सुभाष अवचट Subhash.awchat@gmail.com

रेखाचित्र : अन्वर हुसेन

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

Nirvana is a place of perfect peace and happiness; it is understood as “blowing out” the extinguishment of the flame of personal desire, the quenching of the fire of life. – Buddha 

नशीब, प्राक्तन वगैरे माझे विषय नाहीत. पण खेडेगावात बालपण जाणे हा मोठा योगच म्हणायला हवा. एकंदरीत जीवन ही सरमिसळ असते. कोठे, केव्हा, कसे आणि काय सामोरे येईल याचा पत्ता तुमच्या हातात नसतो. माझे बालपण छोटय़ा खेडय़ात गेले. तेथे भोवती सह्यद्रीच्या डोंगररांगा होत्या. दाट जंगल होते. गावाला सकस बॅडाईक ब्राउनच्या जमिनी होत्या. नदीकाठचे हेमाडपंथी देऊळ, उद्ध्वस्त झालेल्या तटबंदीत आपला चेहरा सांभाळीत असलेली सताड उघडी चिरेबंदी वेस, सुटुंबा टेकडीवर चरणारी गुरेढोरे, वेशीपासल्या तिरक्या टेकाडावर थांबलेल्या बकऱ्यांचा जथा. ऋतुचक्राप्रमाणे ऐकणारे गाव होते. त्यात हलके सण यायचे, शेताच्या बांधावर, घरांच्या छपरांवर फुले उमलायची. अचानक गावावर ढग दाटून यायचे आणि हे गाव धाबळीत लपलेल्या मुलाप्रमाणे वाटायचे. गुरुवारी आठवडय़ाचा बाजार भरायचा. भोवतालच्या डोंगरांतून फेटे बांधून शेतकरी घोडय़ावरून यायचे. ठाकरिणी डोक्यावर लाकडाच्या मोळ्या घेऊन विकायला यायच्या. जाताना तेल, मीठ घेऊन चांदीचे कडे घातलेल्या पायांनी दुडक्या चालीनी गाणी म्हणत डोंगरमाथ्याकडे जायच्या. हे गाव, हे एक कुटुंबच होतं. वस्तीबाहेरच्या पोरक्या बखळीत कौलारू शाळा असायची. पायजमे, गांधी टोपी घातलेले मास्तर असायचे. त्यांचा धाक नसे, कारण ते गावकरी वाटायचे. रस्त्यावरून चालताना त्यांच्या लांब पायजम्याने धूळ उडायची. नदीवर पोहायला गेले की मास्तर म्हशी धुताना दिसायचे. आम्ही पोरंही म्हशी धुवायला मदत करीत असू. माझे बालमित्र काटकोळे, नाकात मेकडं साचलेले असायचे. पोहून शेतातल्या उन्हात रापलेले असायचे. धनगरी कुत्र्याच्या वेगाने आम्ही पळत असू. एकही गोरापान, गोजिरवाणा मित्र अख्ख्या गावात नव्हता. या गावात एकच शिलाई मशीन होतं. चंदू शिंपी थकला की तो तेच मशीन कोणाला विके. मग घराच्या भिंतीवर चुन्याने नवीन नाव टाकून दुसरा शिंपी नवीन दुकान उघडे. शंकर नावाचा एक न्हावी घरोघरी जाऊन पोरांची डोकी भादरत असे. भगवान गुरुजी जगातल्या सर्वाचे सत्यनारायण, मुंजी, लग्न ते स्मशनाभूमीपर्यंतची सर्व कार्ये उरकीत असत. गावात एकच डॉक्टर होता- ते म्हणजे माझे वडील! अडल्यानडल्या पेशंटला बघायला ते बैलगाडीला कंदील लटकवून सगळी पंचक्रोशी पालथी घालत. गावात वीज, रेडिओ, वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके नव्हती. नारायण मास्तरांचं एक छोटं पोस्ट ऑफिस वाडय़ाच्या ओवरीवर भरत असे. दहाबारा मैल नद्या पार करत रनर खांद्यावर डाक घेऊन जसा येई तसं गाव तेथे जमे. श्रावणात यात्रा भरे. कुस्त्यांच्या फडात गर्दी होई. दिंडय़ा-पताकांच्या तालात वारकरी नाचत असत. वेळोवेळी पालख्या निघत. महादेवाच्या मंदिरात प्रवचने होत असत. कधी साधूंची टोळी डोंगरातल्या लेण्यांकडे जाताना दिसे. दिवाळीत काकड आरत्या होत असत. थंडीत गाल आणि पोटऱ्या फुटत असत. नथू शेतकऱ्याच्या गायीला गोऱ्हा झाल्याची बातमी गावभर पसरे. मोसमाप्रमाणे घरोघरी शेतकरी भाज्या, फळे, फुले पोहोचवत असत. परगण्यात बाजरी, नाचणी, ज्वारीच्या ढिगांना उन्हं दाखवायचा मोठा कार्यक्रम होई- जसा बैलपोळ्याला बैलांना घास द्यायचा कार्यक्रम होई. ऋतूंप्रमाणे गावातली हवा सुगंधित होत जात असे. पावसाळ्यात नदीचा, ओढय़ांचा पूर पाहायला गेलेल्या आम्हा पोरांना गावकरी दटावून घरी पाठवीत असत. अशा या गावात त्या बालपणी प्रत्येक जण आपापल्या कामात असल्याच्या आठवणी आहेत. अंगणातल्या रांगोळ्या.. मळ्यात शेतकरणीबरोबर तिच्या गावातल्या मैत्रिणींच्या रंगलेल्या गप्पा – सर्व गाव अगदी आनंदी होते. बालपण संपल्याची भावना होते, जेव्हा मी वेशीतून, एसटीत बसून, शिक्षणासाठी शहराकडे निघतो, ते चिमुकलं गाव मागे राहते; जत्रेतल्या भिरभिऱ्यासारख्या आठवणी मागे उरतात.

