|| अभिजीत ताम्हणे

महाराष्ट्रातल्या उपयोजित कलेनं आकार आणि रंगांसोबत अवकाशाचंही मर्म ओळखण्याचा काळ बाळ ठाकुरांचा. या काळाला त्यांनी न्याय दिलाच; पण त्यांच्या रेखाचित्रांचं कालातीत मोल कुणी ओळखेल का?

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

‘छानच की! पण गंभीर म्हणजे कोणती रे पुस्तकं वाचतोस?’

मराठीची प्राध्यापक असलेल्या मावशीच्या या प्रश्नासरशी अकरावीतल्या भाच्याच्या डोळ्यांपुढे विविध विषयांवरली अनेकानेक पुस्तकं तरळली… साधारण १९८१ चा सुमार असल्यानं त्यात पुलंच्या ‘रवीन्द्रनाथ : तीन व्याख्याने’सारखं तेव्हाचं नवं पुस्तक होतं, दुर्गा भागवतांचं ‘धर्म आणि लोकसाहित्य’, वा. ह. देशपांडे यांचं ‘घरंदाज गायकी’ अशीही काही होती… या सगळ्याबद्दल मावशीला एका वाक्यात सांगायचं म्हणून भाचा म्हणाला : ‘अं… म्हणजे साधारण बाळ ठाकुरांची मुखपृष्ठं ज्या पुस्तकांना असतात ना, ती सगळी!’ यावर मावशीनं आधी ‘ हो क्का?’ असा तुच्छतादर्शक उद्गार काढूनच ‘मुखपृष्ठं कोणी केलीत यावरनं ठरतं का रे पुस्तक गंभीर असणं-नसणं?’ असंही विचारलं होतं. आज ती मावशी नाही. आता तर बाळ ठाकूरसुद्धा नाहीत. पण तरीही उरलेल्यांमध्ये खूप लोक आहेत : ज्यांना गांभीर्यानं सकस काहीतरी वाचल्याचं समाधान आणि बाळ ठाकूर यांचं मुखपृष्ठ पाहिल्याचं समाधान हे दोन्ही एकत्रच देणारी भरपूर पुस्तकं माहीत असतील… आठवत असतील- मुखपृष्ठांसकट. ‘रवीन्द्रनाथ : तीन व्याख्याने’ हे तर बाळ ठाकुरांच्या सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठांपैकीच आहे, पण कमल पाध्येंचं ‘बंध अनुबंध’ आणि त्यानंतर काही वर्षांनी आलेलं सुनीता देशपांडे यांचं ‘आहे मनोहर तरी…’, कृ. द. दीक्षित यांचं ‘सहवास’ अशीसुद्धा कैक पुस्तकं. रूढार्थानं त्यात ज्ञानलक्ष्यी असं काही नसेल, पण सांस्कृतिक समज रुंदावणारी अशी ही पुस्तकं.

त्या मावशीचा तो भाचा जर अकरावीतल्याऐवजी अनुभवी कलासमीक्षक वगैरे असता तर त्यानं तिथल्या तिथं ठणकावून सांगितलं असतं तिला-  ‘होयच. बाळ ठाकूर हे ज्या पुस्तकांची मुखपृष्ठं करतात, त्या पुस्तकांचं गांभीर्यच जणू ठाकूर यांच्या रेषेतून, मुखपृष्ठावरल्या घटकांच्या मांडणीतून आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी रंग-आकारांचा वापर करण्याच्या ठाकूर यांच्या शैलीतून वाचकापर्यंत पोहोचतं. अल्पाक्षरी लेखक जसे महत्त्वाचे, तशीच ठाकूर यांची अल्परंगी शैली इथं महत्त्वाची. कारण या पुस्तकांचा वाचक काही मुखपृष्ठाला भुलून पुस्तक वाचणार नाहीये, याची समज जणू त्या शैलीत होती.’

दीनानाथ दलाल यांच्या काळातलं आव्हान निराळं होतं. कमीत कमी रंगांत, ब्लॉक फार फुकट जाणार नाही याचं तारतम्य बाळगून आकर्षक आणि बहुरंगी भासणारं मुखपृष्ठ करण्याचं ते आव्हान होतं. मराठी प्रकाशन व्यवसायाची एकंदर अर्थघडी नंतर काही फार सुधारली वगैरे नसली तरी रंगबावऱ्या इंदिरा संतांसाठी रंगधर्मी पद्मा सहस्रबुद्धेंची मुखपृष्ठं देण्यापर्यंत तजवीज प्रकाशक करायचे. ‘हा नायक आणि ही नायिका’   अशी चित्रं मुखपृष्ठावरच काढून दाखवण्याचा जमाना संपल्यावर बाळ ठाकूर अवतरले… म्हणजे जाहिरात संस्थांमधल्या आपल्या कामांचा व्याप सांभाळत मराठीकडे लक्ष देते झाले. जाहिराती साधारण १९७० च्या आसपास अधिक नीटनेटक्या, स्वच्छ दिसणाऱ्या होतच होत्या. जाहिरातीतला भरगच्चपणा जाऊन, पांढरी जागा ही ‘रिकामी’ नसून त्या अवकाशामुळे आकाराकडे लक्ष जाणार आहे असं मानण्याचा मोकळेपणा तोवर जाहिरात क्षेत्रात आला होता. हा नेमका बाळ ठाकूर यांचा काळ. त्यांच्या अगदी पहिल्यावहिल्या मुखपृष्ठांपैकी ‘इंधन’ या हमीद दलवाईंच्या कथासंग्रहावर रंग असे काही आहेत, की दलालांचा प्रभाव कसा ओसरू म्हणता ओसरला नव्हता याची खात्रीच पटावी. पण हे रंग वापरणं ही ठाकूर यांची निवड नसावी बहुधा, असं पुढे ‘बिअरची सहा कॅन्स’चं मुखपृष्ठ पाहून म्हणता येतं. या दोन्ही मुखपृष्ठांवरली आकृतीरेखनाची पद्धत एकाच जातकुळीची आहे. पण ‘बिअरची सहा कॅन्स’मध्ये बाळ ठाकुरांना त्यांच्या मनासारखं काम करता आलंय. मुखपृष्ठावरलं चित्र दर्शनी पानावरून, कण्यावरून मलपृष्ठापर्यंत नेण्याचा ‘ठाकूर टच्’ इथंही आहे!

