आनंद विंगकर

करोनाने जखडलेल्याच काळात एका वृत्तवाहिनीने रिपोर्टिगसाठी लेखक पवन भगत यांना घराबाहेर फिरण्याची संधी दिली. या काळात देशभरातील शहरांतून नागरिकांचा तांडा मिळेल त्या वाटेने आपल्या गावाकडे पायी सरकत होता. ठेचकाळत आणि मृत्यूशी झुंज देत चाललेल्या माणसांच्या या प्रवासाला कादंबरीचा विषय बनवत राजकीय आणि सामाजिक जाणिवांना प्रगल्भ करणारी अशी संहिता तयार झाली. शतकानुशतकं आपल्या कातडी अन् मनाला जखडलेली द्वेष, आकस आणि अहंकाराची पुटं काढून टाकण्याची क्षमता तिच्यात आहे..

46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

एका आभासमान जगात आपण वावरत आहोत. सत्य-कल्पितासारखं धूसर- जे वास्तवाला भ्रमित करीत आहे. जगण्यालाच प्रचंड वेग आलेला आहे. नवनव्या गोष्टींचा अनावश्यक हव्यास फोफावत आहे. विस्मरणाचंच एक पर्व सुरू झालंय. फेसबुकसारखं रोज एक नवीन जग आपल्यासमोर रांधलं जातंय. ‘यह दिल मांगे मोअर’ची न संपणारी तहान रिचवली जातेय. मावळणाऱ्या सूर्यासारखा समोरचा दिवस आपण पाठीवर टाकीत आहोत. कालचा दिवसही आपणास सरळ आठवता येत नाही इतके आपण गुरफटलोय ‘फोरजी’च्या डिजिटल विश्वात. सभोवताली घडणाऱ्या अकल्पित घटना ‘रिल्स’च्या चित्रांसारख्या क्षणात विसरल्या जात आहेत.

सर्वसामान्य माणसांचं अवघं आयुष्य कस्पटासमान उद्ध्वस्त व्हावं अशा किती साऱ्या गोष्टी घडल्या आहेत गेल्या काही वर्षांच्या कालावधीत. बेकारीला कसलीही सीमा राहिलेली नाही, नोकऱ्यांवरून क्षणात हजारो कर्मचाऱ्यांची कपात, मग ते कारखान्यातील कामगार असोत, आय. टी. सेलमधील उच्चभ्रू असोत वा एखाद्या विमान कंपनीतील पायलट अथवा हवाई सुंदरी असोत. कुणाचाही कसलाही मुलाहिजा ठेवला जात नाही. कुठेच कसला न्याय मागता येत नाही.

दिल्लीत एक वर्षभर शेतकऱ्यांचं अभूतपूर्व आंदोलन झालं. दिवसरात्र शेकडो वय उतरणीला लागलेले शेतकरी कडाक्याच्या थंडीत नि:शब्दपणे धारातीर्थ पडले. आसाममध्ये कैक पिढय़ांपासून राहणाऱ्या भूमिपुत्रांना देशाचे नागरिक नाहीत म्हणून निर्वासित कॅम्पमध्ये कोंडलं गेलं. परत दिल्लीत भर पावसात सलग तीन-चार महिने स्त्रियांनी गांधीगिरी पद्धतीनं सत्याग्रह करून रात्री जागवल्या. पोलीस यंत्रणेनं हर तऱ्हेनं त्यांच्यावर अत्याचार केले. धर्मावरून, जातीवरून, प्रेमविवाह आपल्या मर्जीनं केला म्हणून समूहानं एखाद्याला जिवे मारलं, तरीही मारेकऱ्यांवर कसलाही गुन्हा नोंदवला जात नाही.

एका बेबंद -अंधकारमय माहोलात आपण जगत आहोत.

या आणि अशा असंख्य घटना सभोवताली घडत असताना साहित्याच्या क्षेत्रात या सर्वाची दखल अभावानंच घेतली जातेय. करोनाच्या काळात लादलेल्या टाळेबंदीमध्ये सुरुवातीच्या महिन्याभरात तर घरातून बाहेर पडणंसुद्धा मुश्कील झालं होतं. रस्ते बंद केलेले. गाव-शहरं बंद करून टाकलेली. फक्त गरजेच्या वस्तू, जुजबी प्रेस आणि पोलीस यंत्रणेची वाहतूक चालू होती. मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातील लोक संसर्ग आणि मरणाच्या भयानं आपआपल्या घरातच मिळालेल्या फावल्या वेळेचा उपयोग करमणूक आणि कौटुंबिक सुखसंवादात रस घेत सुरक्षित राहू लागलेली.