शाळेतलं पुणे शहर मला आवडलं. तेथे नकळत वेगळाच गोतावळा तयार झाला. शाळेत मी  सोडलो तर इतर सारे गोजिरवाणे, अंघोळ केलेले, केस विंचरलेले मित्र वर्गात होते. शहरही मला आवडले. शहराच्या मध्यातून वाहणारी नदी, टेकडय़ांनी, फळाच्या बागांनी, गर्द झाडीत, हे आपल्यापुरतं वसलेलं गाव होतं. त्यातली देखण्या, दगडी बांधकामातली कॉलेजं, शाळा, पटांगणं, बैठय़ा बंगल्याच्या जुन्या वाडय़ांमधून गेलेल्या गल्लय़ा, पेठांमधून हात पाठीशी बांधून ताठ चालणारी पारंगत वृद्ध माणसं.. या गावाला शहर म्हणायचा अधिकार कोणालाही नव्हता. ‘हें आमचें पुणे आहे’, याचा सार्थ अभिमान त्यांना होता. देवळे होती, तळी होती, गाण्यांचे, गणित आणि इतर विषयांचे क्लासेस गल्लय़ागल्लय़ांमध्ये  होते. रस्त्यावरून हातात तंबोरा घेऊन गाण्याच्या क्लासकडे जाणाऱ्या युवती दिसत. धोतराचा काचा मारून सायकलीवर जाणारे गृहस्थ, तर कधी नऊवारी साडीत लेडीज सायकलवर कॉलेजला जाणाऱ्या स्त्रियाही दिसत. उघडेबंब पुजारी, टोप्या घातलेले टांगेवाले, कॉलरची गुंडी लावून कोट घातलेले प्राध्यापक आणि सायकलच्या कसरती करत जाणाऱ्या तरुण पोरांनी पुणे भरलेले होते. विद्वत्तेचा चेहरा या गावाला होता. त्यात अभिमान वाटावी अशी हवा तेथे होती. घरात पंखे वगैरे नसायचेच. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फिल्मचा तो जमाना होता. त्या सिनेमांत दिसणारे असे हे गाव होते. जुन्या थिएटरमध्ये राजा परांजपे, गुरुदत्त, मॅटनीला देवानंद, राज कपूर, नूतन, बलराज सहानी, मोतीलाल यांचे सिनेमे लागायचे. पुणेकर ते सवडीने पाहायचे. रेडिओवरची महंमद रफी, तलत मेहमूदची यांची गाणी पेठांमध्ये रंगायची. गजरे माळून स्त्रिया नाटके बघायच्या. तलम कुडते घालून मंडळी गाण्याच्या मैफिलीत रंग भरायचे. महत्त्वाचे असे की, हे अलौकिक गायक, वादक आणि प्रेक्षकही फक्त पुण्यातलेच असायचे. गुरुदत्तच्या ‘प्यासा’ सिनेमाचा परिणाम तरुण कवींवर झाला होता. त्यामुळे विस्कटलेली दाढी-केस, जाडेभरडे कुडते, खांद्यावर पुस्तकांच्या ओझ्यानं लोंबकळणारी शबनम पिशवी घेऊन ते फिरताना दिसायचे. पिशवीत साधारणत: टॉलस्टॉय, सात्र्, फ्रॉईड नाही तर मर्ढेकरांची जड पुस्तके असायची. या कवींची हाताची बोटे टूथपीकसारखी झालेली असायची.  ‘गुडलक’मध्ये अपरात्री बोटे उंचावून ते चर्चा करीत, चहा पीत बसत. पण मजा म्हणजे, रस्त्यात हे दिसले की पुणेकर त्यांना डिस्टर्ब करीत नसत. कदाचित तो कवी कोणत्या तरी विचारात गुंतला असावा, हेही कारण असेल.

