News Flash

क्रिकेटपटूंचं बायबल

लाटा येतात आणि जातात.. प्रयोग होतात आणि विसरले जातात. पण परंपरांचं तसं नसतं. त्या चिवट आणि दीर्घायुषी असतात. क्रिकेटचं बायबल मानलं जाणारं ‘विस्डेन’ हे इंग्लंडमध्ये

| April 21, 2013 12:11 pm

लाटा येतात आणि जातात.. प्रयोग होतात आणि विसरले जातात. पण परंपरांचं तसं नसतं. त्या चिवट आणि दीर्घायुषी असतात. क्रिकेटचं बायबल मानलं जाणारं ‘विस्डेन’ हे इंग्लंडमध्ये प्रकाशित होणारं नियतकालिक अशाच समृद्ध परंपरेचं झळझळीत उदाहरण आहे. गेली १४९ र्वष नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या या वार्षिकाला नुकतीच १५० र्वष झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याच्या आगळ्या वैशिष्टय़ांचा परामर्ष घेणारा लेख..

‘विस्डेन’! नुसतं नाव ऐकलं तरी क्रिकेटप्रेमींचं मन उचंबळून येतं. कारणही तसंच आहे. विस्डेन आणि क्रिकेट, क्रिकेट आणि विस्डेन ही अगदी एकरूपच आहेत. आणि ही परंपरा थोडीथोडकी नव्हे, तर चक्क दीडशे वर्षांची आहे!

काय आहे हे ‘विस्डेन’?

तर हे आहे- क्रिकेटसंबंधी सारी जंत्री देणारं नियतकालिक.. वार्षकि. ते ओळखलं जातं क्रिकेटचं बायबल म्हणून. पण खुद्द ‘विस्डेन’ स्वत:ला तसं म्हणवून घेत नाही. ते त्याच्या प्रकृतीतच नाही. तेही बरोबरच आहे. आपली थोरवी इतरांनी सांगितलेलीच चांगली. जे काय म्हणायचंय ते इतरांनी म्हणावं.

‘विस्डेन’मध्ये वर्षभरातील सर्व सामन्यांचे निकाल, त्यांचे धावफलक, सगळी आकडेवारी असते आणि ती क्रिकेटजगतात प्रमाण मानली जाते. ‘विस्डेन’चा शब्द हा अखेरचा मानण्याचा जणू अलिखित नियमच असावा. आणि आता ती प्रथाच पडून गेली आहे.

असं असलं तरी ‘विस्डेन’ हे क्रिकेटविषयक संस्थेचे अधिकृत प्रकाशन नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद वा एम. सी. सी. या कुणाचाही त्याच्याशी संबंध नाही. त्यातील सारी माहिती, मजकूर, आकडेवारी ही अर्थातच अनधिकृत असते. आणि गंमत अशी की, तिलाच अधिकृत मानलं जातं. त्यातील अक्षरन् अक्षर सर्वात खात्रीलायक, विश्वास ठेवण्याजोगं मानलं जातं. यातल्या आकडेवारीला आव्हान देण्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. कारण त्याच्यामागे आहे दीडशे वर्षांची परंपरा. म्हणजे पहिला अधिकृत कसोटी सामना होण्यापूर्वीपासूनच हे नियतकालिक इंग्लंडमध्ये प्रकाशित होत आहे. कारण पहिली कसोटी झाली १८७७ साली. १५, १६, १७ आणि १९ मार्च हे चार दिवस. आणि विस्डेन प्रथम प्रकाशित झाले ते १८६४ मध्ये. पण गंमत अशी की, ऑस्ट्रेलियातील या पहिल्या सामन्याचा समावेश या प्रकाशनात शंभर वर्षांपर्यंत करण्यात आला नव्हता. (कारण त्यावेळी हा सामना कम्बाइंड ऑस्ट्रेलियन इलेव्हन आणि दौऱ्यावरील इंग्लिश संघात खेळला गेला होता आणि नंतर तोच पहिला अधिकृत कसोटी सामना ठरवण्यात आला.) १९७७ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. कसोटी सामन्यांना सुरुवात होऊन शंभर वष्रे झाली तेव्हा या पहिल्या कसोटीच्या धावफलकाचा समावेश विस्डेनमध्ये करण्यात आला. योगायोगाची गोष्ट अशी की, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातच पहिला आणि शतकमहोत्सवी कसोटी सामना खेळला गेला होता. या शतकमहोत्सवी सामन्याच्या तारखा १२, १३, १४, १५, १६ आणि १७ मार्च अशा होत्या. या दोन्ही कसोटी सामन्यांचा निकालही सारखाच लागला होता. ऑस्ट्रेलिया- ४५ धावांनी विजयी. फरक एवढाच, की पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते ई. जे. ग्रेगरीने, तर शतकमहोत्सवी कसोटीत ग्रेग चॅपेलने. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या ई. बॅनरमनने पहिल्या डावात (निवृत्त- जखमी) शतक (१६५ धावा) झळकावलं होतं. शतकमहोत्सवी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्याच रॉडनी मार्शनं दुसऱ्या डावात शतक (नाबाद ११०) केलं होतं. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मिडिवटरनं पहिल्या डावात पाच व दुसऱ्या डावात एक असे एकूण सहा बळी, तर त्याचा सहकारी केंडाल याने पहिल्या डावात एक व दुसऱ्या डावात पाच बळी मिळवले होते. शतकमहोत्सवी कसोटीचा मानकरी होता डेनिस लिली. त्यानं पहिल्या डावात सहा, तर दुसऱ्या डावात पाच असे एकूण अकरा बळी मिळवले.