गरीब असंघटित कामगारांसाठी मात्र अघोषित सगळी परिस्थिती आणीबाणीसदृश  निर्माण झालेली. परंतु फेसबुकीय जगाच्या बाहेर काही दुर्लक्षित मुसाफीर मात्र बेचैन असतात. जे दुर्धर परिस्थितीतही काळाची रफ्तार पकडतात, कर्फ्यू लागलेल्या सुनसान अवकाशातही घराबाहेर पडतात, आणि सार्वत्रिक अरिष्टात एका  साथीदाराची भूमिका अदा करतात.

‘ते पन्नास दिवस’ ही अशाच एका मुसाफिराची डायरी आहे. करोनाने जखडलेल्याच काळात ‘आवाज इंडिया’ वाहिनीने रिपोर्टिगसाठी लेखक पवन भगत यांना घराबाहेर फिरण्याची संधी दिली. आणि सामाजिक जाणिवेच्या त्यांच्या पत्नीनं बाहेर संशयास्पद जीवघेण्या आजाराची भीती असतानाही जिवावर दगड ठेवून त्यांना परवानगी दिली. या सगळय़ाचं फलित म्हणजे ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीची संहिता.

पवन भगत हे गजबजल्या शहरापासून दूर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नावाच्या शहरवजा गावात राहतात. जनतेची रोजीरोटी आणि त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणारे ते प्रामाणिक आंबेडकरवादी कार्यकर्ते. संवेदनशील वाचक असल्यानं मराठी आणि हिंदी साहित्याची त्यांना आवड आहे. कबीर, गजानन माधव मुक्तिबोध, सर्वेश्वर दयाल सक्सेना ते धुमिल. इकडे मराठीत नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, अरुण काळे, प्रकाश जाधव आणि भुजंग मेश्रामच्या कवितांवर जिवापाड प्रेम असल्याचे ते जाहीर करतात. नावलौकिकाचा कसला शौक नसलेला हा माणूस चळवळीतून वेळ, उसंत मिळेल तेव्हाच कागदावर काही कथा साकार करतो. एवढीच त्यांची साहित्याची शिदोरी. एरवी ‘जाजोबोर’सारखी कायमची बेचैन भटकंती त्यांच्या पायावर कोरलेली. सामाजिक वा राजकीय अरिष्टात बांधिलकी मानणाऱ्या या कलंदराच्या जिवाची नेहमीच घालमेल सुरू असते.

जागतिकीकरणानंतरचं आजचं संपूर्ण जग सर्व तऱ्हेच्या विषमतेच्या कडेलोटावर पोहोचलेलं आहे. केन्सप्रणीत कल्याणकारी रूढ लोकशाहीची संकल्पना आता अस्तित्वात राहिलेली नाही. मूठभरांच्या हातात अनिर्बंधित सत्ता, संपत्ती अन् पृथ्वीच्या पाटीवरील इत्थंभूत साधनसामग्री आणि उर्वरितांसाठी एक महाकाय अभाव. त्यातून आलेले दैन्य, दारिद्रय़, उपासमार, बेकारी, गुन्हेगारी, आजार, अज्ञान आणि असंतोष, याला आळा घालणे अशक्यप्राय झालेलं आहे. आणि म्हणूनच मग देशादेशांतील, धर्माधर्मातील, जातीवंशामधील तणाव वाढून युद्धे पेटली वा पेटवली जात आहेत. यात आणखी परत माणसाला वास्तवतेची जाणीव न होण्यासाठी दैववादी अंधश्रद्धा,आंतरराष्ट्रीय खेळांच्या सर्कशी, जैविक शस्त्रे, खोटय़ा विज्ञानकथा, डिजिटलचे आभासी जग आणि अनामिक आजारांच्या भीती मानवी समाजावर लादल्या जात आहेत.  स्वाइन फ्ल्यू, एड्स, करोना ही  त्यातीलच काही नावे.  वरून पुन्हा पर्यावरणाच्या ऱ्हासातून पृथ्वीवर उद्भवणारी महाकाय नैसर्गिक अरिष्टे आहेतच.