पण माझा गोतावळा साधना प्रेस, शनवार पेठेत वाढला. तेथे अद्भुत लोक मला त्या वयात भेटले. नाथ पै, एस. एम. जोशी, प्रधान मास्तर, ना. ग. गोरे, यदुनाथ थत्ते अशी भलीमोठी यादी तयार हाईल. ही माणसं जगातल्या अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढत रहिली. वैयक्तिक आयुष्यात ते माझे शिक्षक झाले. त्याबरोबर पुण्यातल्या तालमीमुळे माझा कुस्तीचा छंद जोपासला गेला. त्यामुळे माझ्या गोतावळ्यात पैलवानापासून ते टांगेवाले, कवी, गायक, तबलजी, भटजी, मल्लखांबावरचे पिळदार सवंगडी, नंतर थोडा मोठा झाल्यावर मोठे थोरले लेखक, प्रकाशक, प्रिंटर्स ते साधना प्रेसमधले महानायक सामील झाले. माझ्या शाळेतल्या विद्वान शिक्षकांनी, अनेक प्रोफेसरांनी त्यात ज्ञानाची भर घातली.

हे आठवले की एक जाणवते- त्यावेळी तेथे वैचारिक ट्रॅफिक जाम नव्हता. तो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट जमाना परत येणे अशक्य आहे. त्या पिरीअडमध्ये जो तो आपापले काम हिरिरीने, आनंदाने करण्यात मग्न होते. साऱ्यांचे डोळे उघडे होते. अत्रे, फडके, पोतदार, यशवंतराव चव्हाण, पु. ल. देशपांडे यांच्या व्याख्यानांनी पुण्यातले रस्ते, आमची मने मोहरून गेलेली असायची. एकंदरीत मधुबालाच्या अद्भुत स्मितासारखा तो काळ होता.

त्या वेळी डोळे बंद करून ध्यानाला बसलेला, निर्वाण प्राक्तनाच्या चर्वणा करताना कोणी दिसत नसे. गुरू, कल्ट, टेरेरिझमचा तो काळ नसल्याने डोळे सताड उघडे होते तेही खरंच आहे. पुढे जी. ए.  कुलकर्णी भेटले. तेही म्हणाले, ‘डोळे बंद करून हे लोक काय शोधतात? डोळे पाहण्यासाठी असतात.’