असं हे ऐतिहासिक प्रकाशन सुरुवातीला विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक (ह्र२ीिल्ल उ१्रू‘ी३ी१ह्ण२ अ’ेंल्लूं) या नावानं प्रकाशित झालं. एक सांगण्याजोगी बाब अशी की, पहिली पाच वष्रे ते क्रिकेटर्स हा शब्द उ१्रू‘ी३ी१ह्ण२ अशा प्रकारे छापत होतं. पाच वर्षांनंतर मात्र त्यात योग्य तो बदल करून  उ१्रू‘ी३ी१२ह्ण असे छापले जाऊ लागले. म्हणजे ‘एका क्रिकेटपटूचं पंचांग’ऐवजी ‘सर्व क्रिकेटपटूंचं पंचांग’ असं नामकरण करण्यात आलं. ते किती सार्थ आहे, ते आपण सारे जाणतोच.

सुरुवातीला या क्रिकेट पंचांगात क्रिकेटखेरीज अन्य खेळांबाबत, इतकंच काय- पण काही महत्त्वाच्या घडामोडींची माहितीही देण्यात येई. ते साहजिकच होतं. कारण त्यावेळी या प्रकारची क्रिकेटसंबंधी अनेक नियतकालिकं प्रकाशित होत होती आणि त्या स्पध्रेत टिकून राहण्यासाठी ही गोष्ट गरजेची होती. त्यामुळे बोटींच्या शर्यती, डर्बीचे विजेते, इतकं कशाला- इंग्लंडच्या यादवी युद्धाच्या बातम्या आणि अन्य स्पर्धाचे विजेते, इ. माहितीही देण्यात येत असे. १८७७ च्या प्रकाशनात तर वेल्समध्ये १२ नोव्हेंबर १८७५ रोजी पिकलेल्या स्ट्रॉबेरीज सापडल्याची, तसंच १९७६ च्या आवृत्तीत १८ सप्टेंबर १८७५ हा दिवस अतिशय उष्ण- ५ी१८ ँ३ दिवस असल्याची माहिती देण्यात आली होती. अल्मनॅक म्हणजे पंचांग या नावाला साजेसे दिनविशेषही त्यात असत. राजेमहाराजांचे जन्म आणि स्मृतिदिन इ. प्रत्येक दिवसासाठी अशी काही ना काही नोंद असे.

