प्रा. विजय तापस

मध्यंतरी काही जुनी मासिकं चाळत असताना अनेकदा ‘शांता कुलकर्णी’ या नावाशी थांबणं झालं. हे नाव अनेक कविता, कथा, लेख, अनुवाद यांच्या शिरोभागी किंवा तळाशी नांदताना दिसलं. या नावाच्या स्वामिनीने आपल्या प्रत्येक लेखनात स्वत:चं म्हणून काही वेगळेपण राखलंय हेही लक्षात आलं. तुम्हाला एखाद्या लेखकाचं (यात स्त्रियाही आल्याच) लौकिक व्यक्तिमत्त्व, त्याची मानसिक-वैचारिक जडणघडण, त्याच्या जीवनाचे अन्य तपशील माहीत नसले तरी फारसं बिघडत नाही, कारण त्याच्या लेखनातून तो स्वत:च पुरेसं बोलत असतो. लेखकाच्या लौकिक आयुष्याला ओलांडून जाणारं काहीतरी फार मोलाचं, वांच्छित-अवांच्छित असं- कधी कधी खुद्द लेखकालाही धक्का बसावा असं काही त्याच्या लेखनातून प्रकट होत राहतं. मला शांता कुलकर्णी म्हणजेच सरिता पत्की या बाईंच्या बाबतीत तसंच वाटतं. याचा एक उत्तम पुरावा म्हणजे त्यांचं ‘बाधा’ हे नाटक. तसंच त्यांनी सादर केलेली रूपांतरित नाटकं- असा पुरावा ठरू शकतील. ‘खून पाहावा करून’, ‘पांथस्थ’ आणि आल्बेर काम्यूच्या नाटकावर आधारलेलं ‘यात्रिक’ या नाटकांचा सरिताबाईंच्या लौकिक आयुष्याशी काही संबंध नाही. असा संबंध नसला तरी एक वेगळय़ा श्रेणीचा म्हणून- ज्याला ‘चिंतनसंबंध’ म्हणता येईल- असा संबंध नक्कीच तिथे आहे. ‘बाधा’ हे नाटक म्हणजे सरिताबाईंनी त्यांच्या काळातल्या एका करडय़ा-काळसर स्त्रीवास्तवाला दिलेला अस्वस्थ करणारा प्रतिसाद आहे.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

