मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटावेळी मुंबई पोलिसांना प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याची कैफियत या घटनेला तीन दशके पूर्ण होत असताना समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ मार्च १९९३ रोजी वरळी येथे झालेल्या पाचव्या स्फोटात मेजर वसंत जाधव (निवृत्त) जखमी झाले; परंतु त्याही स्थितीत त्यांनी मच्छीमार कॉलनी माहीम कॉजवे येथे विदेशी हँडग्रेनेड आणि दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर १२ किलो जिवंत आरडीएक्स स्कूटर बॉम्ब सुरक्षितपणे निकामी करून शेकडो लोकांचे प्राण वाचविले. मात्र त्यांच्या या कार्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत त्यांना आजही सतावते.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सन १९९२ पर्यंत पोलिसांचे स्वत:चे बॉम्बशोधक आणि नष्ट करणारे पथक नव्हते, कारण तोपर्यंत अशा भीषण संकटाची कल्पनाही कुणी केली नव्हती. लष्करातील निवृत्तीनंतर वसंत जाधव यांची केंद्र सरकारने मुंबई विमानतळाजवळ ‘बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्कॉड’ ( इऊऊर) याचे मुख्याधिकारी म्हणून १९८७ ला नेमणूक केली. या पदावर २००६ पर्यंत म्हणजे एकोणीस (१९) वर्षे ते कार्यरत होते. या काळात आपली जबाबदारी सांभाळून असंख्य वेळा त्यांनी पोलिसांची मदत केली.

शेअर बाजाराच्या इमारतीजवळ झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी वसंत जाधव यांना तातडीने बोलावले. (तोपर्यंत कुणालाच पुढील साखळी बॉम्बस्फोटाबद्दल कल्पना नव्हती.) शेअर बाजाराजवळ तपासणीसाठी जात असताना वरळी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात जाधव यांची गाडीही सापडली. ‘हा मुंबईतील साखळी स्फोटातील सर्वात भीषण स्फोट होता. उडालेल्या स्टीलच्या तुकडय़ांमुळे मी जखमी झालो, पण मी माझे सहकारी पोलिसांच्या मदतकार्यात सहभागी झालो. तिथून परतताना मला प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. कारण शोधले, तर माहीम कॉजवे येतील मच्छीमार चाळीत अतिरेक्यांनी टाकलेली स्फोटके रस्त्याच्या मध्यभागी पडल्यामुळे माहीम कॉजवे परिसरात दोन्ही बाजूंनी वाहतूक अडल्याचे कळाले. तेव्हा मी स्वत: पुढाकार घेऊन स्फोटके समुद्रकिनारी नेऊन निकामी केली.’

या स्फोटांच्या दोन दिवसांनंतर १४ मार्च रोजी एका दक्ष नागरिकाने संशयातून केलेल्या तक्रारीवरून गजबजलेल्या दादर पूर्व येथील भागात स्कूटरमध्ये स्फोटके असल्याचे निदर्शनास आले. दादर शाखेचे तत्कालीन पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी जाधव यांना पाचारण करण्याचे सुचवले. जाधव यांनी या स्कूटरमध्ये असलेली १२ किलोची स्फोटके निकामी केली. या दोन्ही स्फोटांना थोपवून शेकडो प्राणांची रक्षा करणाऱ्या मला अधिकृतपणे शिफारस केलेला शौर्य पुरस्कार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ( टऌअ) काहीही कारण न देता नाकारण्यात आला आहे, असे जाधव यांचे म्हणणे आहे.

आशेचा वृक्ष..
एक डबलडेकर प्रवासी बेस्ट बस प्रवाशांसह हवेत उडाली. बसचे छप्पर शेजारच्या नेहरूनगर झोपडपट्टीत भिरकावले गेले. तेथील आदर्श नगर, खरुडे मंडई, नेहरू नगर झोपडपट्टी परिसरातील रहिवासी, व्यापारी भयभीत झाले. स्फोटामुळे जवळपासच्या वाहनांना आग लागली. बस चालकाचा मृतदेह रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला नेहरू नगरमध्ये फेकला गेला. तेथील पान विकणाऱ्या एका स्टॉलवाल्याचे धड वेगळे होऊन पडले. एक तर िभतीतच उभा चिरडला गेला. प्राची वर्तक आणि संध्या या दोन हवाई सुंदरी आपल्या मोटारीतून जात असताना वरळी येथे स्फोटात सापडल्या. त्यात प्राची ठार झाली. प्राचीचा ईस्ट-वेस्ट एअरलाइन्समध्ये नोकरीचा पहिलाच दिवस होता. दर्शन हा विद्यार्थी सत्यम चित्रपटगृहात चित्रपट पाहून मित्रांसोबत बाहेर पडला होता. रस्ता ओलांडत असताना मित्र पुढे गेले. तेजस मेहता या १३ वर्षांच्या मुलाचाही या स्फोटात अंत झाला होता.

या स्फोटात बस थांब्याशेजारी असलेले एक झाड संपूर्ण राख झाले होते. दोन वर्षांनंतर या झाडाला पालवी फुटली. त्यामुळे स्फोटात सर्वस्व हिरावलेल्या पीडितांना व त्यांच्या कुटुंबीयांना जगण्याची नवी उमेद मिळावी, यासाठी वृक्षाभोवती स्फोटातील पीडितांसाठी श्रद्धांजली स्मारक उभारण्यात आले. दर वर्षी १२ मार्चला स्फोटातील बळींना श्रद्धांजली वाहिली जाते. पीडितांचे नातेवाईक, काही पीडित, परिसरातील व्यापारी, स्थानिक नागरिक या वृक्षाजवळ आवर्जून उपस्थित असतात. स्फोटांच्या जखमा घेऊन बहुतांश लोक या परिसरातून विस्थापित झाले असले, तरी हा वृक्ष त्यांना जोडणाऱ्या आशेचे प्रतीक म्हणून नव्या ऊर्जेने सळसळत आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A story of neglected bravery bomb blasts in mumbai amy
First published on: 11-03-2023 at 12:00 IST