यंदाचे नाटय़संमेलन बारामती येथे २१, २२ आणि २३ डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्ताने नियोजित नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांची रंगभूमी आणि तत्सम कलामाध्यमांच्या संदर्भात माधव वझे यांनी घेतलेली ही खास मुलाखत..
मोहन, बारामतीला होत असलेल्या नाटय़संमेलनाचा अध्यक्ष म्हणून तुझी निवड झाल्याबद्दल आधी मनापासून अभिनंदन! मला सांग- प्रायोगिक रंगभूमीचा राजदूत अशी तुझी ओळख असताना नाटय़संमेलनाचा अध्यक्ष अशी स्वतंत्र ओळख तुला आवश्यक वाटली का?
– नाही वाटली. तुला माहीतच आहे, की आम्ही थिएटर अ‍ॅकॅडमी स्थापन केली तेव्हा आम्ही सगळेच एकमेकांत ठरवून आळीपाळीनं अध्यक्ष वगैरे झालो. निवडणूक वगैरे काही नसायची. पुढे ‘घाशीराम कोतवाल’ नाटक आम्ही केल्यावर नाना फडणवीस अशी माझी ओळख निर्माण झाली. खरं तर त्याआधी मी ‘खेळिया’, ‘अशी पाखरे येती’ वगैरे नाटकं केली होती. पण लोक म्हणायचे, तुमचा नाना म्हणजे अगदी ग्रेट! त्यामुळे एका वेळी तर असं मनात आलं होतं की, नाटकात काम करणं सोडूनच द्यावं. फार लोकप्रियता देणारं यश मिळू नये. अशा विचारात असतानाच ‘घाशीराम’चा परदेशदौरा आला. समकालीन रंगभूमीवरचं निमंत्रणाने आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवासाठी परदेशी गेलेलं ‘घाशीराम’ हे पहिलं नाटक.  नंतरचे दौरे वगैरे ती एक वेगळी कहाणी आहे. पण त्यानिमित्तानं मी व्यवस्थापक झालो. त्याला दोन कारणं होती. एक म्हणजे नाटकात काम करणं मला सोडून द्यावंसं वाटत होतं. दुसरं म्हणजे ससूनमधल्या माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. तेवढा वेळ मी प्रयोगासाठी देऊ शकेन असं दिसत नव्हतं. मग माझ्या पाहण्यात ‘ग्रिप्स’ रंगभूमी आली. ती पाहून जाणवलं, की आपल्याकडे अशी रंगभूमी नाही. त्या रंगभूमीवर मी दहा र्वष रमलो. ‘ग्रिप्स’मुळे माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली. त्यामुळे ओळख होण्यासाठी नाटय़संमेलन आणि त्याचा अध्यक्ष होणं हे मला कधीच गरजेचं वाटलं नाही.
संमेलनाध्यक्ष म्हणून तुझी एकमतानं बिनविरोध निवड झाली याचा आनंद आहेच; पण मला सांग- कुठल्याही संस्थेत गट असतात, आणि कोणाला निवडून आणायचं, याचं राजकारण पद्धतशीरपणे केलं जातं. नाव घ्यायला नको, पण पूर्वीच्या काही अध्यक्षांची निवड राजकारण करूनच झाली असावी अशी शंका येऊ शकते.
– असं होत नाही असं मी ठामपणे म्हणणार नाही. पण असंच होतं असंही नाही. मला काय वाटतं, की क्रिएटिव्ह लोकांच्या हातात कारभार गेला तर ती संस्था म्हणून टिकून राहते. अध्यक्ष उत्तम दर्जाचा असावा, ही अपेक्षा ठीक आहे. परंतु अनेकांचे कलाबाहय़ हेतूही असू शकतात. काहीजण हितसंबंधियांमध्ये गुंतलेले असू शकतात. मी म्हणेन, व्यक्ती सक्षम असावी आणि तिला स्वीकारलेल्या कामात स्वारस्य असावं. पण तेवढंच पुरेसं नाही. क्रिएटिव्ह लोकांना उत्तम प्रशासनाची जोड मिळाली पाहिजे. जब्बार पटेलनं ‘घाशीराम कोतवाल’ उत्तम रीतीनं बसवलं नसतं तर नुसत्या मार्केटिंगवर काही झालं नसतं! आज शिक्षणतज्ज्ञांच्या हातात शिक्षण राहिलं आहे का? मनोरंजनाचा उद्योग मनोरंजन करणाऱ्यांच्या हातात राहिला आहे का? आपल्या रंगभूमीवर असे निर्माते होते, की ज्यांना दृष्टी होती आणि त्यांच्यापाशी व्यवस्थापनकौशल्यही होतं. तू म्हणतोस तसं असू नये हे खरं; पण त्यासाठी सजग माणसं लागतात.