हेही वाचा >>> कस्तुरीगंध : ‘मंगलदिव्य’ मराठा विधवांची दु:खगाथा

 ‘बाधा’ नाटकाचा संबंध थेटपणे बाईंच्या व्यक्तिगत आयुष्याशी नसला तरी त्या नाटकाचा संबंध बाईंच्या आयुष्यकाळाशी, सामाजिक पातळीवरच्या स्त्री-वास्तवाशी तरी नक्कीच असलेला दिसतो. १९२० पासून साधारणपणे पुढची चाळीसएक वर्ष पांढरपेक्षा मध्यमवर्गीय घरांमधून आपल्याला शिक्षित-अशिक्षित, कमावत्या-बिनकमावत्या, तरुण-प्रौढ अविवाहित स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात दिसते. प्रौढ अविवाहित मुली घरात असणं ही त्या काळातली एक मोठीच सामाजिक समस्या ठरली होती. अर्थात या स्थितीला दोन महत्त्वाची कारणं होती. पहिलं कारण म्हणजे कुटुंब नियोजनाचा भयंकर अभाव आणि त्याबद्दलच्या समाजाच्या विक्षिप्त कल्पना. अखेरच्या क्षणी तोंडात गंगाजल घालायला मुलगाच हवा या विकृत अपेक्षेने मुलगा होईतो संतती वाढती राहायची- ज्यात स्वाभाविकच मुलींचं प्रमाण जास्त असायचं. ‘मुलगी वा मुलीचं घरात जन्माला येत राहणं हे दुर्भाग्य’ हीच समाजाची मानसिकता होती. ‘गळय़ातली धोंड’ म्हणूनच मुलींना वागवलं जाई. मुलीचं लग्न करायचं तर हुंडा नावाचा विक्राळ राक्षस समोर उभा असायचा. मुलग्याच्या लग्नात हुंडा घरात येण्याची जी सोय होती, तसा कोणताच लाभ मुलीच्या संदर्भात नव्हता. त्यामुळे घराघरात बिनलग्नाच्या मुली मोठय़ा संख्येने वावरत होत्या. या कारणांशिवायही या स्त्री-वास्तवाला अनेक कारणं असूच शकतात. दोन महायुद्धं आणि त्याचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या जागतिक स्तरावरच्या आर्थिक आणीबाणीचे घोर परिणाम भारतात फार मोठय़ा प्रमाणावर जाणवत होते. या काळात दारिद्रय़ इतक्या विकोपाला गेलेलं दिसतं की, घरातल्या कमावत्या तरुण मुली (तिचं उत्पन्न कितीका अल्पस्वल्प असेना) हा आईबापांना आर्थिक खाईतला दिलासा वाटत होता. घराघरातल्या कमावत्या मुली कुटुंबाचा आर्थिक भार जरी पेलत होत्या तरी त्यांना घरात काही किंमत, अधिकार वा प्रतिष्ठा होती असं नाही. याचा अनुभव ‘बाधा’तून येतोच. त्या काळातलं स्त्री-पुरुषांच्या अकाली होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही खूप मोठं होतं. बाळंतरोगाने आणि कुपोषणाने मरणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आणि रोगराई, अतिरिक्त काबाडकष्ट, व्यसनं यांनी मृत्युमुखी पडणाऱ्या पुरुषांचं प्रमाण हे आजच्या तुलनेत कित्येक पटीने मोठं होतं यात शंका नाही. हे जे आपल्या महाराष्ट्रातलं स्त्री-वास्तव होतं त्याचाच एक अतिशय प्रभावी असा बॅक ड्रॉप किंवा संदर्भपट सरिताबाईंच्या ‘बाधा’ला आहे हे अजिबातच विसरून चालणार नाही. ‘‘समाजातला पुरुषी धारणांवरच आयुष्य बेतणारा एक मोठा वर्ग असा आहे की, त्याच्या नजरेला पडणारी अविवाहित स्त्री ही त्याला ‘अ‍ॅव्हलेबल डॉल’च वाटते.’’ असं एमिली ब्रॉन्टेचं निरीक्षण आहे. तिच्या या वाक्यातून जो आशय आपल्याला कळतो तोच खरं पाहता ‘बाधा’चा नाटय़ाशय आहे.

हेही वाचा >>> कस्तुरीगंध : ‘माईसाहेब’ : काळ्या मनाच्या आईचं पोर्ट्रेट

‘बाधा’ नाटक १९५६ मध्ये ‘भारतीय विद्या भवन’ या संस्थेतर्फेसुप्रसिद्ध दिग्दर्शक नंदकुमार रावते यांच्या नेतृत्त्वाखाली रंगभूमीवर साकार झालं. खुद्द नंदकुमार रावते, कमलाकर सारंग, रमेश होनावर, श्रीधर घैसास, सुनंदा रावते असे कलावंत लाभल्यामुळे नाटक प्रचंड यशस्वी झालं. नाटक‘तारा’ या अविवाहित प्रौढ स्त्रीची कहाणी जो आशय प्रक्षेपित करतं आणि तो ज्या पद्धतीनं करतं त्याला न्याय द्यायचा तर जीवनाकडे, त्यातही स्त्रीकडे पाहण्याची पूर्वग्रहरहित दृष्टी बाजूला ठेवून काम करणारे लोक आवश्यक असतात. ही गरज ‘बाधा’मध्ये काम करणाऱ्या सर्वानीच इतक्या सकारात्मकतेने पार पाडली की, ‘बाधा’ अविस्मरणीय ठरलं यात खरोखरच आश्चर्य नाही. या तीन अंकी नाटकात एका कुटुंबाची- त्यातल्या दोन बहिणी आणि त्यांचा एक बेकार भाऊ- यांची कहाणी येते. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचा संसार चालवण्याची आर्थिक जबाबदारी सोळा-सतरा वयाच्या तारावर येऊन पडते. ही जबाबदारी ती अपार कष्ट करून निभावतेही. मात्र यात तिचं लग्न मागे पडतं. इथे कोणालाही विभावरी शिरूरकरांच्या ‘कळय़ांचे नि:श्वास’मधल्या अनेक नायिकांची आठवण येत राहील. बिनलग्नाच्या, पण कमावत्या प्रौढ कुमारिका हा त्या काळातल्या अनेक कुटुंबांमध्ये एक मोठाच प्रश्न होता, अगदी चारचौघात लज्जित वा कानकोंडं व्हावं असा!

