योगेश जोशी

हिंदीसह अनेक तेलुगू चित्रपटांची निर्मिती करणारे आणि  ‘शंकराभरणम्’ सारखा अस्सल भारतीय सांगीतिकपट बनवणारे चित्रकर्ते के. विश्वनाथ यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्ताने हा चित्रपट ३५ हून अधिक वेळा रिचवत या चित्रकर्त्यांशी भावनिक सेतू जोडणाऱ्या एका मराठी संगीतदर्दीचे टिपण..

१९८१/८२ च्या सुमारास मुंबईच्या वरळी नाक्याजवळ गीता नावाचं एक टुकार थिएटर होतं. त्या थिएटर मध्ये ‘शंकराभरणम्’ नावाचा एक तेलुगु चित्रपट लागला होता. मी तेव्हा दादरला पंडित वसंतराव कुलकर्णी आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम घेत होतो.  त्या दोघांकडे अनेक उत्तमोत्तम गायक आणि गायिकांचा राबता असायचा. त्यातच एक दिवस संगीतभूषण पंडित राम मराठे आपल्या शिष्यांसोबत वसंतरावांच्या क्लासमध्ये आले . त्यांनी ‘शंकराभरणम्’ चित्रपटाचा विषय काढला. त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य पंडित सुरेश डेग्वेकर व त्यांच्या भगिनी शोभाताई होत्या. त्या दोघांनी हा चित्रपट बघण्याकरता मला गळ घातली. मी तेव्हा वरळीच्याच लाला लजपतराय कॉलेजमध्ये शिकत होतो, त्यामुळे मला गीता थिएटर चांगलेच माहीत होते. तिथे येणारा वर्ग हा बहुतांश झोपडपट्टीत राहणारा असे. त्यामुळे प्रथम चित्रपट बघायला त्या थिएटरमध्ये जायला मन तयार होईना. एके दिवशी सर्व हिंमत एकवटून चित्रपट पाहण्यासाठी तिकीट काढलं.

पडदा सरला, तानपुऱ्याचा मधुर ध्वनी कानी पडला आणि क्षणार्धात सारं हाऊसफुल्ल थिएटर स्तब्ध झालं. तेलुगु भाषा न समजणारा कदाचित मी एकटाच प्रेक्षक असेन. ओमकार ध्वनीनं चित्रपटातील पहिल्या गाण्याला सुरुवात होते. ‘ॐकार नादानु संधानु मौ गान में, शंकराभरणम्’ एस. पी. बालसुब्रमण्यम् यांच्या भारदस्त आवाजात या गीतानं चित्रपटाला सुरुवात होते आणि गीत संपता संपता चित्रपटाची मोहिनी रसिक प्रेक्षकांना भुरळ घालते. अगदी एखादा प्रथितयश गायक पहिल्या समेला मैफल खिशात घालतो तशी! संगीतकार के. व्ही. महादेवन यांनी या चित्रपटाला अप्रतिम संगीत दिलं आहे. अगदी अभिषेकी बुवांनी एखाद्या मराठी संगीत नाटकाला द्यावं तसं. या चित्रपटात शंकरशास्त्री ही मध्यवर्ती भूमिका ज्यांनी साकारली, त्यांचा खऱ्या अर्थाने हा पहिलाच चित्रपट.  पण या भूमिकेकरिता त्यांना तेलुगु चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळालं. त्या अगोदर या शंकरशास्त्री म्हणजे जे. व्ही. सोमयाजुलु यांनी ‘ज्योती’ या तेलुगु चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली होती. मुळात राज्य शासनाच्या महसूल विभागात ‘डेप्युटी कलेक्टर’ म्हणून नोकरी करणाऱ्या सोमयाजुलु यांचा नाटकाशी थोडाफार संबंध होता. पण चित्रपटाशी बिलकूल संबंध नव्हता. त्याच्या बरोबर दुसऱ्या मध्यवर्ती भूमिकेत होती मंजू भार्गवी- ही ‘तुलसी’ या नायकिणीच्या मुलीच्या भूमिकेत. म्हणजे मध्यवर्ती भूमिकेतील दोन्ही कलाकार फारसे नावाजलेले नव्हते. कामेश्वर रावच्या भूमिकेत नावाजलेले एकमेव कलाकार चंद्रमोहन सोडले तर कुणीही कलाकार नावारूपास आलेला नव्हता. मग हे रसायन जमलं कसं? ते जमवून आणलं एका महान कलातपस्वी योग्यानं. मराठीतील भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम किंवा बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या पंगतीतलं दाक्षिणात्य किंवा तेलुगु सिनेसृष्टीतलं एक नाव म्हणजे कासिनधुनी विश्वनाथ, म्हणजेच के. विश्वनाथ. ३ फेब्रुवारीला सकाळी तेलुगु चित्रपटसृष्टीमधील दिग्गज दासारी नारायण राव यांच्या स्नुषेने के. विश्वनाथ यांच्या निधनाचे वृत्त कळविले. तेव्हा मला धक्काच बसला.  

