भूषण कोरगांवकर – bhushank23@gmail.com

‘‘तुम्ही खरं तर वेळ अमावस्येला या. आमच्याकडं मराठवाडय़ात मोठा सणच असतो तो..’’ २०११ साली मोहनाबाईंनी मला आमंत्रण दिलं होतं. मोहना महाळंग्रेकर ऊर्फ मेहरुन्निसा पठाण. संगीतबारीच्या लुकलुकणाऱ्या दुनियेतलं एक बडं नाव. गळ्यात दैवी सूर, पायात पक्का ताल, लावणीवर जिवापाड प्रेम.. हे सगळं असूनही धो-धो चालणारी संगीत पार्टी २०१२ साली त्यांनी कायमची बंद केली आणि पूर्णवेळ शेती करायला त्या आपल्या मूळ गावी निघून गेल्या. पुढे २०१४ साली ‘संगीतबारी’ हे मुख्यत्वे त्यांच्याच आयुष्यावर बेतलेलं माझं पुस्तक प्रकाशित झालं. ‘संगीतबारी’ याच नावाचे आमचे काली बिल्ली प्रॉडक्शनचे कार्यक्रम सुरू झाले. पण दरवर्षी काही ना काही अडचणींमुळे नेमका हा दिवस हुकत होता. शेवटी तब्बल दहा वर्षांनी- १२ जानेवारी २०२१ रोजी लातूर जिल्ह्यतल्या त्यांच्या शेतावर जायची संधी मला मिळाली.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
thane theft news, jewellery theft thane marathi news
सुट्टी घेतल्यामुळे सेल्समनची चोरी उघड, १ कोटी ५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; नौपाडा पोलिसांनी केली सेल्समनला अटक
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

लॉकडाऊननंतर प्रथमच भेटत असल्यामुळे वर्षभराच्या साचलेल्या गप्पा चहाचे अगणित कप, मटार आप्पे आणि सुशीलाच्या बश्यांसोबत रंगत होत्या. सुशीला म्हणजे इथला कुरमुऱ्यांचा नाश्त्याचा एक चटपटीत प्रकार. त्याच्यासोबत दिलेली चटणी तर फारच भन्नाट होती. मुख्य म्हणजे स्वयंपाकघरात फारसं न फिरकणाऱ्या मोहनाबाईंनी ती स्वत: बनवली होती. ‘‘म्हंजे किती सोपी आसंल बघा!’’ त्या म्हणाल्या, ‘‘हिरव्या चिंचेचा कोळ वाटीभर घ्या. ती नसंल तर साधी चिंच किंवा आमसुलंही चालतील. त्यात दोन मुठी कच्चे शेंगदाणे, एक छोटा कच्चा कांदा, एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ अन् लाल तिखट घेऊन ही चटणी मिक्सरमधून काढायची. आम्ही घालत नाही, पण तुम्ही पाहिजे तर किंचित साखर घाला. चटनी तयार.’’

‘‘बस्स.. इतकंच?’’

‘‘नाहीतर मी करायच्या भानगडीत पडंन का? याला खरी चव सगळ्या कच्च्या पदार्थानी येते. एकदा करून तर बघा. शन्नो, और एकेक कप चाय दे मा.’’

‘‘चायवाय नक्को अब. चलो, गुडा उठाव.. जाने का है..’’ मुस्कानकडून फायनल हुकूम आल्यावर आम्ही उठलो आणि शेताच्या दिशेने चालत निघालो.

वाटेत लागणाऱ्या चिंचा, बोरं पाडत, तुरीच्या- चवळीच्या शेंगा मोडून खात, साप-मुंगूस-रानपक्ष्यांचं दर्शन घेत आमची मजल दरमजल सुरू झाली.

वेळ अमावस्येच्या दिवशी या भागात शाळा, कॉलेजं, ऑफिसं, दुकानं सगळ्यांना सुट्टी असते. सगळी जनता शेतावर असते. शेतात एके जागी ज्वारीच्या कडब्याच्या कोपी तयार केल्या जातात. त्यांना फुलांचं तोरण, शाल वगैरेंनी सजवलं जातं. या कोपीत मातीचे पाच पांडव आणि लक्ष्मी तयार करून ते पूजले जातात.