या नाटकाची नायिकाच तारा आहे. नाटकाला प्रारंभ होतानाचं तिचं वय साधारण अठ्ठावीस आणि तिचा नाटकातला पहिला- दृश्यमान होणारा अवतार कसा, तर सरिताबाई म्हणतात तसा- खुरटलेली, करपलेली, खंगलेली दिसणारी मुलगी. रूक्ष चेहरा, बारीक अंगकाठी, ऑफिसमध्ये जाताना केलेला अतीव साधा, चुरगळलेला वेश. चेहरा ओढलेला!- या अशा ताराची लहान बहीण नलू. वय अठरा. ठरू पाहणाऱ्या लग्नाला अगदी तयार आणि उत्सुक. हिच्या जीवनाकडून, एक चांगला नवरा मिळावा ही अपेक्षा वजा करता फार अपेक्षाच नाहीत. मोठी बहीण तारा, पन्नाशी ओलांडलेली आई आणि हुशार, पण बेकार असल्याने गावगन्ना उंडारणारा भाऊ बाळ यांच्याकडून अभावग्रस्त आयुष्यातून सुटका होणार नाही, तशी सुटका झालीच तर ती आपल्या आयुष्यात ‘नवरा’ म्हणून येणाऱ्या देवदूताकडूनच होईल अशी तिची पक्की खात्री आहे. या दोन बहिणी आणि त्यांची हतबल, असहाय आणि आलेल्या परिस्थितीपुढे वाकणारी शरणागत आई म्हणजे त्या काळातल्या मध्यमवर्गीय वा निम्नमध्यमवर्गीय स्त्री-जीवनाचं शंभर टक्के प्रातिनिधिक नसलं, तरी बऱ्याचशा प्रमाणात प्रातिनिधिक ठरावं असं ‘रियल लाइफ स्केच ऑफ अ वुमन’च आहे. ताराच्या मनाच्या तळाशी एक खदखद म्हणा, नाराजी म्हणा किंवा हतबलतेतून आलेली निराशा म्हणा- ही आहे की तिच्या अठरा वर्षांच्या बहिणीचं लग्न ठरत असताना तिला मात्र घरच्या जबाबदाऱ्यांनी अविवाहित राहणं भाग पडतं आहे. अर्थात तिच्या भावाला आणि नलूला याची जाणीव आहे की, तारा अनेकदा अनेक ठिकाणी वेगवेगळय़ा दोनचार पुरुषांबरोबर हिंडत असते. त्यांच्याकडून तिला अनेक भेटवस्तू मिळत असतात. तिचं घरातलं आणि घराबाहेरचं जगणं आणि वागणं यात विरोधाभास आहे. आपल्याला नाटकात ताराचं घरंगळत जाणं, बहकणं, विश्वनाथ नावाच्या तरुण श्रीमंताच्या भूलथापांना बळी पडून वाहवत जाणं दिसत राहतं. पुढे तर ती पुरुष नावाच्या खडकावर पुन्हापुन्हा आपटत छिन्नभिन्न होत राहते. ती स्वत:च्या आत्म्याशी, स्वत्त्वाशी- म्हणजेच ‘इनर सेल्फ’शी प्रतारणा करत राहून अधिकाधिक केविलवाणी होत राहते. ताराचं नाटकातलं दर्शन मृगजळामागे धावत सुटलेल्या भ्रमचित्त माणसाचं आहे. ती स्वत्वनाशाच्या धारेला लागली आहे. नाटकाच्या अखेरच्या पर्वात तिच्या आयुष्यात कुमार हा गरीब,भाबडा तरुण येतो. तो कदाचित खरोखरच तिच्या प्रेमात पडला आहे. तो आहे तेवीस वर्षांचा. दोघांच्या वयात त्या काळाचा विचार केल्यास मोठं अंतर आहे. कदाचित त्याच्यासाठी तारा हा ‘श्रीमंत आश्रय’ तरी आहे किंवा ते ‘मातृसदृश प्रेमछत्र’ तरी आहे किंवा त्याला ताराची प्रेमबाधा तरी झाली आहे. तो तिची लग्नासाठी अजिजी करतो, करुणा भाकतो. ‘‘I want you to be my guardian angel,  my… my mother… my partner for life!ll असंही स्पष्ट शब्दांत म्हणतो.