विश्वनाथ आणि त्यांच्या कुटुंबाशी माझे एका भेटीतच चांगले संबंध प्रस्थापित झाले. अनेक वर्ष त्यांचा शोध घेऊनही त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. मागे युनियन बँकेनं मला हैदराबाद येथे त्यांच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलावलं होतं. मी युनियन बँकेच्या तत्कालीन जनरल मॅनेजरना माझी इच्छा वजा अट बोलून दाखवली आणि त्यांनी आमची भेट घडवून आणली. मी के. विश्वनाथ यांच्या फिल्म नगर या ज्युबिली हिल, बंजारा हिल प्रभागातील राहत्या घरी पोहोचलो. के. विश्वनाथ म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतलं एक अत्युच्च शिखर. चिरंजीवी, कमल हसन, हेमा मालिनी, जयाप्रदा, दिग्दर्शक अदूर गोपाल कृष्णन यांसारखे कलावंत ज्यांचे आशीर्वाद घेण्यास त्यांच्या घरी यायचे ते कलातपस्वी के. विश्वनाथ.. प्रशस्त बंगल्यात शिरताच रवींद्रनाथ यांनी माझं स्वागत केलं व समोर साक्षात कलातपस्वी बसलेले होते. आमचा गप्पांचा फड रंगला. विषय फक्त एकच होता ‘शंकराभरणम्’ आणि त्यातही मी हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत, कंठ संगीत शिकलो आहे, हे त्यांना सांगताच मला म्हणाले, ‘‘मी ‘कटय़ार काळजात घुसली’ हा मराठी चित्रपट बघितला. त्यातील एक गायक कलाकार मला येऊन भेटून गेले.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘हे मूळ संगीत नाटक मराठी रंगभूमीवर १९६७ साली आलं व त्याचे संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी होते- जे माझे गानगुरू.’’ हे ऐकून ते कलातपस्वी आनंदित झाले. ‘शंकराभरणम्’ या चित्रपटाविषयी बोलणं सुरू झालं आणि पहिली भेट फक्त ‘शंकराभरणम्’ विषयापुरती मर्यादित राहिली. कारण कलातपस्वींनी अनेक तेलुगु व हिंदी फिल्मस् निर्मिल्या, तथापि त्यांच्या कलाकारकीर्दीचं अत्युच्च शिखर म्हणजे ‘शंकराभरणम्’, जसं अभिषेकींचं ‘कटय़ार काळतात घुसली’ हे संगीत नाटक.

१९७८/७९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पाश्चात्त्य संगीताच्या चालींतून कॉपी पेस्ट करून हिंदी चित्रपट गीत निर्मितीचं वारं अंगात जोमानं भरत होतं. जुन्या अवीट चालींचा   चित्रपट ‘आँधी’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमानंतर ओसरू लागला होता. हे माझ्यासारख्या वयाच्या चौथ्या वर्षांपासून रेडियो सिलोन, बिनाका गीतमाला ऐकणाऱ्याला  जाणवू लागलं होतं. नेमकं हेच कलातपस्वींनी हेरलं आणि अभिजात संगीतावर आधारित एक चित्रपट निर्मितीचा विचार मनोमन निश्चित केला. मूळ कथा व संभाषण त्यांनीच लिहिलं. ‘‘कसं सुचलं हे कथानक?’’ मी विचारलं. त्यावर ते म्हणाले, ‘‘ही सर्व माझ्यावरील शिवशंकराची कृपा आहे.’’ कलातपस्वी शंकराचे निस्सिम भक्त होते, त्यांच्या घरी गेल्यावर भिंतीवर शंभो महादेवाचं चित्र पाहिलं की लगेच कळून येत होतं.