नाटय़संमेलनाच्या अध्यक्षांना नाटय़ परिषदेत काम करण्यास वाव नसतो. कसलेच अधिकार त्याला नसतात. असं जर आहे, तर दरवर्षी फक्त जाहीर करावं, की यावर्षी हा सन्मान अमक्या व्यक्तीला दिला आहे. त्याकरता नाटय़संमेलन भरवून अध्यक्षाला भाषण कशाला करायला सांगायला पाहिजे? जर तो दीड दिवसाचा गणपती आहे, तर भाषण तरी कशाला?
– त्यानिमित्तानं नाटय़व्यवहाराबद्दल त्या माणसाचं आकलन आपल्यासमोर येत असतं. त्या भाषणाची पुस्तिकाही काढतात. आता एका भाषणानं नाटय़ परिषद सुधारेल वगैरे असं काही म्हणता येणार नाही आणि तशी अपेक्षाही नाही. नाहीतर प्रत्येक अध्यक्षाच्या भाषणानंतर परिषदेला स्वत:च्या धोरणांचा आणि कामकाजाचा पुनर्विचार करावा लागेल. एक वैचारिक हातभार- इतकंच त्याचं महत्त्व. ते भाषण फक्त नाटकवाल्यांसाठी नाही, तर प्रेक्षकांसाठीसुद्धा त्यातलं काय घ्यायचं, काय व्यवहार्य आहे, ते नाटय़ परिषदेनं ठरवावं. संमेलनाचा अध्यक्ष आणि नाटय़ परिषद हे एकमेकांना पूरक असावेत. मी माझ्या अध्यक्षपदाची मर्यादा ओलांडून परिषदेवर अतिक्रमण करणार नाही. या पदाचा गैरफायदा घेणार नाही.
नाटय़संमेलनाचा अध्यक्ष होण्यापेक्षा परिषदेत राहून, तिथं जाऊन खरं तर उत्तम कार्य करता येईल. तू ते करशील का?
– नाही. कारण संस्थेमध्ये सुधारणा घडवून आणणं किती अवघड असतं ते मला माहीत आहे. फिल्म इन्स्टिटय़ूट आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. अधिकार आणि प्रेम असं दोन्ही असल्याशिवाय काही करता येत नाही. त्यासाठी वेगळा पिंड असलेला मनुष्य लागतो. वीस वर्षांपूर्वी मी ते केलं असतं. या टप्प्यावर ते शक्य नाही. संस्था उभी करण्यात माझी वैद्यकीय कारकीर्द खर्ची पडली. त्या विषयात मला रुची असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, त्यांचा पाठपुरावा मला करता आला नाही. तो मी आता करू बघतो आहे. आरोग्यशिक्षण, आरोग्य संवेदना सक्षम करण्यासाठी माध्यमांचा कसा उपयोग करता येईल, ते मी पाहतो आहे.
नाटकाच्या सेन्सॉर बोर्डबद्दल आपण बोलूया. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, इतकाच विचार बोर्डाने नाटक वाचून त्याला प्रयोगाची परवानगी देताना करायचा असतो. साहित्य आणि इतर कलांशी ज्याचा अर्थाअर्थी संबंध नाही अशा व्यक्ती तिथे सभासद म्हणून अनेकदा नेमल्या जातात. आणि त्यांना रस असतो आपला अधिकार गाजवून नाटकाला परवानगी नाकारण्यामध्ये! नाटककाराला अवघड परिस्थितीतून बाहेर कसं काढता येईल, याचा विचार ते करीत नाहीत. मी एकेकाळी सेन्सॉर बोर्डाचा सभासद होतो तेव्हा नाटक बंधनांतून मोकळं कसं करता येईल यासाठी आपण इथं आहोत असं मी इतरांना सांगत असे. तर आता तू याबद्दल काय म्हणशील?