‘बिअरची सहा कॅन्स’च्या पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ थेट पॅकिंगच्याच खोक्याची आठवण देणाऱ्या रंगाचं आणि तश्शाच पोताचं होतं. हे मुखपृष्ठाच्या कागदाचा पोतबीत बघायचा असतो असं तोवर फार तर ‘प्रास’वाल्या अशोक शहाणेंना माहीत असावं. या प्रास प्रकाशनाच्या ‘इसम’ या गौरकिशोर घोष यांच्या (अनुवाद : अशोक शहाणे) कादंबरीचंही मुखपृष्ठ बाळ ठाकुरांचं होतं का, हे आता आठवत नाही. पण ‘गांधी मला भेटला’ ही पोस्टर कविता मात्र ठाकूर यांच्याच चित्रानिशी, मांडणीनिशी निघाली होती. पुढे ती वादग्रस्त ठरली. तिच्या फेरप्रकाशनावरूनही फौजदारी खटले झाले, हे जरा विसरू आणि आत्ता एवढंच लक्षात ठेवू की, बाळ ठाकूर हे फक्त मौज प्रकाशनाचे नव्हते. शिवाय मौजेचं नावही न घेता त्याकाळी जो कंपूशाहीचा आरोप केला जाई, त्या कंपूतही बाळ ठाकूर नव्हते.

पण ‘मौज’ दिवाळी अंकांच्या आतली चित्रं गेली कित्येक वर्षं बाळ ठाकूरांची असत. त्यांची लीलया वाहत जाणारी, रस्ता नेमका माहीत असणारी, लांब आणि हवी तेवढीच ठसठशीत रेषा हे या सर्व रेखाचित्रांचं वैशिष्ट्य. दहा वर्षांतल्या ‘मौज’चे अंक एकत्र पाहिल्यास बाळ ठाकुरांच्या चित्रांतली सलगता लगेच भिडेल. म्हणूनच या रेखाचित्रांच्या मूळ प्रती जर कुणी जपून ठेवल्या असतील तर ठाकुरांना आदरांजली म्हणून त्या रेखाचित्रांचं तरी नीटसपणे प्रदर्शन व्हायला हवं. एखाद्या चित्रप्रदर्शनाकडून दृश्यसंलग्नतेची जी अपेक्षा असते, ती या रेखाचित्रांतून पूर्ण होते. हे अर्थात ठाकूर यांच्या बाकीच्या अनेक ठिकाणच्या रेखाचित्रांबद्दलही म्हणता येतं. मग ती चित्रं पुस्तकांतली असोत की विजय तेंडुलकरांनी संपादित केलेल्या आणि एकदाच निघालेल्या ‘जाहीरनामा’सारख्या अंकातली असोत.

ज्या भाच्यानं मावशीकडून चाळीसेक वर्षांपूर्वी (बाळ ठाकुरांच्या निमित्तानं) अपमान सहन केला होता, त्याला आजही ठाकुरांची अनेक रेखाचित्रं आठवतात… ‘रावबाच्या रंगीचा लखू’, ‘कुंडलीक’ या वल्लीसारख्या व्यक्ती ठाकुरांनी पाहिल्या असणं शक्यच नसताना त्या त्यांनी कशा साकारल्या होत्या, हे ती चित्रं आता कुठेच डोळ्यांसमोर नसूनही सगुणसाकार आठवतं. ठाकूर यांच्या अनेक व्यक्तिरेखाटनांमध्ये त्या- त्या व्यक्तीची वेदना दिसायची. जणू त्या काल्पनिक पात्राच्या काळजातली ठसठस बाळ ठाकूर ओळखायचे, असंच त्यांची भरपूर रेखाचित्रं आता सलग पाहताना वाटतं. त्यांच्या रेषेतच तो गुण होता… ठसठस ओळखणारी ठसठशीत रेषा! बाळ ठाकुरांचे मित्र वसंत सरवटे यांच्या चित्रांचं ‘सर्वोत्तम सरवटे’ असं पुस्तक कधीच झालंय. ठाकूर यांच्या रेखाचित्रांचं पुस्तक करण्याची सुबुद्धी कुणाला सुचलीच, तर त्या पुस्तकाचं नाव ‘ठसठशीत ठाकूर’ असेल का?

abhijit.tamhane@expressindia.com