‘शंकराभरणम्’चं कथानक अगदी साधं सोपं. शंकरशास्त्री हे कर्नाटक संगीतातील विद्वान व शंकराभरणम् हा राग जणू त्यांच्यावर प्रसन्न होता. एका मैफिलीत मंजू भार्गवी (तुलसी) ही नृत्यांगना तिच्या देवदासी आईबरोबर आली असता तल्लीनतेनं शंकरशास्त्रींचं गायन ऐकत असते. तेवढय़ात एक प्रतिष्ठित जमीनदार येतात व तिचा हात धरून घेऊन जातात. तुलसीला फक्त नृत्यांगना व्हायचं असतं. आई मात्र जमीनदाराबरोबर तिला श्रृंगारास भाग पाडते, जमीनदार बलात्कार करतो. त्यातून एक पुत्र जन्मास येतो. दरम्यान आई मरते. नृत्यांगना तुलसी जमिनदाराचा खून  करते. मुलीला बळजबरीनं वेश्यावृत्तीस प्रवृत्त केल्यानं आईला अटक होते. नृत्यांगना तुलसी (मंजू भार्गवी) ला शंकरशास्त्री (जे.व्ही. सोमयाजुलु) आसरा देतात. ते गावकऱ्यांसह त्यांच्या कर्मठ साथीदारांना पटत नाही व सर्व जण त्यांची साथ सोडतात. एकेकाळी ऐशोआरामात राहणाऱ्या शास्त्रींची परिस्थिती हलाखीची होते. यात सुमारे दहा-बारा वर्षे उलटतात. एक दिवस नृत्यांगना तुलसी- जी शंकरशास्त्रींना गुरुस्थानी मानत असते, तिला दिवंगत आईची संपत्ती, पैसाअडका मिळतो. तो सर्व ती शंकरशास्त्रींच्या नावानं एक सभागृह बांधण्यात खर्च करते. दरम्यानच्या काळात बलात्कारातून झालेल्या मुलास ती शंकरशास्त्रींच्या घरी काम करण्यास प्रवृत्त करते, जेणेकरून त्याच्यावर संगीताचे संस्कार होतील आणि त्या प्रयोगात ती यशस्वीही होते. या दरम्यान पाश्चात्त्य संगीताचे डोळे झाकून अनुकरण करणारी तरुण टवाळ मुलं शंकरशास्त्रींची टिंगल-टवाळी करतात. त्यांना त्यांच्याच सुरात गाऊन शास्त्रीबुवा चोख उत्तर देतात. सरतेशेवटी त्या सभागृहात शंकरशास्त्री पुन्हा मोठय़ा श्रोतृवृंदासमोर गायला लागतात, परंतु दुर्दैवाने त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. डॉक्टर मदतीसाठी सरसावतात, पण त्यास शंकरशास्त्री नकार देतात. दरम्यान नृत्यांगनेचा मुलगा ते गायन पूर्ण करतो. िवगेत उभी राहून तुलसी  हे सर्व बघत असते. तेव्हा शंकरशास्त्रींना कळतं की हा तुलसीचा मुलगा आहे. ते आपल्या पायातलं सोन्याचं कडं त्या मुलाच्या पायात घालतात आणि त्याला आपला सांगीतिक वारस नेमतात व प्राण सोडतात. त्यांच्या चरणावर डोकं ठेवून तुलसी नृत्यांगनासुध्दा गुरुचरणी प्राण सोडते. शेवटी अनाथ मुलाला शंकरशास्त्रींची कन्या शारदा व जामात आपल्यासह घेऊन जातात. एवढंच कथानक.

सोमयाजुलांचा शंकरशास्त्री चित्रपटात काम करण्याचा कुठलाही पूर्वानुभव नसताना एवढा गाजला की ‘फोब्र्स्’ मासिकाने भारतीय चित्रपटसृष्टीतील २५ अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट केलं आहे. या चित्रपटातील सर्व गाणी १९७९ मध्ये बाजारात आली आणि प्रसिद्ध झाली. सुरुवातीचं ‘ॐकार नादानु संधानु मौ गान में’, त्यानंतर ‘रागम तालम पल्लवी’, ‘संकरा नादसरीरा हर’, ‘दोरेकुना इटुवंती सेवा’ ही सर्व राग संगीतावर आधारित फिल्मी गीतं सुपरहिट झाली.

‘‘या चित्रपटाची निर्मिती करताना माझ्याकडे पुरेसा निधी नव्हता म्हणून मी सुपरस्टार्स घेऊ शकलो नाही. तथापि सर्व कलाकारांनी आपआपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आणि त्यातून एक भव्य कलाकृती निर्माण झाली.’’ लो बजेटचे चित्रपट काढून ते यशस्वी कसे करायचे याचा गुरुमंत्र राजश्री पिक्चर्सच्या ताराचंद बडजात्या यांनी कदाचित कलातपस्वींकडून घेतला असावा असं वाटतं.

