08 July 2020

News Flash

अ‍ॅलेक्झँडरच्या इच्छा!’

अ‍ॅलेक्झांडर दि ग्रेट या विश्वसम्राटाच्या आयुष्याची अखेर मोठी करुण झाली. एकेक प्रदेश, देश-विदेश पादाक्रांत करत असतानाच त्याला जीवघेण्या आजाराने गाठले. यातून आपण वाचणार नाही हे

| December 9, 2012 12:05 pm

अ‍ॅलेक्झांडर दि ग्रेट या विश्वसम्राटाच्या आयुष्याची अखेर मोठी करुण झाली. एकेक प्रदेश, देश-विदेश पादाक्रांत करत असतानाच त्याला जीवघेण्या आजाराने गाठले. यातून आपण वाचणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या अमात्यांना बोलावले आणि आपल्या शेवटच्या तीन इच्छा त्यांना सांगितल्या. त्या अशा-
१. मृत्यूनंतर माझी शवपेटिका माझ्या डॉक्टरांनीच उचलून मिरवणुकीने दफनभूमीकडे न्यावी.
२. ज्या मार्गाने महायात्रा जाणार असेल, त्या मार्गावर दुतर्फा मी आजवर मिळवलेली हिरे-माणिके-रत्ने-पाचू यांच्या राशी पसराव्यात.
३. माझे दोन्ही हात शवपेटीतून बाहेर काढून दोन्ही बाजूंना लोंबकळू द्यावेत.
आपल्या या अजब इच्छा पूर्ण करण्याचे वचन अमात्यांकडून घेतल्यावर अ‍ॅलेक्झांडर शांत झाला. भीड चेपल्यावर अमात्यांनी त्याला या विस्मयकारक इच्छांमागचा विचार स्पष्ट करण्याची विनंती केली.
‘‘माझी शवपेटी डॉक्टरांनीच उचलून न्यावी हे सांगताना मला माझ्या जनतेला दाखवून द्यावयाचे आहे, की वैद्यकशास्त्रही मृत्यूपुढे पराभूत आहे. कितीही तज्ज्ञ आले आणि प्रगती झाली तरी मृत्यूपुढे वैद्य हतबल ठरतात. त्यांची ही हतबलता आणि त्यांच्या मर्यादा जनमानसात ठसाव्यात म्हणून ते डॉक्टरच माझे खांदेकरी व्हायला हवेत. हिऱ्या-माणकांच्या राशी कितीही मिळवल्या तरी उत्तम आरोग्य नसेल तर त्या निरुपयोगी आणि त्याज्य ठरतात हेही मला लोकांना दाखवावयाचे आहे. महत्त्वाचा आहे तो समय. वेळ पाळणे आणि वेळ वाया न दवडणे ही खरी समृद्धी. लोंबकळणारे माझे हात रिकामे असतील, त्यात आभूषण-अलंकार नसतील, तसेच पराक्रम गाजवणारे खड्गही नसेल. मी रिकाम्या हाती आलो होतो आणि आज रिकाम्या हातीच परत जातो आहे. जाताना आजवर मिळवलेले काहीही बरोबर नेता येत नाही हेच मला समाजाला दाखवून द्यायचे आहे.’’ अ‍ॅलेक्झांडर दि ग्रेटने यानंतर डोळे मिटले ते कायमचेच.
परवा कुठेतरी सहजच वाचनात आलेली ही बोधकथा मनात घर करून राहिली. वैद्यकशास्त्र कितीही प्रगत झाले तरी मृत्यूचे चक्र थांबवू शकत नाही. तेव्हा डॉक्टरांना देवत्व देण्याची गरज नाही. त्यांनाही मर्यादा आहेत, आकलनशक्तीला कुंपण आहे. ते समाजाचा घटक आहेत आणि ज्या रुग्णाची शुश्रूषा ते करत आहेत, त्याच्याशी ते पूर्ण तादात्म्य पावलेले आहेत. शेवटच्या यात्रेतही त्यांची सोबत सुटत नाही आणि खांदा देण्याचा अधिकार डॉक्टरांकडेच जावा. मी स्वत: आजवर शुश्रूषा केलेल्या अनेक रुग्णांच्या-सहकाऱ्यांच्या महायात्रांना आणि अंतिम क्रियांना उपस्थिती लावली आहे. खांद्यावर भोक पडलेले गळके मडके घेऊन फिरणाऱ्या ज्येष्ठ आप्तेष्टांकडे मूक आक्रंदन करत पाहिले आहे. वैद्यकसत्तेची दौर्बल्यता मला त्या क्षणात त्या फुटक्या मडक्यासारखी स्पष्टपणे जाणवली आहे.
मृत्यू वैद्यकसत्तेला जमिनीवर आणतो आणि वैद्य-डॉक्टरांचे पाय जमिनीवरच राहायला मदत करतो हे खरे आहे. माझी समाजाला फक्त एवढीच नम्र विनंती आहे, की आमच्या या मर्यादा तुम्हीही जाणून घ्या. आमचे सात्वंन नाही, पण कृपया आमच्यावर हल्ले करू नका, रुग्णालये जाळू नका, कारण काहीही झाले तरी मानव मर्त्य आहे आणि वैद्यक मर्यादित आहे.
अ‍ॅलेक्झांडरने सांगितलेले दुसरे दोन दृष्टान्त सर्वपरिचित आणि सर्वमान्य आहेत. Health is wealth,, पण आपण उभे आयुष्य दौलत जमवण्यात आणि उरलेले आयुष्य मिळवलेली संपदा शरीरस्वास्थ्य राखण्यासाठीच खर्च करतो हे सत्य आहे. गरज आहे ती धनसंपादन आणि स्वास्थ्यवर्धन या दोहोंत संतुलन राखण्याची.
अ‍ॅलेक्झांडर युद्धांत जिंकला, पण स्वास्थ्यात हरला हे सत्यच पुरेसे बोलके नव्हे का?    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2012 12:05 pm

Web Title: wishes of alexander
Next Stories
1 लायन किंग
2 चालिसा संस्कृती
3 संक्षेपात..
Just Now!
X