथींवरून हे लक्षात येत असून हा धोका पुढेही तसाच असणार आहे. आपल्याला मिळालेला इशारा हा केवळ ‘क्ष’ विकारांपुरताच मर्यादित आहे असं समजणं चुकीचं ठरेल. यानंतर ‘य’ व ‘ज्ञ’ विकार येण्याचेही धोके आहेत. करोनाच्या साथीवर विजय मिळवण्यासाठी लशींची वाट पाहत स्वस्थ बसणे परवडणारे नाही. मानवी आरोग्यासाठी घातक असणाऱ्या लाखो जंतूंचा माग काढून नव्या साथी येऊ शकणाऱ्या संभाव्य ठिकाणांची कसून यादी केली पाहिजे. तेथील लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करून त्या माहितीच्या आधारे औषधे व लशी तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांची जागरूकता वाढीस लागेल.’

विषाणू हे सजीव की निर्जीव? की दोन्ही नाहीत? यावर वैज्ञानिक जगतात मत-मतांतरे आहेत. न्यू यॉर्क विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ प्रो. एकार्ड विमेर यांना प्रयोगशाळेत निर्जीव रसायनांपासून विषाणू कण (व्हायरीऑन) तयार करण्यात यश आले होते. पेशींमध्ये गेल्यावर त्या विषाणू कणांनी पुनरुत्पादन करून पेशींमध्ये संसर्ग निर्माण केला होता. प्रो. विमेर म्हणतात, ‘विषाणू ही सजीव व निर्जीव या अवस्थांना  पर्यायी अवस्था आहे.’

माणूसप्राणी स्वत:ला जगातील सर्वात श्रेष्ठ भक्षक समजतो. परंतु सार्स आणि कोविड-१९ ने मानवजात हेच मोठे भक्ष्य होण्याची शक्यता असल्याचं दाखवून दिलं आहे. विषाणू हा सर्वव्यापी, सतत बदलणारा, परिस्थितीशी जुळवून घेणारा, अतिशय प्रबळ आहे. एक लिटर समुद्राच्या पाण्यात अंदाजे १०० अब्जाहून अधिक, तर एक किलो कोरडय़ा मातीत त्यापेक्षा दहा पटीने अधिक विषाणूंचं अस्तित्व असतं. जगातील विषाणूंची संख्या ही १० वर ३१ शून्य एवढी असू शकते. ब्रह्मांडामधील (कॉसमॉस) ताऱ्यांपेक्षा पृथ्वीवरील विषाणूंची संख्या अधिक असावी असा अंदाज आहे. एकंदरीत विषाणूमुक्त जग असंभव व अशक्य असल्याने त्यांचा माग घेऊन उपाय योजणे हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे. २००९ पासून  डॉ. डॅस्झ्ॉक, डॉ. डेनिस कॅरोल, डॉ. जोन मॅझेट हे प्राणीजन्य रोगप्रक्रि येविषयी संशोधन करीत आहेत. त्यांनी ३० राष्ट्रांतील पाळीव प्राणी, वटवाघळे, उंदीर आणि साथींचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, ‘१९४० पासून आजपर्यंत ३३० विकारांचा उगम झाला आहे. त्यांपैकी ६०टक्के  विकार हे प्राण्यांपासून उद्भवले आहेत व  हा वेग वाढतोच आहे. जगात साथ पसरवण्याची क्षमता असणाऱ्या विषाणूंचे ३ लाख ते १५ लाख प्रकार असावेत. कित्येकदा हे विषाणू थेट माणसांपर्यंत न येता घोडा, डुक्कर, माकडांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात.’ विषाणू ही जागतिक आपत्ती असून, त्यांचं निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी जागतिक पातळीवर विषाणू प्रकल्प (ग्लोबल व्हायरोम प्रोजेक्ट) हाती घेणे आवश्यक आहे. त्याद्वारे घातक विषाणूंचा शोध घेऊन त्यांचा जनुकसंच (जिनोम) तयार करणे, ‘प्रतिकारक्षमताशास्त्रीय वेधशाळेचा जागतिक प्रकल्प’ (ग्लोबल इम्युनॉलॉजिकल ऑब्झर्वेटरी) निर्माण करून जगभरातील रक्तपेढय़ांशी संपर्क ठेवणे व त्यांच्याकडे वेळोवेळी येणाऱ्या रक्तांच्या नमुन्यांवर नजर ठेवल्यास विषाणूंची वाटचाल व त्यांच्यासाठी तयार होत असलेली मानवी प्रतिकारशक्ती समजून येईल. हे नियोजन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सशक्त करावी लागेल. त्याकरता जगातील समस्त राष्ट्रांनी एकत्र येऊन सहकार्य करणं आवश्यक आहे.