दीर्घकाळ या नियतकालिकाचं मुखपृष्ठ साल्मन िपक रंगाचं होतं. पण १९३८ साली ७५ व्या वर्षांच्या प्रकाशनाचं मुखपृष्ठ (आज सर्वाना माहीत असलेल्या, किंबहुना विस्डेनची ओळख बनलेल्या) पिवळ्या रंगाचं करण्यात आलं. त्याचवेळी मुखपृष्ठावर क्रिकेट खेळाडूंच्या प्रतिमाही छापण्यात आल्या. मुखपृष्ठावर खेळाडूचं छायाचित्र सर्वप्रथम २००३ सालच्या आवृत्तीवर झळकलं. तो मान इंग्लंडच्या मायकेल वॉनला मिळाला.

विस्डेनची प्रत्येक आवृत्ती संग्राह्य़ असते. तरीही सर्वाधिक प्रसिद्ध आवृत्ती कोणती, असा प्रश्न केला तर उत्तर मिळतं : १९३९ चं विस्डेन. खरं तर ई. डब्ल्यू. स्वँटन या प्रख्यात क्रिकेट लेखकाच्या मालकीची जी प्रत होती ती. दुसऱ्या महायुद्धात तो सहभागी होता आणि जपाननं त्याला युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतलं त्यावेळी ही प्रत त्याच्याकडे होती. सर्व युद्धकैद्यांमध्ये ती एवढी लोकप्रिय ठरली, की वाचनालयातील पुस्तकांप्रमाणं तिच्यासाठी नंबर लावले जात. ती मिळायची तीही केवळ बारा तासांसाठी! त्या प्रतीवर पहारेकऱ्यांतर्फे ‘घातपाती नाही’- ठ३ २४ु५ी१२्र५ीह्ण, असा शिक्का मारण्यात आला होता. ही प्रत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात हाताळली गेली होती, की दोघा कैद्यांनी ती भाताच्या खळीच्या साहाय्याने ठीकठाक केली. २००० साली स्वँटन ९२ व्या वर्षी निधन पावल्यानंतर त्यांची ही जुनाट, पण सुस्थितीतील प्रत लॉर्ड्स येथील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली.

संग्राह्य़ असं विस्डेन पहिल्या वर्षी केवळ ११२ पानांचं होतं. दरवर्षी त्याचा आकार वाढत गेला आणि आता तो १५०० पानांवर गेला आहे. सुरुवातीला किती माहिती घ्यायची याचा विचार करावा लागत असे. तर आता कोणती माहिती गाळावी लागेल याचा विचार करावा लागतो. १९६३ साली विस्डेनची शतकी आवृत्ती प्रकाशित झाली आणि त्या सर्व शंभर अंकांचा संच हा त्यावेळी २५० पौंड मोलाचा होता असं सांगण्यात येत होतं. आजमितीला त्याची किंमत एक लाख पौंडांवर (सुमारे पाऊण कोटी रुपयांहून जास्त) जाईल असं सांगितलं जातं. प्रख्यात गीतकार, ऑस्करविजेते सर टिम राइस यांचाही या संग्राहकांमध्ये समावेश आहे. विस्डेनचं सारं रेकॉर्ड १९४४ मध्ये जर्मन बॉम्बहल्ल्यात जळून गेलं. तरीही ती सारी माहिती पुस्तकांत असल्यामुळं काही अडचण झाली नाही. त्यामुळंच युद्धाच्या सर्व वर्षांत विस्डेन नियमित प्रकाशित होत होतं.

असं हे नियतकालिक सुरू केलं होतं एका क्रिकेटपटूनंच. त्याचं नाव जॉन विस्डेन. तो व्हिक्टोरियन युगातल्या खेळाडूंपकी होता. पाच फूट चार इंच उंचीच्या जॉनला ‘लिट्ल वंडर’ म्हणत. कारण त्यानं एका सामन्यात सर्वच्या सर्व दहा बळी मिळवले होते आणि तेही सर्वाचे त्रिफळे उडवून! १८५९ मध्ये कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या इंग्लंड संघात त्याचा समावेश होता.

