scorecardresearch

व्यावसायिक असूनही प्रायोगिकतेचा पाठीराखा

नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ रंगकर्मी अण्णा तथा भालचंद्र पेंढारकर यांचे कर्तृत्व विविधांगी असले..

नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ रंगकर्मी अण्णा तथा भालचंद्र पेंढारकर यांचे कर्तृत्व विविधांगी असले तरी व्यावसायिक रंगभूमीच्या धुरिणांकडे सहसा न आढळणारी प्रायोगिकतेची ओढही त्यांना होती. त्यापायी त्यांनी जे प्रायोगिकतेचे ‘प्रयोग’ केले, त्यांचा मागोवा घेणारा लेख..

सा हित्य संघात रंगमंचावर कुठल्यातरी प्रायोगिक नाटकाची तालीम विजया मेहता घेत होत्या. तालीम रंगात आली होती. ती प्रायोगिक नाटकाची तालीम रंगमंचाच्या वरच असलेल्या आपल्या ध्वनिमुद्रण मनोऱ्यातून एक डोळा मनस्वीपणे पाहत होता. तोही त्यात रंगून गेला होता. तालमीने क्षणकाळ विश्रांती घेतली तेव्हा ती धोतर-कोटातली मूर्ती नागमोडी शिडी उतरत मोठय़ा उत्साहाने तिथं अवतरली आणि उद्गारली, ‘‘विजया, तुझ्या या प्रायोगिक नाटकात मला छोटीशी भूमिका मिळेल का?’’ विजयाने आपल्या नेहमीच्या मुक्तहास्याने त्या व्यक्तीला दाद दिली. ती व्यक्ती म्हणजेच अण्णा तथा भालचंद्र पेंढारकर!
अण्णा पेंढारकर जितके व्यावसायिक होते तितकेच ते प्रायोगिकही होते. केवळ प्रयोगसंख्या वाढवणारे ‘प्रायोगिक’ नव्हते; तर वृत्तीने आणि दृष्टीनेही नव्याचा शोध घेणारे.. नेहमी प्रायोगिकांना मदतीचा हात पुढे करणारे. प्रायोगिकतेचा हा वारसा त्यांनी आपल्या पिताजींकडूनच घेतला होता.
१९२१ साली केशवराव भोसलेंकडून ‘ललितकलादर्श’ या संस्थेची मालकी बापूराव पेंढारकरांकडे आली. तेव्हापासून बापूरावांनी नित्यनवे प्रयोग रंगभूमीवर केले. संगीताच्या स्वप्नात धुंद होण्यातच इतिकर्तव्यता मानणाऱ्या मराठी नाटकाला सामाजिक बांधिलकीचे भान देऊन जागे करणाऱ्या मामा वरेरकरांचे नाटक रंगभूमीवर आणण्याचे धाडस बापूरावांनी केले. रंगमंचावर मोटार आणण्याचे, नाटकाच्या जाहिरातीसाठी चमचमत्या विद्युत्अक्षरांचा वापर करणारे, ‘सत्तेचा गुलाम’ नाटकात वैकुंठाच्या शेतात खऱ्या पाण्याचा पाट दाखवणारे, कमतनूरकरांच्या ‘श्री’च्या नाटय़प्रयोगाला चित्रित प्रसंगाची जोड देणारे पहिले बापूराव पेंढारकरच. (‘श्री’ नाटक- १९२६)
नेपथ्य, आशय आणि सादरीकरणाचे वेगवेगळे प्रयोग करण्याच्या पित्याच्या वेडाने पुत्रही झपाटला होता. म्हणूनच विजय तेंडुलकरांचे प्रायोगिक नाटक प्रथम व्यावसायिक रंगमंचावर आणणारे निर्माते होते भालचंद्र पेंढारकर. नाटकाचं नाव होतं- ‘झाला अनंत हनुमंत.’ दिग्दर्शक होते अरविंद देशपांडे. प्रायोगिक नाटकाचे व्यावसायिक रंगमंचावरचे हे पहिले दर्शन होते १९६८ सालचे. व्यावसायिक नाटकवाले जेव्हा प्रायोगिकवाल्यांचा प्रचंड दु:स्वास करायचे त्या काळातले. ‘झाला अनंत हनुमंत’ हे नाटक व्यवसाय कितपत करील अशी शंका घेतली गेली तेव्हा अण्णांनी ज्या तडफेने शंकेखोरांना निरुत्तर केले, त्यातून त्यांच्या प्रायोगिक रंगकर्मीविषयीच्या उत्कट स्नेहभावाचे दर्शन होते. ते म्हणाले, ‘एका मान्यवर लेखकाचे नाटक एका मान्यवर दिग्दर्शकाला घेऊन मी रंगभूमीवर आणतो आहे. विषय चांगला आहे. उत्तम निर्मिती आणि प्रायोगिकता यासाठी ललितकलादर्श प्रसिद्ध आहे. त्यातूनही तिच्या हीरकमहोत्सवप्रसंगी धाडस करायचं नाही तर केव्हा? व्यावसायिकदृष्टय़ा हे नाटक चाललं नाही तर मला मुळीच वाईट वाटणार नाही. कारण त्या दृष्टिकोनातून हे नाटक मी निवडलेलंच नाही.’ या नाटकात अण्णांनी ‘पंढर’ची (कीर्तनकार) भूमिका केली होती. अण्णा पेंढारकर इतर निर्मात्यांपेक्षा वेगळे का वाटतात, त्याचं हे बोलतं उदाहरण आहे. प्रायोगिक नाटकांसारखेच चटपटीत, नेटके प्रयोग व्यावसायिक रंगमंचावर स्वातंत्र्योत्तर काळात प्रथम केले ते अण्णा पेंढारकरांच्या ‘ललितकलादर्श’नेच.