अचानक उद्भवलेल्या करोना महासाथीने जगभरातील जनतेला बांधून ठेवलं. वाऱ्यासारख्या वेगानं त्याचा भीती-प्रचार आणि प्रसार करण्यात आला. काही दिवसांच्या आतच संपूर्ण जगाची मृत्यूच्या भीतीची दहशत माजवून नाकेबंदी करण्यात आली. स्पर्श आणि संपर्कानं याचा प्रादुर्भाव होतो म्हणून माणसाला समूहांपासून तोडण्यात आलं. मृत्यूच्या या आदिम भयानं माणसं एकाकी अन् हतबल झाली. घर, मोहल्ला, गाव सोडून बाहेर पडणं मुश्कील केलं होतं. सगळं जग संशयाच्या फेऱ्यांत जखडून गेलं. कारखाने, छोटय़ा कंपन्या, दुकानं आणि सगळा बाजार बंद करण्यात आला. जे सधन आणि श्रीमंत होते ते सुखासीन घरात ऐषो-आरामात राहिले. ज्यांचं हातावर पोट त्यांना काम नसल्यानं, जगण्याचं कसलंही साधन उपलब्ध नसल्यानं त्यांना शहरात राहणं मुश्कील झालं. रात्री दिलेल्या एका आदेशावर देशभरातील वाहतूक बंद झाली, आणि त्यातूनच सार्वत्रिक उपासमार सुरू झाली. कसलंच काम कुठं नव्हतं आणि बाहेर काय चाललंय नेमकं हे समजून येत नव्हतं.

देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात संपूर्ण देशभरातून पोटासाठी गावं सोडून आलेली माणसं- ज्यांना राहण्यासाठी झोपडपट्टय़ांशिवाय पर्याय नसतो. रोज नवा रोजगार मिळवण्यासाठी नाक्यावर हजारोच्या संख्येनं त्यांना उभं राहावं लागतं. मजुरी मिळालीच तर त्यांच्या रात्रीची शेगडी पेटत असते, असे लक्षावधी निर्वासित या शहराच्या मैदानात, रेल्वेलाइनच्या बाजूला, महामार्गाच्या पुलाखाली, खाचरात, सर्वत्र पसरलेले असतात, पण इतस्तत: शहराच्या उभारणीत, पुनर्बाधणीत त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो. जीवनावश्यक बाजारपेठ त्यांच्यामुळेच गजबजलेली असते. अवजड मालाची वाहतूक होत असते. शहराच्या साफसफाईची कामं ते करीत असतात. याचा इथल्या व्यवस्थेनं कसलाही विचार न करता तमाम लोकांना शहर सोडून निघून जाण्याचा अप्रत्यक्ष आदेश दिला. वर प्रवासाची वाहतूक सेवासुद्धा तातडीनं बंद करण्यात आली. कोणी एकानंही विचार नाही केला की, ही लक्षावधी निराधार माणसं कोणत्याही वाहनाशिवाय मरण्यासाठी तरी किमान दूरदूर असलेल्या आपल्या गावात जाणार कशी? भाडय़ाच्या झोपडीत सुरक्षित अंतर राखून बिना कामधामाची, जीवनावश्यक गरजेच्या जिनसांवाचून राहणार कशी. तसं धनिकांच्या नातेवाईकांची लक्षावधी रुपये खर्च करून देशात-परदेशात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी सुरक्षित घरी परतावं म्हणून विमानांची सेवा उपलब्ध केली.

अशा बेसहारा, बेघर, निराधार माणसांवर लादलेलं विस्थापन ज्यांनी शहरं सोडून हजारो मैलांचा प्रवास अनवाणी पायानं केला. प्रवासात कित्येक जण अन्न-पाण्याविना हकनाक परक्या मुलखात मरण पावले. ज्यांच्या मृत्यूचीही नोंद झालेली नाही कुठेच. ज्यांना वाटेत लुबाडलं. चुकून खालच्या जातीचे असतील तर आणखीच हिणवलं, पिण्यासाठी साधं पाणीसुद्धा मिळालं नाही त्यांना. व्यवस्थेनं काही कारण नसताना दंडुक्यानं मारलं. वाटेत आजारी पडले तर ताप-खोकल्याचं त्यांना औषध मिळालं नाही. घनघोर रात्रीत माणसांच्या वस्तीत राहायला नाकारलं. जंगलात रानटी श्वापदांनी त्यांना घेरलं. झोपेत असताना ट्रक, अवजड वाहनाखाली चिरडलं. वाहतूक नाही, दिवसभराच्या अथक पायपिटीनंतर रात्री झोप शांत लागेल म्हणून रेल्वे रुळावर झोपले, त्यांच्यासाठी असंख्य विवंचनेचा दुसरा दिवस उजाडला नाही. मिळेल ते वाहन म्हणून अक्षरश: वातानुकूलित, दुधाच्या कंटेनरमधून कित्येकांनी प्रवास केला, हवा-पाण्याशिवायच रोड दुर्घटनेत ते मरण पावले.

यात चार पावलं चाललं तरी दम लागणारे, पाण्याअभावी तोंडाला कोरड पडणारे म्हातारे होते. दिवस सरत आलेल्या अशक्त, गरोदर स्त्रिया होत्या, प्रचंड उष्माघातानं ज्यांची तेलाअभावी कोरडी टाळू आत गेलेली, ‘कधी येणार आपलं गाव?’ असे दिनवाणी विचारणारी अनवाणी लहान मुलं होती.