विस्डेनचा पहिला संपादक होता डब्ल्यू. एच. क्रॉसफोर्ड (१८६४-६९). आजपर्यंत विस्डेनचे १५० वर्षांत फक्त १७ संपादक झाले आहेत. सर्वाधिक काळ हे पद भूषवलं सिडनी पार्डननं. तो १८९१ ते १९२५ अशी ३५ वष्रे संपादक होता. अन्य संपादक असे : डब्ल्यू. एच. नाइट (१८७०-७९), जी. एच. वेस्ट (१८८०-८६), चार्लस एफ. पार्डन  (१८८७-९०), सी. स्टय़ुअर्ट केन (१९२६-३३), सिडनी जे. सदरटन (१९३४-३५), विल्फ्रेड एच. ब्रूक्स (१९३६-३९), हॅडन व्हिटाकर (१९४०-४३), ह्य़ूबर्ट प्रेस्टन  (१९५२-८०), जॉन वूडकॉक (१९८१-८६), ग्रॅम राइट (१९८७-९२, २००१-०२), मॅथ्यू एंगल (१९९३-२०००, २००४-०७), टिम डी’ लिसल (२००३), सिल्ड बेरी (२००८-११), लॉरेन्स बूथ (२०१२-आजपर्यंत). गेल्या ७२ वर्षांतला बूथ हा सर्वात कमी वयाचा संपादक आहे.

क्रिकेटप्रेमींचं सोडून द्या, पण सर्वसामान्य वाचकांनाही विस्डेन ठाऊक असतं ते त्याच्या क्रिकेट पंचकामुळं! म्हणजे वर्षांतील पाच सर्वोत्तम खेळाडूंच्या निवडीमुळं! ही प्रथा १८८९ मध्ये सुरू करण्यात आली. तिचं वैशिष्टय़ असं की, या मानासाठी एका खेळाडूची फक्त एकदाच निवड करण्यात येते. अर्थात पाच खेळाडूंची निवड करण्याची प्रथा १९२७ पासून सुरू झाली ती २०१० पर्यंत चालली. त्याआधी १८९६ मध्ये फक्त एका खेळाडूचीच- डब्ल्यू. जी. ग्रेसची निवड करण्यात आली होती. तर १८९० मध्ये नऊ फलंदाज निवडले गेले होते. २००६ च्या पाच खेळाडूंच्या निवडीनंतर हा मान मिळालेल्या खेळाडूंची संख्या ३०० झाली होती. २०११ मध्ये मात्र फक्त चार क्रिकेटपटूंचीच निवड केली गेली. कारण निवडल्या गेलेल्या पाचव्या खेळाडूवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं त्याच्यावर बंदी घातल्यामुळे त्याला वगळण्यात आलं. २००८ मध्ये विस्डेननं गतकाळातील ज्या प्रख्यात खेळाडूंची काही ना काही कारणानं या मानासाठी निवड होऊ शकली नव्हती अशांची नावं प्रसिद्ध केली आणि ती वाचल्यावर आश्चर्यच वाटतं. ते खेळाडू : अब्दुल कादिर, बिशनिशग बेदी, वेस्ली हॉल, इंझमाम उल हक आणि जेफ थॉमसन! समानतेच्या युगात २००९ मध्ये इंग्लंडच्या क्लेअर टेलरनं या यादीत स्थान मिळवलं. हा बहुमान मिळवणारी ती पहिली महिला. 

नव्या शतकाच्या आगमनाबरोबर अनेक उपक्रम योजले गेले. ‘विस्डेन’ त्यात मागं कसं राहणार? त्यानंही १०० क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ यांचं मंडळ नेमून त्यांच्याकडं शतकातील सर्वोत्तम पाच खेळाडूंची निवड करण्याची कामगिरी सोपवली. त्यानुसार सर डॉन ब्रॅडमन, सर गॅरी सोबर्स, सर जॅक हॉब्स, सर व्हिव्हियन रिचर्डस् आणि शेन वॉर्न यांची निवड करण्यात आली. त्यातही ब्रॅडमन हा एकच खेळाडू असा होता, की ज्याचा समावेश मंडळातील प्रत्येकाने आपल्या यादीत केला होता. ज्या शंभराव्या आकडय़ाने त्याला कसोटी धावांच्या सरासरीत दगा दिला होता, त्यानं या टक्केवारीत मात्र डॉनच्या पदरात पुरेपूर माप टाकलं होतं.