यशवंत नाटय़गृहाच्या आवारात प्रायोगिक रंगमंचासाठी सर्व रंगकर्मीनी एकत्र येऊन दामू केंकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सळसळते आंदोलन उभे केले होते. अशीच एक नाटय़विषयक चळवळ अण्णा पेंढारकरांनी १९५४ साली उभी केली होती. नाटकावरचा करमणूक कर रद्द करावा यासाठीचं ते आंदोलन होतं. प्रचाराचा भाग म्हणून आपल्या नाटकाच्या प्रयोगाप्रसंगी त्यांनी रंगभूमीवर प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. साधारण २० मिनिटांचा हा कार्यक्रम पेंढारकरांनी स्वत:च लिहून सादर केला होता. लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध जागृती करणाऱ्या पथनाटय़ाशीच या कार्यक्रमाचे नाते जुळते.
अलीकडच्या काळात प्रायोगिकांनी लोकक लांच्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यापूर्वी काही वर्षे अगोदर अण्णा पेंढारकरांनी साहित्य संघासाठी दशावतारी बाजाचं ‘इंद्रजीतवध’ हे नाटक सादर के लं होतं. त्याचं संगीतही त्यांनीच दिलं होतं. साहित्य संघाच्या मान्यवर मंडळींबरोबरच अण्णांनीही त्या दशावतारात महत्त्वाची भूमिका केली हेती. ‘ललितकलादर्श’ या नाटय़संस्थेची ‘हौशी विंग’ म्हणून ‘ललित कला केंद्र’ ही संस्था त्यांनी काढली होती. विजया जयवंत, सुधा करमरकर, नंदकुमार रावते, आनंद पै, दामू केंकरे या त्यावेळच्या प्रायोगिक युवा रंगकर्मीचा त्यात सहभाग होता. ‘गीत सौभद्र’ ही संगीतिकाही प्रायोगिक स्वरूपात (लेखक- ग. दि. माडगूळकर) त्यांनी सादर केली होती.
भारत-चीन युद्धाच्या पाश्र्वभूमीवरील ‘रक्त नको, मज प्रेम हवे’ हे नाटक मूळातले कन्नड नाटक. ते मराठीत रूपांतरित करून (रूपांतरकार- सुरेश खरे) व्यावसायिक रंगमंचावर आणण्याचं धाडस अण्णांनी केलं. केवळ नाटय़निर्मिती करूनच ते थांबले नाहीत, तर त्यात वाँग ही चिनी व्यक्तिरेखाही त्यांनी रंगवली होती. कमलाकर सोनटक्के यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं.
मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अस्सल संगीत नाटक म्हणजे काय, याचं शिक्षण दिलं आणि देवलांचं ‘संगीत शारदा’ नाटक त्यांनी त्या विद्यार्थ्यांमधून उभं केलं. हा प्रयोग तुफान रंगला. संगीत रंगभूमीवरील प्रायोगिकतेचं दर्शन अण्णांच्या या ‘शारदा’नं दिलं. जुन्या संगीत नाटकाची अवीट गोडी त्यामुळे उभरत्या पिढीला कळून चुकली.
भाण या लोककलाप्रकारावर आधारित विद्याधर गोखले लिखित ‘बावनखणी’ हे नाटक अण्णांनी सादर केलं ते भरतशास्त्रप्रणीत रंगमंचावर! चित्रकार द. ग. गोडसे यांनी या नाटकाचं नेपथ्य साकारलं होतं.
‘बहुरूपी हा खेळ असा’ या दत्तात्रय केळुस्करलिखित नाटकात त्यांनी गिरगावच्या चौपाटीवरचा देखावा उभा केला होता. चौपाटीवरचा लोकमान्य टिळकांचा पुतळा पाहून तर प्रेक्षकांना प्रत्यक्ष चौपाटीवरच गेल्याचा अनुभव आला. हे वास्तवदर्शी नेपथ्य पु. श्री. काळे यांनी सिद्ध केलं होतं. रंगमंचावरच्या पात्रांची हालचाल त्यांच्या पायाने उडणाऱ्या वाळूमुळे अधिकच प्रत्ययकारी झाली होती.