या मंगल काळात बुद्ध, महावीर, कृष्णमूर्ती, ओशो वगैरे लोकांची एन्ट्री झाली नाही. तुकाराम, फुले, आंबेडकर, कर्वे, गाडगे महाराज,  वारकरी अशा आप्तमंडळींचा माझा परिवार होता. प्रत्येक कलावंताचा बहराचा एक काळ असतो. त्याच्या क्रिएटिव्हिटीचाच तो बहर असतो. अचानक तत्त्वज्ञान मार्केटमध्ये आले. फोफावलेदेखील. खरं म्हटले तर बुद्ध आणि त्याचे दृष्टिकोन हा पुरातन विषय आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा काळ संपून शम्मी कपूर जसा रंगीत सिनेमा घेऊन आला, तसा बुद्ध एकदम इंटरनॅशनल पातळीवर पसरला. बौद्धकालीन गुहा, चैत्य, स्तूप, त्यांची कॅलिग्राफी हे मला मोहवून टाकणारे होते. तो अभ्यासाचा विषयही होता. बुद्धाच्या गोष्टी सर्वाना माहीत असतात. पण तत्त्वज्ञान आणि त्याचा अर्थ, उपासना हे भले मोठे शब्दकोडे वाटत असे, त्यामुळे त्या प्रांतात माझे भटकणे झाले नाही. शिवाय बालपणात काम करीत राहणे, त्यातून आनंद गवसतो ही दृष्टी मला माझ्या गोतावळ्यात नकळत मिळाली होती. त्यामुळे संसार, दु:ख, मृत्यू, पुनर्जन्म, निर्वाण, एन्लाईटनमेंट या जबरी शब्दांची भीती नव्हे, तर माझ्या आउटलुकमध्ये त्यांना थारा नव्हता. ‘असेल बुवा’ म्हणत टाळण्याची ती सोपी युक्ती होती. गुहेत डोळे मिटून एखाद्या माँकप्रमाणे मेडिटेशन करीत मी बसलो आहे या कल्पनेनेच मी दचकून उठत असे.

पण अचानक बुद्धीझम माझ्यापाशी येऊन थडकला तो चित्रकलेमुळे. कारण सर्वत्र बुद्ध, बुद्ध अशा आशयाची कमळे, शिखरे असलेली अतिसामान्य चित्रे मार्केटमध्ये आली. चीनमधून घाऊक प्लॅस्टिकच्या नानाविध साइजमधल्या मूर्ती सर्वत्र पोहोचल्या. पोस्टर्स छापून ती फूटपाथवर विकायला आली आणि महत्त्वाचं म्हणजे ती घरात लावण्याची फॅशन आली. मलेशियातून बुद्धाच्या दगडी, बैठय़ा मूर्ती भारतात आल्या. बागेमध्ये बुद्धाची मूर्ती, त्यापुढे पाणी, पाण्यात दगडगोटे, प्लॅस्टिकची तरंगती फुले असे इंटिरिअर सुरू झाले. त्यात एक घोळ म्हणजे, आपला योगा म्हणजे बुद्ध हेही जोडले गेले. घरात बुद्धाचे चित्र म्हणजे संसारात शांती येणे हा गैरविचारही आला. त्या काळी माझी ‘परंपरा’ ही पेंटिगची सीरीज आली होती. त्याची पार्श्वभूमीही वेगळी होती. पण आपले साधू, आपली परंपरा म्हणजे बुद्ध अशी धारणा झाली आणि बुद्धाचे पेंटिंग द्या अशी मागणी माझ्याकडे वाढली.