परत हा आपला देश माणसामाणसांत विभागणी करणाऱ्या विविधतेनं नटलेला. ज्यात एका जातीचा दुसऱ्या जातीला विटाळ, जिथं जन्मानंच काही श्रेष्ठ उच्चवर्णीय आणि कर्मानं इतर सर्व कनिष्ठ. परत वेगवेगळे आपले धर्म, म्हणजे समोरच्या माणसाची जात वा धर्म समजत नाही तोवर तो आपल्यासारखा माणूस, आणि आपल्याहून वेगळा वा हलकी जात समजताच तो शत्रू अशी परंपरेनं घालून दिलेली आपली सामाजिक धारणा.

या सर्वाचा जिताजागता वृत्तांत म्हणजेच ‘ते पन्नास दिवसा’चं कथानक.

मुंबई ही आपल्या देशाची औद्योगिक राजधानी आणि बनारस-वाराणसी आपली सांस्कृतिक तशीच धार्मिक राजधानी.  या कादंबरीचा अफाट अवकाश. त्यामुळे ही तशी भारतीय कादंबरी आहे. यातील प्रमुख प्रातिनिधिक पात्रं आहेत चार आणि वर नमूद केलेली प्रवासात त्यांना वेगवेगळय़ा प्रदेशांतील भेटणारी असंख्य निराधार, बेसहारा माणसं.

पहिले पात्र क्षुद्र, अतिक्षुद्र, आदिवासी अन् भटके यांचं प्रतिनिधित्व करणारा रामस्वरूप मौर्य- जो गावात अल्पभूधार, अर्धवेळ शेतमजूर आहे आणि शहरात बिगारी, असंघटित कामगार आहे.

ज्यांना उपरा म्हणून हिणवलं जातं- ज्यांच्या देशप्रेमावर संशय घेतला जातो, जो देशातील सर्व अल्पसंख्याक वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करतो, असा शेख आरिफ हे दुसरं पात्र आहे.

मंदिर, मस्जीद, गुरुद्वारा, चर्चचं पौरोहित्य करतो, शारीरिक श्रमापासून लांब राहतो, इतरांच्या श्रमावर परमेश्वराच्या नावाखाली आपला उदरनिर्वाह करतो नि स्वत:ला इतरांपासून श्रेष्ठ समजतो. ते पंडित ब्रिजमोहन मिश्र हे तिसरं पात्र आहे.

हे तिघे जे वास्तवात एकमेकांचा तिरस्कार  करतात. पंडिताला क्षुद्राचा स्पर्शसुद्धा चालत नाही. आणि मुस्लिमांबाबत तर अकारण जन्मजात वैर आहे त्यांचं, परंतु या तिघांचं गाव बनारसच्या जवळपास म्हणून नाइलाजानंच छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर योगायोगानंच एकमेकांना भेटतात आणि नंतरचा प्रवास एकत्र करतात.

याशिवाय एक मुलगी, स्त्री. ती बुद्धिजीवी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी- जी मोठय़ा पॅकेजच्या आयटी क्षेत्रात काम करते. परंतु लॉकडाऊनमुळे तिची कंपनी बंद पडलेली आहे.

तसं पहाल तर हेच आहेत आपल्या अवाढव्य देशाच्या पायाचे चार पाय. हे एकत्र आले आणि एकदिलानं राहिले तर देशात ते स्वर्ग निर्माण करतील. लेखकानं ही पात्रं जाणीवपूर्वक एकत्र आणली आहेत आणि या प्रदीर्घ प्रवासात त्यांचे आपापसातील समज-गैरसमज दूर केले आहेत. परत हे वाचताना राजकीय आणि सामाजिक जाणिवेनं काहीसे प्रगल्भ तर होतोच; आणि सोबत शतकानुशतकं आपल्या कातडी अन् मनाला जखडलेली  द्वेष, आकस आणि अहंकाराची पुटं गळून पडत जातात. केवळ एकशेसाठ-सत्तर पानांची गेल्या पाच वर्षांतील अतिशय महत्त्वाची असलेली ही कादंबरी प्रत्यक्ष अनुभवायला हवी.

चळवळीशी नाते जोडलेल्या लेखकांमधील महत्त्वाचे नाव. शेतकऱ्यांच्या आजच्या दु:खाला वाचा फोडणाऱ्या ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ या कादंबरीने सर्वदूर ओळख प्राप्त. ‘आत्मटीकेच्या उदास रात्री’ आणि ‘सुंबरान मांडलं’ हे काव्यसंग्रह प्रकाशित. ग्रामीण भागात साक्षरता आणि विज्ञान प्रसारासाठी कार्यरत.

anandwingkar533@gmail.com