‘‘या जेवायला..’’ वाटेत लागणाऱ्या प्रत्येक शेतात आमंत्रण मिळत होतं.

‘‘आजच्या दिवशी एकमेकांच्या शेतात जावंच लागतं.’’ मोहनाबाईंचे भाऊ म्हणाले, ‘‘ज्यांच्याकडं शेती नाही अशा लोकांना तर आवर्जून जेवायला बोलावतात.’’

‘‘त्यामुळं लोकं पाच-सहा वेळा दाबून जेवतात.’’ मोहनाबाई म्हणाल्या, ‘‘पण या दिवसाचं महत्त्वच है, की कितीबी खा.. जेवण संपत नाही अन् बाधतबी नाही.’’

न संपणारं आणि न बाधणारं असं कुठलं स्पेशल जेवण असतं या दिवशी? बांधून आणलेलं सामान, डबे, पिशव्या, पत्रावळ्या, हंडय़ा वगैरे तर दिसत होत्या; पण अन्न शिजवण्याची काहीच तयारी नजरेस पडत नव्हती. आम्ही झोका खेळलो. गाण्याच्या भेंडय़ा खेळलो. पोरासोरांनी अवाढव्य बावडीत पटापट उडय़ा मारल्या आणि पोहून, खेळून थकल्याभागल्यावर मग पांडव आणि लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली.

‘होलगे रे होलगे, पालम पालगे’ असं ओरडत साबीर आणि अयानने कोपीच्या भोवती पाणी आणि आंबिल शिंपडत फेऱ्या मारायला सुरुवात केली. तोवर मोहनाबाईंनी देवांपुढे कणकेचे दिवे लावून, हळदी-कुंकू वाहून पूजा करून घेतली.

त्यांच्या बहिणी, भाऊ, भावजया, या सगळ्यांची मुलं-मुली, सुना, जावई, त्यांची मुलं आणि मित्रपरिवार असे सगळे मिळून आम्ही पन्नासेक लोक जेवायला बसलो. सगळं जेवण बांधून आणलेलं होतं. एकेक गाठोडं उघडताच त्याच्या सुगंधानेच भूक खवळली. दोन प्रकारच्या भाकऱ्या, धपाटे, गोड भाकरी, चटण्या, लोणची, सपक वरण (त्यांच्या दृष्टीने सपक; पण प्रत्यक्षात भरपूर लसूण आणि हळदीमुळे ते छान खमंग झालं होतं!), अवीट गोडीचा चांदतारा भात आणि ‘येळवस’ किंवा ‘येलामास’चे प्रमुख पाहुणे- भज्जी आणि आंबिल!

भज्जी म्हणजे एक प्रकारे भाज्या आणि कोवळे दाणे घालून केलेलं पिठलं. आणि आंबिल म्हणजे चक्क नेहमीचं ताक. दिसण्यातही साधंच. पण त्याची चव अक्षरश: स्वर्गीय! खरोखरच या दोघांनी मेजवानीला चार चाँद लावले. गरम गरम जेवण चविष्ट लागलं तर समजू शकतं; पण भल्या पहाटे उठून शिजवून ठेवलेलं आणि पुन्हा गरमही न केलेलं ते जेवण इतकं रुचकर लागत होतं की मला आश्चर्यच वाटलं.

‘‘ही सगळी या दिवसाची पुण्याई!’’असं त्यांचं म्हणणं असलं तरी मी कृती विचारली आणि या खमंग, नशिल्या चवीची गुपितं समजली.