– कोणताही सभासद हा नाटक पाहणारा तर असतोच. त्यामुळे त्याचा संबंध नाही असं म्हणता येणार नाही. शिवाय नसेना का त्याचा नाटकाशी संबंध; कोणाला काय वाटू शकतं हे तर त्यातून कळून येतं! आता असं पाहा की, आपल्या देशात शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं नाही. साक्षरतेची आपली कल्पना म्हणजे सही करता येणं! शिक्षणानं वैचारिक विकास व्हावा अशी आपली शिक्षणाची भूमिका नाही. समाजाला वैचारिक अधिष्ठान येण्यासाठी सुबत्ता लागते. मौर्यकालीन भारतात आपण विचारानं किती प्रगत होतो! तशी आज इंग्लंड-अमेरिका म्हणता येतील प्रगत! त्याकाळी लोकांना जगण्याची भ्रांत नव्हती. श्वास नीट चालू आहे, रक्त नीट खेचलं जातं आहे, तर मग बाकीच्या इंद्रियांच्या- ज्याला महत्त्वाचं म्हणतात अशा- चलनवलनाकडे लक्ष देता येईल. समाजाची महत्त्वाची चलनवलनं नीट नसतील तर पंचाईत! तर अधिकार असलेल्यांनी त्याचा उपयोग एक मार्गदर्शक म्हणून करावा. आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे हे ओळखून अधिकाराचा वापर करावा. कुवत आणि स्वारस्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या. स्वारस्य आहे म्हणजे कुवत असतेच असं नाही. कुवत असते त्यांना स्वारस्य असतंच असंही नाही. एखादा माणूस व्यवसायानं खेळाडू असला किंवा सीए असला तरी त्याला कलांमध्ये स्वारस्य असू शकतं. साहित्य, संगीत, नाटक या कलांमुळे समाज एकसंध राहतो. निरनिराळय़ा व्यवसायांनी ते होत नाही.                
असं बघ की, निरनिराळे व्यवसाय करणारे असतात, त्यांना नाटकात काम पाहिजे असं काही नसतं. नाटक उभं राहत  असताना आपण तिथं असणं, हे त्यांना हवं असतं. अशी माणसं ही आपल्या हौशी रंगभूमीची शक्ती आहे आणि हे गेली कित्येक र्वष चालू आहे.
दूरचित्रवाणीवरच्या मालिकांबद्दल मला विचारायचं आहे. अनेकदा त्या मालिकांमधला अभिनय वरवरचा, उथळ म्हणावा असा असतो..
– याला आताच्या जीवनाची गतिमानता कारण आहे. सध्या प्रचंड स्पर्धा सुरू आहे. या बदलत्या काळाशी नट जमवून घेत आहेत. फार प्रसिद्धी नको, त्याचप्रमाणे कमी पण नको. पूर्वी मला प्रश्न पडायचा नाही, की मी माझ्याकडे आलेल्या मालिकेला/ चित्रपटाला हो म्हणू की नको. कारण इतक्या गोष्टी माझ्याकडे येतच नव्हत्या. आता एका वेळी चार चित्रपट येतात तेव्हा प्रश्न पडतो- हो म्हणायचं की नाही म्हणायचं. मला ती सवयच नव्हती. आता जी तरुण मुलं काम करताहेत त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि तो परिस्थितीपोटी बदललेला आहे. ती विचार करतात की, मला विचारताहेत तोपर्यंत काम करून घ्यावं. उद्या विचारतील की नाही, माहीत नाही. तुमच्या क्षमतेनुसार इथला तुमचा कालावधी ठरणार आहे. म्हणजे दहा र्वष की पंधरा. उथळपणा हा त्याचा  भाग आहे. निरनिराळय़ा वाहिन्या बातम्या देत असतात. तिथं बातमी खरी की खोटी याची शहानिशा करण्यासाठी थांबतो कोण? म्हणून मी या मालिकांना ‘दृश्य-श्राव्य वृत्तपत्र’ म्हणतो. आता नाही पाहता आलं, तर उद्या पाहता येईल. त्याचं महत्त्व तेवढय़ापुरतंच. एक कला म्हणून माध्यम ओळखलं जायला अजून त्याचं वय व्हायचं आहे.