विषाणूंचा प्रसार होण्यात जागतिक मांस बाजारपेठा मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहे. त्यांत अनेक ठिकाणी साप, डुक्कर, वटवाघूळ, पाल, उंदीर, कुत्रा, मांजर हेही असतात. ‘पाळीव व जिवंत वन्य प्राण्यांच्या मांस बाजारपेठांवर तसेच त्यांच्या व्यापारावर कायमस्वरूपी बंदी घालावी,’ असे आवाहन जगातील वन्यप्राणी संरक्षण संघटना करीत आहेत. सध्या चीनमधील वुहानमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, तैवान, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, मेक्सिको, घाना, नायजेरिया इत्यादी देशांत अशा मांस बाजारपेठा आहेत. हे मांस स्वस्त असल्यामुळे अनेक गरिबांचे ते खाद्य आहे. सुमारे ६० लाख डॉलरची उलाढाल असणाऱ्या या व्यापारावर र्निबध आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य व मतैक्य आवश्यक आहे. काही भागातील शेतकरी वटवाघळांची विष्ठा खतासाठी वापरतात. त्यांना सजग करावे लागेल. विषाणूजन्य विकारांचे संशोधन करणाऱ्या गटाचे प्रमुख व अमेरिकी वैज्ञानिक प्रो. स्टुअर्ट पिम म्हणतात, ‘महासाथ सुरू होण्याआधीच रोखली पाहिजे. रोगास प्रतिबंध घालणाऱ्या उपाययोजनांमध्ये गुंतवणूक करणे हीच मानवी आरोग्य व जागतिक अर्थव्यवस्थेसाठी उत्तम हमी असेल.’

२०११ ते २०१७ या काळात व्हिएतनामने ‘रोगांची संभाव्यता शोध मोहीम’ राबवली व मांस बाजारपेठांच्या स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष दिले. जंगली प्राण्यांच्या संपर्कात येणारे शेतकरी, मांस बाजारातील विक्रेते, तसेच कोंबडय़ा, कुत्रा, मांजर, डुक्कर, उंदीर व वटवाघळांच्या रक्ताचे नमुने तपासले. त्यातून त्यांच्याकडे प्राथमिक माहिती तयार झाली व त्यांची सार्वजनिक आरोग्यसेवा भक्कम झाली. तेव्हा जागतिक स्तरावर तातडीने ‘रोगांची संभाव्यता शोध मोहीम’ हाती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक देशांच्या प्रक्रि या सहभागाची आवश्यकता आहे.

आज कोविड-१९ मुळे जागतिक अर्थव्यवस्थेस अंदाजे ११.५ लाख कोटी डॉलरचा तडाखा बसला आहे. मांस बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढील दहा वर्षे दरवर्षी २६ अब्ज डॉलरची तरतूद करावी लागेल. विनाश पावलेली अरण्ये ही विषाणूजन्य रोगांचे प्रक्षेपण स्थान ठरत आहेत. ही आणीबाणी समजून घेत वन्यजीव व जंगल संरक्षण ही सर्वाची प्राथमिकता झाली पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण प्रकल्पाचे मुख्याधिकारी इंगर अँडरसन म्हणतात, ‘करोना ही शतकातून एखादी महासाथ आहे असा समज करून घेणं भाबडेपणाचं ठरेल. आपण पर्यावरणाबाबतीत जे काही करीत आहोत त्यामुळे हवामान बदलासारख्याच अकल्पित घटना अतिशय वेगाने सामोऱ्या येत आहेत. करोनापर्वातून जात असताना फक्त औषध व उपचारांचा विचार करणे अपुरे ठरेल. वन्य-प्राण्यांपासून होणारे रोग रोखण्यासाठी जंगलतोड, मांस बाजारपेठ व अन्य सर्व बाबी लक्षात घेऊन सर्व राष्ट्रांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अपरिमित वित्त व जीवितहानी टाळता येणार नाही.’