भज्जी

साहित्य : उकडून घेतलेले शेंगदाणे, मटार, हरभरा, तुरीचे दाणे- प्रत्येकी एक वाटी (शेंगदाणे रात्रभर भिजवून ठेवायचे.), वांगी व गाजराचे छोटे चौकोनी तुकडे-प्रत्येकी एक वाटी, खुडलेली मेथी आणि कांद्याच्या पातीची एक जुडी चिरून, हिरव्या चिंचेचा दाट कोळ- एक वाटी (नसल्यास साधी चिंच किंवा आंबटचुका एक जुडी), बेसन-पाणी-तेल-कढीपत्ता- प्रत्येकी दीड वाटी, मीठ, मोहरी, हळद, तिखट, आणि चव देणारा मुख्य पदार्थ- लसणाची पात, लसूण-हिरवी मिरची-जिरे यांचं वाटण.

कृती : तेलात मोहरी तडतडली की वरील वाटण व कढीपत्ता टाकून परतायचं. छान वास आला की सगळ्या भाज्या, हळद, तिखट घालून थोडा वेळ परतल्यावर उकडलेले दाणे घालून परतत राहायचं. या मिश्रणाला तेल सुटलं की मीठ व चिंचेचा कोळ घालायचा. एक उकळी आल्यावर मग बेसन कालवलेलं पाणी हळूहळू टाकून ढवळत राहायचं. बेसन पूर्ण रटरटू लागलं की झाली भज्जी तयार! आम्ही खाल्लेली भज्जी दाट, ओलसर होती. पण तुम्ही आवडीनुसार ती कोरडी किंवा पळीवाढी पातळ करू शकता.

आंबिल

लसणाची पात, लाल मिरची, जिरे, मीठ, चिमूटभर हळद हे सगळं पाटय़ावर वाटून रात्री ताकात घालून छान घुसळून घ्यायचं व झाकून ठेवायचं. सकाळी उठून लसूण-मोहरीची फोडणी दिली की दिवसभर पिण्यासाठी आंबिल तयार.

‘‘काही लोक यात जवारीचं पीठबी आंबवून घालतात.’’ लैलाबाई आणि रोशनबाई- म्हणजे मोहनाबाईंच्या भावजयी माहिती देत होत्या.. ‘‘पन त्याची काई गरज नसती. जवार तशीबी भाकरीतनं पोटात जातीच. आनि जवार घातल्याली आंबिल जास्त पिली तर चेहरा सुजतो. लई सुस्ती येती नशेवानी!’’

आम्हाला तर ताकाची आंबिल पिऊनच नशेवानी सुस्ती येऊ लागली होती.

‘‘किती ग्लास झाले?’’ मोहनाबाईंनी विचारलं.

‘‘चार..’’ मी म्हणालो.

‘‘किसने दिये रे चार-चार ग्लास..? अक्कलबिक्कल है के नहीं?’’ मोहनाबाई नातवंडांवर ओरडल्या.

‘‘उन्हो मांगे तो नक्को कैसे बोलेंगे?’’ अब्बास आणि आयेशा घाबरले.

‘‘भूषण, रात्रभर मस्त आंबलेलं ताक असतं ते. असं समजा की, तुम्ही शेतात येऊन बाटलीभर बीअर प्यायलीये. काही नाही होत. पन पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. आंबिल दोन ग्लासच प्यायची.. काय?’’

‘हो..हो’ करताना डोळ्यासमोर दहा वर्षांपूर्वीचं दृश्य आलं.

‘‘बैठकीतली लावणी लई खेळली. आता शेतातली लावणी करून पहायचीये. बघू या, घुंगरांची सरस्वती जशी माझ्यावर प्रसन्न झाली तशी ही शेतातली लक्ष्मी होती का ते!’’ लावणीच्या क्षेत्राला रामराम ठोकताना मोहनाबाई म्हणाल्या होत्या. आज दुष्काळ, कर्ज या सगळ्या संकटांना मागे टाकून शेतातली लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झालेली पाहून खूप आनंद झाला. हा आनंद साजरा करायला नको?

‘‘अली, अजून एक ग्लास प्लीज.’’ मी हळूच ऑर्डर सोडली आणि बाभळीच्या बलदंड पारावर आडवा झालो.

(छायाचित्र सौजन्य- कुणाल विजयकर)