नव्या शतकात विस्डेननं २००४ मध्ये एक नवी प्रथा सुरू केली. वर्षांतला आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून खेळाडूची निवड करण्याची! या मानासाठी फक्त एकदाच निवड हा नियम नाही. ‘विस्डेन लीिडग क्रिकेटर इन् द वर्ल्ड’ या किताबाचा पहिला मानकरी होता- रिकी पाँटिंग. आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे वीरेंद्र सेहवागची निवड लागोपाठ दोन वष्रे- २००८ आणि २००९ मध्ये- झाली. २००७ मध्ये विस्डेननं गेल्या शतकातील मानकऱ्यांची नावे जाहीर केली होती. विस्डेन प्रसिद्ध करणाऱ्या जॉन विस्डेन आणि कंपनीने प्रकाशनाला शंभर वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं इंग्लंड वि. वेस्ट इंडीज मालिकेसाठी विस्डेन करंडक देणगी म्हणून दिला. लॉर्ड्स संग्रहालयात हा करंडक अ‍ॅशेस करंडकाच्या शेजारीच ठेवलेला आहे. पहिल्या अधिकृत कसोटीची दखल न घेणाऱ्या विस्डेननं मर्यादित षटकांच्या पहिल्या सामन्याचाही अगदी थोडक्यात धावफलक दिला आणि स्वत:ची ती परंपरा कायम राखली.

कालौघात विस्डेनची मालकीही बदलत गेली. काही काळ रॉबर्ट मॅक्सवेल यांच्याकडं ती होती. त्यांच्या मॅकडोनाल्ड प्रकाशनतर्फे ‘विस्डेन’ १९७० च्या दशकात प्रकाशित झालं. पहिल्याच कार्यक्रमात रॉबर्टने सर्वाना विस्डेनच्या पानांचा आकार अतिशय लहान असून तो बदलण्याची गरज आहे, असं सांगून धक्का दिला होता. तो बदलला नाही, तरी मोठय़ा आकाराची मर्यादित (५००० प्रती) आवृत्ती मात्र सर्वप्रथम २००६ मध्ये प्रकाशित करण्यात आली. अब्जाधीश आणि संग्राहक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या सर पॉल गेट्टी यांना ‘विस्डेन’ एवढं आवडलं, की त्यांनी १९९३ मध्ये ही कंपनीच विकत घेऊन टाकली. २००३ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत ते तिचे अध्यक्ष होते. २००८ मध्ये कंपनी ब्लूम्सबेरी पब्लििशग ग्रुपला विकण्यात आली.

असा हा ‘विस्डेन’चा इतिहास. आता थोडक्यात ‘विस्डेन’मध्ये काय असतं, ते पाहू. ‘विस्डेन’ची संपादकीय टिप्पणी महत्त्वाची असते आणि अनेकदा तिच्यावर वाद होतात. ‘क्रिकेटियर्स ऑफ द इयर’ आणि ‘लीिडग क्रिकेटियर ऑफ द वर्ल्ड’ यांचे परिचय व महत्त्वाची आकडेवारी. ती अगदी समग्र असण्याचा आग्रह कधीच धरला गेला नाही. सध्या विस्डेनने ईएसपीएन क्रिकिन्फोबरोबर ऑनलाइन सहकार्य केले असून तेथे सर्व आकडेवारी उपलब्ध असते. यात सर्वाधिक माहिती इंग्लंडमधील क्रिकेटसंबंधी असते. आधीच्या हंगामातील सर्व काऊंटी सामने तसंच विद्यापीठे, शाळा आणि क्लब्जच्या सामन्यांचा समावेश असतो. सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असतोच; शिवाय प्रत्येक देशातील महत्त्वाच्या स्पर्धाचा गोषवाराही देण्यात येतो. नियम आणि व्यवस्थापन यांबाबत त्यात खास विभाग आहे. डकवर्थ लुईस पद्धत, पॉवर-प्ले वगरेबाबतही लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. नंतरच्या विभागात आधीच्या वर्षांतील क्रिकेटविषयक पुस्तकांचे परीक्षण, निवृत्तांबाबतची जंत्री आणि प्रमुख दिवंगतांना श्रद्धांजली, इ.चा समावेश असतो. क्रिकेटचे पंचांग म्हणजे आगामी आंतरराष्ट्रीय सामने आणि इंग्लंडमधील सामन्यांचा कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आगामी सात वर्षांतील नियोजन आणि क्रिकेटशी संबंधित काही गमतीदार गोष्टींचाही अंतर्भाव असतो. उदा. सशामुळे पॅव्हेलियन जळाले, उष्ण हवेच्या बलूनने खेळ थांबवला, किंवा पंच रात्रभर मदानातच कोंडले गेले, इ. किस्से असतात.

