कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गेल्या काही दिवसांपासून आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांच्या डोळ्यास डोळा लागलेला नाही.
रात्रभर नुसते या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत असतात. वहिनी सांगत होत्या, एक-दोनदा तर या तळमळीमुळे खाटेवरून पडलेसुद्धा. पूर्वी मात्र त्यांचे असे नव्हते. खाटेवर पाठ टेकली रे टेकली, की त्यांचे विमान टेकॉफ घेई. बरे, हे विमानही साधे नव्हे, तर अगदी बोइंग!
लोकांना त्यांच्या झोपेचा काय हेवा वाटे! एकदा तर आमचा चाळमालक त्यांच्याविरोधात चक्क पोलिसांत गेला होता. ‘भाडेकरू टिकत नाहीत. चाळीत येऊन डेसिबल मोजा’ म्हणत होता! आम्ही पूर्वी सांताक्रूझला राहायचो म्हणून टिकलो!
पण आता मात्र लेलेंच्या पापणीला पापणी लागत नाही.
आता तसे पाहाल तर झोप आमचीही उडाली आहे.
राष्ट्रासमोर अत्यंत गहन-गंभीर प्रश्न आहेत. जवळजवळ महिना झाला- अजून युती फुटते की तुटते, हे ठरलेले नाही. बरे, युतीच लटकल्यामुळे आघाडीचेही काही ठरत नाही. त्यामुळे तिकडे आमचे परमलाडके नेते मा. ना. अजितदादा पवार यांनी ‘आता माझी सटकली’ असे मेडिकल बुलेटिन काढले आहे. जळीस्थळीकाष्ठीपाषाणी.. झालेच तर वृत्तच्यानेली या एकाच राष्ट्रीय प्रश्नाची चर्चा सुरू आहे. स्वप्नातसुद्धा आम्हाला १४५, १४३, १६० असे आकडे दिसत आहेत. असे असताना कोणत्याही राष्ट्रहितेच्छु नागरिकास झोप येईलच कशी?
पण लेलेंचे मात्र भल्तेच.
परवा आम्ही ठरवून दुपारचे जागरण केले आणि त्यांच्या भेटीस गेलो.
म्हटले, ‘लेले, काय ही अवस्था करून घेतलीत? अहो, कोणतीही लाट अखेर ओसरणारच! त्याचा एवढा काय विचार करायचा?’
तर तांबारलेल्या डोळ्यांनी लेले वसकन् अंगावरच आले.
‘कस्ली लाट? त्याचा काय संबंध?’
‘नाही कसा? म्हणून तर तुमची झोप उडालीय ना?’
‘कोण म्हणतो असे? आम्हांस झोप येत नाही याचे कारण पूर्णत: सामाजिक आहे. आधीच जात, धर्माच्या नावाने समाज दुभंगला आहे. तशात आता मोबाइलमुळे नवे संकट समोर आले आहे. आम्हांस चिंता आहे ती त्याची!’
मनी म्हटले, मोबाइलच्या संकटाबद्दल बोलताहेत. परवा आम्ही शेजारच्या फाटकांना लेलेंबद्दलचा एक एसेमेस टाकला होता. तो तर त्यांनी चाळीच्या व्हाट्सॅप ग्रुपवर टाकला नाही ना?
आम्ही निरागसपणे विचारले, ‘कसले संकट म्हणताय लेले?’
‘स्वत:ला पत्रकार म्हणविता ते पाकिटांपुरतेच काय?’ लेलेंनी तेवढय़ात आमच्यावर सूड उगवला. ‘त्या स्टीव्ह जॉब्जमुळे आपल्या समाजात नवा वर्गसंघर्ष निर्माण झाला आहे, हे तुम्हाला दिसत नाही काय?’ असे म्हणून त्यांनी डोक्यावरून चादर ओढून घेतली. आम्ही वहिनींकडे पाहिले, तर त्यांच्या डोळ्यांत पाणी. म्हणाल्या, ‘त्या दिवशी माझा भाऊ आला होता. तेव्हापासून हे असं ‘वर्गसंघर्ष वर्गसंघर्ष’ चाललंय. मला वाटलं, आमच्या चिंटय़ानेच वर्गात काही भांडण केलं की काय? पण..’
त्यानंतर आमचे दोन तास मोडून वहिनींनी आमची जी काही ज्ञानवृद्धी केली, त्यावरून आम्हांस एवढेच समजले की, अलीकडेच लेलेंनी तब्बल तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचा नवाकोरा चायनामेड मोबाइल घेतला. तो त्यांनी मोठय़ा कौतुकाने त्यांच्या मेव्हण्याला दाखवला. म्हणाले, ‘बघा. व्हाटसॅप, हैक, येमिंडिकेटर अशी सगळी अॅप आहेत याच्यात. शिवाय फोनपण करता येतो. आता मेव्हण्यानेपण ‘व्वा, मस्त आहे फोन. छान डिझाइन आहे. एकदम सॅमसंग एस्फोर वाटतोय’ असं काही बोलायचं ना? तर त्याने खिशातून त्याचा आयफोन काढला!..
बरोबरच आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्याही डोळ्यांना हे आयफोन आणि आयफोनवाले जरा डाचतच होते! ते उष्टावलेल्या सफरचंदाचं चित्र पाहून आमच्याही पोटातले आम्ल जरा खवळतच होते!
अरे, स्वत:ला काय समजतात काय हे साडेतीन टक्के? आम्ही अँड्रॉइडवाले म्हणजे बहुजन समाज आणि तुम्ही म्हणजे उच्चवर्णीय?
दुसऱ्या ओएसचा स्पर्शसुद्धा चालत नाही यांना! साधे ब्लुटूथने शिवायला गेलो तरी तोंडावर दरवाजा आपटतात! आणि गुणवत्तेचा माज किती?
आता अँड्रॉइडमध्ये काय कमी गुणवत्ता असते? तेथेही सगळी अॅप चालतातच ना? क्यामेरा, आवाज.. कश्शा कश्शात कमी नाही. उलट, आमच्या एका चायना मोबाइलवर गाणे लावले तर लोकलचा अख्खा डबा दणाणून जातो! आणि आयफोन? नुसती मैनाराणी मंजुळगाणी! बरे, विकत घ्यायचा म्हटले तर दुकानाच्या आधी बँकेच्या दारात जावे लागते.
खरे तर अशा फोनवरून लेलेंनी एवढे काही नाराज व्हायचे कारण नव्हते. पण तो फोन त्यांच्या मेव्हण्याने घेतला होता ना!
मग त्यांना कशी बरे झोप लागणार?
वहिनींना म्हटले, ‘येईल हळूहळू. तुम्ही फक्त त्यांना अॅसिडिटीवरचं औषध सुरू करा..’