मानवाचे पाय चंद्रावर उमटण्याअगोदरच अण्णांनी आपल्या ललितकलादर्शतर्फे सादर केलेल्या ‘आकाशगंगा’ या बाळ कोल्हटकरलिखित नाटकात ते उमटवले होते.
अण्णा पेंढारकर हे अस्सल व्यावसायिक नाटय़निर्माते होते. कितीही अडचणी येवोत, पण कलावंतांना अगोदर दिलेल्या तारखांनुसार प्रयोग होत असत. उत्पन्न होवो- न होवो, नटांचं मानधन कधी चुकलं नाही वा विलंबानेही दिलं गेलं नाही. प्रयोग घोषित केलेल्या नेमक्या वेळेस सुरू करण्याचं ब्रीद अण्णांनी कायम पाळलं. दिल्लीच्या ‘पंडितराज जगन्नाथ’च्या प्रयोगाला पंतप्रधान पं. नेहरूंना उशीर झाला, पण त्यांच्यासाठी अण्णांनी नाटक थांबवलं नाही. या वक्तशीरपणाबद्दल प्रयोगानंतर पंडितजींनी त्यांना शाबासकी दिली. वेळ काटेकोरपणे पाळण्यासाठी कलावंतांना प्रसंगी कंपनीच्या खर्चाने विमानाने न्यायला त्यांनी कमी केलं नाही. काही कलावंत अण्णांनी आपल्या कंपनीसाठी कायमचे बांधून घेतले होते. अशा शिस्तशीर वागणुकीचा नाटय़निर्माता दुर्मीळच. ‘चंद्रलेखा’च्या मोहन वाघ यांनीच फक्त हे गुण अण्णांकडून आत्मसात केले.
१९५७ सालची भारतीय विद्याभवनची आंतर-महाविद्यालयीन नाटय़स्पर्धा. आमच्या खालसा कॉलेजने ‘काळ आला होता’ ही एकांकिको स्पर्धेत सादर केली होती. त्यावेळी गाजत असलेल्या ‘दुरिताचे तिमिर जावो’ या बाळ कोल्हटकरलिखित नाटकाच्या पहिल्या अंकाचा तो संक्षिप्त अंश होता. मी त्यात दिगूची भूमिका करीत होतो. अण्णा आवर्जून आमच्या या एकांकिकेला उपस्थित होते. त्यांच्या उद्गारांची आज मला तीव्रतेनं आठवण होते. ते म्हणाले होते, ‘माझी भूमिका अनुभवताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी का तरळतं, या प्रश्नाचं उत्तर आज मला नाडकर्णीचं काम बघून मिळालं.’ त्यांचे हे उद्गार त्यावेळच्या वृत्तपत्रांतील कॉलेजविश्वात छापून आले होते. आमच्या एकांकिकेने अंतिम स्पर्धेत दुसरं पारितोषिक मिळवलं आणि मला अभिनयाचं रौप्यपदक! आज ते पदक कुठं हरवलं, कुणास ठाऊक! पण त्यापेक्षाही मौल्यवान असलेले अण्णांचे शब्द मात्र माझ्या मनात कायमचे रुतून बसले आहेत. आपलीच गाजलेली भूमिका वठवणाऱ्या एका कोवळ्या कॉलेज- युवकाचं असं भरभरून कौतुक करणारे नट-निर्माते आज कुठे आहेत? मराठी संगीत रंगभूमीचा आढावा घेणारा एक रंगतदार कार्यक्रम त्यावेळच्या ख्यातनाम कलावती सुहासिनी मूळगांवकर यांनी साहित्य संघातर्फे सादर केला होता. विष्णुदास भाव्यांच्या संगीत नाटकापासून ते विद्याधर गोखल्यांच्या संगीत नाटकांपर्यंतचा एक संगीत नाटय़पटच बाईंनी सुस्वररीत्या मूर्तिमंत केला होता. या धुंद करणाऱ्या कार्यक्रमाचा शेवट झाला तो विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील प्रवेशाने. या अखेरच्या भागात तांबडी पगडी परिधान करून ते ‘आम्ही पुण्याचे बामण हरी’ म्हणत पदन्यासात रंगून गेले होते. त्यांच्या साथीला होत्या ललिता केंकरे. अण्णांचा विरोध ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाला नव्हता; ते लिहिणाऱ्या वृत्तीला होता. (संदर्भ- ‘तें आणि आम्ही’- आविष्कार प्रकाशन)
अण्णा पेंढारकर प्रायोगिकतेचे किती उत्तम पाठीराखे होते हे सांगायला यापेक्षा अधिक ते काय हवं?
प्रायोगिकतेची पाठराखण करणाऱ्या या अस्सल व्यावसायिक रंगकर्मीच्या स्मृतींना माझे लाख प्रणाम! असा भालचंद्र आता होणे नाही! ल्ल
kamalakarn74@gmail.com कमलाकर नाडकर्णी

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on bhalchandra pendharkar