विस्डेनचा हा सर्वसमावेशकपणा पाहता त्यासंबंधी कितीही लिहिलं तरी संपणार नाही. पण कुठंतरी थांबायलाच हवं. शिवाय ज्यांना उत्सुकता आहे, ते माहिती महाजालावर जाऊन त्यांना हवं ते हव्या तितक्या वेळ पाहू शकतात. शेवटी एकच महत्त्वाची नोंद देऊन थांबू या. पहिल्या ‘टाय टेस्ट’विषयी विस्डेननं म्हटलं होतं :

‘मेलबर्न येथे १७ फेब्रुवारी १९६१ रोजी हे दाखवून दिलं की, खेळाचा- सामन्याचा वा मालिकेचा- निर्णय काय झाला, यापेक्षा खेळ हा नेहमीच श्रेष्ठ आहे. त्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या या व्यापारी शहराचा सारा कारभार थंडावला होता. कारण सारे शहर वेस्ट इंडिजच्या हसऱ्या चेहऱ्याच्या खेळाडूंना- जे विजेते नव्हते, तर पराभूत संघाचे सदस्य होते- त्यांना निरोप देत होते. खास शाही पाहुणे किंवा राष्ट्रीय हीरोंना ज्याप्रकारे निरोप देण्यात येतो, अगदी त्याच त्याच प्रकारे.’

किती खरं आहे! खेळाडू नाही, तर खेळच अखेर महत्त्वाचा असतो. खेळाडू येतात आणि जातात; पण खेळ मात्र कायम असतो. तसंच जोवर क्रिकेट असेल, तोवर ‘विस्डेन’ असणारच!

 

भारता, तुझ्या खेळाला तुझीच गरज आहे!

‘अखेर भारताला एक देणगी मिळाली आहे. या संपूर्ण खेळाला आकार देण्याची कुवत आता त्यांच्याकडे आहे. परंतु अनेकदा त्यांचा खेळ हा काहीजणांच्या स्वार्थासाठी असल्याचे दिसते. इतर देशही हा खेळ आपल्या हितासाठीच वापरतात. क्रिकेटची नियामक मंडळे ही काही नि:स्वार्थी लोकांनी भरलेली नाहीत, परंतु त्यांच्यापैकी कुणाकडेही भारताएवढी ताकद नाही आणि ते त्याच्याप्रमाणे जबाबदारीही वाटून घेत नाहीत. ज्यावेळी ट्विेंटी-२० सामन्यांवर आधारीत राष्ट्रवादाचा उदय झाला, नेमक्या त्याच सुमारास भारताच्या एकेकाळी दरारा असलेल्या फलंदाजीच्या क्रमवारीचे विघटन झाले. हे सारे अगदी वादळी आहे आणि त्यामुळे या खेळाची जगातील अवस्था अगदी डळमळीत झाली आहे. भारता, आता तुझ्या खेळाला तुझीच गरज आहे.’

संपादक लॉरेन्स बुथ, विस्डेन अ‍ॅलमॅनक, २०१२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 12:11 pm

Web Title: wisden cricketers almanack
टॅग : Sports
Next Stories
1 दलितांनी कोषातून बाहेर पडावे!
2 कुंपणच शेत खाते तेव्हा..
3 प्राध्यापकांची ‘गुणवत्ता’ कशावर तोलणार?
Just Now!
X