१९४ राष्ट्रं सदस्यांची जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही देशात साथ पसरल्याची माहिती मिळाल्यावर रोगाच्या खोलात जाऊन औषधे व लशीकरण सुचवते. प्रमाणीकरण करणारी जागतिक संस्था अशी तिची ख्याती आहे. देवी व पोलिओचं निर्मूलन करण्यात संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. जग करोनानं ग्रासल्यावर मात्र जागतिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेला होणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये अमेरिकेचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुळे तिच्या  निर्णयप्रक्रियेवर श्रीमंत राष्ट्रे व कॉर्पोरेट कंपन्यांचा प्रभाव अनेकदा दिसतो. २००३ साली चीनमध्ये सार्सची साथ आल्यावर त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला तातडीने कळवले नव्हते. तेव्हा संघटनेचे महासचिव ग्रो हार्लेम ब्रुंटलँड यांनी चीनला जोरदार फटकारले होते. ते दिवस गेले. सध्याचे महासचिव ट्रेडोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी कधीच स्पष्ट व परखड भूमिका घेतलेली नाही. अमेरिकेला वा चीनला कधी दटावलं नाही. ते गुप्त मतदानातून बहुमताने निवडून आलेले पहिलेच महासचिव आहेत. परंतु आपत्तीप्रसंगी बहुमतानुसार कार्य करण्याचे काही तोटेही असतात. चीनच्या दबावामुळे ही महासाथ जाहीर करण्यास त्यांनी विलंब लावला असा त्यांच्यावर आरोप आहे. जागतिक आरोग्य नियमनाचा हा भंग आहे. अमेरिकेने निधीपुरवठा थांबवताच चीन पुढे सरसावला आणि जागतिक आरोग्य संघटनेला ‘चीनचं बाहुलं’ म्हटलं जाऊ लागलं. त्यातून या संघटनेच्या विश्वासार्हतेला तडे जात आहेत. हे दोष दूर करून जगातील सर्वांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी, जागतिक आरोग्य नियमन सुलभ व्हावे, सामाजिक न्याय व समता या मूल्यांवर आधारित ‘जागतिक आरोग्य घटना’ (ग्लोबल हेल्थ कॉन्स्टिटय़ूशन) तयार करून आरोग्याचे जागतिक मानक ठरवावेत, सार्वजनिक आरोग्य हा जागतिक हक्क व्हावा याकरता वैज्ञानिक व विद्वान प्रयत्नशील आहेत.

करोनाच्या सूक्ष्म विषाणूंचा हल्ला चालू असतानाच कीटक वर्गातील टोळांनीही आफ्रिका व आशिया खंडातील अनेक देशांवर आाक्रमण केलं होतं. जागतिक अन्न व शेती संघटनेमध्ये टोळधाडींचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या गटाने ‘आंतरराष्ट्रीय सहकार्याविना टोळांवर नियंत्रण अशक्य आहे. वाऱ्याचा वेग व दिशा, हवामान स्थिती इत्यादी माहिती एकमेकांना कळवत राहणे आवश्यक आहे. थंड व कोरडय़ा वातावरणात त्यांची संख्या कमी होत असली तरी ते अन्नाविना बराच काळ तग धरून पुन्हा उष्ण काळात सक्रि य होऊ शकतात. या मधल्या काळात टोळांचे निरीक्षण करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. टोळ कोणत्या दिशेने व कोठे येऊ शकतात, त्यांची अंडी कोठे आहेत, याचा अंदाज घेऊन रसायनाची हवेतून फवारणी करता येते. केनिया, सोमालिया, सुदान, येमेन, अर्जेटिना, पराग्वे, सौदी अरेबिया, पाकिस्तान, भारत व नेपाळ या देशांना टोळांनी हैराण केलं आहे. केवळ पाकिस्तानमध्येच २० अब्ज रु.ची पिके टोळधाडीने फस्त केली आहेत. केनियातील ७० हजार हेक्टरवरील पिके साफ झाली असून  टोळधाडीमुळे आफ्रिकी देशांना अन्नसंकटाला  सामोरं जावं लागत आहे. जागतिक अन्न व शेती संघटनेचे तज्ज्ञ सांगत आहेत, ‘सुमारे २५ वर्षांनी आलेली ही टोळधाड इतक्यात आटोक्यात येणार नाही. तिचं नियंत्रण व अन्नपुरवठय़ाकरता जागतिक सहकार्य गरजेचं आहे.’