कोणत्याही तत्त्वज्ञानाचे स्वरूप आपापल्या चिंतनाच्या मार्गाने जाते. ते व्हिज्युअल आर्टमध्ये दर्शवणे हे फक्त अ‍ॅबस्ट्रॅक्ट असू शकते. चित्रकलेची, वाङ्मयाची भाषा वेगळी. केवळ मेडिटेशनमध्ये बसलेला बुद्ध, आसपास पक्षी, पाने फुले दाखवली की त्यात बुद्धाची विचारसरणी येत नाही. अनेक तत्त्वज्ञानांची ट्रॅजिडी ही की ते तत्त्वज्ञान, जो तो आपल्या सोयीने वाकवून घेतो. तो मार्क्‍स असेल नाही तर बुद्ध! त्यामुळेच बुद्धाचे तत्त्वज्ञान, निर्वाण दूर जाऊन त्याची गार्डन्स, म्युझिक, आर्किटेक्चर, इंटिरिअर किंवा मोठे टुरीझमही भरीस आली. मेडिटेशनसाठी नवीन स्थळं तयार झाली. तो शब्दही कोणी इतक्या सहजतेने वापरायला लागतो. विरोधाभास असा आहे की बुद्ध म्हणतात, फक्त मेडिटेशन करून तुम्हाला एन्लाईटनमेंट मिळत नाही. बुद्धाला वयाच्या ३५ व्या वर्षी एन्लाईटनमेंट मिळाली. पुढची ४५ वर्षे तो जगला, कारण त्याला पुर्नजन्म नको होता. चुंदा नावाच्या लोहाराच्या हातचे जेवण तो जेवला. त्याला ते बाधले आणि कुशीगरमध्ये तो मृत्यू पावला. सारं जीवन desire, suffering ने भरलेलं असतं. एन्लाईटनमेंटमध्ये तुम्ही एका परफेक्ट जागी पोहोचता, जेथे फक्त शांती आणि आनंद मिळतो. या विचारात, अनेक धर्मात हे सुटकेचे मार्ग सांगितले आहे. या कष्टदायक संसारातून सुटका आणि अंतिम सत्य, आनंदाकडे पोहोचणे यासाठी त्यांनी आपापला मार्ग शोधला. ती त्यांची स्वत:ची वाट होती. त्या वाटेवरून शिष्य चालत गेले, तर अंतिम टप्पा त्यांना गवसणार नाही. त्यामुळे प्रत्येकानी आपापला रस्ता शोधावा असा उपदेश आहे. या निर्वाणाच्या बाबतीत साध्या माणसांना जगभर प्रश्न आहेत. एन्लाईटनमेंट मिळाली अशी माणसे अजून तरी सापडली नाहीत किंवा निर्वाणाला भरभक्कम पुरावे नाहीत. सत्य पडताळून पाहायला पुरावे लागतात. एन्लाईटनमेंट मिळालेल्या माणसांनी काय केले? त्यांना या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबद्दल, मृत्यू, पुर्नजन्माबद्दल कोणती नवीन दृष्टी मिळाली? त्याची मानवजातीला कोणती मदत झाली? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. निसर्गापुढे मानवजात ही कमकुवत राहिली आहे. संसार करताना सारे स्वीकारून, अलिप्ततेकडे जाण्याचे सोपे मार्ग त्यांनी अवलंबले. तुकाराम दुकानात पुडय़ा बांधता बांधता अलिप्त झाला. संतांनी समाज सुधारणेचे काम केले. शिक्षकांनी एकनिष्ठतेने शिकवून समजूतदार पिढय़ा तयार केल्या. अंधश्रद्धेत गुंतलेल्या भोळ्या माणसांना सत्याची जाणीव करून दिली. स्त्रियांना शिक्षण दिले. गोरगरिबांच्या आजारांवर उपाय शोधले. वैकुंठाचा हा कर्मयोग्याचा रस्ता त्यांनी पकडला. सारे सोडून, हिमालयाच्या गुहेत जाऊन बसण्याचे धारिष्टय़, कुवत प्रत्येकाकडे नसते. त्यांना समाजाच्या आधाराची गरज असते. डोळे बंद करून बसण्याऐवजी डोळे उघडे ठेवून जगण्याचा मार्ग चित्रकारांनी स्वीकारला. Reality and Realisation यामधला समतोल त्यांनी साधला. त्यांना मृत्यूची भीती अथवा निर्वाणाचे आकर्षण नव्हते. त्यांनी मनाचा शोध कॅनव्हासवर उतरविण्याचा प्रयत्न केला. ते करताना त्यांना चैतन्याचा झरा सापडत गेला. आणि या जगभरातल्या चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, लेखक-कवींनी एक मोलाचा पुरावा मागे ठेवला. ती चित्रं पाहताना त्यांच्या एन्लाईटनमेंटमध्ये त्यांनी जगाला सामावून घेतले. वय वर्षे सोळा ते एक्याण्णव  या कालात पिकासोने निर्माण केलेल्या चित्रांचे जर रेट्रोस्पेक्टिव्ह पाहिले की कळते या मार्गावर त्याला काय काय सापडत गेले. त्यानेच काय, इतर अनेक चित्रकारांनीही त्यांना मिळालेली एन्लाईटनमेंट कलात्मक रूपात जगात ठेवून निर्वाण केले.