शंकरशास्त्री म्हणजे कसलेले गायक- ज्यांच्या डोळय़ात जरब आहे. अतिशय शिस्तप्रिय माणूस व गायक. लोकांच्या मनात आदरयुक्त भीती. मोजक्याच मैफिली स्वीकारणारे अगदी पंडित कुमार गंधर्वाप्रमाणे व साक्षात सरस्वतीचे उपासक. स्वत:ची मुलगी शारदा मालकौंस रागात नसलेला स्वर चुकून ‘ऋषभ’लावते, तेव्हा त्याची शिक्षा स्वत:च्या हातावर कापूर जाळून करणारे शंकरशास्त्री.. टवाळकी करणाऱ्या पोरांना शास्त्रीय गायकीने चोख उत्तर देणारे शंकरशास्त्री.. नृत्यांगनेच्या मुलाला जातीभेद विसरून आपला उत्तराधिकारी म्हणून नेमणारे शंकरशास्त्री.. हे सारं कसं जमलं असं विचारल्यावर कलातपस्वी म्हणाले, ‘‘आम्ही रोज तालिम करायचो. प्रत्येक प्रसंग दहा वेळा घोटून घेऊन नंतर ‘टेक’ घ्यायचो. सर्व कलाकारांनी झोकून काम केलं होतं. त्यांना त्यांच्या भूमिकेत एक प्रकारची धुंदी चढली होती. प्रत्येक गीताला के. व्ही. महादेवन यांचं संगीत कंठातून काढणारे एस. पी. बालसुब्रमण्यम् व चंद्रमोहन, हे कलातपस्वींचे चुलत बंधू तर नुकत्याच निवर्तलेल्या वाणी जयराम यांनी एस. पी. बालसुब्रमण्यम् यांच्यासह दिलेला स्वरसाज यामुळे सर्वार्थानं हा चित्रपट गाजला. आश्चर्य म्हणजे सुरुवातीच्या आठवडय़ात या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकले नाहीत, तेव्हा मला धक्का बसला की चित्रपट नक्की चालेल की नाही? पण आठवडय़ाभरात या चित्रपटाविषयी केवळ कानोकानी जे रिपोर्ट गेले, पब्लिसिटी झाली तेव्हा गर्दी नियंत्रित करणं कठीण झालं. १९८० मध्ये ब्लॅकनं एक तिकीट रु. १००/- ते रु. २००/- ला विकलं जात होतं.’’

 ‘‘काही महिन्यातच हा चित्रपट मल्याळम भाषेत डब झाला आणि केरळमध्येही सुपरहिट ठरला. एका प्रेक्षकानं हा चित्रपट ९९ वेळा बघितला व त्याची तिकिटं नीट चिकटवून पोस्टानं पाठवली.’’ही आठवणही कलातपस्वींनी सांगितली. मी स्वत: हा चित्रपट ३५ वेळा बघितला, हे सांगताच ते हर्षभरित झाले.

 नॅशनल फिल्म अ‍ॅवॉर्ड, फिल्मफेयर अ‍ॅवॉर्ड (दक्षिण भारत), नंदी अ‍ॅवॉर्ड मिळून एका वर्षांत या चित्रपटाला १२ पुरस्कार मिळाले. अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला. या वर्षी गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये लिजंड सीरिजमध्येही चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटावरून ‘सूरसंगम’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली. ‘सरगम’, ‘कामचोर’, ‘जाग उठा इन्सान’, ‘संजोग’, ‘ईश्वर’, ‘संगीत’ अशा हिंदी चित्रपटांसहित अनेक तेलुगु चित्रपटांची निर्मिती कलातपस्वी यांनी केली. त्यांच्या कारकीर्दीतला एक मैलाचा दगड म्हणजे ‘शंकराभरणम्’ या एका चित्रपटाची निर्मिती करून ते थांबले असते तरी अजरामर झाले असते. 

कलातपस्वींचा पुनर्जन्मावर विश्वास होता. भगवान शंकरानं जर त्यांना विचारलं असतं की ‘कुठला जन्म देऊ?’ तर त्याचं उत्तर त्यांनी ‘शंकराभरणम्’च्या शेवटच्या गाण्यात दिलं आहे. ‘दोरेकुना इटुवंती सेवा, नीपद राजीवमुल चेरु निर्वाण, सोपान मदिरोहा मनु सेयू त्रोवा, दोरेकुना इटुवंती सेवा..’- तुझी सेवा करण्याचा जन्मोजन्मी योग यावा व राहिलेलं कार्य पूर्ण व्हावं, असा जन्म मला दे.

(लेखक ‘टाटा स्टील’चे माजी जनसंपर्क प्रमुख, तसेच शास्त्रीय कंठसंगीत व जुन्या हिंदी चित्रपटसंगीताचे अभ्यासक.)