२००८ साली इंग्लंडमधील ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेन्ज वेदर फोरकास्ट्स’ या संस्थेने जगातील हवामानशास्त्रज्ञांची शिखर परिषद भरवली होती. तीत जगभरातील हवामान भाकिताविषयी सखोल चर्चा झाली. ‘सध्या हवामानाचा वेधशास्त्रीय नमुना (मॉडेल) करण्याकरता सेकंदाला १००० अब्ज प्रक्रि या होणारे संगणक उपलब्ध आहेत. ही क्षमता दहा हजार पटींनी वाढवल्यास अचूकतेकडील प्रवास सुकर होईल. याकरता निधी अपुरा पडत आहे. भव्य गुंतवणूक करून हवामान संशोधनात क्रांतिकारक बदल घडवल्यास गरीब देशांना खूप उपयोग होऊ शकेल. शेती संशोधन, विश्वाची निर्मिती व हवामानबदल यासंबंधीच्या संशोधनासाठी जगातील शास्त्रज्ञ एकत्र आले आहेत. याच पद्धतीने हवामान भाकिताकरता अब्जावधी डॉलरचा भव्य प्रकल्प जगाने हाती घेणे आवश्यक आहे,’ असं आवाहन परिषदेच्या अखेरीस केलं गेलं होतं. कित्येक वर्षांपासून विविध ज्ञानशाखांचे वैज्ञानिक जागतिक समस्या सोडविण्यासाठी जागतिक सहकार्य अत्यावश्यक असल्याचे वारंवार सांगत आहेत.

दुसरं महायुद्ध चालू असताना जपानने अचानक अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला. त्यानंतर काही आठवडय़ांतच रूझवेल्ट यांनी इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना भेटीस बोलावले होते. भल्या सकाळी सगळे संकेत बाजूला ठेवून रूझवेल्ट यांनी चर्चिल यांना झोपेतून उठवून, ‘महायुद्धाच्या वाटचालीतून जगाचं भविष्य अंध:कारमय झाल्यामुळे सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन राष्ट्रसंघ स्थापला तरच जगातील अशांतीपर्व दूर होऊ शकेल,’ असं सांगितलं. रूझवेल्ट यांनीच जगाचा कारभार सुजाणांच्या हाती सोपविण्याच्या या संकल्पनेचं १ जानेवारी १९४२ रोजी नामकरण केलं- ‘संयुक्त राष्ट्रसंघ’! काही महिन्यांतच या संकल्पनेला मूर्त रूप आलं. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ कार्यालय चालू झालं. त्यातून जागतिक सुव्यवस्था घडविण्याचे प्रयत्न सुरू झाले.  संयुक्त राष्ट्रसंघाने अर्थसाहाय्य, शेती संशोधन, बालकल्याण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत जागतिक सहकार्य मिळवत अनेक जागतिक संस्था सुरू केल्या. १९४८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. विसाव्या शतकावर महायुद्ध व शीतयुद्धाची दाट छाया होती. दुष्काळ व भूकबळीमुळे जगभर हाहाकार उडाला होता. जगातील शेतीशास्त्रज्ञांनी ‘कन्सल्टेटिव्ह ग्रुप ऑन इंटरनॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च’  स्थापन केला. तांदूळ, गहू, मका, तेलबिया अशा महत्त्वाच्या पीक संशोधनासाठी जगभर संस्था निर्माण केल्या. हरित क्रांती हे त्याचं फलित होतं. १९८८ साली ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने जगातील वैज्ञानिकांच्या अभ्यासातून हवामान- बदलाचे विज्ञान व अर्थशास्त्र समजावून सांगत परिणामांचा भविष्यवेध घेतला. या शतकात विश्वनिर्मिती, महास्फोट, मूलकण यांचा शोध घेण्यासाठी जगातील शास्त्रज्ञ एकत्र आले. १०० देशांतील दहा हजार वैज्ञानिकांनी अथक संशोधनातून बोसॉन कणांचं गूढ उकललं.

या महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाला ७५ वर्षे पूर्ण होताना संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्याची तीन कालखंडांत विभागणी केली आहे. ते म्हणतात, ‘अमेरिका व सोविएत युनियनमधील शीतयुद्धाच्या काळात जगाची विभागणी दोन ध्रुवांत होऊनही शांतता निर्माण करण्याचे कार्य कल्पकतेने सुरू होते. १९९१ मध्ये  सोविएत युनियनची शकले झाल्यानंतर जग अमेरिकाकेंद्री  एकल-ध्रुवी झाले. थोरल्या जॉर्ज बुश यांनी ‘जगाची नवी व्यवस्था’ असं त्याचं वर्णन केलं होतं. तरीही कुवेत, इराक, अफगाणिस्तान येथे सामूहिक अत्याचार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रयत्नशील राहिली. मागील दोन-तीन वर्षांतील अमेरिका व चीनमधील संघर्ष व शीतयुद्धाकडील वाटचाल पाहता हे जग अधिक अनागोंदीचे झाले आहे. अमृतमहोत्सव साजरा करताना पुन्हा एकदा जगाने एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रसंघास गतवैभव प्राप्त करून द्यावे.’ २१ व्या शतकावर हवामान- बदलाच्या संकटाचे गडद ढग आहेतच, त्यात करोनामुळे सार्वजनिक आरोग्याची जागतिक आणीबाणी आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचं कळकळीचं आवाहन हे त्यातूनच आलं आहे. संपूर्ण जगावर झालेल्या या विषाणू हल्ल्यामुळे नवा विवेकी मार्ग हुडकणे ही निकड आहे. नैसर्गिक जग हे काही दयाळू नाही. इतर कोणत्याही भक्षकापेक्षा विषाणू हाच मानवी मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. विषाणू हा मृत्यूचा स्रोत आहे तसाच तो दुर्मीळ माहितीचाही स्रोत आहे. त्याआधारे आरोग्य यंत्रणेत बदल घडवल्यास कोटय़वधी जीव वाचू शकतील. २१ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकासमोर आरोग्य, हवामानबदल व अर्थसंकटाच्या अरिष्टाने जग वेढले आहे. अशात अमेरिका, चीन व रशिया यांच्यामुळे पुन्हा एकदा शीतयुद्धाची लक्षणे दिसू लागली आहेत. याविषयी लंडनच्या ‘द इकॉनॉमिस्ट’ व दिल्लीतील ‘डाउन टू अर्थ’ या नियतकालिकांनी संपादकीयातून चिंता व्यक्त केली आहे. दोन्हींचे मथळे होते- ‘नवी जागतिक अव्यवस्था!’ अशा अनागोंदीच्या काळात जगातील जनता बा. सी. मर्ढेकरांनी सांगितलेल्या ‘सर्वे जन्तु रुटीना:, सर्वे जन्तु निराशया:’ अशा असुरक्षित अवस्थेत आयुष्य कंठत आहे. सारांश : विषाणूंनी जगाला बदलून टाकलं आहे. आता माणसानं स्वत:त व जगात बदल करण्याची वाट पाहावी लागेल. २१ व्या शतकातील सत्योत्तर ‘वेटिंग फॉर गोदो!’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2020 1:17 am

Web Title: virus coronavirus covid 19 pandemic vishvache angan dd70
Next Stories
1 सांगतो ऐका : माझ्या ग्वाल्हेरच्या आठवणी
2 माहिती अधिकार कायदा व्हेंटिलेटरवर!
3 ‘लेखकाला तीन मिती ओलांडून जाता आलं पाहिजे..’
Just Now!
X