आपल्याकडे गायतोंडे हे मोठे चित्रकार, दिल्लीतल्या एका बरसातीत राहिले. तेथे त्यांनी आयुष्यभर जी चित्रे चितारली की वाटते, हे त्यांचे तप होते. त्यासाठी त्यांनी गुहेऐवजी स्टुडिओ स्वीकारला. काळाच्या ओघात नाहीसे झालेल्या अनेक आर्किटेक्ट्स्, इंजिनीअर्सनी अखंड दगडात वेरूळ नावाची अलौकिक कविता कोरली. ती पाहताना मोक्ष काय असू शकतो याची पुसटशी कल्पना करता येते. जंगल वाचवण्यासाठी जीवन देणारे कर्नाटकातले आदिवासी, फाटक्या संसारातही हसत, निष्ठेने जीवन जगणाऱ्या कुटुंबांचे हेच रस्ते आहेत. जीवन जगताना त्यांना मिळालेली एन्लाईटनमेंट आहे. शेवटी हॅपीनेस ही रिलेटिव्ह टर्म आहे. छोटय़ा लेकराचे गाल चाटणारे कुत्र्याचे पिल्लू बघितले की हाच निष्पाप आनंद लाखमोलाचा होता.

कॅनव्हास रंगवताना अनेक क्षण असे येतात त्याचे वर्णन करता येत नाही. त्याचे रिअलायझेशन त्या चित्रात दडलेले असते. अशा जगण्यात, अशा क्रिएटिविटीमध्येच डोळस निर्वाणाचे आभास दडलेले असतात. त्याची चाहूल खेडय़ातल्या तुमच्या बालपणात मिळत जाते. बुद्धाची शिकवण काय आहे? या मार्गाने गेल्यास तुम्हाला परफेक्ट शांती आणि हॅपीनेस मिळतो. या खेडय़ात, पायवाटांवर तर ती चोहीकडे पसरलेली दिसते. झाडाच्या सावलीला बसलेले शेतकरी एकही शब्द न बोलता आनंदाने बसलेले दिसतात. चावडीवर बसलेले गावकरी आनंदाने गप्पा मारताना दिसतात. शेतात रापलेल्या त्यांच्या चेहऱ्यांवर असाच एक आत्मिक आनंद पसरलेला दिसतो. दारावर आलेल्या गोसाव्यांना ते मनापासून माधुकरी देतात. शेतातल्या फुलांचे गजरे वेणीला बांधून पारंब्यावर पोरी झोके घेतात. थंडीत शेकोटीपाशी गोल बसून शेक घेताना त्यांचे चेहरे आगीच्या प्रकाशात उजळतात. ते आपली भाषा बोलतात. गातातही. तेथे एक अजब शांतता पसरलेली असते, जी मेडिटेशनमध्ये मिळते असे म्हणतात. ऋतुचक्र त्यांच्यात सामावलेले असते अन् तेही ऋतुचक्राचा भाग होऊन राहतात. लेण्यामध्ये बौद्ध भिक्खू एकत्र बसून पठण करतात, तसे हे गावकरी एकमेकांच्या शेतात जाऊन खुरपणी करतात. शहरात माणसं एकत्र राहतात. पण एकटी होतात. त्यांच्या वैचारिक ट्रॅफिक जाममध्ये गोंधळ निर्माण होऊन ते आनंदाचे मार्ग कोठल्या तरी तत्त्वज्ञानात शोधत रहातात. हे असे आनंद खरे तर निसर्गात सर्वत्र वाऱ्याबरोबर, पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात, सूर्यास्ताच्या रंगामध्ये सामावले असतात. वावरातल्या बांधापासल्या बाभळाच्या झाडाच्या चिमूटभर सावलीत, भाकरतुकडा खाऊन, शेतकरी निवांत डोळे मिटतो, तो खरा मेडिटेशन मधला परमानंद असावा. बालपणी माळरानावर गुराढोरांच्या मागे राखण करताना घामावर बसलेल्या वाऱ्याबरोबर तो अंगभर जिरला आहे. निर्वाण हा या ऋतुचक्रातला छोटा भाग आहे.