मालिकांबद्दल एकीकडे प्रचंड आरडाओरडा चालू असलेला आपण पाहतो आणि तरीही नाइलाजानं लोक त्या पाहतच राहतात असं दिसतं. मला सांग- एक जबाबदार माध्यम म्हणून मनोरंजन करतानाच एक अभिरुची असावी, ती जपली जावी, याची कसलीच जाणीव नसावी या वाहिन्यांना?
– या मालिका म्हणजे एक नैसर्गिक आपत्ती आहे असं माझं मत आहे. एक त्सुनामी! त्या लाटांच्या रेटय़ाला तुम्ही पुरे पडू शकत नाही. मग एकतर शरण जाऊन ते स्वीकारा, नाहीतर मरा! जे शरण जातात ते जगतात, तरतात- हा निसर्गनियम आहे. हवा खेळती राहिली नाही तर असहय़ होऊन माणसं आजारी पडतील. वाचकांचा पत्रव्यवहार इतकी र्वष चालू आहे. त्याचा परिणाम होऊन गोष्टी बदलल्या असं दिसतं का आपल्याला? लोकांना श्वास मोकळा करायचा असतो. हे म्हणजे लंडनमधल्या हाइड पार्कसारखं आहे असं समजायचं. कोणीही येऊन काहीही बोलावं, तसं.
मोहन, तुला नाना फडणवीस यांच्याबद्दल विचारलं नाही तर वाचकांना आवडणार नाही. नानाची भूमिका तू जशी केलीस, तशी महाराष्ट्रात आणि बाहेरही कोणाला जमली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्या भूमिकेचं नेमकं आव्हान कोणतं होतं?
– नानाची भूमिका करताना मी बुद्धी वापरून ती करत नव्हतो. तुला माहीतच आहे- त्यावेळी आपल्यापैकी कोणीच नट प्रशिक्षित नव्हते. चांगलं काम करायचं तर मेंदू फार वापरायचा नसतो. बुद्धीनं काम करणारे नट मी पाहिले आहेत. म्हणून तर डॉक्टर लागूंच्या ‘नटसम्राट’पेक्षा भटांचा नटसम्राट जास्त भावला होता. भूमिकेला शरण जाणं, हे महत्त्वाचं. फार आधी नाही विचार करायचा. जे काय व्हायचं ते सहा तासांच्या तालमीत ठरायचं. पुढे अभिनयावरचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यात म्हटलं होतं- ‘किंग इज प्लेड बाय दि कोर्ट.’ राजदरबारातली माणसं  कसा अभिनय करतात त्यावर राजाचं काम करणाऱ्या नटाचा अभिनय खुलत असतो. नाना म्हणून मी रंगमंचावर आल्यानंतर इतर नट कसा अभिनय करतात, त्यावर माझ्या अभिनयाची प्रत ठरत जाते. मोहन गोखले उदाहरणार्थ. तो त्या नाटकात एक ब्राह्मण असायचा. पण त्या लहानशा भूमिकेत तो इतक्या बारीकसारीक गोष्टी भरायचा, की त्याच्याबरोबर काम करायला मजा यायची. तेच काम दुसरा कोणी करायला लागलं आणि ती मजा गेली. त्यामुळे नानाच्या भूमिकेचं श्रेय माझं एकटय़ाचं नाही. ते आमच्या सगळय़ा संघाचं आहे. खूप र्वष ती भूमिका करत आल्यामुळे बारीकबारीक जागा सापडून त्या भरायची संधी मला मिळाली. प्रयोगातलं आपलं स्वारस्य टिकवण्यासाठी आपल्याला काहीतरी नवं सापडावं लागतं. कशिदाकाम केल्याचा आनंद आपण घेत राहतो. मजा येते.