हेही वाचा >>> कस्तुरीगंध : ‘दंडधारी’ : बाळासाहेबांची षोडशोपचार पूजा

ताराने पुरुष जातीचा जो अनुभव घेतला आहे तो स्वार्थाने बरबटलेला आहे. आता तिला पुरुषाबद्दल आकंठ भय, घृणा, तिरस्कार वाटत असला आणि तिला पुरुषांबद्दल नाशाच्या झंझावातासारखा थकवा आला असला तरी तिला कुमारचं प्रेम कळतं. मात्र त्या भाबडय़ा प्रेमाचा स्वीकार करून एका नव्याकोऱ्या आयुष्याला सामोरं जाण्याएवढी जीवनशक्तीच जणू तिच्यात उरलेली नाही. तिला आता जीवनभयाचीच बाधा झालेली असल्याने ती विविध कारणं पुढे करून कुमारचा अधिक्षेप करते, त्याची आर्थिक दरिद्रतेच्या मुद्दय़ावरून निर्भर्त्सना करते आणि त्याला घरातून जवळपास हाकलून लावते.

तो घरातून गेल्यानंतरची नाटककार सरिताबाईंची रंगसूचना जे सुचवते ती खरी बाधा! त्या रंगसूचनेत त्या म्हणतात- ‘तो गेल्यानंतर तारा त्याच्या जात्या पावलांचे आवाज ते ऐकू येईनासे होईपर्यंत ऐकत राहते- जिवाचे कान करून.. आवाज थांबल्यावर कोचावर पडून, तोंड लपवून, आतापर्यंत कधी केला नाही असा आक्रोश करू  लागते.’ तिला ही बाधा झाली असली तरी चार-सहा महिन्यांपूर्वी लागलेली नोकरी अचानक सुटल्याने पुन्हा ताराच्याच आश्रयाला आलेल्या बाळच्या, म्हणजेच तिच्या भावाच्या रूपाने आईबाबांच्या ‘नको नको झालेल्या’ संसाराचं जू पुन्हा एकदा तिच्या मानगुटीवर येऊन बसतं, एखाद्या पिशाच्चासारखं!  म्हणूनच त्याला पुन्हा घरी परतलेला पाहताच तिच्या भकास भविष्याचा चेहराच जणू तिला दिसतो. ती बधिर होते, डोळे फाडून भावाकडे पाहत राहते. आता तिच्या अंगाला भयकंप सुटला आहे. हा भयकंप आहे एका अविवाहित, फसवणूक झालेल्या आणि नात्यांचा सूळ खांद्यावरून वाहण्याची सक्ती सोसण्याऱ्या प्रौढ कुमारिकेचा! सरिताबाईंच्या नाटकाचा हा हृदयस्वर मला त्यांच्यानंतर आलेल्या तेंडुलकरी नाटकाशी आणि संदर्भ वेगळा असला तरी ताराचा आक्रोश खूप वर्षांनंतर रंगमंचावर घडून आलेल्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’ मधल्या बेणारेबाईंच्या आक्रोशाशी घट्टं नातं सांगणारा वाटतो. तुम्हालाही तो तसा वाटला आहे का कधी? ‘बाधा’कडे स्त्रीवादी समीक्षकांचं लक्ष अद्याप गेलंय की नाही कुणास ठाऊक?

vijaytapas@gmail.com